वृंदावनातल्या सुंदर आणि रमणीय वनांमध्ये शरद पौर्णिमा आली. शरद पौर्णिमेला चंद्र लालसर, गुलाबी असा दिसत असतो. वातावरणात अत्यंत उल्हास होता. नद्या, वृक्ष, भूमी सगळेच आनंदी आणि सुखी होते. श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीलांमुळे गोपबालक आणि गोपी अत्यंत आनंदित होत्या. अशा त्या रमणीय रात्री श्रीकृष्णाने वनात आपली दिव्य बासरी वाजवायला सुरूवात केली आणि ते सूर ऐकताच संपूर्ण वृंदावनातली चर आणि अचर सृष्टी अक्षरशः मोहरून गेली. मनुष्य़मात्रांना तर ते सूर कानातून थेट हृदयापर्यंत भिडल्याने त्यांची अवस्था अत्यंत व्याकूळ झालीच होती पण वॄंदावनातले पशुपक्षी, झाडे इतकेच काय आपण ज्या गोष्टींना निर्जीव मानतो ती भूमी, घरे हे सुद्धा त्या बासरीच्या सुरांनी आनंदित झाले, गुरे वासरे आपले दावे तोडून परमेश्वराकडे जायला, त्याच्या कृपाकटाक्षासाठी, आलिंगनासाठी उत्सुक होऊ लागली, तर भूमी आणि घरे वाडे आनंदित होऊन बासरीच्या सुरांवर कंप पावू लागलेत. त्यांना अचर अवस्था प्राप्त होती म्हणून नाहीतर त्यांनीसुद्धा मनुष्य़मात्रांप्रमाणे, गाई वासरांप्रमाणे वनात बासरी वाजवत बसलेल्या त्या परमात्म्याकडे धाव घेतली असती.
ज्या मनुष्य़मात्रांची देहबुद्धी ते दिव्य सूर कानांवर आल्यानंतर सुद्धा जागृत होती, ज्यांचा माझा देह, माझा संसार, माझी बायकामुले हा भ्रम अजून संपूर्णपणे संपला नव्हता त्यांनी मात्र ते दिव्य सूर कानांवर आल्यानंतर सुद्धा वनात धाव घेतली नाही. पण हे दिव्य सूर ऐकून ज्या मनुष्य आणि प्राणीमात्रांची देहबुद्धी पूर्णपणे गळून गेली त्या सर्व आत्म्यांनी त्या परमात्म्याच्या भेटीसाठी, आलिंगनासाठी, त्याच्यासह क्रीडा करण्यासाठी वनात अगदी अनावर होऊन धाव घेतली. अनेक गोप, गोपी, त्यांचे गोधन आणि इतर प्राण्यांसह वृंदावनातल्या त्या रमणीय भूमीवर महारास रंगली. प्रत्येक जीवाला त्या परब्रह्माशी क्रीडा करून त्याच्यात स्वतःला एकरूप व्हायचे होते. यात कुठल्याही प्रकारच्या देहांचे बंधन उरले नाही.आजवर असलेल्या द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा प्रत्येक जीवांचा प्रयत्न होता आणि बासरी वाजवत सगळुया जीवांशी क्रीडा करणारा तो परमात्मा प्रत्येक जीवाच्या त्या संकल्पाच्या पूर्तीकरिता त्यांच्याशी क्रीडा करीत होता.
क्रीडा करीत असताना अचानक काही गोपींचे देहभान जागृत झाले आणि प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याशी खेळतोय हे लक्षात आल्यानंतर त्यांना सूक्ष्म अहंकार झाला. वास्तविक तो परमात्मा तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांशीच क्रीडा करीत होता, आपल्या नावाला सार्थक असे सगळ्यांनाच आपल्यात आकर्षित करून घेत होता. पण आपली देहबुद्धी जागृत झाली की आपल्याला तो परमात्मा इतरांशी काय करतोय हे दिसत नाही फ़क्त आपल्यापुरता आपण विचार करू लागतो. तो परमात्मा फ़क्त आपल्याशी क्रीडा करतोय हे जाणवल्यानंतर गोपींच्या मनात जो सूक्ष्म अहंकार निर्माण झाला त्या अहंकाराला जाणून श्रीकृष्ण अचानक त्या महारासातून निघून गेला. भानावर आलेल्या गोपींना आजूबाजूला श्रीकृष्ण दिसेना. त्या गोपींना आपल्या अकारण अहंकाराची जाणीव झाली आणि आपण काय गमावले याबद्दल त्या शोक करू लागल्यात.
श्रीमदभागवतातील दशम स्कंधातला एकतिसावा अध्याय हा या गोपींच्या पश्चातापाचा आणि आपल्यापासून आपल्या देहबुद्धीमुळे दूर निघून गेलेल्या परमात्म्याला आळवून परत बोलाविण्याच्या गोपीगीताचा आहे. आजही अनेक भाविक घरांमध्ये कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री हे गोपीगीत गाण्याचा प्रघात आहे. काव्याच्या दृष्टीने तर गोपीगीत खूप सरस आहेच पण ते वाचताना त्यातली भावाभिव्यक्ती लक्षात घेऊन ते गायले तर कलियुगात आजही आपले सगळ्याम्चे जे जीव त्या परमेश्वरापासून दूर झालेले आहेत, त्याचा विरह आपल्याला झालेला आहे, ते दुःख दूर करून जीवाला आंतरिक शांती देणारे हे गोपीगीत आहे. या जगात आलेल्या प्रत्येक जीवाला एकदा त्या परमेश्वराला जाऊन भेटायचे आहे. त्यासाठी फ़ार जास्त देहबुद्धी बाळगून चालणार नाही आणि या सगळ्या प्रक्रियेत मध्येच आपल्याला परमेश्वर भेटला जरी ती विशेष गोष्ट न मानता एक सहज आणि आपल्या एकंदर ध्येयाचा भाग असलेली गोष्ट म्हणूनच ती घटना स्वीकारली गेली पाहिजे. भगवंत फ़क्त मलाच भेटला हा अहंकार झाला की तो आपल्याला त्याच्यापासून दूर करतो हे सगळ्या साधकांनी पक्के लक्षात ठेऊन त्याप्रमाणे आपली आध्यात्मिक साधना आणि आचरण ठेवले पाहिजे.
गोपींचा शोक आणि त्यांची अत्यंत पवित्र भावना लक्षात घेऊन भगवंत पुन्हा प्रगट झालेत आणि वृंदावनात सगळ्या चर आणि अचर सृष्टीसह त्यांची महारास रंगली. कोजागरीच्या मध्यरात्री गोपीगीत त्याच्या अर्थासह वाचले, गायले तर मनातल्या कामवासनांचा नाश होतोच आणि आपली देहबुद्धी क्षीण होत जाते हा अनेक भाविकांचा अनुभव आहे. रूसलेल्या भगवंताला पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी हे गोपीगीत नियमित वाचनात तर ठेवावेच पण कोजागरीच्या रात्री जरूर वाचावे.
आजच्या युगात महारास आपण केवळ आपल्या देहबुद्धीच्या परिप्रेक्ष्यातून बघतो. आजच्या संदर्भातून बघतो. अनेक भोंदू त्या महारास शब्दाचा फ़ायदा घेत स्वतःचे चोचले पुरविण्यासाठी देशाला आणि धर्माला बदनाम करणारी कृत्ये करतात. पण महारास हा फ़ार मोठा आणि जीवनात प्रत्येक जीवाने अंतिमतः प्राप्त करून घेण्याचा अनुभव आहे हे लक्षात ठेवावे. आपल्याही आयुष्यात आपल्याला सरतेशेवटी त्या परमेश्वरात विलीन होऊन तो आणि मी निराळा नाही ही अद्वैतावस्था प्राप्त करून घ्यायचीच आहे. आपल्याशी महारास खेळायला त्याने यावे यासाठी जीवनभर साधना करायची आहे.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण पंचमी शके १९४८ दिनांक ३ / ८ / २०२६
३ ऑगस्ट २०२६
No comments:
Post a Comment