काहीकाही गाणी, सुरावटी मनाला टाईम मशीन मध्ये बसवून भूतकाळात आणि भलभलत्या ठिकाणी घेऊन जातात.
आकाशवाणीवर एकेकाळी सादर होणार्या "सांजधारा" कार्यक्रमातली मराठी गाणी लागलीत की सी.पी. अॅण्ड बेरार शाळेतून दिवसभराचे काम आटोपून संध्याकाळी निघालेले आणि बुधवार बाजारात उद्यासाठी भाजी आणणारे माझे वडिल दिसतात. बुधवार बाजाराच्या तटबंदीतून मागच्या गल्लीतल्या नरसीकरांच्या वाड्यात जाण्यासाठी एक मोठा दरवाजा होता. तो दरवाजा ओलांडला आणि पायर्या उतरल्यात की नरसीकरांचा वाडा. तिथे माझी आत्या रहायची. तिच्याकडे आमचे दादा अत्यंत प्रेमाने जायचेत, एकमेकांची विचारपूस, गुजगोष्टी व्हायच्यात.
विविध भारतीवर दुपारच्या वेळेला जी गाणी लागतात त्या गाण्यांच्या लकेरी, सुरावटी जरी कानी आल्यात तरी मी माझ्या बालपणच्या इतवारीतल्या आमच्या कुहीकर वाड्यात जातो. निवांत दुपार, सकाळची शाळा आटोपून जेवण करून छोटासा राम आईच्या मांडीवर डोके ठेऊन वामकुक्षी करतोय, जवळच्याच कुठल्या तरी घरातून या गाण्याच्या लकेरी कानावर पडताहेत.
मल्लिकार्जून मन्सूर अण्णांची मुलतानी रागातली "साहेब जमाले" कानावर पडली की आम्ही आमच्या गाडीने केलेले नागपूर ते सांगोला प्रवास आठवतात. ही बंदिश किंवा भीमसेनजींची मुलतानी मधलीच "गोकुल गाँव का छोरा, बरसाने की नार" गाडीत सुरू आहे. पहाटे पहाटे सुरू केलेल्या प्रवासाला आता जवळपास १२ तास उलटून गेलेले आहेत. बार्शी - कुर्डुवाडी रस्त्यावर चहापान आटोपून आपण टेंभूर्णीकडे जातोय. सूर्य अस्ताला जातोय आणि आता अगदी तासाभरात आपण आपल्या घरी, सांगोल्याला असणार आहोत, हीच भावना.
असे सुरावटींमध्ये हरवून भूतकाळात रमणे, हरवणे हे आजच्या दिनांकाला, वर्तमानात गाडी चालवत असताना चांगले नाही हे सुध्दा मला माहिती आहे. पण या सुरावटींमध्ये आपला जीव रमतोय, टाईम मशीन सारखे आपण भूतकाळात जातोय, आता आपल्यात नसलेल्या आपल्या जीवलगांसोबत रमतोय हे मला खूप मोलाचे वाटते.
- जीवनाशी, काळाशी, जीवलगांशी कायम कृतज्ञ असलेला, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment