Monday, March 23, 2026

पाहता पाहता स्वतःतले झालेले बदल. Change and Transition.

फ़ार फ़ार पूर्वी वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये "हे चित्र पहा आणि ते चित्र पहा" अशा आकाराची सदरे असायचीत. आज अचानक हे आठवायचे कारण म्हणजे आपल्याही आयुष्यात अशी आपलीच चित्रे, आपल्याच काहीकाही सवयी पाहता पाहता बदलत जातात पण पाहता पाहता दिसत मात्र नाहीत. त्या सवयी का आणि कशा बदलल्यात ? याचा शोध घेणे आपले आपल्यालाच अवघड जाते.


काल हातरूमालांना इस्त्री करत बसलो होतो. शनिवार - रविवार अशी लागून सुट्टी आली की त्या पंधरवाड्यात धुतल्या गेलेल्या हातरूमालांना घरच्या घरी इस्त्री करून ते पुढल्या पंधरा दिवसांसाठी नीट रचून ठेवायचे हा माझा गेल्या अनेक वर्षांचा शिरस्ता. ते इस्त्री करतानाच त्यावर थोडे यु डी कोलन शिंपडायचे म्हणजे पुढल्या पंधरा वीस दिवसभरात तो हातरूमाल वापरताना त्या मंद सुगंधाने मन उल्हसित आणि प्रसन्न राहते हा माझा अनुभव. घरच्या घरी अशी इस्त्री केल्यामुळे ते हातरूमाल इस्त्री करताना मनाला काहीतरी विधायक आणि प्रसन्न करणारे कार्य केल्याची सुखद भावना जाणवत राहते ती निराळीच.


काल लक्षात आले की माझ्याजवळ सध्या असलेले सगळे हातरूमाल एकजात पांढ-या रंगाचेच आहेत. त्यावर इतर रंगांची हलकी बॉर्डर वगैरे आहे पण रंग पांढराच. एकेकाळी माझ्याकडे निळे, तांबडे, हिरवे हातरूमाल असायचे. फ़ार फ़ार पूर्वी. मी शिकत असताना. आणि ते घेताना पण ते अगदी कॉटनचेच असावेत हा माझा अट्टाहास नसायचा. अगदी टेरीकॉट, टेरेलीनचे रूमाल पण मी वापरले असल्याचे मला स्मरले. त्या काळापासून ते आज फ़क्त कॉटनचेच आणि त्यातही तलम खादीचे आणि फ़क्त पांढ-या रंगांचेच हातरूमाल वापरण्यातला बदल माझ्यात कधी घडला ? हे माझे मलाच उमगेना.



आणखी एक बदल माझ्यात घडल्याचे मला जाणवले. पूर्वी बाहेरून घरी आलो की दिवसभर घातलेली ट्राऊझर मी त्यातल्या हातरूमालासकट खुंटीला टांगून ठेवत असे. दोन तीन दिवसांनी मग दोन तीन ट्राऊझर्स धुण्यासाठी बादलीत सर्फ़चे पाणी करून त्यात बुडवल्या जात असत. खिशातले रूमाल तसेच असत. मग ती ट्राऊझर धुताना त्यातला रूमाल बाजूला काढल्या जात असे आणि तो धुतल्या जात असे. आजकाल गेल्या पंचवीस वर्षात मात्र रोज बाहेरून आलो की पहिल्यांदा ट्राऊझरमधला हातरूमाल बाहेर काढून तो धुण्याच्या कपड्यांच्या बास्केटमध्ये टाकला जातोय. हा बदल माझ्यात कधी आणि केव्हापासून झाला ? हे सुद्धा मला आता आठवेनासे झाले आहे. 


माझे लग्न झाले तेव्हा माझ्या लक्षात आले आणि पाहून अगदी आनंद झाला होता की माझी सौभाग्यवती ही माझ्याइतकीच किंवा माझ्याहून थोडी सरसच नीटनेटकेपणा आणि टापटिपीची होती. वस्तूंचे बोळे करून इकडे तिकडे टाकून देणे, कुठल्या एका वस्तूला किंवा एखाद्या प्रक्रियेला निश्चित अशी SOP नसणे हे तिच्याबाबतीत शक्यच नव्हते. मलासुद्धा तशीच जीवनसाथी हवी होती. मग माझ्या आयुष्यात रूमालांच्या बाबतीतले हे बदल तिने घडवून आणलेत का ?


तशी शक्यता आहे. पण तिच्या मुळातच ऋजू स्वभावाला कुणावर असा अधिकार गाजवणे, हुकूमशाही करणे, दंडेलीने वागणे मान्यच नव्हते. आमच्या मुलीला पण तिने ज्या सवयी लावल्यात त्या अत्यंत गोड बोलून, समजावणीने. आणि एकदम माझ्या लक्षात आले की तिने असेच हळूवारपणे माझ्या व्यक्तीमत्वातही असे अनेक बदल हळूहळू घडवून आणले असतील. त्या हळूवारपणामुळे ते नक्की कधी झालेत हे आठवत नाहीत. पण आता हाडीमासी रूजलेत. 


"Transition is a gradual Change and Change is a sudden Transition" असे म्हणतात त्याचा असा प्रत्यय आला. चिरकाल टिकणारे बदल असे हळूवारपणे, मनापासून व्हावे लागतात.


- आपल्या जीवनसंगिनीबाबत कायम कृतज्ञ असलेला आणि पुढल्या अनेक जन्मांमध्ये (असलेच तर) हीच जीवनसंगिनी मला मिळावी अशी आर्त प्रार्थना परमेश्वराकडे करणारा एक नीट आणि व्यवस्थित (आजच्या जेन झी च्या भाषेत "Sorted") गृहस्थ, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Tuesday, March 3, 2026

हेड ऑफ़िसची बस

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्यालय मुंबई सेंट्रल इथे आहे.


मुंबई सेंट्रल डेपोच्या गाडीला आमच्या बसफ़ॅन्समध्ये "हेड ऑफ़िसची गाडी" असे संबोधले जाते.





गणपतीपुळे निम आराम मुंबई


मार्गे रत्नागिरी - चिपळूण - महाड - माणगाव - पेण - पनवेल 


अशोक लेलॅण्ड चित्ता मॉडेल


MH 20 / D 9427


मुं. मुंबई आगार


BS II उत्सर्जन मानकांनुसार बांधलेली निम आराम बस. 


2 बाय 2 आसनव्यवस्था. एकूण 45 आसने.

 

मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेली बस. MH 20 / D सिरीज ही संपूर्ण महाराष्ट्रात अगदी आगळीवेगळी आहे कारण MH 20 / D 0001 पासून MH 20 / D 9999 पर्यंत सगळ्या गाड्या एस. टी. च्याच मालकीच्या आहेत. ही सिरीज छत्रपती संभाजीनगर च्या आर. टी. ओ. ने इतर कुठल्याही वाहनांना दिली नव्हती.


या D गॅंगच्या गाड्यांच्या दरा-यावर मी यापूर्वी इथे एक लेख लिहीलेला होता.





मुंबई विभागाच्या एस. टी. बसेसवर मराठीतल्या अतिशय सुंदर फ़ॉन्टने मुं. मुंबई किंवा विभागातल्या इतर डेपोंची नावे लिहीली जायचीत. I am simply in love with that font.


गणपतीपुळे बस पार्किंग

20/02/2009



- एस. टी. नामक प्रेयसीच्या प्रेमातच असल्याने तिची कुठलीही अदा सुंदरच वाटणारा एक आशिक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Sunday, March 1, 2026

चला देवदर्शनाला, पर्यटनाला

पणजी गोवा पूर्णपणे पर्यटनस्थळ आहे. गणपतीपुळे सुद्धा काही मंडळींसाठी पर्यटन स्थळ असेल पण माझ्यासाठी हे एक धार्मिक स्थळ आहे. इथला गणपती लोभसवाणा आहे. अगदी पहिल्या दर्शनात आपलेसे करणारा आहे.


आपली महाराष्ट्र एस. टी. प्रवाशांना देवदर्शनासाठी आणि पर्यटनासाठी नेण्यास कायम सज्ज असते.



पणजी निम आराम गणपतीपुळे

मार्गे म्हापसा - पत्रादेवी - सावंतवाडी - कणकवली - राजापूर

MH - 12 / EF 6344

TATA 1510 Cummins, BS II bus

मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी यांनी बांधलेली निम आराम बस.

सिं. सावंतवाडी आगार.

काहीही म्हणा. या निम आराम गाड्यांची शान काही वेगळीच होती.

सावंतवाडी आगार हे मुख्यतः अशोक लेलॅण्ड गाड्यांचे म्हणून ओळखले जाते. त्यात त्यांच्या ताफ़्यात ही टाटाची सुंदरी फ़ार दुर्मिळ होती. म्हणूनच हे प्रकाशचित्र एक विशेष महत्व राखून आहे. 

गणपतीपुळे बस पार्किंग

20/02/2009