Thursday, July 22, 2021

परिवर्तन मार्क २

यापूर्वीच्या परिवर्तन मार्क१ बाबत इथे वाचा.

 

आपल्या ताफ़्यातल्या साध्या (निम आराम नसलेल्या) बसेसच्या संरचनेत इ. स. २००३ मध्ये पहिल्यांदा मोठा बदल केल्यानंतर एस. टी. महामंडळाने २००५ मध्ये आणखीही छोटे छोटे बदल करून परिवर्तन बसेसचे दुसरे मॉडेल आणले. हेच ते परिवर्तन मार्क २. 

हा मी काढलेला आणि (नावासकट व नावाशिवायही) खूप कॉपी झालेला फ़ोटो.

ह्या मॉडेलमध्ये बसेसचा लुक महामंडळाने बदलला होता. आजवर एस. टी. बसेसचे समोरचे काऊल टाटा किंवा लेलॅण्ड कंपनीकडून चेसिससोबत जसे आले, तसेच वापरत होते. यावेळी पहिल्यांदा समोरचे काऊल टाटा किंवा लेलॅण्ड कंपनीकडून आलेले जसेच्या तसे न लावता, फ़ायबर रिएन्फ़ोर्स्ड प्लास्टिकचे (FRP) पॅनेल बनवून महामंडळाने वापरले होते.

 


 गाड्यांना जुन्या गाड्यांप्रमाणे लाल + पिवळा किंवा परिवर्तन मार्क १ चा निळा + हिरवा रंग न देता संपूर्ण लाल रंगात रंगविण्यात आले होते. बाजूने जुन्या एशियाड (निम आराम) बसेसना असायचे तसे पण पांढ-या रंगांचे दोन छोटे पट्टे मारण्यात आलेले होते. निम आराम गाड्यांना असा एकच पट्टा फ़िकट निळ्या रंगातला असे.


 परिवर्तन मार्क १ मध्ये प्रवासी सामान ठेवण्याच्या रॅकमध्ये बदल झालेले होते. रॅक्ची जाळी जाऊन तिथे आता अखंड पत्रा आलेला होता. ते बदल या ही मॉडेलमध्ये कायम ठेवण्यात आले.

 


फ़क्त परिवर्तन मार्क १ मध्ये बसच्या शेवटी छताला जो गोलाकार असायचा, तो बदलून पुन्हा जुन्या बसेससारखा सपाट भाग त्या ठिकाणी आलेला होता.

काही दिवसांनी ह्या FRP पॅनेल्सचा तकलादूपणा एस. टी. च्या लक्षात आला असावा. मग त्या पॅनेल्सना काही दुरूस्तीची गरज पडली तर एस. टी. पुन्हा टाटा किंवा लेलॅण्डची स्टॅण्डर्ड काऊल त्याठिकाणी लावून देत असे. आणि परिवर्तन मार्क ३ नंतर असे काऊल बदलण्याचा प्रयोग एस. टी. ने पुन्हा केला नाही. अगदी अगदी आता आता माइल्ड स्टीलच्या बसेसपर्यंत.





मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीत या बसेस MH - 12 / CH 75XX आणि MH - 12 / CH 76XX सिरीजमध्ये बांधल्या गेल्यात.

मध्यवर्ती कार्यशाळा औरंगाबादमध्ये या बसेस MH - 20 / D 84XX आणि MH - 20 / D 85XX सिरीजमध्ये बांधल्या गेल्यात.

मध्यवर्ती कार्यशाळा हिंगण्यात या बसेस MH - 40 / 84XX सिरीजमध्ये बांधल्या गेल्यात.


- या बसनामक प्रेयसीच्या प्रेमात असल्याने तिच्या कुठल्याही रूपावर प्रेम आणि प्रेमच करणारा, बसफ़ॅन राम किन्हीकर.

 

No comments:

Post a Comment