माझे मातामह कै. श्री. गोपाळराव केशवराव उपाख्य बाबुराव सगदेव यांचा प्रचंड प्रभाव माझ्यावर आहे. माझी मुंज झाल्या झाल्या त्यांनी मला संध्यावंदन शिकविले. ते स्वतः वयाच्या ८९ वर्षांपर्यंत रोज सकाळ संध्याकाळी संध्यावंदन करायचेत. आयुष्याचे अखेरचे सहा महिने अस्थिभंगामुळे त्यांनी अंथरूणावर काढलेत, तेवढ्याच काळात त्यांची संध्या चुकली असेल फक्त. बाकी दररोज संध्या आणि पहाटे उठून देवपूजा त्यांनी कधीही चुकविली नाही. आपल्या वागणुकीचा आदर्श त्यांनी आम्हासमोर ठेवला.
मी पण मुंज झाल्यानंतर काॅलेजला जाईपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ साग्रसंगीत संध्यावंदन करायचो. अगदी भस्मधारण विधी, अघमर्षण, अर्घ्यदान आणि गायत्रीजपादि सगळे विधी. काॅलेजला हाॅस्टेलला रहायला गेल्यावर सायंसंध्या होईनाशी झाली. पण मग प्रातःसंध्या मात्र नियमाने करायचोच.
अजूनही प्रवासाचे दिवस सोडलेत तर भस्मधारण आणि साग्रसंगीत प्रातःसंध्यावंदन करणे सुरूच आहे. कारण माझ्या आजोबांचा प्रचंड प्रभाव.
माझी मुंज झाल्या झाल्या बालपणी त्यांनी मला केलेला उपदेश माझ्या चांगलाच लक्षात आहे.
एकदा सहज बोलताना ते म्हणालेत, "राम, देवाजवळ आपल्यासाठी कधीही काही मागू नये." बालपणी त्याचा अर्थ कळलाच नाही.
नंतर आमच्या गुरूघरी (प.पू. बापुराव महाराज, प.पू. मायबाई महाराज, नागपूर) अनेक उत्सवांमध्ये अत्यंत उत्कृष्ट कीर्तने ऐकलीत. आणि देवाजवळ स्वतःसाठी का मागू नये ? याचा अर्थ कळला.
एक राजाने नवीन राजवाडा बांधण्याचे काम काढले. बर्याच दिवसांनी काम बघायला तो बांधकामाच्या ठिकाणी गेला. तिथे काम करणार्या एका कारागिराचे काम पाहून तो प्रसन्न झाला. त्याची कारागिरी, कामातली त्याची एकाग्रता, त्याची कामाप्रती निष्ठा पाहून तो खूप प्रभावित झाला.
जुन्या राजवाड्यात परतून त्याने त्या कारागिराला बोलावणे पाठवले. राजा त्यादिवशी त्या कारागिरावर एवढा प्रसन्न होता की त्या कारागिराने अक्षरशः अर्धे राज्य मागितले असते तरी ते द्यायला राजा तयार होता. तो कारागीर राजाकडे आल्यावर राजाने त्याला विचारले, "बोल, तुला काय हवे ?"
तो कारागिर खूप विचारात पडला आणि मग एकदम म्हणाला, "राजेसाहेब, सकाळधरनं एक कप चहा बी नाही प्यालो पहा. तेवढा चा पाजा."
त्या कारागिराने जर "राजेसाहेब, तुम्हाला योग्य वाटेल ते द्या." असे म्हणाला असता तर अर्धे राज्य त्याला मिळू शकले असते पण स्वतःच्या क्षुद्र इच्छेने त्याचा घात केला.
आपणही भक्तिमार्गात असेच करतो का ? आपली उपासना, भक्तिभाव पाहून भगवंत आपल्याला खूप काही जगावेगळे, पारलौकिक असे ऐश्वर्य द्यायला निघाला असतो पण आपण आपल्या देहबुध्दीने या लौकिक जगातलेच मागत बसतो, त्या चहा मागणार्या कारागिरासारखे.
म्हणून आपल्यासाठी आपण भगवंताकडे काही मागूच नये असा त्या उपदेशाचा अर्थ होता.
खूप उशीरा गोस्वामी बाबा तुलसीदास बाबांचा हा दोहा श्रवणात आला.
"जाहि न चाहिय, कबहुँ कछु, तुम्ह सन सहज सनेहु।
बसहु निरंतर तासु मन, सो राउर निज गेहु ।।"
(रामराया, ज्या व्यक्तिला आपल्याकडून कधीच, काहीच नको असते त्याच्याशी तुमचा सहज स्नेह होतो.
प्रभू रामा, तुम्ही त्याच्या मनात निरंतर वास करा कारण तेच तुमचे खरे निवासस्थान आहे.)
बाबा तुलसीदासांचा दोहा श्रवणात तर नंतर आला पण आचरणात आणण्याचे शिक्षण मातामहांकडून फार पूर्वीच मिळाले होते. असे आजी आजोबा मिळण्याचे भाग्य लाभायला पूर्वसुकृत निश्चित जबर असावे लागते, नाही ?
- या बाबतीत खरोखर भाग्यवान असलेला रामराया.
No comments:
Post a Comment