Saturday, July 29, 2023

आठवणीतले एस. टी. रूटस : विदर्भ

बालपणी नागपूरवरून चंद्रपूरला आजोळी जाण्यासाठी अगदी पहिली बस म्हणजे पहाटे 3.45 ला निघणारी नागपूर - टपाल गाडी - चंद्रपूर. नागपूरच्या विविध छापखान्यांमध्ये छापल्या गेलेली नागपूरची वर्तमानपत्रे (तरूण भारत, नागपूर पत्रिका, हितवाद, नवभारत वगैरे) ही गाडी जांब - वरोरा - भद्रावती आणि चंद्रपूरला घेऊन जात असे. म्हणून या गाडीला "पेपर गाडी" ही म्हणत असत. प्रत्येक ठिकाणचे एजंटस त्या त्या बसस्टॅण्डवर येऊन त्यांचे त्यांचे वर्तमानपत्रांचे गठ्ठे घेऊन जात असत. आमच्या बालपणी चंद्रपूरला घरोघरी वर्तमानपत्रे सकाळी 9.00 च्या आसपास पोहोचत असत. ही गाडी वरो-याला, भद्रावतीला गावात असलेल्या बसस्टॅण्डवर जात असल्याने चंद्रपूरला तब्बल सकाळी 7.30 ला पोहोचत असे. 153 किमी अंतरासाठी पावणेचार तास. अशाच एका टपाल गाडीने प्रवास केल्याची आठवण इथे. 

या गाड्यांचे मार्गफ़लक लाल रंगावर पिवळ्या अक्षरांनी अंकित असत. तेव्हा महाराष्ट्र एस. टी. चे नियम अगदी पक्के होते. सर्वसाधारण सेवांचे  (सगळे थांबे घेणा-या ऑर्डिनरी सेवा) मार्गफ़लक काळ्या बोर्डावर पांढरी अक्षरे, जलद सेवेच्या बसेसचे मार्गफ़लक पांढ-या बोर्डावर लाल अक्षरे, अती जलद (Super - Express) सेवांचे पांढ-या बोर्डवर हिरवी अक्षरे, टपाल गाड्यांचे मार्गफ़लक लाल रंगावर पिवळ्या अक्षरांनी तर बाजार गाड्यांचे मार्गफ़लक पिवळ्या बोर्डावर लाल अक्षरांनी अंकित असत.


त्यापाठोपाठ पहाटे 5.30 ला नागपूर - अहेरी ही अहेरी डेपोची अती जलद (सुपर) बस असायची. ही बस तीन तास वीस मिनीटांत चंद्रपूरला पोहोचायची. तिच्यापाठोपाठ चंद्रपूर डेपोची नागपूर सुपर चंद्रपूर. चंद्रपूर डेपो आपल्या नव्या गाड्यांच्या ताफ़्यातल्या बसेस या टायमिंगला पाठवायचेत. ही बसही नागपूर ते चंद्रपूर प्रवासासाठी तीन तास वीस मिनीटे घ्यायची. त्याकाळी 6.00, 9.00, दुपारी 12.00, 13.30, 15.00 संध्याकाळी 18.00 व रात्री 22.00 या टायमिंग्जवर या नव्या बसेस असायच्यात. सकाळी या बसचे आरक्षण उपलब्ध झाले नाही की आम्ही पहाटे 5.30 च्या अहेरी बसने जाण्याचा बेत करायचो. इतक्या पहाटे या बसला कुठल्याही मोसमात गर्दी नसायची. अहेरी डेपोची ही रात्रमुक्कामी बसही तशी नवीच असायची. आजही पहाटे 5.30 ला नागपूर जलद अहेरी ही बस आहेच. 






चंद्रपूरवरून नागपूरला परतताना 5.30 ची चंद्रपूर जलद नागपूर, 6.00 ची चंद्रपूर सुपर नागपूर या बसेस होत्या. आजही आहेत. या बसेसविषयी सविस्तर लेखन या लेखात झालेले आहे. तेव्हा चंद्रपूर डेपोतून सकाळी 6.00 च्या सुमारास एक एशियाड बस (सेमी लक्झरी, आजचे ब्रॅंडनेम: हिरकणी) निघायची. प्लॅटफ़ॉर्मवर न येता सरळ बाहेर जाऊन तुकुम रोडने उर्जानगरकडे जायची आणि 6.30 ला चंद्रपूर बसस्थानकात उर्जानगर एशियाड नागपूर म्हणून दाखल व्हायची. पण 6.00 ची सुपर तुलनेने नवीन गाडी असायची त्यामुळे बरोबर तीन तास वीस मिनीटांत नागपूरला पोहोचणारी बस म्हणून तिचाच स्वीकार व्हायचा. ही बस नेहेमीच फ़ुल्ल असायची. ब-याचदा आसन क्र. 8 ते 54 पूर्णपणे आरक्षित असायचेत. 




मधल्या काळात MWQ 6630 व MWQ 6636 या दोन गाड्यांची जोडी एक सकाळी नागपूरवरून 6.00 ची व एक सकाळी चंद्रपूरवरून 6.00 ची अशी जात असे. या गाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यात आसनांची एक रांग जास्त होती. सर्वसामान्य बसगाड्या 54 आसनी असत. या दोन गाड्या 59 आसनी होत्या. मला वाटतं महामंडळाच्या दापोडी कार्यशाळेने त्याकाळी बांधलेल्या या MWQ 65XX आणि MWQ 66XX सिरीजमधल्या सगळ्याच बसेस 59 आसनी होत्या. त्यामुळे सकाळी 6.00 ची ही बस फ़लाटावर लागताना कंडक्टर साहेब जेव्हा "पूर्ण बस रिझर्वड आहे" असे ओरडून सांगायचेत तेव्हा इतर मंडळी हिरमुसली होऊन या बसचा नाद सोडायचीत आणि यामागे येणा-या उर्जानगर एशियाड किंवा 7.00 वाजता येणा-या राजुरा जलद नागपूर बसची वाट बघायचीत तेव्हा आम्ही बसफ़ॅन मंडळी बिनधास्त आत घुसून आसन क्र 55 ते 59 वर आरामात बसायचो. कारण आम्हाला माहिती असायचं की या बसचे आरक्षण 54 पर्यंतच दिल्या गेलेले आहे. आरक्षण खिडकीवर ही बस 59 आसनी आहे हे माहिती नाही. आणि माहिती असले तरी 55 ते 59 आसनांचे आरक्षण ते देऊ शकत नाहीत. (तसे आरक्षण त्यांनी दिले आणि ऐनवेळी 54 आसनी बस या वेळेवर द्यावी लागली तर? हा प्रॅक्टीकल विचार त्यामागे असावा.)

सकाळी 6.00 च्या सुपर नंतर आमची पसंती असायची ती सकाळी 8.00 वाजता निघणा-या चंद्रपूर सुपर गोंदिया या गाडीला. आदल्या दिवशी संध्याकाळी 6.30 ला चंद्रपूरला आलेली ही गोंदिया डेपोची बस डेपोबाहेर प्रवाशांच्या उतरण्याच्या जागेवरच आपल्या ड्रायव्हर - कंडक्टरना घेऊन झोपलेली असायची. गोंदिया डेपो आपल्या ताफ़्यातली चांगली बस या मार्गावर द्यायचेत. तिच्याच उजव्या बाजूला थोड्या अंतरावर काल रात्री उशीरा 11.00 च्या सुमारास चंद्रपूरला आलेली तुमसर डेपोची तिचीच चुलत बहीण गाढ झोपलेली असायची. तिला नागपूरकडे परतीसाठी वेळ असायचा. ती 9.30 ला नागपूरकडे निघायची. गोंदिया बसच्या मानाने तुमसर बस जरा जुनी असायची. आणि ही बस नागपूरकडे जाताना भद्रावती गावात, वरोरा गावात आत जायची त्यामुळे चंद्रपूर ते नागपूर प्रवासासाठी 4 तास लावायची. ही बस आमचा चॉईस कधीच नव्हती. 





आजही चंद्रपूर गोंदिया ही गोंदिया डेपोची बस आहे. पंण ही बस पहाटे 5.30 ची चंद्रपूर नागपूर जलद आणि सकाळी 6.00 ची चंद्रपूर नागपूर जलद या दोन गाड्यांमध्ये पहाटे 5.45 ला आहे. 5.30 आणि 6.00 च्या वेळांवर चंद्रपूर डेपो त्यांच्याकडल्या नव्या बसेस नागपूरला पाठवतात त्यामानाने गोंदिया डेपोची बस जुनीच असते. ग्लॅमरविहीन. 5.30 आणि 6.00 च्या बसेस चंद्रपूर ते नागपूर प्रवास 2 तास 30 मिनीटे ते 2 तास 45 मिनीटांत करतात तर गोंदिया बस हाच प्रवास रखडत 3 तास 15 मिनीटे ते 3 तास 30 मिनीटांत करते. या गाडीला जाणकार लोकांची पसंती नसते. या गाडीने जाण्यापेक्षा लोक 15 मिनीटे वाट बघून मग 6.00 च्या नव्या बसने निघतात. आणि नागपूरला हिच्या आधी पोहोचतात.

बाकी 6.00 च्या वेळावर नवी गाडी आणि ती सुद्धा दापोडी कार्यशाळेतच बांधलेली हा चंद्रपूर डेपोचा दंडक अगदी जुना आहे. MWQ 6630 व MWQ 6636 या जोडगोळीनंतर MWR 172 व MWR 173, MH - 12 / 8830 व MH-12 / 8832 ते BS 4  एंजिनची माईल्ड स्टीलने बांधलेली MH - 14 / HG 8221  व MH-14 / HG 8225 ही जोडी आणि आता BS 6 मानकांची नव्या डिझाईनची MH-14 / KA 8493 व MH -14 / KA 8597 ही जोडगोळी कायम चंद्रपूर - नागपूर या 6.00 च्या वेळेवर असते. आज ही तर उद्या ती या हिशेबात. त्यातली MH-14 / KA 8493 ही बस तर दापोडी कार्यशाळेने बांधलेली BS 6 मानकांची नव्या डिझाईनची या प्रकारची पहिलीच बस आहे. ती त्यांनी चंद्रपूर डेपोला दिली. चंद्रपूरला आल्यानंतर या गाडीने पहिली ट्रिप चंद्रपूर ते शेगाव मार्गावर केली आणि त्यानंतर आजपर्यंत दररोज चंद्रपूर - नागपूर मार्गावरची ही फ़िक्स्ड गाडी आहे. 

सकाळी 6.00 वाजता चंद्रपूर - नागपूर सुपर बसशेजारी चंद्रपूर सुपर शेगाव ही चंद्रपूर डेपोचीच बसही लागलेली असायची. चंद्रपूर डेपोला नवीन बस मिळाली की तिची पहिली फ़ेरी चंद्रपूर -  शेगाव आणि चंद्रपूर - शिर्डी मार्गावर झालीच पाहिजे असा अलिखित दंडक होता. गजानन महाराज हे विदर्भाचे तर शिर्डीचे साईबाबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत. त्यामुळे त्या धार्मिक भावनेने या नवीन गाड्या पहिल्या फ़ेरीसाठी या दोन गंतव्याकडे जायच्याच. चंद्रपूर जलद शेगाव ही गाडी चंद्रपूरवरून यवतमाळला जाण्यासाठीची सकाळची पहिली गाडी होती. त्यामुळे ह्या गाडीतही यवतमाळपर्यंत आरक्षणे फ़ुल्ल असायचीत. चंद्रपूर - शिर्डी ही दररोज दुपारी 15.30 ला चंद्रपूरवरून निघणारी गाडी आता बंद झाली आहे. बंद झाली म्हणण्यापेक्षा तिचा विस्तार अहेरी पर्यंत करून तिला आता अहेरी - शिर्डी करण्यात आलेले आहे. ती गाडी चंद्रपूर डेपोकडून अहेरी डेपोकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. अहेरी - आलापल्ली - चंद्रपूर - वरोरा - जांब - हिंगणघाट - वर्धा - अमरावती - अकोला - खामगाव - चिखली - जालना - छत्रपती संभाजीनगर - नेवासा - राहुरी - शिर्डी जाणारी ही बस महाराष्ट्र राज्यातल्या राज्यात धावणारी सगळ्यात लांब पल्ल्याची बस म्हणून आपला लौकिक टिकवून आहे. महाराष्ट्र एस. टी. ची सगळ्यात लांब पल्ल्याची बस म्हणून मुंबई - बंगलोर ही 1100 किमी पल्ल्याची बस आहे पण राज्यातल्या राज्यात जवळपास 900 किमी धावणारी शिर्डी - अहेरी ही बस दुस-या क्रमांकावर येते. मध्ये चंद्रपूर डेपोने चंद्रपूर - पुणे (मार्गे नागपूर) हा स्कॅनिया शिवशाहीचा प्रयोग केला होता पण तो तितकासा यशस्वी ठरला नाही. फ़ार पूर्वी अहेरी - मुंबई या "महाबस"चा प्रयोगही असाच फ़सला होता हे सुद्धा या निमित्ताने स्मरते.



परतीच्या प्रवासात गोंदिया सुपर चंद्रपूर ही बस दुपारी 15.00 ला असायची. तर तुमसर जलद चंद्रपूर ही बस संध्याकाळी 19.15 ला असायची. तुमसरवरून नागपूरला येताना ही बस जुन्या भंडारा रोडने यायची आणि नागपूर शहरातल्या वर्धमाननगर - गंगाबाई घाट - महाल - टिळक पुतळा मार्गाने बसस्टॅण्डवर जायची. संध्याकाळी 18.45 च्या सुमाराला नरसिंग टॉकीजपाशी ही बस पहायला खूप मजा यायची. आजोळच्या आठवणींनी मन व्याकूळ व्ह्यायचे. केव्हा हे शैक्षणिक वर्ष संपतेय ? केव्हा सुट्ट्या लागतायत ? आणि केव्हा चंद्रपूरला जायला मिळतेय ? असे व्हायचे. 


यवतमाळ बसस्थानकातून चंद्रपूरकडे यायला सकाळी 6.00 वाजता यवतमाळ जलद अहेरी ही अहेरी डेपोची आदल्या दिवशी मुक्कामाला आलेली बसच असायची. यवतमाळ डेपोच्या चंद्रपूर जलद यवतमाळ या बसची दिवसभरात एकच फ़ेरी व्हायची. सकाळी 9.30 ला यवतमाळवरून निघालेली बस दुपारी 2 वाजता चंद्रपूरला यायची आणि परतताना दुपारी 2.30 ला निघून संध्याकाळी आपल्या मूळ मुक्कामी येऊन विश्रांती घेत बसायची. यवतमाळ - चंद्रपूर मार्गावर चंद्रपूर डेपोची शेगाव - चंद्रपूर, गडचिरोली डेपोची गडचिरोली - नांदेड, दारव्हा डेपोची दारव्हा - राजुरा, पुसद डेपोची पुसद - राजुरा आणि वाशिम डेपोची वाशिम - चंद्रपूर या मोजक्याच गाड्या असायच्यात. चंद्रपूर डेपोची एकही गाडी यवतमाळ - चंद्रपूर म्हणून धावायची नाही.

यवतमाळ - नागपूर बस मात्र अगदी एवंगुणविशिष्ट असायची. चंद्रपूर डेपोप्रमाणे यवतमाळ डेपोही आपल्या ताफ़्यातली उत्तम बस या मार्गावर द्यायचेत. सकाळी 6.00 ला निघालेली ही बस कळंब आणि देवळीला न थांबता फ़क्त वर्धेचा थांबा घेऊन नागपूरला सकाळी 9.00 ला टच असायची. त्याकाळी एकेरी रस्त्यांवरून 150 किमी अंतर 3 तासात पार करणे हे खरोखर कौतुकास्पद होते. चंद्रपूर आणि यवतमाळ डेपो आपापल्या ताफ़्यातल्या नुसत्या चांगल्या गाड्याच नव्हे तर चांगले अनुभवी ड्रायव्हर्सही या मार्गांवर द्यायचेत. सर्वाधिक भारमान असणारे, सर्वाधिक महसूल मिळवून देणारे हे मार्ग होते. 

हीच बस सकाळी 10.00 वाजता नागपूर - यवतमाळ मार्गावर परत निघून दुपारी 13.00 वाजता यवतमाळला टच असायची. दुपारी पुन्हा 14.00 ला यवतमाळवरून निघून नागपूर संध्याकाळी 5.00 ला आणि परतीच्या प्रवासात नागपूरवरून 18.00 ला निघून रात्री 21.00 ला यवतमाळ डेपोत ही बस झोपून झायची ती दुस-या दिवशी पुन्हा सकाळी 6.00 च्या यवतमाळ - नागपूरसाठी. महिनोंमहिने ही बस आणि हा क्रम असाच असायचा. त्यामुळे एकदा ही बस बघितली की त्यानंतर काही महिन्यांनी जरी साधारण या वेळांवर दुरून ही बस येत असली की आम्ही नंबरसकट या बसला ओळखत असू. इतक्या दुरून नंबरसकट बस कशी ओळखली म्हणून ओळखीच्यांकडून, नातेवाईकांकडून भावही खात असू.

या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टाटाची बस असूनही यवतमाळ डेपोवाले हिला टाटाचे मूळ काऊलमधले आयताकृती हेडलाईटस काढून लेलॅंडसारखे गोल हेडलाईटस लावत असत. त्यामुळे ही बस दुरूनही ओळखू यायची आणि हिचा मार्गफ़लकही वेगळा असायचा. यवतमाळ सुपर नागपूर असे न लिहीता यवतमाळ - वर्धा - नागपूर असा असायचा. गेल्या 45 वर्षांनंतर 2022 - 23 मध्ये पुन्हा हा असा मार्गफ़लक सकाळच्या 6.00 चा बसला पाहिला आणि मन पुन्हा भूतकाळात गेले. 


त्याकाळी यवतमाळ - नागपूर सुपर बसेस फ़क्त वर्धेचा थांबा घ्यायच्यात. जलद बसेस मात्र कळंब - देवळी - वर्धा - सेलू असे चार थांबे घ्यायच्यात. त्यात कळंब आणि देवळीचे थांबे अगदी रस्त्यालगतच होते म्हणून चंद्रपूर - नागपूर मधल्या भद्रावती आणि वरोरा या थांब्यांसारखा त्या त्या गावात जा, बसस्थानकावर थांबा आणि पुन्हा हायवेवर या असा खोळंबा नसायचा. या मार्गावर कारंजा - नागपूर, दारव्हा - नागपूर, नांदेड - नागपूर, परभणी - नागपूर, किनवट - नागपूर, माहूर - रामटेक, माहूर - तुमसर, यवतमाळ - गोंदिया अशा अनेक जलद बसेस असायच्यात. पण आमची पहिली पसंती यवतमाळ - नागपूर सुपर बसलाच असायची.  




आम्ही किन्हीकर मूळचे कारंज्याचे. कारंज्याला माझे तीन तीन चुलत काका आणि त्यांचे कुटुंबिय रहायचेत. तिथून नागपूरला येणारे पहिली गाडी म्हणजे सकाळी 6.45 ची कारंजा डेपोची कारंजा जलद नागपूर. ही गाडी 45 - 50 वर्षांनंतर ही गाडी अजूनही याच वेळेवर आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी नागपूरवरून दुपारी 14.00 ला निघते. कारंजा डेपो आपल्या ताफ़्यातली नवीन बस या मार्गावर द्यायचेत. ताफ़्यातल्या नवीन बसेस एकतर कारंजा - शिर्डी नाहीतर कारंजा - नागपूर देण्याचा कारंजा डेपोचा दंडक गेल्या काही वर्षांपर्यंत तरी कायम होता. पण आमचे काका आणि त्यांची मुलेबाळे ही दारव्हा - यवतमाळ मार्गे येणारी गाडी फ़ारशी पसंत करायचे नाहीत. ती मंडळी रिसोड- नागपूर, मेहेकर - नागपूर, वाशिम - नागपूर या खेर्डा - कामरगाव - अमरावती मार्गे जाणा-या गाड्या निवडायचेत. दोन्हीही मार्गांनी कारंजा ते नागपूर हे अंतर जवळपास सारखेच होते तरी त्या लोकांना कारंजा - दारव्हा - यवतमाळ - वर्धा - नागपूर हा रूट बोअर व्हायचा. उलट अमरावती मार्ग छान वाटायचा.  एकेकाची पसंती.

