Saturday, August 1, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३२ ब्राह्मणपत्नींवर श्रीकृष्णांची कृपा

एकदा भगवान श्रीकृष्ण बलरामदादा आणि आपल्या गोप सवंगड्यांसह मथुरेतील लोकांची स्थिती अवलोकन करण्यासाठी म्हणून वृंदावनातून मथुरेजवळ आलेत आणि त्यांनी मथुरेबाहेर असलेल्या एका उपवनात आपला मुक्काम केला. तेव्हा मथुरेत अनेक याज्ञिक ब्राह्मण मंडळी मोठमोठे यज्ञ संपन्न करीत होते. श्रीकृष्ण आणि बलरामदादांना भूक लागली. त्यांनी त्या गोपबालकांना यज्ञस्थळी जाऊन तेथील अन्नप्रसाद स्वतःसाठी मागून आणण्यास सांगितले.


त्याप्रमाणे गोपबालके यज्ञ्स्थळी गेलीत आणि तिथल्या ब्राह्मणांना यज्ञाचा प्रसाद श्रीकृष्ण आणि बलरामदादांच्या भक्षणाकरिता मागू लागलीत. ब्राह्मणांनी त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. ते आपल्या यज्ञकर्मात फ़ार गुरफ़टले होते. निराश होत ती गोपबालके मथुरेबाहेर श्रीकृष्ण आणि बलरामदादांच्या निवासस्थानाकडे आलीत आणि त्यांनी सगळी कथा त्या दोघांना ऐकवली.


श्रीकृष्ण हसलेत आणि म्हणालेत की अरे, असे पहिल्याच प्रयत्नात यश न मिळाल्याने निराश होऊ नका. पुन्हा मथुरेत जा आणि त्या यज्ञ करणा-या ब्राह्मणांच्या पत्नींना या यज्ञप्रसाद मागा. त्या मृदू हृदयाच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला तिथे यश मिळेल.


श्रीकृष्णांच्या वचनांवर विश्वास असलेली गोपबालके पुन्हा मथुरेत आलीत आणि त्यांनी यज्ञ करीत असलेल्या ब्राह्मणांच्या पत्नींकडे श्रीकृष्ण आणि बलरामदादांना प्रसाद हवा म्हणून मागणी केली. त्या स्त्रियांनी रामकृष्णांची गोकुळातली कीर्ती ऐकलेली होती आणि त्यांना त्या दोघांच्याही दर्शनाची ओढ लागलेली होती. त्यांनी लगेच सगळ्या स्वयंपाकातले उत्तमोत्तम पदार्थ भांड्यांमध्ये घेतलेत आणि गोपबालकांसोबत त्या सुद्धा मथुरेच्या बाहेरील उपवनात रामकृष्णांच्या दर्शनासाठी असोशीने निघाल्यात.



रामकृष्णांची भेट झाल्यानंतर त्या स्त्रियांचा आनंद त्यांच्या डोळ्यांमधून ओसंडत होता. त्यांनी मोठ्या प्रेमाने त्या दोघा भावंडांना आणि सोबतच्या गोपबाळांना भोजन करविले. रामकृष्णांची त्यांनी स्तुती केली. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सहज भक्तीवर आणि अकृत्रिम प्रेमभावावर प्रसन्न झालेत. भगवंतांनी त्यांना आशिर्वाद दिलेत. पती आज्ञेवाचून तुम्ही आम्हाला भोजन देऊन आपापल्या पतींची अवज्ञा केली असली तरी त्याबद्दल तुमचे पती तुम्हाला दोष देणार नाहीत असे वचन दिले.


ब्राह्मणपत्नी मथुरेत परतल्यात. यज्ञकर्त्या ब्राह्मणांना ही वार्ता कळताच त्यांना राग न येता स्वतःचेच वाईट वाटले. ज्या साध्यासाठी आपण साधन म्हणून यज्ञ करतो आहोत तोच यज्ञनारायण प्रत्यक्ष प्रगट होऊन आपल्याकडे आहुती मागत होता पण आपण आपल्या कर्मांमध्ये इतके अडकून राहिलो होतो की आपल्याला साध्य काय आणि साधन काय याचाच विसर पडला आणि आपल्या हातून मोठीच चूक झाली याची त्या ब्राह्मणांना जाणीव झाली. या कृत्याचा त्यांना पश्चाताप झाला आणि आपल्या पत्नींचा त्यांना फ़ार अभिमान वाटला. ब्राह्मणांनी रामकृष्णांची स्तुती करून त्यांच्याकडे मनःपूर्वक आणि मनानेच क्षमायाचना केली. मृदूहृदयी भगवंतांनी त्यांना क्षमा केली.



भगवंतासाठी जरी कर्म करतोय तरी आपण आपल्याला नक्की काय साध्य करायचय आणि त्यासाठी नेमके साधन कुठले याचा साध्यसाधन विवेक सदैव जागृत ठेवायला हवा हा या कथेचा बोध आणि हाच या कथेचा प्रसाद सुद्धा.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण तृतीया शके १९४८ दिनांक  १ / ८ / २०२६


१ ऑगस्ट २०२६


No comments:

Post a Comment