आता नुकतीच एक बातमी वाचली. पुणे ते नागपूर विमानप्रवासात एका प्रवाशाच्या सीटचा बसण्याचा भागच नसल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिच्या नव-याने त्या फ़क्त लोखंडी सांगाडा असलेल्या सीटचा फ़ोटो "एक्स" वर टाकून तक्रार केली. विमानकंपनीने दिलगिरी वगैरे व्यक्त केली खरी पण माझ्या मनात "कुठे नेऊन ठेवला विमानप्रवास माझा ?" हा प्रश्न आलाच. आणि त्याचबरोबर आणखी एक विचार चमकला की आता आमच्या नागपूरच्या शहर बसमध्ये जी अशी आसने मध्येमध्ये गायब असतात त्या खाजगी ऑपरेटरला स्वतःच्या समर्थनार्थ बोलायला निमित्तच मिळाले. "अरे, विमानातल्या सिटा गायब असतात. माझ्या बसचे काय घेऊन बसलात ?" असा प्रतिप्रश्न तो ऑपरेटर नक्कीच विचारू शकेल.
तशाही नव्या विमानातल्या सीटस आणि शहर बसमधल्या सीटस याच्या जाडीत, दर्जात काहीच फ़रक नसतो. इकॉनॉमी, इकॉनॉमी या नावाखाली आता विमानात एक दुस-याला लागून बाकडीच टाकायची फ़क्त बाकी ठेवली आहेत. बरे, इकॉनॉमी, इकॉनॉमी चा जप करता करता तिकीटांची किंमत इंडियन एअरलाईन्सच्या फ़ुल्ल सर्व्हिस विमानांच्या तिकीटांइतकीच किंवा जास्त करून ठेवलेली आहेत हे आपण सगळेच विसरून गेलेलो आहोत. त्या इंडियन एअरलाईन्सच्या फ़ुल्ल सर्व्हिस विमानांमध्ये चॉकलेटस, नाश्ता, जेवण वगैरे मिळायचे. इथे या सो कॉल्ड इकॉनॉमी विमानांमध्ये साध्या पाण्यापासून सगळ्या गोष्टी अति महाग. फ़ुकट पाणी देणे ही त्या विमानकंपनीची जबाबदारी आहे असे एखाद्या प्रवाशाच्या लक्षात आले आणि त्याने त्या पाण्याची मागणी केली तर स्वतःची किडनी काढून देतोय या आविर्भावात आणि कमालीच्या अनिच्छेने आणि तुच्छतेच्या नजरेने त्या प्रवाशाला अर्धा कप पाणी देणे हे आपण स्वीकारलय की आपल्याला त्या परिस्थितीची जाणीवच झालेली नाही ? हा सुद्धा प्रश्न मला पडलाय.
विमानप्रवास हे एक अप्रूप होते तेव्हापासून मी विमानप्रवास करतोय. माझ्या पहिल्या विमानप्रवासाची कथा इथे. त्यानंतर एअर डेक्कनच्या विमानाने केवळ 500 रूपयात नागपूर - मुंबई इकॉनॉमी प्रवासही मी केलेला होता. त्या प्रवासात त्या एअरलाईनकडून कसलीच अपेक्षा मी ठेवली नव्हती. अब क्या 500 रूपयोंमे बच्चेकी जान लोगे ? हीच भावना त्या एअरलाईनविषयी त्या प्रवासात माझी होती. पण नंतर चांगले 3000, 4000 रूपये मोजूनही जेव्हा विमान वेळेवर सुटत नाही, एअरलाईन 15 मिनिटांत 25 एस. एम. एस. पाठवून बेजार करते आणि विमानप्रवासात वडापसारखा कोंबून प्रवास केल्याची भावना होते तेव्हा त्या एअरलाईनविषयी चीडच येते.
तथाकथित इकॉनॉमी एअरलाईन्सच्या सेवेविषयी असा सावळागोंधळ असतानाच त्या एअरलाईनचे पायलटस पुरेसे प्रशिक्षित आणि तरबेज असतात का ? सुरक्षेच्या दृष्टीने या एअरलाईन्स इथेही पैसेबचाऊ धोरण अवलंबतात का ? हे मला पडलेले रास्त प्रश्न आहेत. मधल्या काळात तुलनेने स्वस्त असलेली आणि ऐन विमानप्रवा्सात मध्येच बंद पडण्यासाठी कुख्यात झालेली प्रॅट आणि व्हिटनी एंजिन्स वापरण्याचा ट्रेंड या तथाकथित इकॉनॉमी सेवेच्या एअरलाईन्सने आणला होता. हवेतल्या हवेत प्रवासादरम्यान विमानाचे एक एंजिन बंद पडण्याच्या अशा पंधरा वीस घटनांनंतर भारतातल्या नागरी उड्डयन यंत्रणेने डोळे वटारल्यानंतर अशा इकॉनॉमी एअरलाईन्सने नाईलाजाने ती विमाने दुरूस्त केली होती. यात आपण प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये अशी लाजेची भावना नव्हती तर नाईलाजाची भावना होती. स्वतःचा नफ़ा हाच एकमेव भाग या सगळ्यात मोठा असायचा. मायबाप प्रवाशी, त्यांचे हित वगैरे बाबी कायम दुय्यम.
गेली 25 वर्षे मी विमानतळ अभियांत्रिकी हा विषय स्नातक स्तरावरच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. धावपट्टीच्या दोन्हीही बाजूला रनवे थ्रेशोल्ड मार्किंग्ज असतात. तिथपासून त्या रनवेची हद्द सुरू झाली आणि तिथे त्या रनवेची हद्द संपली हे पायलटला लक्षात यावे यासाठी जगभरच्या रनवेजवर हे मार्किंग्ज अगदी एकसारखे असतात. विमान उरतताना त्या बाजूच्या थ्रेशोल्ड मार्किंगवर विमानाची उंची 15 मीटर (50 फ़ूट. म्हणजे साधारण 4 मजली इमारतीएव्हढी) असावी असा दंडक आहे. म्हणजे विमान त्याच्या व्यवस्थित उंचीवर आहे असे समजले जाते. या उंचीत एखाद्या दुस-या मीटरचा फ़रक चालून जातो. पण त्याहून जास्त फ़रक असेल तर त्या विमानासाठी रनवे पुरेसा पडणार नाही त्यामुळे थ्रेशोल्डवर 15 मीटर्सपेक्षा खूप जास्त उंचीवर असलेल्या विमानाने ते लॅंडींग टाळून पुन्हा हवेतल्या हवेत एक चक्कर मारून येऊन पुन्हा एकदा थ्रेशोल्डवर 15 मीटर उंचीवर येण्याची कवायत करायची असते. ती कवायत टाळल्यामुळेच आणि थ्रेशोल्डवर खूप उंची असूनही विमान उतरवण्याचा एका परदेशी पायलटचा अती आत्मविश्वास मंगळूरू चा एप्रिल 2010 चा मोठा अपघात घडवून गेले.
आम्हाला प्रवाशांच्या आरामाची चिंता नाहीच पण त्यांच्या सुरक्षित प्रवासाचीही नाही हेच या सगळ्याच तथाकथित इकॉनॉमी एअरलाईन्सचे धोरण असेल तर मग प्रवाशांनीही आपल्या हक्क, अधिकार आणि सुरक्षेविषयी जागृत व्हायला आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यायला सुरूवात केली पाहिजे हे माझे अत्यंत तळमळीचे प्रतिपादन आहे.
- दरवेळी विमानप्रवासात खिडकीची जागा मागून घेत ती एअरलाईन उडताना आणि उतरताना सगळे नियम पाळतेय की नाही हे डोळ्यात तेल घालून बघणारा आणि दरवेळी त्या हवाई सुंदरीने सुरक्षा सूचना द्यायला सुरूवात केल्यानंतर Nat Geo वर आपण बघितलेले "Air Crash Investigation" चे सगळे एपिसोडस आठवून पोटात गोळा येणारा, हवाईप्रवासी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment