Perestroika and Glasnost अर्थात पुनर्रचना आणि मोकळेपणा हे नव्वदीच्या दशकातले अगदी परवलीचे दोन शब्द होते. पूर्वीच्या एकत्रित रशियाचे शेवटले अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी या दोन शब्दांचा वापर करून रशियाच्या पोलादी राजवटीत नवे युग आणले आणि रशियातून अनेक राष्ट्रे स्वतंत्र झालीत. ती गोष्ट चांगली झाली की वाईट ? यावर एका जाडजूड ग्रंथाचे लेखन, त्यावर परिसंवाद वगैरे अनेक गोष्टी होऊ शकतील पण त्यात आपण जायला नको.
आपल्या सर्वांच्या आयुष्यातही हे दोन शब्द किती महत्वाचे आहेत याचा आपण विचार केला असता आपल्या लक्षात येईल की आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर Perestroika अर्थात पुनर्रचना अत्यंत महत्वाची आहे. नवे विचार स्वीकारणे, नव्या लोकांना स्वीकारणे त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्याची, विचारांची, संकल्पनांची, आपण पालन करीत असलेल्या सिद्धांताचीही एकदा मनाशी विचार करून, त्यांची पुनर्रचना करून नव्याने मांडणी केल्याने आपल्या आयुष्यातला प्रवाहीपणा कायम राहतो. जगण्याची तत्वे जरी ठाम असलीत तरी नव्या युगात, नव्या परिभाषांमध्ये त्या तत्वांना जोखून ती तत्वे जगण्याचे, नव्या पिढीत रूजविण्याचे नवे मार्ग अस्तित्वात आणायचे असतील तर Perestroika फ़ार आवश्यक आहे. साचलेपण हे फ़ार घातक आहे. विचारांचे आणि आयुष्याचेही.
पण ही पुनर्रचना करण्यासाठी आपला स्वतःशी आणि इतरांशीही Glasnost अर्थात मोकळेपणा हा आवश्यक आहे. हे वागण्याबोलण्यात, विचारांमध्ये मोकळेपण नसेल, तुमचेच जीवन जर पारदर्शी नसेल तर मग तुमच्या अत्यंत प्रामाणिक हेतूंबाबतही शंका उपस्थित होऊ शकतात. त्यासाठी मुळात आपण जे नाही ते दाखविण्याचा आपला अट्टाहास संपायला हवा. आपण जसे आहोत, ज्या पद्धतीचे मनुष्य आहोत ते जगापासून लपवायचे कशाला ? आपले गुणदोष जसेच्या तसे जगासमोर आलेत म्हणून घाबरायचे कशाला ? आपण जे नाही ते सतत जगासमोर दाखवत राहणे म्हणजे आपला आपल्याच जीवन जगण्याच्या पद्धतीवर, सिद्धांतांवर विश्वास नाही असे होते. तुमच्या जीवन पद्धतीला, जीवन जगण्याच्या सिद्धांतांना हे जग, हा समाज कदाचित मानणार नाही, याबाबत इतर जगाची वेगळी मते असू शकतात हा मोकळेपणा आपल्या विचारात असला की जगाच्या सिद्धांताशी. मतांशी आपली मते पडताळून बघत त्यात तथ्य असेल तर ती स्वीकारणे आणि त्यात काही तथ्य नसेल तर ती न स्वीकारता आपली मते जगाला पटवणे यासाठी सुद्धा मोकळेपणा आवश्यक असतो. आणि सरतेशेवटी आपला आपल्याच मतांवर ठाम विश्वास असला की जगाला पटो न पटो, मी माझ्या सिद्धांतांवर जगत राहणार, जगाने त्यांच्या त्यांच्या सिद्धांतांवर जगावे हा स्वीकार मनात येण्यासाठीसुद्धा मनाचा मोकळेपणा आवश्यक असतो.
काय म्हणताय मंडळी ? पटतय का ?
- Perestroika and Glasnost च्या काळात युवावस्थेत पदार्पण करीत असलेला आणि त्या शब्दांचा प्रचंड प्रभाव पडलेला एक गृहस्थ प्रा. वैभवीरामाईल किन्हीचोव्ह.
No comments:
Post a Comment