Wednesday, August 5, 2026

व्रतवैकल्ये आणि मनुष्याचा मूळ पिंड. द्विधा मनःस्थिती

 व्रतवैकल्याने नटलेल्या श्रावणातली कुंद संध्याकाळ. 


आषाढ संपून चांगले ७ - ८ दिवस झालेत तरी पावसाचा जोर कमी झालेला नसतो. "क्षणात फिरूनी ऊन पडे" चा अनुभव फक्त कवितेतच राहिलेला असतो. हवेत सुखद असा गारठा.


घरी कांदा, लसूण आदि पदार्थ तर पार कांदेनवमीपासून म्हणजे महिन्याभरापासून वर्ज्य असतात. गरमगरम वरण भात तूप लोणचे असा सात्विक आहार घेऊन आपण हात धुण्यासाठी परसदारी जातो आणि...


...मागल्या अंगणातल्या घरातून जवसाच्या तेलात घातलेल्या लसणाच्या चुरचुरीत फोडणीचा खमंग वास नाकातून मनात जातो आणि तुडुंब भरलेल्या पोटाची भूक पुन्हा चाळवली जाते.


सात्विक, राजस, तामस अशा तिन्ही भावांची, त्यातल्या परस्परांमधल्या द्वंद्वाची मनात मांडणी होते. परंपरेचे पाईक आपले पापभिरू मन परत स्वयंपाकघरात जाउन 'कालनिर्णय' मधे "चातुर्मास कधी संपतोय ?" ती तारीख पुन्हा पाहून घेतेय आणि त्यादिवसानंतर करावयाच्या बेतांचे मांडे मनातल्या मनात खातेय.


- खादाड, पापभिरू आणि परंपरागत ज्ञानावर (विशेषतः त्यामागील शहाणपणावर) दृढविश्वास असणारा एक सर्वसामान्य सात्विक गृहस्थ, रामभाऊ किन्हीकर.

No comments:

Post a Comment