दिवाळीत आपापल्या कामाच्या ठिकाणावरून आपापल्या घरी परतण्याची धडपड मी खूप वर्षे अनुभवलेली आहे. शिक्षणासाठी ४ वर्षे कराडला, नंतर नोकरीसाठी १२ वर्षे मुंबईत असताना दरवेळी दिवाळीसाठी विदर्भात परतणा-या लोकांची संख्या आणि बसमध्ये, रेल्वेमध्ये उपलब्ध असलेल्या जागा यांचे कायम व्यस्त प्रमाण याच्याशी लढतच आम्हाला दिवाळीसाठी घरी, नागपूरला यावे लागे. मग मुंबई - पुणे - नागपूर, मुंबई - छत्रपती संभाजीनगर - नागपूर असे अनेक प्रयोग केले गेलेत. (अशाच एका प्रवासाची गोष्ट इथे)
हळूहळू आम्हाला या प्रवासांच्या नियोजनात प्रावीण्य मिळत गेले. बरोबर १२० दिवस आधी रेल्वे रिझर्वेशन उघडल्या उघडल्या रिझर्वेशन कसे आणि कुठल्या गाडीचे करावे ? यात आम्हाला एक दृष्टी लाभली. आणि काही वर्षांनी आमचे हे प्रवास सुखकर होऊ लागलेत. त्यातच १९९८ मध्ये रेल्वे राज्यमंत्री असलेल्या राम नाईकांनी मुंबई - नागपूर प्रवासासाठी संपूर्ण ए.सी. असलेल्या मुंबई - हावडा ज्ञानेश्वरी एक्सप्रेस आणि त्या गाडीशी रेक शेअरींग करणा-या मुंबई - नागपूर समरसता एक्सप्रेस या गाड्या सुरू केल्यात. या गाड्या संपूर्ण ए. सी. असल्याने आरामदायक होत्या आणि दिवाळीच्या गर्दीत इतर प्रवाशांनी तुमच्या जागांवर आक्रमण करून तुमचे रिझर्वेशन असो किंवा नसो तुम्हाला सारखाच प्रवास अनुभव देण्याचा प्रश्न या गाडीत उदभवणार नव्हता. २००१ च्या दिवाळीत आम्ही उभयतांनी या गाडीचे बरोबर १२० दिवस रिझर्वेशन करून या गाडीने मुंबई ते नागपूर प्रवास करण्याचे ठरविले.
पण नेमके ऑक्टोबर महिन्यात आमच्या बाळाच्या चाहुलीने सौ. वैभवीला नागपूर - चंद्रपूरला जावे लागले आणि तिथेच आराम करावा लागला. म्हणजे मग दिवाळीत मी एकटाच नागपूरला जाणार होतो. सौ. वैभवीचे रिझर्वेशन रद्द करावे लागले आणि मी नव्या ओढीने नागपूर - चंद्रपूरला जायला निघालो.
तेव्हा ही ज्ञानेश्वरी एक्सप्रेस आणि समरसता एक्सप्रेस मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) वरून रात्री ८.२० ला निघायची आणि दुस-या दिवशी विदर्भ एक्सप्रेस आधी सकाळी ९.१५ ला नागपूरला पोहोचायची. विदर्भ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रात्री ८.३५ ला निघून इगतपुरीपर्यंत ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या आधी धावायची. इगतपुरीला विदर्भ एक्सप्रेसला ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ओव्हरटेक करायची आणि कल्याण - इगतपुरी - भुसावळ - अकोला - बडनेरा एव्हढ्याच थांब्यानिशी नागपूरला जायची. हिच्या मागोमागच धावत बरेचसे थांबे घेत विदर्भ एक्सप्रेस नागपूरला सकाळी ९.३५ ला पोहोचत असे. ज्ञानेश्वरी एक्सप्रेस पकडायची म्हणजे कुर्ला टर्मिनससारख्या आडबाजूला जावे लागे. एव्हढीच अडचण होती. मला वाटतं अजूनही कुर्ला टर्मिनसच्या "भय्या टर्मिनस"या ख्यातीत फ़ारसा बदल झालेला नाही. यासंबंधीचा लेख इथे.
१० / ११ / २००१ : ऐरोलीवरून महाविद्यालयीन काम आटोपून पवईच्या घरी आलो. कुर्ला टर्मिनसकडे निघण्याची तयारी करीत असताना सहज रेल्वेच्या साईटवर गाडीची पोझिशन पाहिली तर त्या दिवशी सकाळी ७.३० ला कुर्ला टर्मिनसला येणारी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस बिहारमधल्या रेल रोकोमुळे रात्री कधीतरी येणार होती. नेमके दिवाळी - दसरा हे सण पाहून सर्वसामान्य जनतेची अडवणूक करणारे "राजू शेट्टी" बिहारमध्येही आहेत हे पाहून अचंबा वाटला. हे लोण इकडून तिकडे गेलंय की तिकडचा आदर्श इकडल्या राजूंनी घेतलाय हे कळायला मात्र वाव नव्हता. गाडी उशीरा येणार म्हणजे उशीरा निघणार हे तर नक्की होते. पण पवईवरून फ़ार उशीरा निघून रात्री बेरात्री कुर्ला टर्मिनस गाठण्याची हिंमत होईना. दिवसाढवळ्या तिथल्या लुटालुटीच्या अनेक घटना वाचलेल्या होत्या. मग पवईवरून संध्याकाळी ६.३० ला निघण्याऐवजी जेवून खाऊन रात्री ८.३० ला निघालो आणि रात्री सुरक्षित वेळेत कुर्ला टर्मिनस येथे दाखल झालो.
सकाळी येणारी गाडी अजूनही आलेली नव्हती. त्या दिवशीची गाडी परत कधी जाणार ? याविषयी रेल्वेमध्येच गोंधळाची स्थिती होती. रेल्वेच्या बोर्डावर "अनिश्चित काळासाठी उशीरा" ही घोषणा वाचून काळजाचा ठोका चुकत होता. तेव्हा भारतीय इंटरनेट वगैरे एव्हढे प्रगत झालेले नव्हते त्यामुळे आत्त्ता या क्षणाला आपली गाडी कुठे आहे ? याविषयी आज सहज उपलब्ध असणारी माहिती तेव्हा सर्वांना उपलब्ध नव्हती. रेल्वेवाल्यांना ही माहिती नक्की असते पण सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही माहिती उपलब्ध करून देणे म्हणजे टॉप ॲटोमिक सिक्रेट जाहीर करण्यासारखे आहे अशी रेल्वेची समजूत (तेव्हा तरी) होती. त्यामुळे कुर्ला टर्मिनसवर इतर गाड्यांचे निरीक्षण वगैरे करण्यात वेळ घालवत होतो. बरे इनमिन ४ फ़लाटांचे ते कुर्ला टर्मिनस. त्यात रेल्वेफ़ॅनिंग करून करून किती करणार ? त्यामुळे रात्री शेवटची गाडी गेल्यानंतर फ़लाटावर फ़िरून फ़िरून थकलो आणि कंटाळलो.
त्यातल्या त्यात बरी गोष्ट अशी की हावड्यावरून येणारी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रात्री ११ वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर आली. आणि आणलेल्या प्रवाशांना उतरवून कुर्ला यार्डात मेंटेनन्ससाठी रवाना झाली. आता ही गाडी तिथून येणार कधी ? आणि नागपूरसाठी सुटणार कधी ? याची आम्ही सगळेच प्रवासी चातकासारखी वाट बघत बसलो. रात्री १, १.३० , २ पर्यंत जरी ही गाडी परत फ़लाटावर लागून परतीच्या प्रवासाला लागली असती तरी प्रवाशांची काही हरकत नव्हती. किमान थोडी तरी झोप गाडीत घेता आली असती. या गाडीचे मार्गातले थांबे कमी असल्याने आणि सगळी गाडीच ए. सी. असल्याने झोपेत इतर प्रवाशांकडून, आडबाजूच्या स्थानकांवरून गाडीत शिरणा-या आगंतुकांकडून व्यत्यय येण्याची शक्यता कमी होती.
पण रेल्वेने त्यांचा त्यांचा वेळ घेत आलेली गाडी नीट धूऊन, पुसून पहाटे ३.३० ला फ़लाटावर लावली. माझे तिकीट द्विस्तरीय वातानुकूल शयनयान (सेकंड ए. सी.) त होते. बर्थ नं १. मी आपला बर्थ पकडला. झोपेचे तर खोबरे झालेलेच होते. मी बर्थवर पडून गाडी सुरू होण्याची वाट बघू लागलो.
