Thursday, November 2, 2023

दिवाळी अंक: एक चिंतन

एक काळ होता जेव्हा सामना आपला दिवाळी अंक दस-यानंतर प्रकाशित करायचा. दस-यानंतरच जरा उत्सवी वातावरणाला सुरूवात झालेली असते, दिवाळीचे, दिवाळीतल्या खरेदीचे वेध लागले असतात अशावेळी सामनाच्या दसरा - दिवाळी अंकाची खरेदी आवर्जून व्हायची.

 

नंतर दिवाळीच्या आसपास लोकसत्ता, लोकप्रभा, महाराष्ट्र टाईम्स, चित्रलेखा इत्यादी दिवाळी अंकांची आवर्जून खरेदी व्हायची. आमचे वडील वाचनवेडे होते. त्यामुळे आम्हालाही बालपणापासूनच वाचनाचे वेड. त्यामुळे एखादी दिवाळीची खरेदी (बहुतांशी फ़टाके) कमी करून आमच्याकडे ही दिवाळी अंकांची मेजवानी यायची. मला आठवते आमच्या बालपणी किस्त्रीम (किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर ही तीनही नियतकालिके मिळून एक दिवाळी अंक काढायचीत. त्या वैशिष्ट्यपूर्ण नावामुळे हे लक्षात राहिले.) चा दिवाळी अंकही घरी यायचा. फ़क्त सत्यकथा या मराठीतल्या अत्यंत प्रतिष्ठीत मानल्या गेलेल्या नियतकालिकाचा दिवाळी अंक कधी घरी आला नाही. कदाचित त्यातले लिखाण समजण्याइतकी आमची साहित्यिक पातळी नाही हे आमच्या वडीलांना माहिती असावे, किंवा आम्ही वाचते होईपर्यंत हा अंक प्रकाशित होणे बंद झाले असावे. त्याकाळी दर आठवड्याला लोकप्रभा आणि चित्रलेखा घरी यायचेतच. वाचनीय मजकूर खूप असायचा. नवनवीन माहिती मिळायची. जगाविषयीचे एक आकलन या दोन्हीही नियतकालिकांमधून व्हायचे. त्यामुळे त्यांच्याही दिवाळी अंकांची खरेदी व्हायची.



सुरूवातीला मराठी चित्रलेखाचे संपादक श्री नारायण आठवले होते. तेव्हा ते साप्ताहिक खरोखर वाचनीय होते. दर शुक्रवारी प्रकाशित झालेले अंक दर शनिवारी सकाळी रामदासपेठमधल्या गुरूद्वारासमोरील बुकस्टॉलवरून किंवा थेट बर्डीवरल्या खुराणा बुकस्टॉलवरून घेऊन येणे आणि आल्याआल्या अथपासून इतिपर्यंत वाचून काढणे यात एक निराळाच आनंद होता. नंतर नंतर चित्रलेखा एकांगी आणि पहिल्यांदा छुपे आणि नंतर उघड उघड जातीय भूमिका घेऊ लागले. पैसे खर्च करून वाचावे असे त्यात काही नव्हते. मग चित्रलेखाचा अंक घरी आणणे बंद केले. आताशा हे मासिक सुरू आहे की नाही हे सुद्धा माहिती नाही. कधीकधी बुकस्टॉलवर गेलो तरी दृष्टीपथात येत नाही.


लोकप्रभेचे तसेच झाले. वाचनीय मजकूर कमी कमी होऊ लागला आणि इंटरनेट मुळे ऑरकुट, फ़ेसबुक इत्यादी समाजमाध्यमांच्या द्वारे अद्ययावत माहिती मिळू लागली त्यामुळे स्वतःला लोकप्रभेद्वारे अपडेट आणि अपग्रेड करण्याची निकड कमी झाली. दर आठवड्याचा लोकप्रभाही घरी येईनासा झाला.


गंमत म्हणजे जेव्हा ऐपत नव्हती तेव्हा पोटाला चिमटा काढून अंक वाचावासा वाटे पण जेव्हा अंक विकत घेऊन वाचण्याइतकी, वार्षिक वर्गणी भरण्याइतकी ऐपत आली तेव्हा अंकातली वाचनीयता संपली. 


हळूहळू हीच स्थिती दिवाळी अंकांबाबतही झाली. साधारण एकवीसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत (2010) एका दिवाळी अंकामध्ये चार पाच तरी वाचनीय लेख असायचेत. त्यानंतर आता अगदी उलट परिस्थिती झाली. आता चारपाच दिवाळी अंक मिळून एखादा वाचनीय लेख असतो. जाहिरातीच फ़ार. एखाद्या अनियतकालीकाने किंवा कॉलेजमधल्या प्रकाशित होणा-या वार्षिकांकाने भरपूर जाहिराती मिळवाव्यात आणि केवळ जाहिरातदारांसाठी तो अंक काढावा अशी अवस्था सर्वच दिवाळीअंकांची झाली. मग 2012 नंतर हे असले दिवाळी अंक आवर्जून वाचावे असे वाटेना. 


2013 मध्ये आम्हाला बालपणापासून ओळखणारे एक नातेवाईक दिवाळीत घरी आलेत आणि "यावर्षी कुठले दिवाळी अंक घेतलेत रे ?" अशी पृच्छा त्यांनी केली. त्यावर "एकही नाही" हे उत्तर ऐकताच त्यांची वैदर्भिय भाषेत प्रतिक्रिया उत्स्फ़ूर्त होती. "अबे, काही लाज वाटते काबे तुम्हाला ? दादांना (आमचे वडील) काय वाटेल ?" 


हे जरी खरे असले तरी दिवाळी अंकांमधली वाचनीयता कमी झाली हे पाहून आमच्या दिवंगत तीर्थरूपांनी दिवाळी अंकांच्या खरेदीबद्दल आग्रह धरला नसला हे ही आम्ही जाणून होतो.


आताशा ’मिसळपाव’ या साईटवर त्यांच्या दिवाळी अंकातले बरेच उत्तम लेख ऑनलाईनच वाचून आम्ही आमची वाचनतृप्ती करून घेतो. पण दिवाळी अंकांची समृद्ध आणि एकमेवाद्वितीय परंपरा लाभलेल्या मराठी साहित्यविश्वात दिवाळी अंकाचे सध्याचे स्वरूप, त्यांचा घसरणारा खप आणि त्या खपाविषयी, त्यांच्या दर्जाविषयी कुणालाही कसलेही सोयरसुतूक नसणे हे अस्वस्थ करणारे आहे आणि त्याहीपेक्षा सरस्वतीपुत्रांपेक्षा लक्ष्मीपुत्रांना सगळ्याच क्षेत्रात कसे अधिक महत्व प्राप्त झाले आहे त्याचे ठळक दिग्दर्शक आहे. म्हणूनच दिवाळी अंकांनीही सरस्वती पूजनापेक्षा लक्ष्मीपूजनाची अधिक कास धरली असेल तर ते युगसुसंगतच म्हणावे लागेल.


- दिवाळी अंकांचा एक विचक्षण वाचक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment