Showing posts with label Old routes. Show all posts
Showing posts with label Old routes. Show all posts

Saturday, June 28, 2025

पहाटपक्षी बसेस

पुल म्हणतात की रात्रभर झोपून पहाटे उठून अनुभवलेल्या रेडिमेड पहाटेपेक्षा रात्रभर गाण्यांच्या, गप्पांच्या मैफिली जागवून नंतर आलेली पहाट ती जास्त सुंदर असते.


पण आमच्यासारखे "लवकर निजे, लवकर उठे" वर बालपणापासून विश्वास असलेल्या लोकांना रात्री सेकंड शो चे १२ वाजेपर्यंत जागरणच खूप वाटायचे. जागरण करायचे ते फक्त कोजागरीच्या रात्री आणि ते सुध्दा रात्री १२, १२.३० पर्यंतच. नंतर गाढ झोपेत निसूर. त्यामुळे पुलंनी वर्णन केलेली, रात्रभर जागून आलेली पहाट पहाण्याचे भाग्य जवळपास नाहीच.


पण पहाटे उठून जवळपास रोजच पुल म्हणतात तशी "रेडिमेड पहाट" बघण्याचे भाग्य अनंत वेळा मिळालेले आहे.  अगदी तशीच स्थिती महाराष्ट्र एस.टी. च्या बसेसबद्दल बघायला मिळते.


आमचा जन्म आणि बालपण महाराष्ट्रातल्या पूर्व भागातल्या शहरांमध्ये झाले. ही गावे महाराष्ट्राच्या एका टोकाला असल्याने तिथल्या बसस्टॅण्डवर रात्री येणा-या गाड्या रात्री उशीरात उशीरा १२, १२.३० पर्यंत येणार आणि सकाळी निघणा-या गाड्या पहाटे ३ , ३.३० ला सुरू होणार. रात्री ते बसस्टॅण्ड आमच्यासारखेच निवांत झोपी जाणार. भल्या पहाटे चुळबुळत जागे होणार. पहाटे पहिली बस निघत असली तरीही खरी वर्दळ सकाळी ५.३० , ६ वाजताच सुरू होणार. घरात आई, बाबा लवकर उठले तरीही घरातली इतर सगळी चिल्लीपिली सकाळी ६ वाजताच उठून आपापल्या दिवसभराच्या कामांना सुरूवात करणार तसेच हे. नागपूर म्हणा चंद्रपूर म्हणा हे असेच.


हे पहाटे पहाटे आळोखेपिळोखे देत जागे होणारे बसस्टॅण्डस फ़ार विलोभनीय असतात बरं का. आम्हा बसफ़ॅन्ससाठी अशी बसस्थानके म्हणजे नुकतीच सुस्नात होऊन घराबाहेर अंगणात सुरेख रांगोळी काढत असलेली सुवासिनीच. असे विलोभनीय आणि पुण्यदायक दृश्य खूप भाविकांना आवडते तसेच आम्हा बसफ़ॅन्सना असे पहाटे पहाटेचे नुकतेच उठलेले बसस्थानक बघायला आवडते. ब-याच दिवसांनी अशा बसस्थानकाला मी भेट दिली नव्हती म्हणून लॉकडाऊन काळानंतर मी चंद्रपूरच्या बसस्थानकाला मुद्दाम अशी पहाटे भेट देऊन मी त्याचे दर्शन केले होते. लिंक इथे.





मला वाटतं महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या सगळ्याच बसस्थानकांना हे रात्री निवांत झोपी जाऊन पहाट अनुभवायचं सुख मिळत असेल. अगदी मुंबई - ठाण्याला सुद्धा. कराडला, सातारला, छत्रपती संभाजीनगरला, धुळ्याला, नाशिकला, जालना बसस्थानकाला मात्र हे सुख नाही. बिचारे रात्रभर जागे असतात. कराड बसस्थानकावर रात्री उशीरापर्यंत कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातल्या अनेक गावांमधून मुंबईला जायला निघणा-या गाड्यांची वर्दळ असते तर पहाटे अगदी लवकर मुंबई - ठाणे - नाशिकवरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या लहान लहान गावांपर्यंत जाणा-या गाड्यांची सुरू होते. विश्रांती अशी नाहीच.


सातारा बस स्थानक तर रात्री ९ वाजण्याच्या सुमारासच ख-या अर्थाने जागे होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मी कराडवरून पुणे / शिर्डी / नगर/ नाशिक / मुंबईला दरवेळी जाताना आणि येताना सातारा बसस्थानक दिवसाच्या प्रत्येक तासाला आणि रातीच्या बहुतांश तासाला बघितलेले आहे. दिवसा या बसस्थानकावर गाड्यांची गर्दी असते खरी पण रात्री हे बसस्थानक खरे जागृत होते असे म्हणायला हरकत नाही. दिवसा केवळ प्रवाशांची सोय म्हणून जागे असणारे हे बसस्थानक रात्री अक्षरशः जिवंत होते. एकेकाळी सातारा बसस्थानकाचे एस. टी. कॅण्टीन उत्कृष्ट चवीचे जेवण व इतर खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे मुंबई - पुणे - नाशिककडे जाणा-या बहुतांशी बसगाड्या सातारा स्थानकावर जेवणाची वेळ असेल अशा पद्धतीने त्यांचे वेळापत्रक आखायच्यात. सातारा स्थानकावर पोचल्यावर गाडी फ़लाटावर न लावता फ़लाटासमोरच्या अंधारात उभी करून, सगळ्या प्रवाशांना जेवणासाठी उतरवून, गाडी लॉक करून चालक आणि वाहक सातारा बसस्थानकाच्या कॅण्टीनमध्ये जेवण करताहेत हे दृश्य अनेकदा दिसायचे.


छत्रपती संभाजीनगर म्हणजे महाराष्ट्राचा मध्यबिंदूच. त्यामुळे इथे रात्रभर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाणा-या गाड्यांची वर्दळ अपरिहार्यच. रात्रभर न झोपता हे बसस्थानक पुलंच्या रसिक माणसासारखी पहाट अनुभवत असणार हे नक्की. तसेच आमचे धुळे बसस्थानक, तसेच जालना बसस्थानक. नागपूरवरून पुण्याला एस. टी. बसने जाताना पहिला क्रू (चालक - वाहक) बदलतो तो अकोला स्थानकात आणि दुसरा क्रू बदलतो तो जालना बसस्थानकात. त्या कारणामुळे या दोन्हीही बसस्थानकात ही बस जरा जास्त वेळ थांबा घेते. त्यामुळे या दोन्हीही बसस्थानकात नागपूर - पुणे बस थोडीशी डुलकी घेते आणि लगेच सावध होऊन आपल्या सेवेला लागते असे मला कायम वाटत आलेले आहे.


नागपूरला पहाटे पहाटे निघणा-या पहाटपक्षी बसेस म्हणजे पहाटे ३.४५ ला निघणा-या नागपूर टपाल गाडी चंद्रपूर आणि त्याच्याच शेजारच्या फ़लाटावरून निघणारी नागपूर टपाल गाडी उमरखेड. त्याकाळी आजच्यासारखी छपाईच्या तंत्रज्ञानात प्रगती झालेली नव्हती. नागपूरात छापली जाणारी तरूण भारत, लोकमत, नागपूर पत्रिका, हितवाद ही दैनिके बाहेरगावच्या टपाल आवृत्त्या रात्री लवकर छापून ते गठ्ठे या बसेसने अनुक्रमे चंद्रपूर आणि वर्धा, यवतमाळ, आर्णी, माहूर, उमरखेड इथे पाठविले जायचे. इथल्या लोकांना नागपूरची दैनिके सकाळी थोडी उशीरा वाचायला मिळायची.


त्यानंतर नागपूर बसस्थानक पुन्हा सामसूम झोपी जायचे. मध्ये एकदा पंढरपूर - नागपूर, बुलढाणा - नागपूर बसेस आल्या की तेव्हढ्यापुरते जागे व्हायचे पण मुख्यतः झोपलेलेच असायचे. नागपूर बसस्थानकाला खरी जाग यायची ती पहाटे ५.३० ला निघण-या नागपूर सुपर अहेरी, नागपूर जलद पुसद, नागपूर जलद इंदूर या गाड्यांच्या वर्दळीमुळे. अहेरी आगाराची बस आदल्या दिवशी रात्रीच येऊन त्या काळच्या फ़लाट १९ समोरच्या जागेत झोपलेली असायची. पहाटे ५ वाजता त्या बसची हालचाल सुरू होऊन ती फ़लाटावर लागत असे. तसेच पुसद डेपोच्या गाडीचे. नागपूर - इंदूर ही गाडी मात्र नागपूर - २ (आताचे गणेशपेठ) आगाराची असे. ती छान धुवून पुसून नागपूर - २ आगारातून बाहेर यायची आणि फ़लाट १ वर उभी असायची. सुंदर तयार झालेली ती बस पाहून खूप छान वाटायचे.



त्याकाळी चंद्रपूरवरून निघणा-या पहाटपक्षी बसेस म्हणजे सकाळी  ५.३० ला निघणारी चंद्रपूर जलद नागपूर, सकाळी ६.०० ला निघणा-या चंद्रपूर सुपर नागपूर आणि चंद्रपूर जलद शेगाव तर त्यापाठोपाठ सकाळी ६.३० ला निघणारी चंद्रपूर जलद आर्वी. यातली आर्वी बस फ़क्त बाहेरच्या आगाराची (अर्थात आर्वी) असायची. इतर बसेस चंद्रपूर आगाराच्याच असायच्यात.  


चंद्रपूर बसस्थानकावरून पहाटे साडेपाचची बस गाठायची म्हणजे पहाटे चारला उठून सगळी आन्हिके उरकावी लागायचीत. अगदी अंघोळ वगैरे सुद्धा. कारण नागपूरला सकाळी ९.०० ला पोहोचल्यानंतर वाड्यात नळ गेलेला असायचा. मग कसली अंघोळ आणि कसली आन्हिके ? स्वयंपाकापुरते आणि दिवसभर पिण्यापुरते घडाभर पाणीसुद्धा शेजारून मागून आणावे लागायचे. 


पहाटे साधारण सव्वापाचच्या सुमारास चंद्रपूरला स्टॅण्डवर पोहोचलो की साडेपाचची नागपूर, सहाची नागपूर आणि सहाची चंद्रपूर - शेगाव या तिन्ही गाड्या चंद्रपूर डेपोच्या प्रवेशद्वाराशी थांबलेल्या असायच्यात. त्यात "नेमकी नवी गाडी आज साडेपाचची देऊ देत" म्हणून आम्ही प्रार्थना करायचो पण ९९.९९ % वेळा ही प्रार्थना फ़लद्रूप व्हायची नाही. बाहेर अजूनही अंधार असल्याने आत सगळे दिवे लावलेली साडेपाचची जलद डेपोबाहेर यायची आणि फ़लाटावर लागायची.


ही साडेपाचची बस जरा लेकुरवाळ्या स्वभावाची असे. ही बस चंद्रपूरवरून निघाली की भद्रावती गावाआधी असलेल्या भद्रावतीच्या आयुध निर्माण वसाहतीत जायची. ही एकमेव बस या मार्गे जायची. मग तिथले प्रवासी घेऊन, भद्रावती शहरात असलेल्या बसस्टॅण्डवर जाणे, पुन्हा महामार्गावर परतणे, वरो-याला रेल्वे फ़ाटक ओलांडून गावात असलेल्या बसस्टॅण्डवर जाणे, पुन्हा फ़ाटक ओलांडून महामार्गावर येणे, या गदारोळात एकदा किंवा दोन्हीवेळा रेल्वेचे फ़ाटक बंद असले की खोळंबा सहन करणे या सगळ्या निवांतपणात सहाची सुपर भद्रावती आणि वरोरा थांबे न घेता पुढे निघून गेलेली असायची. जांब बसस्थानकात साडेपाचची बस शिरताना, सहाची बस वाकुल्या दाखवत निघायच्या तयारीत असायची. त्यामुळे आपण साडेपाचच्या बसमध्ये असलो की सहाच्या बसचा राग यायचा आणि सहाच्या बसमध्ये असलो की साडेपाचच्या बसची कीव यायची. 


मुंबईला नोकरी करीत असताना आम्ही नागपूर ते मुंबई हा प्रवास बहुतांशी वेळा विदर्भ एक्सप्रेसने करायचोत. तेव्हा विदर्भ ठाण्याला थांबायची नाही. आम्हाला एक तर कल्याणला किंवा दादरला उतरावे लागे. पहाटे पहाटेचीच वेळ असायची. त्या स्थानकांमध्ये अगदी सकाळी सकाळी छान तयार होऊन आपापल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी लोकल गाडीने ऑफ़िसला / कामधंद्याला निघालेले चाकरमानी दिसायचे. सकाळी कामावर निघालेली माणसे कशीही असोत ती मला कायम प्रसन्न वाटत आलेली आहेत. ही मुंबई मला फ़ार आवडायची. सगळ्यांना काही ना काही काम देणारी आणि दिलेल्या कामावर निष्ठा ठेवणारी.


आजही मी सकाळी माझ्या महाविद्यालयात जायला निघालो की मला आपापल्या ठिकाणांवरून नागपूरला येणा-या अशा पहाटपक्षी बसेस भेटतात. यवतमाळ - नागपूर, चंद्रपूर - नागपूर, वणी - नागपूर, पांढरकवडा - नागपूर, चंद्रपूर - तिरोडा. सगळ्या. पहाटे पहाटे आपापल्या गावांवरून निघून ऑफ़िसच्या, इतर घाईच्या कामांसाठी प्रवाशांची सेवा करीत धावत असलेल्या या पहाटपक्षी बसेस पाहिल्यात की घरी लवकर उठून, आवरून घेऊन, सुस्नात होऊन आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी घराबाहेर पडून मेहेनत करणा-या मुंबईच्या चाकरमान्यांची, घरधन्याची आणि घरधनीणीची आठवण येते. त्यांच्याविषयी उगाच ममत्व दाटून येतं. माणसांच्या जिद्दीला, आकांक्षांना पहाटे उठून आपल्या अगदी वेळेवर धावण्याने बळ पुरविणा-या या पहाटपक्षी बसेस. यांच्याविषयी आदर, ममता दाटून येते. या कितीही जुन्या असल्यात तरी यांच्या  कर्तव्यपालनाने या नवीनच वाटतात. (हल्ली अगदी नवीन को-या बसेस या सगळ्या मार्गांवर यायला लागल्या आहेत म्हणा. आजकाल सगळ्या बसेस MH - 14 / MH XXXX या नव्या सिरीजच्या दिसताहेत.) 



तसेही मेंदी लावलेले हात कितीही सुंदर दिसलेत, त्यावर आपले प्रियजन कितीही फ़िदा असलेत; तरी आपल्या कुटुंबासाठी पहाटे उठून जात्यावर धान्य दळून हाताला घट्टे पडलेला हात हा खुद्द त्या विधात्यालाच जास्त विलोभनीय वाटत असतो, नाही का ?



- बसेसना मानवी रूपात अनुभवणारा बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


शनिवार, २८ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Saturday, July 29, 2023

आठवणीतले एस. टी. रूटस : विदर्भ

बालपणी नागपूरवरून चंद्रपूरला आजोळी जाण्यासाठी अगदी पहिली बस म्हणजे पहाटे 3.45 ला निघणारी नागपूर - टपाल गाडी - चंद्रपूर. नागपूरच्या विविध छापखान्यांमध्ये छापल्या गेलेली नागपूरची वर्तमानपत्रे (तरूण भारत, नागपूर पत्रिका, हितवाद, नवभारत वगैरे) ही गाडी जांब - वरोरा - भद्रावती आणि चंद्रपूरला घेऊन जात असे. म्हणून या गाडीला "पेपर गाडी" ही म्हणत असत. प्रत्येक ठिकाणचे एजंटस त्या त्या बसस्टॅण्डवर येऊन त्यांचे त्यांचे वर्तमानपत्रांचे गठ्ठे घेऊन जात असत. आमच्या बालपणी चंद्रपूरला घरोघरी वर्तमानपत्रे सकाळी 9.00 च्या आसपास पोहोचत असत. ही गाडी वरो-याला, भद्रावतीला गावात असलेल्या बसस्टॅण्डवर जात असल्याने चंद्रपूरला तब्बल सकाळी 7.30 ला पोहोचत असे. 153 किमी अंतरासाठी पावणेचार तास. अशाच एका टपाल गाडीने प्रवास केल्याची आठवण इथे. 

या गाड्यांचे मार्गफ़लक लाल रंगावर पिवळ्या अक्षरांनी अंकित असत. तेव्हा महाराष्ट्र एस. टी. चे नियम अगदी पक्के होते. सर्वसाधारण सेवांचे  (सगळे थांबे घेणा-या ऑर्डिनरी सेवा) मार्गफ़लक काळ्या बोर्डावर पांढरी अक्षरे, जलद सेवेच्या बसेसचे मार्गफ़लक पांढ-या बोर्डावर लाल अक्षरे, अती जलद (Super - Express) सेवांचे पांढ-या बोर्डवर हिरवी अक्षरे, टपाल गाड्यांचे मार्गफ़लक लाल रंगावर पिवळ्या अक्षरांनी तर बाजार गाड्यांचे मार्गफ़लक पिवळ्या बोर्डावर लाल अक्षरांनी अंकित असत.


त्यापाठोपाठ पहाटे 5.30 ला नागपूर - अहेरी ही अहेरी डेपोची अती जलद (सुपर) बस असायची. ही बस तीन तास वीस मिनीटांत चंद्रपूरला पोहोचायची. तिच्यापाठोपाठ चंद्रपूर डेपोची नागपूर सुपर चंद्रपूर. चंद्रपूर डेपो आपल्या नव्या गाड्यांच्या ताफ़्यातल्या बसेस या टायमिंगला पाठवायचेत. ही बसही नागपूर ते चंद्रपूर प्रवासासाठी तीन तास वीस मिनीटे घ्यायची. त्याकाळी 6.00, 9.00, दुपारी 12.00, 13.30, 15.00 संध्याकाळी 18.00 व रात्री 22.00 या टायमिंग्जवर या नव्या बसेस असायच्यात. सकाळी या बसचे आरक्षण उपलब्ध झाले नाही की आम्ही पहाटे 5.30 च्या अहेरी बसने जाण्याचा बेत करायचो. इतक्या पहाटे या बसला कुठल्याही मोसमात गर्दी नसायची. अहेरी डेपोची ही रात्रमुक्कामी बसही तशी नवीच असायची. आजही पहाटे 5.30 ला नागपूर जलद अहेरी ही बस आहेच. 






चंद्रपूरवरून नागपूरला परतताना 5.30 ची चंद्रपूर जलद नागपूर, 6.00 ची चंद्रपूर सुपर नागपूर या बसेस होत्या. आजही आहेत. या बसेसविषयी सविस्तर लेखन या लेखात झालेले आहे. तेव्हा चंद्रपूर डेपोतून सकाळी 6.00 च्या सुमारास एक एशियाड बस (सेमी लक्झरी, आजचे ब्रॅंडनेम: हिरकणी) निघायची. प्लॅटफ़ॉर्मवर न येता सरळ बाहेर जाऊन तुकुम रोडने उर्जानगरकडे जायची आणि 6.30 ला चंद्रपूर बसस्थानकात उर्जानगर एशियाड नागपूर म्हणून दाखल व्हायची. पण 6.00 ची सुपर तुलनेने नवीन गाडी असायची त्यामुळे बरोबर तीन तास वीस मिनीटांत नागपूरला पोहोचणारी बस म्हणून तिचाच स्वीकार व्हायचा. ही बस नेहेमीच फ़ुल्ल असायची. ब-याचदा आसन क्र. 8 ते 54 पूर्णपणे आरक्षित असायचेत. 




मधल्या काळात MWQ 6630 व MWQ 6636 या दोन गाड्यांची जोडी एक सकाळी नागपूरवरून 6.00 ची व एक सकाळी चंद्रपूरवरून 6.00 ची अशी जात असे. या गाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यात आसनांची एक रांग जास्त होती. सर्वसामान्य बसगाड्या 54 आसनी असत. या दोन गाड्या 59 आसनी होत्या. मला वाटतं महामंडळाच्या दापोडी कार्यशाळेने त्याकाळी बांधलेल्या या MWQ 65XX आणि MWQ 66XX सिरीजमधल्या सगळ्याच बसेस 59 आसनी होत्या. त्यामुळे सकाळी 6.00 ची ही बस फ़लाटावर लागताना कंडक्टर साहेब जेव्हा "पूर्ण बस रिझर्वड आहे" असे ओरडून सांगायचेत तेव्हा इतर मंडळी हिरमुसली होऊन या बसचा नाद सोडायचीत आणि यामागे येणा-या उर्जानगर एशियाड किंवा 7.00 वाजता येणा-या राजुरा जलद नागपूर बसची वाट बघायचीत तेव्हा आम्ही बसफ़ॅन मंडळी बिनधास्त आत घुसून आसन क्र 55 ते 59 वर आरामात बसायचो. कारण आम्हाला माहिती असायचं की या बसचे आरक्षण 54 पर्यंतच दिल्या गेलेले आहे. आरक्षण खिडकीवर ही बस 59 आसनी आहे हे माहिती नाही. आणि माहिती असले तरी 55 ते 59 आसनांचे आरक्षण ते देऊ शकत नाहीत. (तसे आरक्षण त्यांनी दिले आणि ऐनवेळी 54 आसनी बस या वेळेवर द्यावी लागली तर? हा प्रॅक्टीकल विचार त्यामागे असावा.)

सकाळी 6.00 च्या सुपर नंतर आमची पसंती असायची ती सकाळी 8.00 वाजता निघणा-या चंद्रपूर सुपर गोंदिया या गाडीला. आदल्या दिवशी संध्याकाळी 6.30 ला चंद्रपूरला आलेली ही गोंदिया डेपोची बस डेपोबाहेर प्रवाशांच्या उतरण्याच्या जागेवरच आपल्या ड्रायव्हर - कंडक्टरना घेऊन झोपलेली असायची. गोंदिया डेपो आपल्या ताफ़्यातली चांगली बस या मार्गावर द्यायचेत. तिच्याच उजव्या बाजूला थोड्या अंतरावर काल रात्री उशीरा 11.00 च्या सुमारास चंद्रपूरला आलेली तुमसर डेपोची तिचीच चुलत बहीण गाढ झोपलेली असायची. तिला नागपूरकडे परतीसाठी वेळ असायचा. ती 9.30 ला नागपूरकडे निघायची. गोंदिया बसच्या मानाने तुमसर बस जरा जुनी असायची. आणि ही बस नागपूरकडे जाताना भद्रावती गावात, वरोरा गावात आत जायची त्यामुळे चंद्रपूर ते नागपूर प्रवासासाठी 4 तास लावायची. ही बस आमचा चॉईस कधीच नव्हती. 





आजही चंद्रपूर गोंदिया ही गोंदिया डेपोची बस आहे. पंण ही बस पहाटे 5.30 ची चंद्रपूर नागपूर जलद आणि सकाळी 6.00 ची चंद्रपूर नागपूर जलद या दोन गाड्यांमध्ये पहाटे 5.45 ला आहे. 5.30 आणि 6.00 च्या वेळांवर चंद्रपूर डेपो त्यांच्याकडल्या नव्या बसेस नागपूरला पाठवतात त्यामानाने गोंदिया डेपोची बस जुनीच असते. ग्लॅमरविहीन. 5.30 आणि 6.00 च्या बसेस चंद्रपूर ते नागपूर प्रवास 2 तास 30 मिनीटे ते 2 तास 45 मिनीटांत करतात तर गोंदिया बस हाच प्रवास रखडत 3 तास 15 मिनीटे ते 3 तास 30 मिनीटांत करते. या गाडीला जाणकार लोकांची पसंती नसते. या गाडीने जाण्यापेक्षा लोक 15 मिनीटे वाट बघून मग 6.00 च्या नव्या बसने निघतात. आणि नागपूरला हिच्या आधी पोहोचतात.

बाकी 6.00 च्या वेळावर नवी गाडी आणि ती सुद्धा दापोडी कार्यशाळेतच बांधलेली हा चंद्रपूर डेपोचा दंडक अगदी जुना आहे. MWQ 6630 व MWQ 6636 या जोडगोळीनंतर MWR 172 व MWR 173, MH - 12 / 8830 व MH-12 / 8832 ते BS 4  एंजिनची माईल्ड स्टीलने बांधलेली MH - 14 / HG 8221  व MH-14 / HG 8225 ही जोडी आणि आता BS 6 मानकांची नव्या डिझाईनची MH-14 / KA 8493 व MH -14 / KA 8597 ही जोडगोळी कायम चंद्रपूर - नागपूर या 6.00 च्या वेळेवर असते. आज ही तर उद्या ती या हिशेबात. त्यातली MH-14 / KA 8493 ही बस तर दापोडी कार्यशाळेने बांधलेली BS 6 मानकांची नव्या डिझाईनची या प्रकारची पहिलीच बस आहे. ती त्यांनी चंद्रपूर डेपोला दिली. चंद्रपूरला आल्यानंतर या गाडीने पहिली ट्रिप चंद्रपूर ते शेगाव मार्गावर केली आणि त्यानंतर आजपर्यंत दररोज चंद्रपूर - नागपूर मार्गावरची ही फ़िक्स्ड गाडी आहे. 

सकाळी 6.00 वाजता चंद्रपूर - नागपूर सुपर बसशेजारी चंद्रपूर सुपर शेगाव ही चंद्रपूर डेपोचीच बसही लागलेली असायची. चंद्रपूर डेपोला नवीन बस मिळाली की तिची पहिली फ़ेरी चंद्रपूर -  शेगाव आणि चंद्रपूर - शिर्डी मार्गावर झालीच पाहिजे असा अलिखित दंडक होता. गजानन महाराज हे विदर्भाचे तर शिर्डीचे साईबाबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत. त्यामुळे त्या धार्मिक भावनेने या नवीन गाड्या पहिल्या फ़ेरीसाठी या दोन गंतव्याकडे जायच्याच. चंद्रपूर जलद शेगाव ही गाडी चंद्रपूरवरून यवतमाळला जाण्यासाठीची सकाळची पहिली गाडी होती. त्यामुळे ह्या गाडीतही यवतमाळपर्यंत आरक्षणे फ़ुल्ल असायचीत. चंद्रपूर - शिर्डी ही दररोज दुपारी 15.30 ला चंद्रपूरवरून निघणारी गाडी आता बंद झाली आहे. बंद झाली म्हणण्यापेक्षा तिचा विस्तार अहेरी पर्यंत करून तिला आता अहेरी - शिर्डी करण्यात आलेले आहे. ती गाडी चंद्रपूर डेपोकडून अहेरी डेपोकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. अहेरी - आलापल्ली - चंद्रपूर - वरोरा - जांब - हिंगणघाट - वर्धा - अमरावती - अकोला - खामगाव - चिखली - जालना - छत्रपती संभाजीनगर - नेवासा - राहुरी - शिर्डी जाणारी ही बस महाराष्ट्र राज्यातल्या राज्यात धावणारी सगळ्यात लांब पल्ल्याची बस म्हणून आपला लौकिक टिकवून आहे. महाराष्ट्र एस. टी. ची सगळ्यात लांब पल्ल्याची बस म्हणून मुंबई - बंगलोर ही 1100 किमी पल्ल्याची बस आहे पण राज्यातल्या राज्यात जवळपास 900 किमी धावणारी शिर्डी - अहेरी ही बस दुस-या क्रमांकावर येते. मध्ये चंद्रपूर डेपोने चंद्रपूर - पुणे (मार्गे नागपूर) हा स्कॅनिया शिवशाहीचा प्रयोग केला होता पण तो तितकासा यशस्वी ठरला नाही. फ़ार पूर्वी अहेरी - मुंबई या "महाबस"चा प्रयोगही असाच फ़सला होता हे सुद्धा या निमित्ताने स्मरते.



परतीच्या प्रवासात गोंदिया सुपर चंद्रपूर ही बस दुपारी 15.00 ला असायची. तर तुमसर जलद चंद्रपूर ही बस संध्याकाळी 19.15 ला असायची. तुमसरवरून नागपूरला येताना ही बस जुन्या भंडारा रोडने यायची आणि नागपूर शहरातल्या वर्धमाननगर - गंगाबाई घाट - महाल - टिळक पुतळा मार्गाने बसस्टॅण्डवर जायची. संध्याकाळी 18.45 च्या सुमाराला नरसिंग टॉकीजपाशी ही बस पहायला खूप मजा यायची. आजोळच्या आठवणींनी मन व्याकूळ व्ह्यायचे. केव्हा हे शैक्षणिक वर्ष संपतेय ? केव्हा सुट्ट्या लागतायत ? आणि केव्हा चंद्रपूरला जायला मिळतेय ? असे व्हायचे. 


यवतमाळ बसस्थानकातून चंद्रपूरकडे यायला सकाळी 6.00 वाजता यवतमाळ जलद अहेरी ही अहेरी डेपोची आदल्या दिवशी मुक्कामाला आलेली बसच असायची. यवतमाळ डेपोच्या चंद्रपूर जलद यवतमाळ या बसची दिवसभरात एकच फ़ेरी व्हायची. सकाळी 9.30 ला यवतमाळवरून निघालेली बस दुपारी 2 वाजता चंद्रपूरला यायची आणि परतताना दुपारी 2.30 ला निघून संध्याकाळी आपल्या मूळ मुक्कामी येऊन विश्रांती घेत बसायची. यवतमाळ - चंद्रपूर मार्गावर चंद्रपूर डेपोची शेगाव - चंद्रपूर, गडचिरोली डेपोची गडचिरोली - नांदेड, दारव्हा डेपोची दारव्हा - राजुरा, पुसद डेपोची पुसद - राजुरा आणि वाशिम डेपोची वाशिम - चंद्रपूर या मोजक्याच गाड्या असायच्यात. चंद्रपूर डेपोची एकही गाडी यवतमाळ - चंद्रपूर म्हणून धावायची नाही.

यवतमाळ - नागपूर बस मात्र अगदी एवंगुणविशिष्ट असायची. चंद्रपूर डेपोप्रमाणे यवतमाळ डेपोही आपल्या ताफ़्यातली उत्तम बस या मार्गावर द्यायचेत. सकाळी 6.00 ला निघालेली ही बस कळंब आणि देवळीला न थांबता फ़क्त वर्धेचा थांबा घेऊन नागपूरला सकाळी 9.00 ला टच असायची. त्याकाळी एकेरी रस्त्यांवरून 150 किमी अंतर 3 तासात पार करणे हे खरोखर कौतुकास्पद होते. चंद्रपूर आणि यवतमाळ डेपो आपापल्या ताफ़्यातल्या नुसत्या चांगल्या गाड्याच नव्हे तर चांगले अनुभवी ड्रायव्हर्सही या मार्गांवर द्यायचेत. सर्वाधिक भारमान असणारे, सर्वाधिक महसूल मिळवून देणारे हे मार्ग होते. 

हीच बस सकाळी 10.00 वाजता नागपूर - यवतमाळ मार्गावर परत निघून दुपारी 13.00 वाजता यवतमाळला टच असायची. दुपारी पुन्हा 14.00 ला यवतमाळवरून निघून नागपूर संध्याकाळी 5.00 ला आणि परतीच्या प्रवासात नागपूरवरून 18.00 ला निघून रात्री 21.00 ला यवतमाळ डेपोत ही बस झोपून झायची ती दुस-या दिवशी पुन्हा सकाळी 6.00 च्या यवतमाळ - नागपूरसाठी. महिनोंमहिने ही बस आणि हा क्रम असाच असायचा. त्यामुळे एकदा ही बस बघितली की त्यानंतर काही महिन्यांनी जरी साधारण या वेळांवर दुरून ही बस येत असली की आम्ही नंबरसकट या बसला ओळखत असू. इतक्या दुरून नंबरसकट बस कशी ओळखली म्हणून ओळखीच्यांकडून, नातेवाईकांकडून भावही खात असू.

या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टाटाची बस असूनही यवतमाळ डेपोवाले हिला टाटाचे मूळ काऊलमधले आयताकृती हेडलाईटस काढून लेलॅंडसारखे गोल हेडलाईटस लावत असत. त्यामुळे ही बस दुरूनही ओळखू यायची आणि हिचा मार्गफ़लकही वेगळा असायचा. यवतमाळ सुपर नागपूर असे न लिहीता यवतमाळ - वर्धा - नागपूर असा असायचा. गेल्या 45 वर्षांनंतर 2022 - 23 मध्ये पुन्हा हा असा मार्गफ़लक सकाळच्या 6.00 चा बसला पाहिला आणि मन पुन्हा भूतकाळात गेले. 


त्याकाळी यवतमाळ - नागपूर सुपर बसेस फ़क्त वर्धेचा थांबा घ्यायच्यात. जलद बसेस मात्र कळंब - देवळी - वर्धा - सेलू असे चार थांबे घ्यायच्यात. त्यात कळंब आणि देवळीचे थांबे अगदी रस्त्यालगतच होते म्हणून चंद्रपूर - नागपूर मधल्या भद्रावती आणि वरोरा या थांब्यांसारखा त्या त्या गावात जा, बसस्थानकावर थांबा आणि पुन्हा हायवेवर या असा खोळंबा नसायचा. या मार्गावर कारंजा - नागपूर, दारव्हा - नागपूर, नांदेड - नागपूर, परभणी - नागपूर, किनवट - नागपूर, माहूर - रामटेक, माहूर - तुमसर, यवतमाळ - गोंदिया अशा अनेक जलद बसेस असायच्यात. पण आमची पहिली पसंती यवतमाळ - नागपूर सुपर बसलाच असायची.  




आम्ही किन्हीकर मूळचे कारंज्याचे. कारंज्याला माझे तीन तीन चुलत काका आणि त्यांचे कुटुंबिय रहायचेत. तिथून नागपूरला येणारे पहिली गाडी म्हणजे सकाळी 6.45 ची कारंजा डेपोची कारंजा जलद नागपूर. ही गाडी 45 - 50 वर्षांनंतर ही गाडी अजूनही याच वेळेवर आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी नागपूरवरून दुपारी 14.00 ला निघते. कारंजा डेपो आपल्या ताफ़्यातली नवीन बस या मार्गावर द्यायचेत. ताफ़्यातल्या नवीन बसेस एकतर कारंजा - शिर्डी नाहीतर कारंजा - नागपूर देण्याचा कारंजा डेपोचा दंडक गेल्या काही वर्षांपर्यंत तरी कायम होता. पण आमचे काका आणि त्यांची मुलेबाळे ही दारव्हा - यवतमाळ मार्गे येणारी गाडी फ़ारशी पसंत करायचे नाहीत. ती मंडळी रिसोड- नागपूर, मेहेकर - नागपूर, वाशिम - नागपूर या खेर्डा - कामरगाव - अमरावती मार्गे जाणा-या गाड्या निवडायचेत. दोन्हीही मार्गांनी कारंजा ते नागपूर हे अंतर जवळपास सारखेच होते तरी त्या लोकांना कारंजा - दारव्हा - यवतमाळ - वर्धा - नागपूर हा रूट बोअर व्हायचा. उलट अमरावती मार्ग छान वाटायचा.  एकेकाची पसंती.

नागपूरवरून अमरावतीला जाणारी पहिली बस म्हणजे पहाटे 5.00 वाजता निघणारी नागपूर - 2 (आता गणेशपेठ) डेपोची नागपूर जलद इंदूर ही आंतरराज्य बस. त्याकाळी जलद बसेस नागपूर ते अमरावती हे 160 किमी चे अंतर 4 तासात पार करायच्यात. कोंढाळी - कारंजा (घाडगे) - तळेगाव - तिवसा हे थांबे आणि तळेगावचा घाट या गाड्यांचा वेग मंदावत असावा. या मार्गावरची नागपूर - पुणे ही दुपारी 13.45 ची निम आराम बस आणि नागपूर - नाशिक मार्गावर धावणारी 16.00 ची निम आराम बस फ़ार जुन्या आहेत. दोन्हीही बसेस नागपूर - 2 आगाराच्याच. दुपारी 13.15 वाजता भंडारा - अकोला ही सुपर बस जायची आणि अजूनही आहे. भंडारा डेपो आपल्या ताफ़्यातली खूप मस्त बस या मार्गावर पाठवतात. ही बस नागपूर ते अकोला हे 250 किमी चे अंतर त्या काळात 5 तासात कापत असे. तेव्हा फ़क्त द्विपदरी रस्ता आणि मार्गात भरपूर थांबे असतानाही.

अकोल्यावरून नागपूरकडे पहिली बस म्हणजे सकाळी 6.00 वाजताची, रात्र मुक्कामी असलेली, तुमसर डेपोची अकोला जलद तुमसर ही बस असायची. ही बस आणि बाजूच्याच फ़लाटावर असलेली रात्र मुक्कामाची हिंगणघाट डेपोची अकोला जलद हिंगणघाट ही सुद्धा 6.00 वाजता सुटणारी बस या दोन्हीही बसेस अकोला ते अमरावती प्रवास करणा-या प्रवाशांसाठी उपलब्ध असायच्यात. हिंगणघाट बस अमरावती - चांदूर रेल्वे - पुलगाव - वर्धा मार्गे हिंगणघाटला जायची. अकोल्यावरून पहाटे 5.30 ला अकोला जलद पुणे ही बसही खामगाव - चिखली - देऊळगाव राजा - जालना - छत्रपती संभाजीनगर - देवी अहिल्यानगर मार्गे पुण्याला संध्याकाळी 17.30 पर्यंत जायची. 

नागपूर ते किनवट जाणारा दुपारी 16.00 वाजताचा किनवट डेपोचा शेड्यूलही किमान 50 वर्षे जुना आहे आणि अजूनही सुरू आहे. ही किनवट डेपोची लेलॅंडची बस नेहेमी टाटाच्या बसेस बघणा-या आम्हा छोट्या वैदर्भिय बसफ़ॅन्ससाठी अगदी अप्रूप असायची. आजही ही बस याच वेळेला धावते. वर्धा - यवतमाळ - आर्णी - माहूर मार्गे किनवटला जाणा-या या बसमधून आम्ही कुटुंबियांनी 1978 च्या सुमारास नागपूर ते यवतमाळ हा प्रवास केल्याचे मला चांगलेच स्मरते.




किनवटला जायला रामटेक जलद किनवट ही बसही खूप जुनी आहे. दुपारी 13.00 वाजता नागपूरवरून निघणारी ही रामटेक डेपोची बस मात्र जांब - हिंगणघाट - पांढरकवडा मार्गे किनवटला जायची. आजकाल रामटेक डेपो या मार्गावर निम आराम बस पाठवायला लागलाय. 

नागपूर ते माहूर प्रवासासाठी अगदी जुन्या काळापासून सकाळी 10.00 वाजता रामटेक डेपोची रामटेक जलद माहूर आणि दुपारी 13.00 वाजता तुमसर डेपोची तुमसर जलद माहूर हे दोन मार्गही 50 वर्षे जुने आहेत. आमचे कुलदैवत म्हणजे माहूरची रेणुका देवी. तिच्या दर्शनाला जायचे असेल तर या दोन गाड्यांपैकीच एक आम्हाला निवडावी लागायची. त्याकाळी नागपूर ते माहूर प्रवासाला जवळपास 7 तास लागायचेत. दिवसभर असा प्रवास करून संध्याकाळी माहूरला पोहोचणे. तिथे मुक्काम करणे आणि दुस-या दिवशी दर्शन वगैरे घेऊन, प्रसाद घेऊन दुपारी एका गाडीने यवतमाळपर्यंत आणि तिथून नागपूरला परतणे असा आमचा दोन दिवसांचा कार्यक्रम असे. माहूर - तुमसर ही मुक्कामी गाडी दुस-या दिवशी पहाटे 5.30 ला परतीच्या प्रवासाला लागत असे. तर माहूर - रामटेक ही दुसरी मुक्कामी गाडी सकाळी 8.00 वाजता परतत असे. एव्हढ्या वेळात माहूरमधले दर्शन वगैरे आटोपणे अशक्य असे. या थेट बसेसने परतायचे असल्यास माहूरचा एक दिवसाचा मुक्काम वाढून दोन दिवसांचा करावा लागत असे. त्यापेक्षा यवतमाळला बस बदलून दुस-या बसने नागपूर गाठणे आम्हाला अधिक श्रेयस्कर वाटत असे.


एकूण विदर्भातल्या मी अनुभवलेल्या जुन्या रूटसचा आढावा या दीर्घ लेखात घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. जुन्या बसफ़ॅन्सना यात अजूनही जुने बसरूटस आठवतील. त्यांचे स्वागत. काही काही बसरूटस माझ्याही स्मृतीतून निघून गेलेले असतील त्याबद्दल क्षमस्व.

यापुढील भागात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जुन्या बसरूटचा आढावा घेण्याचा प्रयत्न करेन.

- जुन्या बसेसचा चाहता असलेला बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.  




Tuesday, May 25, 2021

नागपूर शहरातली शहर बस वाहतूक : इतिहास व सद्यस्थिती भाग १

 नागपूर शहरातली शहर बस वाहतूक : इतिहास व सद्यस्थिती भाग १


१९७० आणि १९८० च्या दशकात नागपूरची शहर बस वाहतूक (जी एस. टी. महामंडळाच्या ताब्यात होती) अगदी छान व नियमित होती. बहुतेक सगळी मध्यमवर्गीय मंडळी शहर बसने प्रवास करीत. बसेसचे वेळापत्रक अगदी नियमित होते. खाजगी वाहनांचा वावर आणि वापर कमी होता. सिव्हील लाईन्स मधल्या केंद्रीय आणि राज्य सरकारी कार्यालयांमध्ये काम करणा-या नोकरदार वर्गासाठी सकाळी  नऊ साडेनऊच्या सुमारास नागपुरातील विविध भागांमधून खास "ऑफ़िस फ़े-या" निघत असत. "अयाचित मंदीर ते जिल्हा कार्यालय", "नंदनवन ते तहसिल कचेरी" किंवा "जुना सुभेदार ले आऊट ते डीएजीपीटी" अशा विशेष बस असत. संध्याकाळी ऑफ़िसेस सुटल्यानंतर तशाच फ़े-या या नोकरदारांना घरापर्यंत सोडत असत. बसेस, त्यातले ड्रायव्हर्स, कंडक्टर्स सगळी मंडळी ठरलेली असत. 




त्याकाळी मोरभवन, अयाचित मंदीर आणि गांधीबाग ही मोठ्ठी शहर बस स्थानके होती. या ठिकाणी एस. टी. चे वाहतूक नियंत्रण अधिकारी तैनात असत. त्यांचा वचक असे. बसेस वेळापत्रकाप्रमाणे सुटत आहेत की नाहीत यावर त्यांचे लक्ष असे. आजसारखा खाजगी सेवेतला लंदफ़ंद कारभार नव्हता.  