शेवटी पहाटे ५.३० वाजता गाडीच्या इंजिनाने मोठ्ठा हॉर्न दिला आणि गाडी हलली. आणि गंमत म्हणजे मी अगदी ग्लानीवजा झोपेत गेलो. कल्याण स्टेशनला गाडी थांबल्यावर थोडी झोप चाळवली खरी पण मी अगदी गाढ झोपेत होतो. यानंतर गाडीला खरा थांबा भुसावळलाच होता (मधले कसारा आणि इगतपुरी हे इंजिन जोडण्या काढण्यासाठी असलेले तांत्रिक थांबे होते. पण तिथून प्रवासी चढ उतार होणार नव्हती.) त्यामुळे आम्ही सगळे निश्चिंत होतो. माझ्यासकट माझ्या ४ शायिकांच्या कंपार्टमेंटमधील सगळेजण निद्रादेवीच्या राज्यात प्रवेशकर्ते झालेले होतो.
सकाळी ११.०० च्या सुमारास मला जाग आली. घड्याळ्यात पाहून आपण साडेपाच तासांपूर्वी निघाल्याचे कळत होते. सहज पडदा बाजूला करून बघितले तर मला धक्काच बसला. माझ्या अंदाजानुसार साधारण साडेपाच तासांत गाडीने मनमाडपर्यंत येणे अपेक्षित होते. पण गाडी भुसावळ आऊटर सिग्नलला उभी होती. इतक्या जलद मुंबई ते भुसावळ प्रवास मी यापूर्वी कधीच केलेला नव्हता. याच वेगाने गाडी जात राहिली तर पुढचे नागपूरपर्यंतचे अंतर ही गाडी दुपारी ३.३० पर्यंतच पूर्ण करेल याची मला खात्री वाटू लागली. म्हणजे कुर्ला टर्मिनस ते नागपूर हे ८२१ किलोमीटरचे अंतर फ़क्त १० तासात. हा एक नवीनच विक्रम होणार होता.
पण भुसावळ नंतर काही अगम्य कारणांमुळे गाडी तितका वेग धारण करू शकली नाही. मलकापूर आऊटर, शेगाव आऊटर या ठिकाणी थांबून राहिल्याने भुसावळ - नागपूर या ३९६ किलोमीटर अंतरासाठी गाडीने ५ तास ४५ मिनीटे घेतलीत आणि आम्ही दुपारी ४.३० ला ११ तासात ८२१ किलोमीटर अंतर पार करून नागपूरला पोहोचलो.
या माझ्या प्रवासाविषयी मी माझ्या नातेवाईकांना, इतर रेल्वेफ़ॅन मित्रांना सांगितले तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया अविश्वासाचीच होती. मुंबई ते नागपूर हे अंतर केवळ ११ तासात पार करणे हे त्या जमान्यात अविश्वसनीयच होते. थोड्याच वर्षांनी मुंबई - हावडा मार्गावर हेच अंतर केवळ १० तासांमध्ये पार करणारी संपूर्ण ए. सी. दुरांतो एक्सप्रेस आणि हे अंतर ११ तासात पार करणारी ए. सी. + नॉन ए. सी. मुंबई - नागपूर दुरांतो सुरू झाली आणि हे स्वप्न सगळ्यांसाठी साकार झाले.
मला आठवतं नागपूरवरून सुटणा-या नागपूर - मुंबई विदर्भ एक्सप्रेसची वेळ दुपारी ३.०० पासून दुपारी ४.४५ करण्याच्या प्रयोगापूर्वी मध्य रेल्वे ही गाडी नागपूरवरून महिना दोन महिने रोज मुद्दाम उशीरा सोडत असे. आणि मधल्या वेळात ही गाडी तो वेळ भरून काढत मुंबईला तिच्या नियोजित वेळेत पोहोचते की नाही याचे निरीक्षण करीत असे. या माझ्या प्रवासातच सध्याच्या मुंबई - हावडा दुरांतोच्या १० तासांच्या धाववेळेचा आत्मविश्वास मध्य रेल्वेला दिला नसेलच असे नाही.
- जलद गाड्यांचा अतिजलद प्रवासी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment