Showing posts with label Parivartan Mark 2. Show all posts
Showing posts with label Parivartan Mark 2. Show all posts

Saturday, January 27, 2024

परिवर्तन मार्क ३ बसेस.

इ. स. २००३ मध्ये जवळपास चाळीस वर्षांनंतर पहिल्यांदा बसेसच्या डिझाईनमध्ये मोठा बदल घडवल्यानंतर, दोनच वर्षात एस. टी. ने आपले डिझाईन पुन्हा थोडे बदलले. त्याबद्दलचे लेख परिवर्तन मार्क १ आणि परिवर्तन मार्क २ इथे आणि इथे.

परिवर्तन मार्क २ नंतर अवघ्या ८-९ महिन्यांमध्ये आपल्या एस. टी. ने पुन्हा आपले डिझाईन बदलले आणि परिवर्तन मार्क ३ बसेस आल्यात. या बसेसमध्ये एस. टी. ने पुन्हा आपला परंपरागत लाल + पिवळा रंग आणला होता आणि टाटा आणि लेलॅण्ड कंपनीचे मूळ काऊल्स जसेच्या तसे बसेसना द्यायला सुरूवात केली. 



परिवर्तन मार्क १ बसेसच्या खिडक्यांच्या काचांना फ़्रेम्स नव्हत्या. अशा फ़्रेम्स नसलेल्या काचांची व्ह्यायब्रेशन्स खूप होत असणार आणि त्यांचा आवाजही भरपूर होत असणार हे एस. टी. च्या लक्षात आले असावे आणि त्यांनी काचांना फ़्रेम्स द्यायला सुरूवात केली. परिवर्तन मार्क ३ बसेसच्या खिडक्यांना ॲल्युमिनियम फ़्रेम्स होत्या पण परिवर्तन मार्क २ बसेसच्या खिडक्यांच्या फ़्रेम्सप्रमाणे त्या काळ्या रंगात रंगवलेल्या नव्हत्या. परिवर्तन मार्क ३ बसेसच्या खिडक्यांच्या काचांच्या ॲल्युमिनियम फ़्रेम्स छान दिसायच्यात. आणि दणकटही वाटायच्यात.




परिवर्तन मार्क ३ बसेसचा हा प्रयोग साधारण वर्षभर चालला. मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर ने बांधलेल्या MH - 40 / 85XX या सिरीज पासून MH - 40 / 88XX या सिरीजपर्यंत हा प्रयोग चालला. 


नंतर मात्र 2 बाय 2 आसन व्यवस्थेच्या, संपूर्ण लाल रंगातल्या परिवर्तन मार्क ४ बसेस आल्यात. परिवर्तन मार्क ४ बसेसचे हे डिझाईन मात्र पुढले १५ वर्षे चालले आणि एम. एस. बॉडीतल्या बसेस येईपर्यंत हे डिझाईन तसेच कायम राहिले.


- बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, November 18, 2023

आडव्या बाकड्याची बस.

आज चाळीशी आणि पन्नाशीच्या पुढच्या पिढीच्या बालपणीच्या एस. टी. प्रवासाच्या आठवणींमध्ये ड्रायव्हर काकांच्या मागे असलेल्या आणि बाकीच्या प्रवाशांकडे तोंड करून असलेल्या लांबच लांब बाकड्याची आठवण प्रामुख्याने असेलच. या बाकड्यावर ड्रायव्हर काकांकडे तोंड करून गुडघे टेकून तळपाय इतर प्रवाशांच्या दिशेने करीत ड्रायव्हर काकांचे ड्रायव्हिंग कौशल्य बघत, येणारा ट्रॅफ़िक बघत प्रवास करण्याचे अनेक सफ़ल, असफ़ल प्रयत्न आपण सगळ्यांनी केले असतीलच. सगळ्या बाळगोपाळांना त्या बाकड्याचे एक आकर्षण असायचेच.

पण परिवर्तन मार्क १ बसेस पासून एकाच बाजूला (प्रवासाच्या दिशेला असलेल्या) तोंड असलेली आसने आलीत आणि ही मजा हरवली. त्यापूर्वी असलेल्या उलट बाजूचा आडवा बाकडा असलेल्या शेवटल्या बसपैकी एका बसचे हे नॉस्टॅल्जिक प्रकाशचित्र.



या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंगळवेढा डेपोची बस सांगोला ते अकलूज या ऑर्डिनरी सेवेसाठी वापरल्या जात होती. हे म्हणजे "आयजीच्या जिवावर बायजी उदार" सारखे झाले. 

सांगोला बस स्थानक दिनांक १५/११/२०१४.

तत्पूर्वी बरीच वर्षे एस. टी. ने खालीवर होणा-या खिडक्या आणि बसच्या मागे असलेल्या प्रवासी दार असलेल्या बसेस चालवल्यात.



साधारण १९९५ च्या आसपास बसचे दार मागून पुढे आले. मला वाटते मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरची MH - 31 / N 9251 ही याप्रकारातली पहिली बस होती.



नंतर मग काही गाड्यांनंतरच खाली - वर होणा-या (Drop Down) खिडक्यांच्या जागी पुढे मागे सरकवणा-या (Sliding) खिडक्या आल्यात. त्याच ह्या गाड्या.





मग परिवर्तन मार्क १परिवर्तन मार्क २ गाड्या आल्यात. 

त्यानंतर परिवर्तन मार्क ३ आणि परिवर्तन मार्क ४ गाड्या आल्यात.

त्यानंतर माइल्ड स्टील ची बांधणी असलेल्या BS 4 एंजिनच्या गाड्या आल्यात. जुन्या (परिवर्तन मार्क ४) गाड्यांची जुनी ॲल्युमिनीयम बस बॉडी बदलून नवी माइल्ड स्टील बॉडी बांधण्याचा उपक्रम सुरू झाला.

याच गाड्यांमध्ये जुन्या डिझाईनची उंच गाडीचे डिझाइन बदलून थोडी ठेंगणी गाडी बांधणे सुरू झाले.

त्यानंतर आली ती म्हणजे सध्याची BS 6 डिझाइनची नव्या बांधणीची गाडी.

यापूर्वी परिवर्तन मार्क १ आणि मार्क २ वर लिहीलेय. इतर सगळ्या टप्प्यांवर या वर्षाअखेर किंवा पुढल्या वर्षाच्या सुरूवातीला सविस्तर लिहीण्याचा मनोदय आहे.


- एस. टी. चा इतिहासप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Thursday, July 22, 2021

परिवर्तन मार्क २

यापूर्वीच्या परिवर्तन मार्क१ बाबत इथे वाचा.

 

आपल्या ताफ़्यातल्या साध्या (निम आराम नसलेल्या) बसेसच्या संरचनेत इ. स. २००३ मध्ये पहिल्यांदा मोठा बदल केल्यानंतर एस. टी. महामंडळाने २००५ मध्ये आणखीही छोटे छोटे बदल करून परिवर्तन बसेसचे दुसरे मॉडेल आणले. हेच ते परिवर्तन मार्क २. 

हा मी काढलेला आणि (नावासकट व नावाशिवायही) खूप कॉपी झालेला फ़ोटो.

ह्या मॉडेलमध्ये बसेसचा लुक महामंडळाने बदलला होता. आजवर एस. टी. बसेसचे समोरचे काऊल टाटा किंवा लेलॅण्ड कंपनीकडून चेसिससोबत जसे आले, तसेच वापरत होते. यावेळी पहिल्यांदा समोरचे काऊल टाटा किंवा लेलॅण्ड कंपनीकडून आलेले जसेच्या तसे न लावता, फ़ायबर रिएन्फ़ोर्स्ड प्लास्टिकचे (FRP) पॅनेल बनवून महामंडळाने वापरले होते.

 


 गाड्यांना जुन्या गाड्यांप्रमाणे लाल + पिवळा किंवा परिवर्तन मार्क १ चा निळा + हिरवा रंग न देता संपूर्ण लाल रंगात रंगविण्यात आले होते. बाजूने जुन्या एशियाड (निम आराम) बसेसना असायचे तसे पण पांढ-या रंगांचे दोन छोटे पट्टे मारण्यात आलेले होते. निम आराम गाड्यांना असा एकच पट्टा फ़िकट निळ्या रंगातला असे.


 परिवर्तन मार्क १ मध्ये प्रवासी सामान ठेवण्याच्या रॅकमध्ये बदल झालेले होते. रॅक्ची जाळी जाऊन तिथे आता अखंड पत्रा आलेला होता. ते बदल या ही मॉडेलमध्ये कायम ठेवण्यात आले.

 


फ़क्त परिवर्तन मार्क १ मध्ये बसच्या शेवटी छताला जो गोलाकार असायचा, तो बदलून पुन्हा जुन्या बसेससारखा सपाट भाग त्या ठिकाणी आलेला होता.

काही दिवसांनी ह्या FRP पॅनेल्सचा तकलादूपणा एस. टी. च्या लक्षात आला असावा. मग त्या पॅनेल्सना काही दुरूस्तीची गरज पडली तर एस. टी. पुन्हा टाटा किंवा लेलॅण्डची स्टॅण्डर्ड काऊल त्याठिकाणी लावून देत असे. आणि परिवर्तन मार्क ३ नंतर असे काऊल बदलण्याचा प्रयोग एस. टी. ने पुन्हा केला नाही. अगदी अगदी आता आता माइल्ड स्टीलच्या बसेसपर्यंत.





मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीत या बसेस MH - 12 / CH 75XX आणि MH - 12 / CH 76XX सिरीजमध्ये बांधल्या गेल्यात.

मध्यवर्ती कार्यशाळा औरंगाबादमध्ये या बसेस MH - 20 / D 84XX आणि MH - 20 / D 85XX सिरीजमध्ये बांधल्या गेल्यात.

मध्यवर्ती कार्यशाळा हिंगण्यात या बसेस MH - 40 / 84XX सिरीजमध्ये बांधल्या गेल्यात.


- या बसनामक प्रेयसीच्या प्रेमात असल्याने तिच्या कुठल्याही रूपावर प्रेम आणि प्रेमच करणारा, बसफ़ॅन राम किन्हीकर.