१९९९ मध्ये मी काढलेला हा फ़ोटो सध्या इंटरनेटवर फ़ार व्हायरल झालेला आहे. खूपशा ग्रूप्समधून हा फ़ोटो महाराष्ट्र एस. टी. च्या जुन्या बांधणीच्या बसचा फ़ोटो म्हणून फ़िरतो आहे. गोष्ट खरी आहे. महाराष्ट्र एस. टी. च्या साध्या बसचे हे डिझाईन जवळपास चार दशके तरी तसेच होते.
हा फ़ोटो मी कोडॅक के. बी 10 या कॅमे-याने काढलेला आहे आणि नंतर त्याला स्कॅन करून डिजीटल रूपात बदललेला आहे. या फ़ोटोची प्रिंट आणि त्याचे निगेटिव्हज माझ्याकडे आहे. जुन्या काळी (साधारण २००८ - २०११ पर्यंत) फ़ोटोवर कॉपीराईट कसा टाकायचा ? याबद्दल मी अनभिज्ञ होतो आणि म्हणूनच १५ वर्षांपूर्वी हा फ़ोटो माझ्या फ़्लिकर अकाऊंटवर मी टाकला. तिथेही त्या फ़ोटोला जवळपास २४०० व्ह्यूज आलेले आहेत आणि एस. टी. मधल्या जाणका-यांच्या कॉमेंटसही.
मुंबईला दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापन करताना दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांच्या SURVEYING या विषयाचा कॅम्प म्हणून आम्ही सेंट झेव्हियर्स व्हिला, खंडाळा इथे आठवडाभर मुक्कामी असायचोत. या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाजवळच पुणे - मुंबई (जुन्या, NH 4) या महामार्गाचा बसथांबा होता. ज्यांनी जुन्या NH 4 ने मुंबई - पुणे - मुंबई प्रवास केलाय त्यांना ठाऊक असेल की खंडाळा गावातून मुंबई - पुणे व पुणे मुंबई हे दोन मार्ग वेगळे व्हायचेत.
त्याच पुणे - मुंबई महामार्गावर जुन्या NH 4 वरील खंडाळा बोगद्याच्या अगदी वर हा राजमाची पॉइंट होता. इथे एक छोटेसे उद्यान सुद्धा होते. त्या उद्यानालगतच आपल्या महाराष्ट्र एस. टी. चा हा एक ब्रेक टेस्टिंग पॉइंट होता. आपल्या महाराष्ट्र एस. टी. ची एक शेड होती. त्यात काही अधिकारी, बदली चालक, काही तंत्रज्ञ वगैरे मंडळी बसलेली असायचीत. या ठिकाणी थांबणे हे सर्वच्या सर्व बसेसना अनिवार्य होते.
या ठिकाणी थांबून सर्व चालक मंडळी त्या शेडमध्ये जायचीत. तिथे त्यांनी अंमली पदार्थ सेवन केले आहेत की नाही याची ब्रेथ ॲनालायझरद्वारे चाचणी व्हायची. गाडी संपूर्णपणे थांबल्यामुळे गाडीचीही चाचणी व्हायची. कारण या राजमाची पॉइंटनंतर अमृतांजन पुलापर्यंत जुन्या पुणे - मुंबई घाटाला एक तीव्र उतारांची आणि शार्प वळणांची अशी साखळीच होती. त्यामुळे या ठिकाणी चालकाची आणि वाहनाची तपासणी अत्यावश्यकच होती.
ही तळेगाव डेपोची बस लोणावळा - राजमाची - लोणावळा अशी सर्वसामान्य (ऑर्डिनरी) सेवा घेऊन लोणावळ्यातील पर्यटकांना राजमाची उद्यानापर्यंत आणून थोडावेळ थांबून परत जायची. अशाच एका संध्याकाळी काढलेला त्या बसचा हा फ़ोटो. त्या काळी प्रत्येक विभाग हा आपापल्या बसचे दर्शनी भागातील ग्रील्स आणि काहीवेळा खिडक्यासुद्धा वेगवेगळ्या रंगांनी रंगवीत असत. पुणे विभाग आपल्या बसेसना तेव्हा असा गुलाबी रंग ग्रील्सना आणि खिडक्यांना देत असे. ग्रील्सभोवती पांढरी बॉर्डर ही पण पुणे विभागाचीच खासियत होती.
मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीने बांधलेली ही टाटा बस आज महाराष्ट्र एस. टी. च्या बसबांधणीतले एक मानचिन्ह झालेले पाहून माझ्यातला बसफ़ॅन खरोखर आनंदित होतो.
आपल्याला आठवतात का आपापल्या विभागातल्या जुन्या बसेसच्या ग्रील्सचे आणि खिडक्यांचे रंग ?
उदाहरणार्थ
1. चंद्रपूर विभाग समोरच्या बफ़रला काळ्या बॉर्डरमध्ये छोटासा पिवळा पट्टा मारयचेत. ग्रिल व खिडक्या हिरव्या रंगाच्या असायच्यात.
2. यवतमाळ विभागातल्या बसेसचे ग्रिल्स आणि खिड्क्या आकाशी निळ्या रंगाच्या असायचेत.
3. अकोला विभागातल्या बसेसच्या काळ्या ग्रिल्सभोवती अशीच एक पांढरी बॉर्डर असायची.
4. अहिल्यानगर व जळगाव विभागातल्या बसेसची ग्रिल्स निळ्या रंगांची असायचीत.
5. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा काही काळ अशी गुलाबी रंगाची ग्रिल्स असायचीत नंतर मग काळपट चंदेरी (Steel Grey) रंगांच्या ग्रिल्स असायच्यात.
6. नांदेड विभागाच्या बसेस तर पिवळ्या धमक ग्रिल्ससाठी प्रसिद्ध होत्या.
कळवा आणखी काही रंग जे कदाचित आज माझ्या आणि काही बसफ़ॅन्सच्या विस्मृतीत गेलेले असतील. तुमच्या उत्तरांमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
- एक अत्यंत जुना बसफ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment