Saturday, November 18, 2023

आडव्या बाकड्याची बस.

आज चाळीशी आणि पन्नाशीच्या पुढच्या पिढीच्या बालपणीच्या एस. टी. प्रवासाच्या आठवणींमध्ये ड्रायव्हर काकांच्या मागे असलेल्या आणि बाकीच्या प्रवाशांकडे तोंड करून असलेल्या लांबच लांब बाकड्याची आठवण प्रामुख्याने असेलच. या बाकड्यावर ड्रायव्हर काकांकडे तोंड करून गुडघे टेकून तळपाय इतर प्रवाशांच्या दिशेने करीत ड्रायव्हर काकांचे ड्रायव्हिंग कौशल्य बघत, येणारा ट्रॅफ़िक बघत प्रवास करण्याचे अनेक सफ़ल, असफ़ल प्रयत्न आपण सगळ्यांनी केले असतीलच. सगळ्या बाळगोपाळांना त्या बाकड्याचे एक आकर्षण असायचेच.

पण परिवर्तन मार्क १ बसेस पासून एकाच बाजूला (प्रवासाच्या दिशेला असलेल्या) तोंड असलेली आसने आलीत आणि ही मजा हरवली. त्यापूर्वी असलेल्या उलट बाजूचा आडवा बाकडा असलेल्या शेवटल्या बसपैकी एका बसचे हे नॉस्टॅल्जिक प्रकाशचित्र.या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंगळवेढा डेपोची बस सांगोला ते अकलूज या ऑर्डिनरी सेवेसाठी वापरल्या जात होती. हे म्हणजे "आयजीच्या जिवावर बायजी उदार" सारखे झाले. 

सांगोला बस स्थानक दिनांक १५/११/२०१४.

तत्पूर्वी बरीच वर्षे एस. टी. ने खालीवर होणा-या खिडक्या आणि बसच्या मागे असलेल्या प्रवासी दार असलेल्या बसेस चालवल्यात.साधारण १९९५ च्या आसपास बसचे दार मागून पुढे आले. मला वाटते मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरची MH - 31 / N 9251 ही याप्रकारातली पहिली बस होती.नंतर मग काही गाड्यांनंतरच खाली - वर होणा-या (Drop Down) खिडक्यांच्या जागी पुढे मागे सरकवणा-या (Sliding) खिडक्या आल्यात. त्याच ह्या गाड्या.

मग परिवर्तन मार्क १परिवर्तन मार्क २ गाड्या आल्यात. 

त्यानंतर परिवर्तन मार्क ३ आणि परिवर्तन मार्क ४ गाड्या आल्यात.

त्यानंतर माइल्ड स्टील ची बांधणी असलेल्या BS 4 एंजिनच्या गाड्या आल्यात. जुन्या (परिवर्तन मार्क ४) गाड्यांची जुनी ॲल्युमिनीयम बस बॉडी बदलून नवी माइल्ड स्टील बॉडी बांधण्याचा उपक्रम सुरू झाला.

याच गाड्यांमध्ये जुन्या डिझाईनची उंच गाडीचे डिझाइन बदलून थोडी ठेंगणी गाडी बांधणे सुरू झाले.

त्यानंतर आली ती म्हणजे सध्याची BS 6 डिझाइनची नव्या बांधणीची गाडी.

यापूर्वी परिवर्तन मार्क १ आणि मार्क २ वर लिहीलेय. इतर सगळ्या टप्प्यांवर या वर्षाअखेर किंवा पुढल्या वर्षाच्या सुरूवातीला सविस्तर लिहीण्याचा मनोदय आहे.


- एस. टी. चा इतिहासप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


No comments:

Post a Comment