Showing posts with label Warkari Panth. Show all posts
Showing posts with label Warkari Panth. Show all posts

Sunday, August 7, 2022

देवाचिये द्वारी - २९

 



कोणाचे हे घर हा देह कोणाचा I

आत्माराम त्याचा तोचि जाणे II


मी तू हा विचार विवेके शोधणे I

गोविंदा माधवा याच देही II


देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा I

सहस्रदळी उगवला सूर्य जैसा II


ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती I

या नावे रूपे ती तुम्ही जाणा II



मी कोण, मी कोणाचा या प्रश्नांचा धांडोळा स्वतःच्या अंतःकरणात घेऊन याच देहात असलेल्या परमेश्वराची अनुभूती साधक मंडळींनी घ्यावी असे अत्यंत आग्रहाचे प्रतिपादन माऊली आपण सर्व साधकांना करताहेत.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध दशमी, शके १९४४ , दिनांक ०७/०८/२०२२)

Saturday, August 6, 2022

देवाचिये द्वारी - २८

 


अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस I

रचिले विश्वासे ज्ञानदेवे II


नित्य पाठ करी इंद्रायणीतीरी I

होय अधिकारी सर्वथा तो II


असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन I

उल्हासेकरून स्मरण जीवी II


अंतकाळी तैसा संकटाचे वेळी I

हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य II


संतसज्जनांनी घेतली प्रचीती I

आळशी मंदमती केवी तरे II


श्रीगुरूनिवृत्ती वचन प्रेमळ I

तोषला तात्काळ ज्ञानदेव. II



अशा हा साध्या सोप्या हरीपाठाचे स्वस्थ चित्ताने एकाग्र होऊन आणि उल्हासाने जो मनुष्यमात्र पठण, चिंतन करेल त्याच्या सर्व संकटांमध्ये आणि अंतकाळी प्रत्यक्ष हरी त्यांना सांभाळील हे वचन आपल्या गुरूंच्या, श्री निवृत्तीनाथा महाराजांच्या सामर्थ्यबळावर माऊली आपल्याला या अभंगातून देत आहेत.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध नवमी, शके १९४४ , दिनांक ०६/०८/२०२२)

Friday, August 5, 2022

देवाचिये द्वारी - २७

 



सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी I

रिकामा अर्धघडी राहू नको II


लटिका व्यवहार सर्व हा संसार I

वाया येरझार हरीविण II


नाममंत्र जप कोटी जाईल पाप I

रामकृष्णी संकल्प धरूनी राहे II


निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी I

इंद्रिया सवडी लपू नको II


तीर्थी व्रती भाव धरी रे करूणा I

शांती दया पाहुणा हरी करी II


ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान I

समाधी संजीवन हरिपाठ. II



या संसारातल्या सर्व लटक्या व्यवहारांचे फ़ोलपण जाणून, इंद्रियांच्या अधीन न होता, नामसाधनात जे कुणी साधक राहतील त्यांच्या घरी शांति आणि दया हे सदगुण कायम वास्तव्यास येतील. हरिपाठातले शेवटले काही अभंग लिहीताना माऊली आपले नामसाधनेचे प्रतिपादन अधिक आग्रहाने आणि अधिक भावपूर्ण करताना दिसत आहेत.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध अष्टमी, शके १९४४ , दिनांक ०५/०८/२०२२)

Thursday, August 4, 2022

देवाचिये द्वारी - २६


 
एक तत्व नाम दृढ धरी मना I

हरीसी करूणा येईल तुझी II


ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद I

वाचेसी सदगद जपा आधी II


नामापरते तत्व नाही रे अन्यथा I

वाया आणिका पंथा जाशी झणी II


ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी I

धरोनी श्रीहरी जपे सदा. II



नाम या एका साधनावर दृढ विश्वास ठेऊन आणि सदगदित अंतःकरणाने आणि वाचेने ते नाम घेतले तरच मनुष्यमात्रांच्या जीवनाचे सार्थक होईल असे माऊली या अभंगातून आग्रहाचे प्रतिपादन करताहेत.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध सप्तमी, शके १९४४ , दिनांक ०४/०८/२०२२)

Wednesday, August 3, 2022

देवाचिये द्वारी - २५

 


जाणीव नेणीव भगवंती नाही I

हरीउच्चारणी मोक्ष सदा II


नारायण हरी उच्चार नामाचा I

तेथे कळीकाळाचा रीघ नाही II


तेथील प्रमाण नेणवे वेदांसी I

ते जीवजंतूंसी केवी कळे II


ज्ञानदेवा फ़ळ नारायण बाठ I

सर्वत्र वैकुंठ केले असे. II


ज्या नाम महिम्याला वर्णन करता करता वेदही थकलेत ते नाम जाणीवेने किंवा अजाणतेपणाने घेतले तरी ते भगवंतापर्यंत पोहोचतेच. असे हे भगवंताचे नाम आपण कायम घेत रहावे हे माऊली या अभंगातून सुचवताहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध षष्ठी, शके १९४४, दिनांक ३/८/२०२२)


Tuesday, August 2, 2022

देवाचिये द्वारी - २४

 


जप तप कर्म क्रिया नेम धर्म I

सर्वाघटी राम भाव शुद्ध II


न सोडी हा भावो टाकी रे संदेहो I

रामकृष्ण टाहो नित्य फ़ोडी II


जात वित्त गोत कुळ शीळ मात I

भजे का त्वरित भावनायुक्त II


ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी I

तेणे वैकुंठभुवनी घर केले. II


सर्व भूतमात्रांमध्ये भगवंताचे अधिष्ठान आहे अशी भावना ठेऊन भावनायुक्त अंतःकरणाने परमेश्वराची आराधना केली तर मनुष्यमात्रांना वैकुंठ दूर नाही असे आश्वासन माऊली आपल्याला या अभंगातून देत आहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध पंचमी, नागपंचमी,  शके १९४४, दिनांक २/८/२०२२)


Monday, August 1, 2022

देवाचिये द्वारी - २३

 


सात पांच तीन दशकांचा मेळा I

एक तत्वी कळा दावी हरी II


तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ I

तेथे काही कष्ट न लागती II


अजपा जपणे उलट प्राणाचा I

तेथेही मनाचा निर्धारू असे II


ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ I

रामकृष्णी पंथ क्रमियेला. II


"तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती" अध्यात्माच्या इतर साधनांसाठी मनुष्यमात्रांना जे कष्ट करावे लागतात, तेवढे सोपे नामसाधन आहे असे आग्रहाचे प्रतिपादन माऊली या अभंगात करत आहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध तृतीया, शके १९४४, दिनांक १/८/२०२२)


Sunday, July 31, 2022

देवाचिये द्वारी - २२

 


नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ I

लक्षुमी वल्लभ तयांजवळी II


नारायण हरी नारायण हरी I

भक्ति मुक्ति चारी घरी त्याच्या II


हरीविणे जन्म तो नर्कचि पै जाणा I

यमाचा पाहुणा प्राणी होय II


ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड I

गगनाहूनि वाड नाम आहे. II


नामस्मरण हा नित्यनेम करणारे साधक दुर्लभ आहेत. आणि असा नेम  करणाऱ्या साधकांसाठी प्रत्यक्ष लक्ष्मी आणि लक्ष्मीपती जवळ उभे राहून त्यांचे सकल मनोरथ पूर्ण करतात असे आश्वासन आपल्याला देऊन आपण सगळ्या साधकांना नामस्मरणाकडे वळण्याचे आवाहन माऊली आपल्याला करताहेत.  


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध तृतीया, शके १९४४, दिनांक ३१/०७/२०२२)


Saturday, July 30, 2022

देवाचिये द्वारी - २१

 


काळवेळ नाम उच्चारिता नाही I

दोन्ही पक्ष पाही उद्धरती II


रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण I

जडजीवा तारण हरि एक II


हरिनाम सार जिव्हा या नामाची I

उपमा त्या देवाची कोण वानी II


ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ I

पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. II


हरिपाठाच्या चिंतन, मनन आणि नुसत्या पठणानेही केवळ स्वतःचाच उद्धार साधतो असे नव्हे तर आपल्या पूर्वजांचाही वैकुंठमार्ग आपण सोपा करीत असतो अशी ही हरिपाठाची फ़लश्रुती माऊली आपल्याला सांगून साध्या सोप्या नामस्मरणाकडे आपल्याला वळवताहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध द्वितीया, शके १९४४, दिनांक ३०/०७/२०२२)


Friday, July 29, 2022

देवाचिये द्वारी - २०

 


नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी I

पापे अनंत कोटी गेली त्यांची II


अनंत जन्माचे तप एक नाम I

सर्व मार्ग सुगम हरिपाठी II


योग यागक्रिया धर्माधर्म माया I

गेले ते विलया हरिपाठी II


ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म I

हरीविण नेम नाही दुजा. II


"अनंत जन्माचे तप एक नाम , सर्व मार्ग सुगम हरिपाठी " इतर अनेक उपायांपेक्षा नामस्मरणासारख्या सोपे सुलभ साधनाचे महत्व माऊली या अभंगातून पुन्हा पटवून सांगत आहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध प्रतिपदा, शके १९४४ , दिनांक २९/०७/२०२२)


Thursday, July 28, 2022

देवाचिये द्वारी - १९

 


वेदशास्त्रपुराण श्रुतींचे वचन I

एक नारायण सार जप II


जप तप कर्म हरिवीण धर्म I

वाऊगाची श्रम व्यर्थ जाय II


हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले I

भ्रमर गुंतले सुमनकळिके II


ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र I

यमे काळगोत्र वर्जियेले. II


"जप तप कर्म हरिवीण धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय" अध्यात्मात सगळी साधने केलीत आणि जे साध्य त्या हरीलाच विसरलोत तर ते सगळे व्यर्थ असे माऊलींचे प्रतिपादन. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ अमावास्या, दीप अमावास्या, जिवती अमावास्या, शके १९४४ , दिनांक २८/०७/२०२२)


Wednesday, July 27, 2022

देवाचिये द्वारी - १८


हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन I

हरीविण सौजन्य नेणे काही II


या नरा लाधले वैकुंठ जोडले I

सकळ घडले तीर्थाटण II


मनोमार्गे गेला तो तेथे मुकला I

हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य II


ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी I

रामकृष्णी आवडी सर्वकाळी. II


अत्यंत अस्थिर अशा मानवी मनाचे ज्याने ऐकले, जो मनाच्या मागे गेला त्याची फ़रफ़ट अटळ आहे. जो हरिपाठातल्या शाश्वत अशा परमेश्वर स्वरूपाला (आणि पर्यायाने स्वस्वरूपाला) जाणता झाला तो स्थिर होईल आणि त्याचेच आयुष्य़ धन्य होईल याचे प्रतिपादन करणारा हा अभंग. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण चतुर्दशी, शके १९४४ , दिनांक २७/०७/२०२२)


Tuesday, July 26, 2022

देवाचिये द्वारी - १७

 


हरिपाठकीर्ति मुखे जरी गाय I

पवित्रची होय देह त्याचा II


तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप I

चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे II


मातृपितृभ्राता सगोत्र अपार I

चतुर्भूज नर होऊनी ठेले II


ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधले I

निवृत्तीने माझ्या हाती दिले. II


अशा या साध्या सोप्या हरिपाठाला, त्यात प्रतिपादन केलेल्या (सर्व जीवांमध्ये भेद नाही एव्हढेच काय तर मनुष्य आणि परमेश्वराच्या विभूतीतही भेद नाही हे सांगणाऱ्या) अद्वैत सिद्धांताला जो जीव जाणतो त्यात आणि परमेश्वरात भेद उरत नाही असे प्रतिपादन करणारा हा अभंग.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II




- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण त्रयोदशी, शके १९४४ , दिनांक २६/०७/२०२२)


Monday, July 25, 2022

देवाचिये द्वारी - १६

 


हरीनाम जपे तो नर दुर्लभ I

वाचेसी सुलभ राम कृष्ण II

 

राम कृष्ण नामी उन्मनी साधली I

तयासी लाधली सकळ सिद्धी II

 

सिद्धी धर्म सकळ हरिपाठी आले I

प्रपंची निवाले साधुसंगे II

 

ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा I

तेणे दशदिशा आत्माराम. II

 

 

अध्यात्माच्या अनंत साधनांमध्ये अत्यंत सोपे असे नामस्मरण ज्या साधकाला साधले त्याला सकळ सिद्धी सहज साधता येतात असे नामस्मरणाचे महत्व पटवून सांगणारा माऊलींचा हा अभंग.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण व्दादशी, शके १९४४ , दिनांक २५/०७/२०२२)


Sunday, July 24, 2022

देवाचिये द्वारी - १५


 

एक नाम हरी द्वैतनाम दूरी I

अद्वैतकुसरी विरळा जाणे II

 

समबुद्धी घेता समान श्रीहरी I

शमदमांवेरी हरी झाला II

 

सर्वांघटी राम देहादेही एक I

सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी II

 

ज्ञानदेवा चित्ती परिपाठ नेमा I

मागिलीया जन्मा मुक्त झालो. II

 

"सर्वांघटी राम देहादेही एक" सर्व प्राण्यांमध्ये एकच परमात्मतत्व भरलेले आहे या अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन करणारा हा अभंग. नेमाने हा परिपाठ करणा-या भक्ताची गतजन्मातल्या क्रियमाणांमधून मुक्तता करण्याची ग्वाहीच माऊली आपल्याला देत आहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण एकादशी , शके १९४४ , दिनांक २४/०७/२०२२)

Saturday, July 23, 2022

देवाचिये व्दारी - १४

 


नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी I

कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी II

 

रामकृष्ण वाचा अनंत राशी तप I

पापाचे कळप पळती पुढे II

 

हरिहरि हरि मंत्र हा शिवाचा I

म्हणती जे वाचा तया मोक्ष II

 

ज्ञानदेवा पाठ नारायण नाम I

पाविजे उत्तम निजस्थान II

 

 

"नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी " असा हा हरिपाठ ज्याच्या नित्य वाचनात आहे त्याला कलीची आणि काळाची बाधा होणार नाही हे माऊलींचे हरिपाठाविषयीचे आपण सर्वांना दिलेले आश्वासन आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण दशमी, शके १९४४ , दिनांक २३/०७/२०२२)

Friday, July 22, 2022

देवाचिये व्दारी - १३

 


समाधी हरीची समसुखेवीण I

न साधेल जाण व्दैतबुद्धी II

 

बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे I

एका केशिराजे सकळ सिद्धि II

 

ऋद्धिसिद्धिनिधी अवघीच उपाधी I

जव त्या परमानंदी मन नाही II

 

ज्ञानदेव रम्य रमले समाधान I

हरिचे चिंतन सर्वकाळ II

 

जोपर्यंत अव्दैताच्या परमानंदात मन बुडून जात नाही तोपर्यंत "ऋद्धिसिद्धिनिधी अवघीच उपाधी " हे सगळे उपाय मनुष्याच्या मागे नसत्या उपाधी बनून राहतील हा निखळ स्वच्छ अध्यात्माचा माऊलींचा उपदेश.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण नवमी शके १९४४ , दिनांक २२/०७/२०२२)

Thursday, July 21, 2022

देवाचिये व्दारी - १२

 


तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी I

वायाचि उपाधि करिसी जना II

 

भावबळे आकळे येरवी नाकळे I

करतळी आवळे तैसा हरी II

 

परिचयाचा रवा घेता भूमीवरी I

यत्न परोपरी साधन तैसे II

 

ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण I

दिधले संपूर्ण माझे हाती II

 

 

"भावबळे आकळे येरवी नाकळे " यात परमेश्वराच्या ख-या स्वरूपाला जाणण्यासाठी केवळ भक्ताच्या मनातला खरा भावच उपयुक्त ठरेल असे माऊलींनी स्पष्ट प्रतिपादन केलेले आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण अष्टमी, शके १९४४ , दिनांक २१/०७/२०२२)

Tuesday, July 19, 2022

देवाचिये व्दारी - १०

 


त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी I

चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ II

 

नामासी विन्मुख तो नर पापिया I

हरीवीण धावया न पावे कोणी II

 

पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक I

नामे तिन्ही लोक उद्धरती II

 

ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे I

परंपरा त्यांचे कुळ शुद्ध II

 

 अनेक तीर्थांचे भ्रमण केले पण जर नामात लक्ष नसेल तर ते सगळे व्यर्थ असे माऊली सुचवताहेत. एका नामावाचून कोणीही आपल्याला तारणार नाही.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण षष्ठी, शके १९४४ , दिनांक १९/०७/२०२२)

Monday, July 11, 2022

देवाचिये व्दारी - २

 


चहु वेद जाण षटशास्त्री कारण I

अठराही पुराणे हरिसी गाती II


मंथुनी नवनीता तैसे घे अनंता I

वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग II


एक हरी आत्मा जीवशिव समा I

वाया तू दुर्गमा न घाली मन II


ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ I

भरला घनदाट हरी दिसे. II

 

 

"एक हरी आत्मा जीवशिव समा" यात प्रत्येक जीवात आणि त्या परमतत्वात काहीच फ़रक नाही याचे प्रतिपादन केलेले आहे. हा दृढ सिद्धांत एकदा मनात ठसला की अध्यात्माच्या अनेक दुर्गम बाबींमध्ये मन घालण्याची त्या व्यक्तीला गरज भासत नाही.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ शुद्ध व्दादशी, शके १९४४ , दिनांक ११/०७/२०२२)