"God gave us relatives; Thank God we can choose friends" असे इंग्रजी भाषेत जराश्या वैतागानेच म्हटले जाते. बरोबरच आहे. नातेवाईकांना वैतागलेल्या एखाद्या विचारवंताने हे वाक्य प्रसवले असावे आणि त्या वाक्याच्या सार्वत्रिक समान अनुभवामुळे ते वाक्य जगभरातल्या लोकांना पटले आणि रूढ झाले.
आपल्या भारतीय संस्कृतीतल्या कर्माच्या सिद्धांतानुसार मात्र या वैतागवाण्या वाक्यामागचा नेमका अर्थ लागतो. मुळात या जन्मात आपल्या आयुष्यात येणारी सर्व मंडळी, आपले सर्व नातेवाईक इतकेच काय आपली अपत्ये सुद्धा गत जन्मातले आपले काही ऋण वसूल करायला किंवा फ़ेडायला आलेले असतात. गत जन्मातल्या किंवा गेल्या अनेक जन्मातल्या आपल्या काही कर्मांचा हिशेब त्या जीवांच्या बाबतीत अपुरा राहिलेला असतो तो पूर्ण करण्यासाठी ही सगळी मंडळी आपल्या आयुष्यात येतात. मग या जन्मात या मंडळींकडून आनंददायी अनुभव आलेत, सुख प्राप्त झालेत तर गेल्या काही जन्मांमधले आपल्या कर्माचे चांगले संचित आता आपल्याला फ़ळ द्यायला आलेय म्हणून ते स्वीकारायचे असते आणि जर त्यांच्याकडून आपल्याला मनस्ताप, उद्वेग, त्रास झाला तर मागल्या काही जन्मात आपण त्यांना अशा प्रकारचा काही त्रास दिला असावा ते कर्म पूर्ण करायला आपल्या आयुष्यात ते आलेले आहेत असे मानून या जन्मात आपण त्रास करून घेऊ नये किंवा त्यांना तशाच प्रकारचा त्रास द्यायला जाऊन या जन्मात नवे कर्म, नवे प्रारब्ध तयार करू नये.
याउलट गेल्या अनेक जन्मात आपण केलेले कर्म अशा या लोकांकडून आपल्याला त्रास देऊन निःशेष होत असलेले बघून आपल्याला आनंद व्हायला हवा. आपल्या कर्मांचा हिशेब निःशेष झाल्याशिवाय, आपली इथली कर्मांची बॅलन्सशीट टॅली झाल्याशिवाय या जन्ममरणाच्या फ़े-यांमधून आपल्याला सुटका नाही हे कायम लक्षात ठेवावे. आणि या जन्ममरणाच्या फ़े-यातून सुटका हे जर आपले अंतिम ध्येय असेल तर मग या सगळ्या नातेवाईकांना मनोमन धन्यवाद म्हणावे. जर असे आपले अंतिम ध्येय नसेल तर मात्र त्यांच्या कर्मांना प्रत्युत्त्तर देत, त्यावर अधिक कर्मे करीत आपण नवीन कर्मे, प्रेम, वैर इत्यादि भाव निर्माण करावेत आणि ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेत जावे.
आपल्या भारतीय संस्कृतीत यासाठी "ऋणानुबंध" हा मोठा छान शब्द आहे. आपले इतर अनेक जणांशी, अनेक जन्मांचे काहीतरी ऋण असेल आणि त्या अनुबंधामुळे, त्या बंधनांमुळे त्या त्या व्यक्ती आपल्या आयुष्यात या जन्मी आल्या असतील असा त्या शब्दाचा अर्थ. हे ऋण मान्य करून ते कसे आहे याचे कौतुक या जगात बघणे आणि ते ऋण फ़िटत आले म्हणून त्याचा आनंद घेणे हे खरे जीवन.
जगाला कसे वागायचे तसे जग वागो. कदाचित जगात सगळ्यांनाच हा कर्माचा सिद्धांत पटतो, पचतो असे नाही पण मला मात्र या कर्मांच्या फ़े-यातून मुक्त व्हायचे आहे अशी ज्याची इच्छा असेल त्याने मात्र अशा प्रकारे निष्कर्म होण्याचा प्रयत्न करीत असावा आणि त्या प्रयत्नात आपल्याला त्रास देऊन अशा प्रकारे आपल्या कर्मांचे ओझे हलके करणा-या सगळ्यांचे मनोमन ऋणी असावे. सगळ्यांसाठी अगदी मनापासून "जो जे वांछिल तो ते लाहो" ही प्रार्थना करीत असावे. जगातल्या सर्व सुष्ट शक्तींच्या अवलोकनात "जो जे"या प्रार्थनेत आपलाही समावेश होतो हे तर अगदी नक्की समजावे. मग अगदी निर्भय आणि आनंदी होऊन साक्षीभावाने जगावे, जगता यावे.
संत एकनाथ महाराजांच्या "जैशी स्थिती आहे, तैशापरी राहे; कौतुक तू पाहे, संचिताचे" या ओवीचा अर्थ हाच तर आहे. हे करत असताना जगाप्रती आपली चांगली कर्मे मात्र सोडू नयेत. चांगलीच कर्मे करावीत पण त्या चांगल्या कर्माचेही संचित तयार होऊन ते भोगायला आपल्याला पुन्हा जन्म नकोय ही भावना मनात ठेऊन ती सर्व कर्मे भगवंताला, श्रीक्रुष्णाला अर्पण करावीत आणि निःशेष कर्मांच्या आनंदात मस्त जीवन जगावे.
भाषाप्रभू गदिमांनी तर लिहीलेच आहे ना "जग हे बंदिशाळा, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला...... सुटकेलाही मन घाबरते" तसे या जगाची इतकी सवय होऊन हेच जग आवडायला लागणे, इथल्या भातुकलीच्या, लुटुपुटूच्या खेळांमध्ये रमणे आणि त्यामुळे जगाच्या बंदिखान्यातून सुटका व्हायला मन घाबरणे असे होऊ देऊ नये. या जगातून आपली कर्मे निःशेष करून आपल्याला सुटका करण्यासाठी आलेल्यांचे मनोमन आभार मानावे आणि सुटण्यासाठी तयार रहावे.
- "कर्माचा सिद्धांत हा ग्रंथ अगदी योग्य वेळी वाचनात आलेला आणि त्याचे वाचन झाल्यानंतर त्यातल्या सिद्धांतांचा डोळस अनुभव घेत असणारा मुक्तीच्या मार्गावरील एक साधक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment