Wednesday, December 9, 2020

कायमचे लक्षात राहिलेले एक उमदे व्यक्तिमत्व.

९ डिसेंबर २०००. नागपूरचा एक तरूण त्याच्या नवपरिणीत पत्नीसह मधुचंद्रासाठी गोव्याला निघालेला होता. नागपूर ते कोल्हापूर हा प्रवास महाराष्ट्र एक्सप्रेसने आणि कोल्हापूर ते पणजी हा प्रवास बसने असा त्यांचा बेत होता. सगळा प्रवास त्याने स्वतः आखलेला होता. गोव्यातल्या हॉटेल्ससकट सगळी आरक्षणे त्याने स्वतः केलेली होती. नागपूर ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसचे तिकीट त्याने तत्कालीन नियमानुसार बरोबर ६० दिवस आधी आरक्षित केलेले होते आणि व्दिस्तरीय वातानुकूल शयनयानात (सेकंड एसी) सगळयांपासून अलिप्त आणि सगळ्यात कमी वर्दळीची जागा म्हणून मुद्दाम आसन क्र. २३ आणि २४ निवडून घेतले होते. (कोचमधल्या अगदी मधोमध असलेल्या बर्थ बे मधले साइड लोअर आणि साइड अप्पर बर्थस.)


सकाळी ११ वाजता नागपूरवरून सुटणारी नागपूर - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस (तेव्हा ती गोंदियापर्यंत वाढवलेली नव्हती.) सकाळी १० वाजता फ़लाटावर लागली. त्या दांपत्याला स्टेशनवर सोडायला त्या तरूणाचे धाकटे भाऊ, मित्र आदि मंडळी. थट्टा मस्करी चाललेली. गाडी आली. सेकंड एसीचा एकुलता एकच असलेला कोच सापडला. दांपत्य गाडीत शिरले. बर्थखाली सामानसुमानाची व्यवस्था वगैरे झाली. आणि सगळेच आता निवांत गप्पांमध्ये रंगलेत. आता थोड्या वेळात गाडी सुटणार आणि प्रवास सुरू होणार हे खुषीचे वातावरण.


इतक्यात तिथे एक गृहस्थ आलेत आणि त्यांच्याकडल्या पेपर तिकीटांवरही ए-१ कोचमधल्या २३ आणि २४ नंबरचा बर्थ त्यांना दिलेला असण्याची नोंद. बर ते गृहस्थ म्हणजे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष आणि कोल्हापूरचे आमदार श्री. बाबासाहेब कुपेकर यांचे स्वीय सहाय्यक. ते स्वीय सहाय्यक आणि खुद्द विधानसभाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर याच नंबरच्या बर्थस वरून प्रवास करणार होते. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर २००० रोजी संध्याकाळी संपलेले होते आणि विधानसभाध्यक्ष त्यांच्या स्वीय सहाय्यकांसह ९ डिसेंबरला त्यांच्या गावी परतत होते. विधीमंडळ सचिवालयाने आरक्षित केलेले पेपर तिकीट आणि त्यावर ए -१ / २३ आणि ए -१/ २४ ही अक्षरे पाहून त्या तरूणाचा, त्याच्या पत्नीचा आणि सोबत आलेल्या भावंडांचा गोंधळच उडाला.


मग नववधूशिवाय इतर मंडळी फ़लाटावर उतरली. बाबासाहेब कुपेकर अजूनही आपल्या नागपूरकर कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात गप्पा मारत रमलेले होते. स्वीय सहाय्यकांनी टीटीई साहेबांना पाचारण केले. ते आलेत. पुन्हा एकदा त्या तरूणाकडे असलेल्या तिकीटाची आणि रिझर्वेशन चार्टची पाहणी झाली. आणि धक्काच बसला. गाडीला लावलेल्या आणि टीटीई साहेबांकडे असलेल्या चार्टवर त्या तरूणाचे आणि त्याच्या पत्नीचे नावच नव्हते. रेल्वेकडून काहीतरी घोळ झाला होता. बरोबर रिझर्वेशन उघडल्याच्या दिवशी रिझर्वेशन करूनही ऐनवेळी चार्टमध्ये नाव नसणे म्हणजे भरपूर अभ्यास करून, छान परिक्षा देऊन निकाल "राखीव" यावा असे टेन्शन.




तरूणाकडे असलेल्या तिकीटाची रेल्वे अधिका-यांकडून पुनर्तपासणी झाली. तिकीट तर अधिकृत होते. त्यावर रेल्वे अधिका-यांच्या मान्यतेची पावतीही मिळाली. मग फ़लाटावर रेल्वे अधिका-यांची धावपळ सुरू झाली. त्या डब्यात एकही जागा शिल्लक नव्हती. नागपूरपासूनच आर ए सी, वेटींग लिस्ट चे प्रवासी ताटकळत होतेच. मधल्या स्थानकावरूनही असेच आर ए सी, वेटींग लिस्ट चे प्रवासी असणार हे उघड होते. अधिका-यांची फ़लाटावर नुसती धावपळ आणि धावपळ. कारण प्रवास करणारी व्यक्ति म्हणजे राज्यातल्या राजशिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) नुसार व्ही व्ही आय पी व्यक्ति होती.


मग साधारण ११ च्या सुमासास गाडीचे एंजिन गाडीपासून विलग होताना दिसले. नागपूर यार्डात जाऊन त्याने तिथला एक राखीव व्दिस्तरीय वातानुकूल (सेकंड एसी) डबा काढला आणि परत येऊन महाराष्ट्र एक्सप्रेसला जोडला. त्या दिवशी महाराष्ट्र एक्सप्रेस दोन व्दिस्तरीय शयनयान घेऊन धावली. आर ए सी, वेटींग लिस्ट सगळ्या प्रवाशांना त्यादिवशी अगदी कन्फ़र्मड जागा मिळाली असणार.


ते स्वीय सहाय्यक त्या तरूणापाशी आले. तोपर्यंत बाबासाहेब स्वतः त्या तरूणाजवळ येऊन उभे होते. आपल्या जागेवर आरक्षण असलेला तरूण हाच याची त्यांना कल्पना आलेली होती. शांतपणे त्या तरूणाशी ते गप्पा मारीत उभे होते. स्वीय सहायक तरूणाला म्हणाले, " साहेब, आता नवीन डबा लागलाय. तुम्ही त्यात शिफ़्ट व्हा. वाटल्यास तेच बर्थ नंबर्स मी टीटीईंना द्यायला सांगतो." 


त्यावर बाबासाहेब कुपेकरांनी दिलेले उत्तर कायमचे लक्षात राहणारे आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उमदेपणा अधोरेखित करणारे आहे. एव्हढ्या मोठ्या पदावरच्या राजकारण्याचे पाय किती जमिनीवर आहेत हे दाखवणारे आहे.

 ते आपल्या स्वीय सहाय्यकाला म्हणाले, " अहो, ते आता ए-१ मध्ये आधी बसलेयत ना. ते सेट झालेले आहेत. अनायासे आपण आपल्या सामानसुमानासकट बाहेर उभे आहोत. आपणच त्या जादा डब्यापर्यंत जाऊयात." 

आणि त्या तरूणाला म्हणाले, " तुम्ही बसा हो निवांत. गुड लक." 

आणि लगेच एंजिनाच्या मागे लागलेल्या सेकंड एसीकडे ते रवाना झालेसुद्धा. तो डबा सध्या उभे असलेल्या डब्यापासून ७ ते ८ डबे दूर होता पण कार्यकर्त्यांसह ते तिकडे चालत गेलेत आणि कोल्हापूरपर्यंतचा प्रवास त्यांनी त्या डब्यातून केला. स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्ता नसलेला, त्यांच्या मतदारसंघातला मतदार नसलेला एव्हढेच काय साधीओळखही नसलेल्या एका माणसासाठी त्यांनी हा  उमदेपणा दाखवला. अगदी अकृत्रिम. कुठलाही अभिनिवेश नसलेला साधेपणा. 




एका एका बर्थसाठी आपापसातच भांडणे करणारी, टीटीईला धमक्या देणारी लोकप्रतिनिधी मंडळी यानंतर मला पहायला मिळाली. (लिंक इथे) त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब कुपेकरांचा हा उमदेपणा माझ्या कायमचा लक्षात न राहिला तरच नवल.


- कथानकातला तो तरूण, प्रवासी पक्षी राम किन्हीकर.

 

2 comments: