शिरपूरवरून नागपूरला कारने येताना वाटेत, दरवेळी सकाळी १० च्या सुमारास, मुक्ताईनगर ते भुसावळ पट्ट्यात, "बर्हाणपूर जलद औरंगाबाद" बस दिसायची.
तेव्हा आमच्या कन्येच्या इतिहासाच्या धड्यात नुकताच मुघल इतिहास झाला असल्याने तिने निरागसपणे एकदा प्रश्न विचारला, " बाबा, औरंगजेब याच बसने नेहमी बर्हाणपूरवरून औरंगाबादला जात होता का ?"
माझ्या डोळ्यासमोर ८० वर्षे पार केलेला औरंगजेब उभाच राहिला. त्याच्या संपूर्ण दरबारी पोषाखात (तो टोप वगैरे चढवून), कमरेला तलवार लटकावून, ज्येष्ठ नागरिकांचे सवलत तिकीट घेऊन, चालकाच्या अगदी मागच्या सीटवर, खिडकीचे गज एका हाताने घट्ट धरून अधीरतेने प्रवास करणारा औरंगजेब गाडीतल्या प्रवाशांच्या चेहर्यावर स्मितहास्य फुलवणारा होता.
तसही इतिहासकारांच्या मते तो खूप साधा (स्वतःचा खर्च टोप्या विणून वगैरे चालवणारा) होता. मग तेव्हा एस. टी. असती तर तो एस. टी. ने नक्कीच गेला असता.
तसेच मी पहिल्यांदाच माणगाववरून ठाण्याला परतताना "महाड जलद सूरत" या GSRTC च्या रातराणी एस टीने प्रवास करताना माझे झाले होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथे प्राध्यापक असणार्या मित्राला भेटून रात्री ९.०० च्या सुमारास लोणेरे फाट्यावरून या गाडीत बसलो. माणगाव स्थानकावरून निघाल्यावर थोड्याच वेळात ड्रायव्हर साहेबांनी गाडीतले मुख्य दिवे मालवले आणि निळसर दिव्यांच्या मंद प्रकाशात आमचा प्रवास सुरू झाला. आता कुठलाही प्रवास म्हणजे केवळ "अ" ठिकाणाहून "ब" ठिकाणापर्यंत जाणे एव्हढाच विचार आम्ही बसफॅन मंडळी करीत नसल्याने या बसचा "महाड जलद सूरत" हा मार्ग डोक्यात फिट्ट होता. आणि थोड्या वेळाने काय विचारता ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने, रायगडाच्या पायथ्याशी महाडमधे, बहिर्जी नाईकांच्या गुप्त सरंजामात जमलेली मावळे मंडळी सूरत लुटायला गुजरातकडे चाललेली आहेत असेच मला वाटू लागले. त्या अंधारात जो प्रवासी म्हणावा तो गुप्त वेषातला मावळाच वाटत होता. पनवेलला या गाडीतून उतरलो खरा पण दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रात "मावळ्यांनी सुरतेवर चाल करून ती लुटली" अशी हेडलाईन वाचायला मिळेल की काय ? असे वाटत होते.
पुलंचे हरीतात्या त्यांच्या चाळीतल्या मुलांना घेऊन पहिल्यांदा पुण्याला गेले होते तेव्हा खंडाळ्याच्या घाटातून रेल्वेने प्रवास करणार्या या सगळ्या मुलांना "एकदा तरी मराठी सैन्य घोड्यांवर स्वार होऊन या घाटात चढ उतार करताना दिसावे" अशी तीव्र इच्छा मनात आल्याचे पुलंनी लिहून ठेवलेले आहे. अगदी तसेच मला झाले होते. नुसते "महाड जलद सूरत" नाव वाचून.
पुलंना ही ऐतिहासिक दृष्टी हरीतात्यांनी दिली.
आणि आम्हाला खुद्द पुलंनी.
बालपणापासून त्यांच्या साहित्याची असंख्य पारायणे करून जवळपास त्यांचे सगळे साहित्य तोंडपाठ असल्याचा असाही परिणाम होतो.
- एस टी च्या इतिहासाच्या प्रेमात असलेला आणि इतिहासात एस टी नेऊ पाहणारा एक एस टी प्रेमी मावळा रामोजी.
(फोटो प्रातिनिधिक)
No comments:
Post a Comment