बसेसवर पूर्ण मार्गफ़लक नसत. छोट्या चौरस आकाराच्या लोखंडी पाट्या एका गोलाकार तारेत गुंफ़लेल्या (स्पायरल बाईंडिंगसारख्या) असत. त्या काळ्या पाट्यांवर पांढ-या अक्षरांमध्ये बसचा नंबर आणि गंतव्य स्थान लिहीलेले असे. एक फ़ेरी मारून बस परत मूळ ठिकाणाला आली की हे नंबर्स बदलता येत असत. (स्पायरल बाइंडिंगच्या डायरीत आपण पाने उलटतो तसे). कारभार अगदी व्यवस्थित होता. पांढ-या पाट्यांवर लाल अक्षरे म्हणजे ऑफ़िस फ़ेरी किंवा जलद सेवेची बस हे दुरूनच ओळखू येत असे. 


त्याकाळातले प्रमुख मार्ग क्र. आणि आणि त्यांचे मार्ग यांची झलक.


मार्ग क्र. १ : अयाचित मंदीर ते श्रद्धानंद पेठ : मार्गे नटराज टॉकिज, नगारखाना, नरसिंग टॉकिज, गांधी गेट, टिळक पुतळा, आग्याराम देवी, कॉटन मार्केट, शनी मंदीर, आनंद टॉकीज, मुंजे चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, महाराजबाग, धरमपेठ पेट्रोल पंप (तेव्हा त्याला "धरमपेठ पेट्रोल पंप" असेच म्हणायचेत. "बोले पेट्रोल पंप" हे नाव १९९० च्या दशकात रूढ झाले.), धरमपेठ माता मंदीर, लक्ष्मी भुवन चौक, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर आणि श्रद्धानंद पेठ शेवटचा बसस्टॉप. (सध्या असलेल्या तनिश्क पासून बस वळून परतीच्या प्रवासाला कल्याण ज्वेलर्स समोरच्या शेवटल्या बसस्टॉपवर उभी रहात असे.) ही बस परतीच्या मार्गावर टिळक पुतळ्यापासून लेक व्ह्यू लॉज, चिटणीस पार्क, बडकस चौक अशी परतत असे.


मार्ग क्र. २ : अयाचित मंदीर ते टेलिकॉम नगर: मार्गे नटराज टॉकिज, नगारखाना, नरसिंग टॉकिज, गांधी गेट, टिळक पुतळा, आग्याराम देवी, कॉटन मार्केट, शनी मंदीर, आनंद टॉकीज, मुंजे चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, महाराजबाग, धरमपेठ पेट्रोल पंप, लॉ कॉलेज चौक, गोकुळपेठ, लक्ष्मी भुवन चौक, शंकरनगर, गांधी नगर, श्रद्धानंद पेठ, माधवनगर, राणा प्रताप नगर आणि टेलिकॉम नगर शेवटला बसस्टॉप. (सध्या असलेल्या सोमलवार शाळा, खामला शाखेच्या थोडा अलिकडे.) ही बस परतीच्या मार्गावर टिळक पुतळ्यापासून लेक व्ह्यू लॉज, चिटणीस पार्क, बडकस चौक अशी परतत असे.


मार्ग क्र. ३ : अयाचित मंदीर ते स्वावलंबी / दीनदयाल नगर: मार्गे नटराज टॉकिज, नगारखाना, नरसिंग टॉकिज, गांधी गेट, टिळक पुतळा, आग्याराम देवी, कॉटन मार्केट, शनी मंदीर, आनंद टॉकीज, मुंजे चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, महाराजबाग, धरमपेठ पेट्रोल पंप, लॉ कॉलेज चौक, गोकुळपेठ, लक्ष्मी भुवन चौक, शंकरनगर, गांधी नगर, श्रद्धानंद पेठ, माधवनगर, गोपाल नगर (स्टॉप क्र. १, २ व ३. ही नावे अजूनही गोपाल नगरात अस्तित्वात आहेत. आता तिथून एकही बसमार्ग नसतानाही.), पडोळे हॉस्पिटल, स्वावलंबी नगर  क्र. १ व स्वावलंबी नगर शेवटला स्टॉप. सध्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बस वळत असे व जोशींच्या चक्कीसमोरील शेवटल्या थांब्यावर परतीच्या प्रवासासाठी उभी रहात असे.) ही बस परतीच्या मार्गावर टिळक पुतळ्यापासून लेक व्ह्यू लॉज, चिटणीस पार्क, बडकस चौक अशी परतत असे.


मार्ग क्र. ४ :अयाचित मंदीर ते देवनगर : मार्गे नटराज टॉकिज, नगारखाना, नरसिंग टॉकिज, गांधी गेट, टिळक पुतळा, आग्याराम देवी, कॉटन मार्केट, शनी मंदीर, आनंद टॉकीज, मुंजे चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, महाराजबाग, धरमपेठ पेट्रोल पंप, धरमपेठ माता मंदीर, लक्ष्मी भुवन चौक, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर. आठ रस्ता चौक, सुरेंद्र नगर, देव नगर (हल्लीचा देव नगर चौक) ही बस परतीच्या मार्गावर टिळक पुतळ्यापासून लेक व्ह्यू लॉज, चिटणीस पार्क, बडकस चौक अशी परतत असे.


मार्ग क्र. ५ :अयाचित मंदीर ते जयप्रकाश नगर : मार्गे नटराज टॉकिज, नगारखाना, नरसिंग टॉकिज, गांधी गेट, टिळक पुतळा, आग्याराम देवी, कॉटन मार्केट, शनी मंदीर, आनंद टॉकीज, मुंजे चौक, झाशी राणी चौक, पंचशील टॉकीज, लोकमत बिल्डींग, रहाटे कॉलनी, अजनी चौक, देव नगर, पांडे ले आऊट, जयप्रकाश नगर. ही बस परतीच्या मार्गावर टिळक पुतळ्यापासून लेक व्ह्यू लॉज, चिटणीस पार्क, बडकस चौक अशी परतत असे.


मार्ग क्र. ६ : पारडी / गांधीबाग ते बर्डी : मार्गे वर्धमान नगर, भावसार चौक, गांधीबाग बस स्थानक, अग्रसेन चौक, गीतांजली टॉकीज, मेयो हॉस्पीटल, रेल्वे स्टेशन, मानस चौक, टेकडी रोड, मूनलाईट फ़ोटो स्टुडियो.


मार्ग क्र. ७ : पारडी / गांधीबाग ते टेलिकॉम नगर: मार्गे वर्धमान नगर, भावसार चौक, गांधीबाग बस स्थानक, अग्रसेन चौक, गीतांजली टॉकीज, मेयो हॉस्पीटल, रेल्वे स्टेशन, मानस चौक, टेकडी रोड, मूनलाईट फ़ोटो स्टुडियो, महाराजबाग, धरमपेठ पेट्रोल पंप, लॉ कॉलेज चौक, गोकुळपेठ, लक्ष्मी भुवन चौक, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर श्रद्धानंद पेठ, माधवनगर, राणा प्रताप नगर आणि टेलिकॉम नगर शेवटला बसस्टॉप. (सध्या असलेल्या सोमलवार शाळा, खामला शाखेच्या थोडा अलिकडे.)


मार्ग क्र. ३१ : गांधीबाग ते रघुजी नगर: मार्गे नंगा पुतळा चौक, सराफ़ा चौक, गांधी पुतळा, बडकस चौक, अयाचित मंदीर, नटराज टॉकीज, नगारखाना, (गोखले किराणा स्टोर्स समोरून डावीकडे वळत) राजवाडा, तुळशीबाग, रेशीमबाग चौक, सक्करदरा चौक, रघुजीनगर (सध्या्च्या छोट्या ताजबाद पर्यंत ही गाडी जाऊन तिथूनच परतीच्या प्रवासाला वळत असे.)


मार्ग क्र. ३२ : गांधीबाग ते अयोध्या नगर: मार्गे नंगा पुतळा चौक, सराफ़ा चौक, गांधी पुतळा, बडकस चौक, अयाचित मंदीर, नटराज टॉकीज, नगारखाना, (गोखले किराणा स्टोर्स समोरून डावीकडे वळत) राजवाडा, तुळशीबाग, रेशीमबाग चौक, तुकडोजी पुतळा चौक, जुना सुभेदार ले आऊट, शारदा चौक, अयोध्यानगर (लाडीकर राम मंदीर शेवटचा स्टॉप)


मार्ग क्र. ३३ : गांधीबाग ते दत्तात्रय नगर: मार्गे नंगा पुतळा चौक, सराफ़ा चौक, गांधी पुतळा, बडकस चौक, अयाचित मंदीर, नटराज टॉकीज, नगारखाना, (गोखले किराणा स्टोर्स समोरून डावीकडे वळत) राजवाडा, तुळशीबाग, रेशीमबाग चौक, तुकडोजी पुतळा चौक, सोमवारी क्वार्टर्स, (छोट्या ताजबादच्या थोडे आधी उजवीकडे वळून, सध्याच्या संजुबा शाळेजवळून) दत्तात्रय नगर. (या गाड्याच्या दिवसभरातून मोजक्याच फ़े-रा होत असत.)


मार्ग क्र. ३४ : गांधीबाग ते रघुजी नगर: मार्गे नंगा पुतळा चौक, सराफ़ा चौक, गांधी पुतळा, बडकस चौक, अयाचित मंदीर, नटराज टॉकीज, नगारखाना, (गोखले किराणा स्टोर्स समोरून डावीकडे वळत) राजवाडा, तुळशीबाग,(नाग नदीच्या पुलानंतर लगेच डावीकडे वळून ग्रेट नाग रोडने) गणेश नगर, होमिओपॅथिक कॉलेज, मयूर मंगल कार्यालय, संगम टॉकीज चौक, तिरंगा चौक, सक्करदरा चौक, रघुजी नगर.


मार्ग क्र. ७६ : रघुजी नगर ते बर्डी / वायुसेना नगर : मार्गे सक्करदरा बाजार, आयुर्वेदिक कॉलेज, ईश्वर देशमुख कॉलेज, हनुमान नगर, मेडीकल कॉलेज, टीबी वॉर्ड, रेल्वे मेन्स शाळा, अजनी स्टेशन, कॉंग्रेस नगर, धंतोली , मुंजे चौक, झाशी राणी चौक, धनवटे रंग मंदीर, हडस हायस्कूल, शंकर नगर चौक, लक्ष्मी भुवन चौक, रामनगर चौक, रवीनगर चौक, रवीनगर कॉलनी, सी पी क्लब, टी व्ही टॉवर, वायुसेना नगर


मार्ग क्र. ८० : नंदनवन ले आऊट ते वर्मा ले आऊट / बर्डी: नंदनवन ले आऊट, मयूर मंगल कार्यालय, शारदा चौक, संगम टॉकीज चौक, तेलघाणी, देवांजली / पुष्पांजली बिल्डींग्ज, रेशीमबाग, तुळशीबाग, राजवाडा, नरसिंग टॉकीज, गांधीगेट, टिळक पुतळा, आग्याराम देवी, कॉटन मार्केट, शनी मंदीर, आनंद टॉकीज, मुंजे चौक, झाशी राणी चौक, धनवटे रंग मंदीर, हडस हायस्कूल, शंकर नगर चौक, गांधी नगर, वर्मा ले आऊट. ही बस परतीच्या मार्गावर टिळक पुतळ्यापासून लेक व्ह्यू लॉज, चिटणीस पार्क, बडकस चौक, केळीबाग रोड, श्रीरंग ज्वेलर्स, महाल चौक अशी परतत असे.


त्याकाळी दर बुधवारी (नगारखाना आणि महाल सुतिकागृहाजवळ बुधवार बाजार भरलेला असल्यामुळे) या बसेस तुळशीबागेतून सी पी ऍण्ड बेरार कॉलेजसमोरून वळून सोनबाजीच्या वाडीसमोरून वळून नटराज टॉकीजकडे येत असत. त्या काळात फ़ारशी वाहतूक नसल्याने नगारखान्याकडून गोखले किराणा स्टोर्ससमोरून आणि नगारखान्याच्या मागून (नितीनजी गडकरींच्या घराकडून) शिवाजी सायकल स्टोर्सकडे वळताना चिंचोळ्या गर्दीतूनही मोठ्ठ्या बसेस लीलया वळत असत. आज साधी चारचाकी तिथून वळवायची म्हटले तर घाम फ़ुटतो.






मध्यमवर्गीय सहकुटुंब बसने प्रवास करीत असत. ७६ क्रमांकाच्या रूटवर रघुजीनगर ते बर्डी मार्गावर १९८६ ते १९९३ पर्यंत डबल डेकर गाड्याही धावल्या होत्या. इनमिन दोन गाड्या  MCU 9803 आणि MCU 9804 नागपूर शहर बस सेवेसाठी आलेल्या होत्या. बर्डीवरून विमानांच्या येण्याजाण्याच्या वेळांवर विमानतळाची फ़ेरी पण असायची. दोन विमाने सकाळी आणि दोन विमाने संध्याकाळी असे वेळापत्रक होते. या बसेसमधून कुणी विमानप्रवास करणारे प्रवासी जात नसत. विमाने पहायला विमानतळावर जाणारे आमच्यासारखे हौशी प्रवासी या बसेस मधून जात आणि परतत असत. या मार्गावर एकाला एक जोडून असलेली जोड बस पण धावत असे. अशीच जोड बस बर्डी - हिंगणा या मार्गावर पण धावत असे. लांबचलांब आणि वळणे नसलेला मार्ग हा जोडबससाठी आवश्यक असावा. फ़क्त गंतव्य स्थानावर वळण घेण्याची गरज असलेले मार्ग म्हणून हे दोन मार्ग जोडबसचे होते. १९८५ च्या आसपास या जोड बसेस नागपूर शहर बस वाहतुकीतून काढून घेण्यात आल्या.


नागपूर शहर बस वाहतुकीतला खाजगी कंत्राटदारांचा कशाचाही घरबंध नसलेला आताचा कारभार पाहिला म्हणजे जुने सोनेरी दिवस प्रकर्षाने आठवितात. 

- एक जुना नागपूरकर बसफ़ॅन, राम किन्हीकर