नागपूरवरून अमरावतीला जाणारी पहिली बस म्हणजे पहाटे 5.00 वाजता निघणारी नागपूर - 2 (आता गणेशपेठ) डेपोची नागपूर जलद इंदूर ही आंतरराज्य बस. त्याकाळी जलद बसेस नागपूर ते अमरावती हे 160 किमी चे अंतर 4 तासात पार करायच्यात. कोंढाळी - कारंजा (घाडगे) - तळेगाव - तिवसा हे थांबे आणि तळेगावचा घाट या गाड्यांचा वेग मंदावत असावा. या मार्गावरची नागपूर - पुणे ही दुपारी 13.45 ची निम आराम बस आणि नागपूर - नाशिक मार्गावर धावणारी 16.00 ची निम आराम बस फ़ार जुन्या आहेत. दोन्हीही बसेस नागपूर - 2 आगाराच्याच. दुपारी 13.15 वाजता भंडारा - अकोला ही सुपर बस जायची आणि अजूनही आहे. भंडारा डेपो आपल्या ताफ़्यातली खूप मस्त बस या मार्गावर पाठवतात. ही बस नागपूर ते अकोला हे 250 किमी चे अंतर त्या काळात 5 तासात कापत असे. तेव्हा फ़क्त द्विपदरी रस्ता आणि मार्गात भरपूर थांबे असतानाही.

अकोल्यावरून नागपूरकडे पहिली बस म्हणजे सकाळी 6.00 वाजताची, रात्र मुक्कामी असलेली, तुमसर डेपोची अकोला जलद तुमसर ही बस असायची. ही बस आणि बाजूच्याच फ़लाटावर असलेली रात्र मुक्कामाची हिंगणघाट डेपोची अकोला जलद हिंगणघाट ही सुद्धा 6.00 वाजता सुटणारी बस या दोन्हीही बसेस अकोला ते अमरावती प्रवास करणा-या प्रवाशांसाठी उपलब्ध असायच्यात. हिंगणघाट बस अमरावती - चांदूर रेल्वे - पुलगाव - वर्धा मार्गे हिंगणघाटला जायची. अकोल्यावरून पहाटे 5.30 ला अकोला जलद पुणे ही बसही खामगाव - चिखली - देऊळगाव राजा - जालना - छत्रपती संभाजीनगर - देवी अहिल्यानगर मार्गे पुण्याला संध्याकाळी 17.30 पर्यंत जायची. 

नागपूर ते किनवट जाणारा दुपारी 16.00 वाजताचा किनवट डेपोचा शेड्यूलही किमान 50 वर्षे जुना आहे आणि अजूनही सुरू आहे. ही किनवट डेपोची लेलॅंडची बस नेहेमी टाटाच्या बसेस बघणा-या आम्हा छोट्या वैदर्भिय बसफ़ॅन्ससाठी अगदी अप्रूप असायची. आजही ही बस याच वेळेला धावते. वर्धा - यवतमाळ - आर्णी - माहूर मार्गे किनवटला जाणा-या या बसमधून आम्ही कुटुंबियांनी 1978 च्या सुमारास नागपूर ते यवतमाळ हा प्रवास केल्याचे मला चांगलेच स्मरते.




किनवटला जायला रामटेक जलद किनवट ही बसही खूप जुनी आहे. दुपारी 13.00 वाजता नागपूरवरून निघणारी ही रामटेक डेपोची बस मात्र जांब - हिंगणघाट - पांढरकवडा मार्गे किनवटला जायची. आजकाल रामटेक डेपो या मार्गावर निम आराम बस पाठवायला लागलाय. 

नागपूर ते माहूर प्रवासासाठी अगदी जुन्या काळापासून सकाळी 10.00 वाजता रामटेक डेपोची रामटेक जलद माहूर आणि दुपारी 13.00 वाजता तुमसर डेपोची तुमसर जलद माहूर हे दोन मार्गही 50 वर्षे जुने आहेत. आमचे कुलदैवत म्हणजे माहूरची रेणुका देवी. तिच्या दर्शनाला जायचे असेल तर या दोन गाड्यांपैकीच एक आम्हाला निवडावी लागायची. त्याकाळी नागपूर ते माहूर प्रवासाला जवळपास 7 तास लागायचेत. दिवसभर असा प्रवास करून संध्याकाळी माहूरला पोहोचणे. तिथे मुक्काम करणे आणि दुस-या दिवशी दर्शन वगैरे घेऊन, प्रसाद घेऊन दुपारी एका गाडीने यवतमाळपर्यंत आणि तिथून नागपूरला परतणे असा आमचा दोन दिवसांचा कार्यक्रम असे. माहूर - तुमसर ही मुक्कामी गाडी दुस-या दिवशी पहाटे 5.30 ला परतीच्या प्रवासाला लागत असे. तर माहूर - रामटेक ही दुसरी मुक्कामी गाडी सकाळी 8.00 वाजता परतत असे. एव्हढ्या वेळात माहूरमधले दर्शन वगैरे आटोपणे अशक्य असे. या थेट बसेसने परतायचे असल्यास माहूरचा एक दिवसाचा मुक्काम वाढून दोन दिवसांचा करावा लागत असे. त्यापेक्षा यवतमाळला बस बदलून दुस-या बसने नागपूर गाठणे आम्हाला अधिक श्रेयस्कर वाटत असे.


एकूण विदर्भातल्या मी अनुभवलेल्या जुन्या रूटसचा आढावा या दीर्घ लेखात घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. जुन्या बसफ़ॅन्सना यात अजूनही जुने बसरूटस आठवतील. त्यांचे स्वागत. काही काही बसरूटस माझ्याही स्मृतीतून निघून गेलेले असतील त्याबद्दल क्षमस्व.

यापुढील भागात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जुन्या बसरूटचा आढावा घेण्याचा प्रयत्न करेन.

- जुन्या बसेसचा चाहता असलेला बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.  




6 comments:

  1. Aniruddha PhalnikarJuly 29, 2023 at 2:04 PM

    सुंदर!

    एसटी इतिहासाचं, माहितीचं प्रचंड भांडार आहे.

    देवी अहिल्यानगर उल्लेख आवडला.

    बीएस६ ची पहिली फेरी शेगाव आणि नंतरच्या सगळ्या नागपूर हे वाचूनच असं वाटलं की यामागे देवस्थानापासून शुभारंभ करण्याचा हेतू असावा. आणि तेच पुढे तुम्ही लिहिलंही आहे. पण चंद्रपूर आगाराच्या या पद्धतीचं कौतुक वाटलं.

    शिर्डी-चंद्रपूर बसने मी आणि आईने जवळपास १२/१३ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर ते खामगाव प्रवास केला होता. शनि शिंगणापूरचं दर्शन घेऊन वडापने घोडेगाव फाटा, तिथून दुसऱ्या वडापने संभाजीनगर, तिथून चंद्रपूर बसने खामगाव आणि तिथून पुढे रिक्षाने शेगाव.

    वर्धा, बुलढाणा आणि वाशिम मधल्या लांब पल्ल्याच्या मार्गांबद्दल वाचायला आवडेल.

    पुढच्या भागाची वाट पाहतोय.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक आभार, अनिरूद्धजी. आपल्या प्रवासांबद्दलही वाचायला नक्की आवडेल.

      Delete
  2. Super information, super intercity

    ReplyDelete
  3. Very interesting blog information. Is it still running.

    ReplyDelete