परमेश्वराने तानसेनाचा गळा जरी आम्हाला दिला नसला तरी कानसेनाचे कान मात्र भरभरून दिलेत. पुलंच्या भाषेत सांगायच तर एखाद्यासारख गाता येत नसेल पण त्याच्या गायनात एखाद्या रागाचा काष्टा सुटल्याच किंवा एखाद्या रागिणीचा पदर ढळल्याच चटकन लक्षात येत.
पण तरीही आज लक्षात आल की आपल प्रेम गाण्यातल्या सुरांपेक्षा काकणभर अधिक त्यातल्या शब्दांवर आहे.
झाल ते अस. शनिवार संध्याकाळ. ढग जमून आलेले. मस्त मूड लागला. यूट्यूब उघडल आणि त्याला म्हटल, "बेटा, आज बिलासखानी तोडी सुनेंगे."
सुंदर गाण्यांची लड सुरू झाली पण दोन नवोदित गायिकांचे शब्द साखरभातातल्या (परवाच घरी बेत झाल्याने ताजी ताजी उपमा) खड्यांसारखे बोचलेत.
" "झूटे तेरे नैन" नाही रे बाळांनो. "जुठे तेरे नैन" अशी भावना आणि शब्द आहेत ते." असे त्या नवोदित गायिकांना कळवळून सांगावेसे वाटले. आजकाल गाण्यातला भाव समजून न घेता गाता येणे या गोष्टीला भलताच भाव आला आहे हे लक्षात घेऊन गप्प बसलो.
प्रियकर आदल्या रात्री सवतीबरोबर होता आणि त्यामुळे त्याचे डोळे (तिच्याकडे प्रेमाने, आसक्तीने बघत राहिल्याने) उष्टे झाले आहेत ही त्या प्रेयसीची भावना. पण न समजता गायल्याने ते "झुटे" झालेत.
असच कानाला पसायदानातले "येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो" खटकते. विश्व + ईश + रावो = विश्वेशरावो असा संधी झालाय रे तो. ज्ञानदेवांच्या या विश्वात्मक देवाला आपण अगदी काशीचा विश्वेश्वर करून टाकलय हे कुठेतरी कानाला खटकत. कार्यक्रम कितीही देखणा झाला तरी आयोजकांची एकंदर तयारी कितपत होती ? हे मी तरी पसायदानाच्या अचूक उच्चारणावरून ठरवतो.
असो, बाकी "आता अध्यक्ष आणि इतर मान्यवरांनी "मंचकावर" (अचूक शब्द "मंचावर") विराजमान व्हावे"
किंवा
"महाराष्ट्राचे "तथाकथित" (अचूक शब्द "तत्कालीन") राज्यपाल"
वगैरे मी ऐकलेल्या मराठीच्या जाहीर धिंडवड्यांबद्दल बोलायलाच नको.
— आपला छिद्रान्वेषी, मराठीप्रेमी रामचंद्रपंत (अमात्य)
No comments:
Post a Comment