बालपणापासूनच आमची तब्येत म्हणजे सिंगल हड्डी, अगदी काडी पहेलवान अशी. त्यामुळे आम्ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलला प्रवेश घेतला तेव्हा आम्ही वयाची विशी आणि वजनाची तिशी गाठायचीच होती. हॉस्टेलला चार वर्षानंतर पदवी मिळवताना आमचे वजन फ़क्त ४२ किलो होते हे मी आज अत्यंत आनंदाने नमूद करू इच्छितो. तडतडा स्वभाव आणि त्यामुळे काटक शरीर. शिवाय आज जेव्हढा मी फ़ूडी आहे तेव्हढा माझ्या तरूणपणात नव्हतो. माझी आई अगदी अन्नपूर्णा होती. तिला विविध पदार्थ करता येत असत आणि तिच्या हाताइतकी उत्तम चव कुठेच नाही म्हणून बाहेरचे काही खाऊन बघण्याचा फ़ार सोस आम्हाला नव्हता. अगदीच आपदधर्म म्हणून बाहेर खावे लागले तर गोष्ट वेगळी पण मुद्दाम बाहेर जाऊन खाणे हा प्रकार नव्हता. एकतर तो काळ तसा नव्हता आणि तशा सोयीही फ़ारशा उपलब्ध नव्हत्या. तात्पर्य काय ! अनेकविध कारणांमुळे आम्ही सिंगल चे सिंगल हड्डीच राहिलेले होतो.
कराडला गेल्यानंतर पहिल्या वर्षीचे बुजरेपण गेल्यानंतर मग नवनवे मित्र, मैत्रिणी मिळायला लागलेत. मनुष्य नागपूरचा असो, नगरचा असो, सांगलीचा असो किंवा अगदी नाशिकचा असो त्याच्या घरी आपल्या घरच्यासारखेच वातावरण, संस्कार आहेत. एखाद्या गोष्टीबाबत त्याच्या क्रिया प्रतिक्रिया अगदी आपल्यासारख्याच आहेत ही जाणीव पटली की मग भौगोलिक अंतरे मनाच्या अंतरांशी कसलेही संबंध ठेवत नसत. "काय बेटे तुम्ही पुण्या मुंबईची माणसे !" असे वाक्य बोलणा-या माणसाने आयुष्यात एकदाही अकोला जिल्ह्याच्या पश्चिमेला पाऊल ठेवलेले नसते आणि "काय तुमच्या विदर्भात कायम दुष्काळ !" असे म्हणणा-या माणसाने त्याच्या आयुष्यात मुंबई - पुणे - नाशिक हा त्रिकोण ओलांडलेला नसतो. घराबाहेर रहायला लागल्यानंतर वृत्ती विशाल होते, दृष्टीकोन व्यापक होतो. "वसुधैव कुटुंबकम" ही वृत्ती अंगी बाणायला सुरूवात होते.
तसाच एक अत्यंत गुणी मित्र मला लाभला तो म्हणजे सांगलीचा सतीश सुरेश तानवडे. एक अत्यंत उत्तम गायक, अंगात एक उपजतच सांगलीकर फ़टकळपणा, कुठल्याही अवघड प्रसंगात अजिबात दडपण न घेता एखादा अत्यंत मार्मिक विनोद वापरून तो प्रसंग अगदी हलका करून टाकण्याचे त्याचे कसब आणि मित्र म्हणून जिवाला जीव देणारा "सत्या" आम्हा सर्व मित्रमंडळींमध्ये अत्यंत लोकप्रिय होता. त्याउलट मी. एक "न कलाकार", भीडस्त स्वभावाचा, "नाही" म्हणायचे मनात असताना बहुतांशी वेळा "हो" म्हणून नंतर पस्तावणारा, अवघड प्रसंगांचे पटकन दडपण घेणारा. अशावेळी त्याची आणि त्याच्या अत्यंत विरूद्ध स्वभावाच्या माझी मैत्री कशी जुळली ? आणि इतकी वर्षे कशी टिकली ? हे एक कोडेच आहे.
तसे आमचे मित्रमंडळ मस्तच होते. पण सगळे माझ्यासारखेच, अगदी सिंगल हड्डी. आमच्या मित्रमंडळींमध्ये मात्र आपण असे सिंगल हड्डी आहोत असा एक बोचणारा न्यूनगंड होता. बरे, जिम लावावी का ? या विषयावर प्रचंड मतभेद होते. बहुतांशी जणांचे म्हणणे असे की जिम लावायची, तिथे नियमाने जाऊन घाम गाळायचा आणि एव्हढे करून आपल्या अंगावर सध्या असलेले अडीच किलो मासही जिममध्ये जाऊन अंगावरून उतरून गेले तर ? नको, नकोच ती जिम. त्यामुळे जिमचा प्रश्नच निकालात निघाला होता.
त्याकाळी बाजारात १० - १० रूपयांमध्ये अशी ए - 3 आकाराची, गुळगुळीत कागदांवर छापलेली नटनट्यांची, प्रसिद्ध क्रिकेटियर्सची पोस्टर्स मिळायचीत. आता हॉस्टेल म्हटले की तिथे ही सगळी पोस्टर्स भिंतींवर चिटकवणे आलेच. आमच्यातली काही अतिउत्साही मंडळी त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या विदेशी नटी "शेवंताबाई कोल्हे" (समझनेवाले समझ गये है.) यांचीही अर्धावृत्त, अनावृत्त पोस्टर्स लावायचीत. (आणि मग हॉस्टेल वार्डन सर किंवा प्राचार्य सरांचा हॉस्टेल राऊंड असल्यावर त्या पोस्टर्सवर तात्पुरते टॉवेल्स टाकून, कपडे लटकवून ती पोस्टर्स झाकायचा अगदी आटोकाट प्रयत्न करायचीत.)
आमच्या मित्रमंडळींनी मात्र आपल्या डोळ्यासमोर बॉडीबिल्डींगचा आदर्श असावा म्हणून त्याकाळच्या तगड्या क्रिकेट प्लेयर्सचे पोस्टर्स आमच्या रूम्सवर लावलेले होते. रोज सकाळी उठल्यानंतर आमच्या तत्कालीन मांडीएव्हढा दंड असलेल्या त्या क्रिकेट्पटूचे दर्शन घायचे आणि कधीतरी ५ - १० वर्षांनी आपलाही दंड त्याच्यासारखा होईल अशी दुर्दम्य आशा बाळगायची म्हणजे आज ना उद्या आपणही तितकेच बलदंड नक्कीच होऊ असा आमचा स्वतःवरच एक अत्यंत पॉझिटिव्ह असा मानसिक प्रयोग होता.
त्यात सतीश ने भर घातली. एकेदिवशी त्याच्या मनात काय आहे कुणास ठाऊक ! तो मला म्हणाला, "राम्या, आजपासून तू मला अरनॉल्ड स्वार्तझनेगर च्या धर्तीवर अरनॉल्ड तानवडे म्हणायचे आणि मी तुला सिल्व्हेस्टर स्टॅलीनच्या धर्तीवर सिल्व्हेस्टर किन्हीकर म्हणणार." झाले. त्याच्या अत्यंत आग्रही स्वभावानुसार आम्ही हा प्रयोग ते सेमीस्टरभर चालवला. कुठेही भेटलोत की "हाय अरनॉल्ड !" किंवा "हाय सिल्व्हेस्टर !" असे एकमेकांना अभिवादन करीत असू. या अभिवादनामुळे आमच्या मनात स्वतःविषयी तशी उच्च भावना जागृत होऊन काहीही विशेष प्रयत्न न करता आम्ही असेच मनाच्या पॉझिटिव्ह विचारसरणीच्या जोरावर तसे हट्टेकट्टे बनू ही आमची अगदी भाबडी समजूत. आज ते आठवलं की हसू येते.
एव्हढही करून कॉलेजमधून पास होऊन परतताना आमच्या वजनांनी धड पन्नाशी सुद्धा गाठली नव्हती. हा फ़ोटो मी फ़ायनल इयरच्या परिक्षेनंतर कराड सोडून नागपूरला परतताना कराडच्या बसस्टॅंडवर काढलेला आहे. सतीश, मी आणि आमच्या दोघांचीही एक छान मैत्रिण वैशाली. आम्ही सगळेच अगदी काटक होतो. आज या सगळ्या वजनांचा आणि आपण तेव्हा किती काटक आणि फ़िट होतो याचा अक्षरशः हेवा वाटतो. मध्यंतरी सुखावण्याच्या काळात वजनाने ७५ गाठले होते आणि प्रकृतीच्या नवनवीन कुरबुरी सुरू झालेल्या होत्या ते आठवले की अंगावर काटा येतो. किती प्रयत्नांनी वजनाला काबूत आणता आले हे माझे मलाच माहिती.
जिममध्ये जाऊन कृत्रिम फ़ूड सप्लीमेंटस घेऊन, औषधे, इंजक्शने घेऊन बनविलेल्या त्या सिक्स पॅक शरीरांविषयीही आता काही वाटेनासे झाले आहे. वाटलीच तर फ़क्त कीव वाटतेय. या औषधांचे, इंजेक्शनांचे दुष्परिणाम जेव्हा या लोकांना जाणवायला लागतील तेव्हा यांच्यासारखे दुर्दैवी जीव हेच असतील असेही आज वाटून जाते. पण कॉलेजच्या काळात आमच्याकडे नसलेल्या या डबल हड्डी बॉडीचा आदर्श आमच्या डोळ्यांसमोर होता हे मात्र नक्की.
- पुन्हा एकदा कॉलेज जीवन अनुभवू इच्छिणारा, सिंगल हड्डी - डबल हड्डी आणि पुन्हा सिंगल हड्डी असा प्रवास करून आलेला एक विद्यार्थी सिल्व्हेस्टर किन्हीकर.
No comments:
Post a Comment