नाटक म्हणजे मराठी माणसांच्या अगदी "मर्मबंधातली ठेव" आहे. असे म्हणतात एखाद्या ठिकाणी दोन मराठी माणसे स्थायिक झालीत की ते दोघे मिळून तीन नाट्यसंस्था काढतील. प्रत्येकाची एक एक आणि दोघांची मिळून एक.
धामणगाव रेल्वे इथल्या एका वर्षाच्या वास्तव्यात असाच अनुभव आला. उण्यापु-या तीस पस्तीस हजार (तीस वर्षांपूर्वी) लोकसंख्येचे हे गाव आणि त्यात दोन अगदी मोठ्या नाट्यसंस्था. दोन्ही संस्थांचे वार्षिक नाट्यमहोत्सव व्हायचेत, एकांकिका स्पर्धा व्हायच्यात. लक्ष्मणराव देशपांडे, अकोल्याचे श्री दिलीप देशपांडे यांच्यासारख्या मातबर कलाकारांना बोलावून त्यांचे "व-हाड निघालय लंडनला" आणि "मेड इन इंडिया" सारखे दोन अंकी एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण व्हायचे. ते सुद्धा तिकीट वगैरे लावून. सतीश आळेकरांच्या अत्यंत गाजलेल्या "बेगम बर्वे" या नाटकाचा प्रयोग आपल्या नाट्यमहोत्सवात सादर करण्याचे धार्ष्ट्य धामणगावकर नाट्यसंस्थाच करू जाणे. नागपूरला या आणि अशा त-हेच्या समृद्ध नाटकांचे प्रयोग लागल्याचे मी तरी बघितले नाही. धामणगाव हे नाट्यदृष्ट्या समृद्ध गाव होते हे नक्की.
मला एक प्रश्न कायम पडत आलाय. आपण नाटक "बसवतो", "उभे करत" नाही. नाटक बसवणे ह्या वाक्प्रचारात कधीकधी खरेच नाटक "बसते". अशाच एक बसलेल्या आणि फ़सलेल्या एकांकिकेची ही कथा.
धामणगावात गेलो. गेल्याबरोबर महिन्या दोन महिन्यातच तिथल्या नाट्यवर्तुळात सामील झालो. आमच्या महाविद्यालयातील एक नाट्यकर्मी असलेले माझे सहकारी श्री अनंत मावळे आणि त्यांचे मित्र श्री. मोरूभाऊ यांनी एका एकांकिका स्पर्धेत भाग घेण्याची विनंती केली. आम्ही योगेश सोमण यांची गाजलेली "रिंग अगेन" ही एकांकिका निवडली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड इथे मी प्रथम वर्षात शिकत असताना आमच्या महाविद्यालयीन स्नेहसंमेलनात (1990) ही एकांकिका संदेश कुलकर्णी आणि गिरीश शास्त्री या आमच्या सिनीयर्सनी अत्यंत प्रभावीरित्या सादर केलेली मी बघितली होती. पाच वर्षांनंतरही त्या प्रयोगाचा माझ्या मनावर असलेला ठसा पुसला गेलेला नव्हता. त्या सुंदर लिखाणाचा आणि तेव्हढ्याच प्रभावी सादरीकरणाचा माझ्या मनावरचा प्रभाव अजूनही पुसला गेलेला नाही.
दोनच पात्रांची ही एकांकिका. धनराज नावाचा एक श्रीमंत माणूस आपल्या दिवाणखान्यात छान गाणीबिणी ऐकत संध्याकाळी मदिरापान करत बसलेला आहे. त्याच्या घरी त्या क्षणी कुणीही नाही. अशातच दूर कुठेतरी एक मानसशास्त्राचा प्राध्यापक - संशोधक प्रा. साने एक मानसशात्रीय प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. "एखाद्या माणसाच्या कमकुवत मनाचा फ़ायदा घेऊन त्याला केवळ फ़ोनवरून घाबरवून सोडता येईल का ?" हा त्याचा प्रयोग. तो आपल्या अभ्यासिकेतून फ़ोन फ़िरवतो. तो नेमका धनराजला लागतो. आणि मग सुरू होतो तो प्रा. साने आणि धनराजमधला उंदीर - मांजराचा खेळ.
खूप उत्कंठावर्धक आणि प्रेक्षकांना बांधून ठेवणारा हा कथेचा प्लॉट होता. त्यात प्रा. सानेचा रोल मी करणार होतो. धनराजची भूमिका मोरूभाऊ आणि प्रकाशव्यवस्था व ध्वनीव्यवस्था अनंत मावळे सांभाळणार होते. त्या एकांकिकेची तालीम वगैरे सुरू झाली. मी दिग्दर्शक या नात्याने नोटस वगैरे काढायला सुरूवात केली. कुठलाही समारंभ, प्रयोग प्रत्यक्षात होण्याआधी आपल्या मनात जसाच्या तसा घडला तर तो यशस्वी होतोच हा आजवरचा माझा अनुभव. त्यामुळे धामणगावच्या रंगमंचावरचा प्रयोग माझ्या मनात घडू लागला. प्रयोगातले संभाव्य धोके, नवनवीन कॉम्बिनेशन्स वगैरे लक्षात घेऊन माझा दिग्दर्शकीय अभ्यास सुरू होता आणि तो पूर्णत्वास गेला होता.
या नाटकासाठी पार्श्वसंगीत हे एक महत्वाचे पात्र होते. त्यासाठी आमचा शोध सुरू झाला. नागपूर आकाशवाणीवर काम करणारा माझा एक शालेय मित्र धामणगावच्याच आदर्श महाविद्यालयात कामाला होता. त्याच्याजवळ तो कीबोर्ड वगैरे पण होता. एकांकिकेत तो लाइव्ह म्युझिक देऊ शकत होता. तो आम्हाला जॉइन झाला. पण पहिल्या एकदोन बैठकांमध्येच आमच्या लक्षात आले की त्याच्या कल्पनेनुसार जर आम्ही एकांकिका केली असती तर आमच्या संवादांना पार्श्वभूमी म्हणून संगीत असण्यापेक्षा त्याच्या संगीतातल्या दोन पिसेसमध्ये आम्ही आमचे संवाद म्हणतोय. म्हणजे आमच्या एका रहस्यमय एकांकिकेची संगीत एकांकिका करण्याची त्याची तयारी दिसत होती. मग त्याला सभ्य शब्दात नारळ दिला.
मग शोध सुरू झाला तो एकांकिकेतील प्रसंगांना साजेशा म्युझिक पिसेसचा. त्याकाळी टेपरेकॉर्डस, कॅसेटचा जमाना होता. रिकाम्या कॅसेटसमध्ये आपल्या आवडीची गाणी भरून देणारी कॅसेटसची दुकाने प्रत्येक गावात भरपूर असायचीत. अशाच एका दुकानवाल्याला आम्ही गाठले. त्याच्याकडे जवळपास आठ दिवस संध्याकाळी रोज एक तास बसून आम्हाला हवे तसे म्युजिक पिसेस एका कॅसेटमध्ये भरून घेतलेत. त्या म्युझिक पिसेससह आमच्या तालमी सुरू झाल्यात.
रंगीत तालमीत आमचा दोघांचाही अभिनय छान झाल्याची पावती आम्हाला रंगीत तालमीला आलेल्या काही जाणकारांकडून मिळाली. या स्पर्धेत पहिले बक्षीस आम्हीच पटकावणार याची धास्तीयुक्त कुजबूज आमच्या प्रतिस्पर्धी संघांमध्येही सुरू झाली. थोडक्यात काय आम्ही प्रयोगाआधीच स्पर्धेत "माहौल" करण्यात यशस्वी झालेलो होतो.
स्पर्धेच्या आदल्या रविवारी मी नागपूरला होतो. घरी नवा टू इन वन घेतलेला होता. प्रयोगासाठी तोच टू इन वन वापरण्याचे मी ठरवले आणि तो घेऊन त्या आठवड्यात धामणगावला परतलो.
स्पर्धेतला प्रयोग धामणगावच्या माहेश्वरी भवनमध्ये होता. माहेश्वरी भवन हे मुंबई हावडा रेल्वेलाईनला अगदी लागून आहे. धामणगाव स्टेशनपासून अर्धा किलोमीटर आणि धामणगावातल्या तत्कालीन रेल्वे क्रॉसिंगला अगदी लागून. प्रयोग सुरू झाला. या एकांकिकेत एक गंमत होती. सुरूवातीलाच दोन पात्रे रंगमंचावर आलीत की एकांकिका संपेपर्यंत कुठल्याच पात्र विंगेत जात नाही. दोघा पात्रांपैकी कुणाचीही एकांकिका संपेपर्यंत एक्झिट नाही.
स्पर्धेपूर्वीच खूप चर्चा झालेला आमचा बहुचर्चित प्रयोग त्यादिवशी रात्री सुरू झाला. प्रयोगात प्रा. सानेचे मोठे स्वगत आहे. माझे ते स्वगत सुरू असतानाच रेल्वेलाईनवरून एक भलीमोठी मालगाडी गेली. तिच्या आवाजात स्वगत थांबवावे लागले. मालगाडी गेल्यावर मग पुन्हा ते स्वगत घेतले आणि प्रा. सानेंनी धनराजला फ़ोन फ़िरवला.
फ़ोन फ़िरवला खरा पण टेप केलेली फ़ोनची रिंग वाजेचना. हा संपूर्ण प्रयोग प्रा. सानेने धनराजला केलेल्या एकापाठोपाठ एक फ़ोन्सवर आधारित होता. त्यात फ़ोनची रिंगच न वाजणे म्हणजे रंगमंचावरील दोघांचीही खूप मोठी गोची होती. मला माझ्या जागेवरून विंगेत नवा टेपरेकॉर्डर घेऊन त्याच्याशी खटपट करीत बसलेले अनंत मावळे दिसत होते. रोज प्रयोगात त्याच कॅसेटमध्ये टेप केलेली फ़ोनची रिंग आज का वाजत नाहीये ? हे त्यांच्याही लक्षात येत नव्हते हे दिसत होते. मी रंगमंच सोडून त्यांच्या मदतीला जाऊ शकत नव्हतो. शेवटी मोरूभाऊंच्या लक्षात ही गोची आली. त्यांनी फ़ोनची रिंग वाजलेली नसतानाच प्रा. साने (माझा) फ़ोन उचलला. प्रेक्षकात हशा आणि आम्हा दोन्ही नटांच्या उरात धडकी. इतक्या रहस्यमय नाटकात पहिल्या मिनीटाला हशा म्हणजे नाटक बसत चालल्याची सूचना.
संपूर्ण प्रयोगभर आम्ही मेहेनतीने केलेले पार्श्वसंगीत वाजलेच नाही. फ़ोन्सच्या रिंगाही वाजल्या नाहीत. "Show Must Go On" या तत्वाला अनुसरून आम्ही दोघांनीही आपापले संवाद नीट म्हटलेत खरे पण फ़ोनची रिंग न वाजता उचलल्या गेलेला फ़ोन हा दरवेळी प्रेक्षकांमध्ये हशा पिकवीत होता आणि पार्श्वसंगीताशिवाय नुसत्या संवादावरचा हा रहस्यमय नाटकाचा प्रयोग सपक होत होता. आम्ही नाटक मारून नेले खरे. पण पडदा पडताच विंगेत धाव घेतली. नव्याको-या टेपरेकॉर्डरने दगा कसा दिला ? हा प्रश्न मला आधी सोडवायचा होता. प्रयोगाची तर वाट लागलीच होती. आमचे नाटक अगदी साफ़ "बसले" होते.
विंगेत अनंतराव हताश चेहे-याने आमचीच वाट बघत होते. नव्या को-या टेपशी थोडी झटापट केल्यावर लक्षात आले की प्रयोगाआधी चुकून त्या टू इन वन मध्ये टेप मोड आणि रेडिओ मोड ची बटण दाबल्या जाऊन ते यंत्र रेडिओ मोडमध्ये गेले होते. मग आम्ही तयार केलेली फ़ोनच्या रिंगची ,रहस्यमय पार्श्वसंगीताची टेप वाजणार तरी कशी ?
आज नवनवीन तंत्रज्ञान सगळ्यांच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असण्याच्या काळात इतक्या साध्या अडचणीसाठी प्रयोग "बसणे"हे आठवले तरी हसू येते आणि गेल्या तीस वर्षात तंत्रज्ञानाने केव्हढी मोठी झेप घेतली आहे हे पाहून स्तिमीत व्हायला होते.
त्यानंतर धामणगावच्या शब्दरंग संस्थेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. आनंद सुभेदार सरांनी हीच एकांकिका माझ्यासोबत करण्याची तयारी दर्शविली आणि आम्ही नंतर तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हीच एकांकिका सादर केली. कारंजा (लाड), अमरावती आणि चंद्रपूर येथे आम्ही या एकांकिकेसाठी अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वसंगीतासाठी बक्षीसेही मिळतील. पहिल्यांदा "बसलेल्या" नाटकानेच आम्हा रंगकर्मींना त्यानंतर जागरूक करून "उभे केले" असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
- चुकांपासून लवकर शिकणारा (Fast Learner) नाट्यशास्त्राचा एक विद्यार्थी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
चुकांमधून शिकतो तो खरा विद्यार्थी .. छान आठवण सांगितलीये
ReplyDeleteहो. आम्ही सगळेच त्या चुकांमधून शिकलोत. त्याच एकांकिकेने त्यानंतरच्या दोन तीन एकांकिका स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवलीत.
Delete