Saturday, January 2, 2016

पहिल्या वहिल्या विमानप्रवासाच्या आठवणी

सप्टेंबर १९९५. ऐरोली, नवी मुंबईच्या दत्ता मेघे महाविद्यालयात अध्यापनासाठी रुजू झालो होतो. अल्पावधीतच महाविद्यालयातल्या एक दोन कार्यक्रमांचे सूत्र संचालन करण्याची संधी मिळाली. महाविद्यालयात माझ्यासोबत संगणक विभागात श्री. मगदूम म्हणून एक सहकारी होते. ते ऐरोलीत स्वतःची संगणक प्रशिक्षण संस्था चालवीत असत. त्यांच्या संस्थेचा वार्षिकोत्सव १ जानेवारी १९९६ ला करण्याचे ठरले. मी निवेदन करावे अशी त्यांनी विनंती केली आणि वार्षिकोत्सवासाठी आम्ही सर्वांनी जोमात तयारी सुरू केली. निवेदन तर होतेच पण छोटे नाटुकले, प्रहसने इ. इ. क्षेत्रातही मला रूची असल्याने त्यादृष्टीने त्यावर काम सुरू झाले. १ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.०० ते रात्री १०.०० असा कार्यक्रम ठरला.

माझ्या आयुष्य़ात ज्यांनी मला खूप समजून घेतले आणि माझ्यावर अतोनात प्रेम केले अशा  माझ्या लाडक्या मामांचा वाढदिवस  २ जानेवारीला असतो. १९९६ मध्ये त्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण होत होती आणि त्यानिमित्ताने एक छोटासा समारंभ आम्ही त्यांच्या निवासस्थानी चंद्रपूरला करण्याचे ठरविले. १ जानेवारीच्या माझ्या कार्यक्रमानंतर मी ८०२९ कुर्ला - हावडा एक्सप्रेसने निघावे आणि दुस-या दिवशी दुपारी चंद्रपूरला पोहोचावे असा बेत ठरला. आमचा कार्यक्रम संध्याकाळी ७.०० ते रात्री १०.०० असला तरी " भारतीय प्रमाण वेळेनुसार " तो नक्की रात्री १०.३० ते ११.०० कधीही संपू शकला असता आणि माझी गाडी ठाण्यावरून रात्री १०.१० वाजता सुटणार होती. त्यादृष्टीने मला ऐरोलीवरून रात्री ९.३० पर्यंत निघावे लागणार होते. बरं त्या काळी मुंबईवरून नागपूरकडे जायला शेवटची हीच गाडी होती. नागपूरमार्गे हटिया, पुरी येथे जाणा-या आणि कुर्ल्यावरून रात्री १२.१० वाजता सुटणा-या गाड्या तेव्हा नव्हत्या. मी माझी ही अडचण मगदूमांना सांगितली आणि आपण आणखीही एक निवेदक तयार करूयात. कार्यक्रमाचा पूर्वार्ध मी करतो आणि उत्तरार्धात त्या निवेदकाकडे कार्यक्रम सोपवूयात असा प्रस्ताव दिला. दुसरी निवेदिका म्हणून एक मुलगी (त्यांच्याच संस्थेतली एक विद्यार्थिनी) तयार होती आणि सक्षम होती. या प्रस्तावावर मगदूम काही बोलले नाहीत. फ़क्त त्यांनी मला विचारले की "तुम्हाला नागपूरला किती वाजेपर्यंत पोहोचायचे आहे ?"

दुस-या दिवशी सकाळी मगदूम सरांनी माझ्या हातात अलायन्स एअर (इंडियन एअरलाइन्सची उपकंपनी) च्या २ जानेवारीला सकाळी सुटणा-या नागपूर विमानाचे तिकीटच ठेवले. मुंबई- नागपूर नेहेमीच शयनयान वर्गाने १७५ रूपयात प्रवास करणारा मी ते २९०० रुपयांचे तिकीट पाहून भांबावूनच गेलो. असा कोण मोठा निवेदक मी लागून गेलो होतो ? मी मागितले असते तरी कुणीही मला विमानाचे तिकीट वगैरे काढून दिले नसते आणि इथे तर न मागता हातात विमानाचे तिकीट ! मगदूम म्हणाले " सर, आता पूर्ण कार्यक्रम करा आणि रात्री उशीरा निघा. तुम्ही ८०२९ गाडीच्या वेळेआधी नागपुरात पोहोचता."  खरेच होते ते. गाडीने मी २ डिसेंबर रोजी वर्धेला दुपारी १ वाजता आणि चंद्रपूरला संध्याकाळी ५ पर्यंत पोहोचलो असतो पण आता तर सकाळी ६.१५ च्या विमानाने मी सकाळी ७.१५ ला नागपूर आणि दुपारी ११ पर्यंत चंद्रपुरात असणार होतो.
मग माझ्या पहिल्या वहिल्या विमान प्रवासाची तयारी सुरू झाली. चांगली बॅग घ्यायला हवी होती पण चांगली म्हणजे कितपत चांगली ? यावर एकमत होइना. कारण आमच्या दोस्त राष्ट्रांपैकी कुणीही त्यापूर्वी विमानाने प्रवास केलेला नव्हता. मग त्यातल्या त्यात देशमुख सरांची एक चांगली बॅग तयार केली. ठेवणीतले कपडे कार्यक्रमासाठी आणि प्रवासाठीही तयार ठेवलेत. विमानात कसे बोलावे अगर वागावे ? याविषयी मार्गदर्शन कोण करेल हा मोठ्ठा प्रश्न असताना आमच्या डिपार्टमेंटला एक प्रा. मंजूनाथ म्हणून, परदेश प्रवासाचा थोडा अनुभव असलेली व्यक्ती, सामील झाली. त्यांच्या कडे वेळ काढून गेलो आणि त्यांना माझा भाबडा प्रश्न विचारला. 

त्यांनी एकदम बटाट्याच्या चाळीतला फ़र्टाडो आचार्य बाबा बर्व्यांवर खेकसतो तशा सुरात माझा प्रश्न निकाली काढला. (फ़र्टाडो गोव्यातला आणि मंजूनाथ मंगलोर कडचा. म्हणजे शेजारी बंधूच की.) आमच्या चर्चेचा मतितार्थ हा की मी अगदी महाराष्ट्र एस. टी. सारखा, अगदी बिनधास्त, आसनावर मांडी वगैरे घालून गेलो तरी, कोणी विचारणार नाही. कसले आलेयत विमानप्रवासाचे एटीकेटस वगैरे ? अगदी आरामात जा. अर्थात त्याचा सल्ला वास्तवतेला बराच धरून असला तरी मी एकदम असा मोकळाढाकळा जाणार नव्हतोच. (आणि अजूनही एव्हढ्या विमानप्रवासांनंतर सरावल्यावरही जाण्याची हिंमत करत नाही. मध्यमवर्गीय मन कोंडमारा. दुसरे काय ?)  

१ जानेवारी १९९६. अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी ७ चा कार्यक्रम ७.४० ला सुरू झाला. प्रमुख पाहुण्यांना उशीर हे पेटंट कारण. आता आम्हा हौशी मंडळींचा कार्यक्रम. रंगायचा तितकाच रंगला. सर्व आटोपून निघायला रात्री ११.३० वाजलेत. माझा धाकटा भाउ, महेश, तेव्हा एल. ऍण्ड टी. कंपनीत नुकताच नोकरीला लागला होता आणि कंपनीतर्फ़े त्यांना जुहू विलेपार्ले योजनेत अत्यंत पॉश वस्तीत रहायला व्यवस्था केली होती. रात्र त्याच्याकडे काढण्याचे ठरले. उगाच ऐरोली ते सांताक्रूझ विमानतळ हा लांबचा प्रवास पहाटे मला टाळायचा होता. टॅक्सी न मिळणे, लोकल, बस इ. बंद पडणे असा कुठलाही धोका या बाबतीत मला पत्करायचा नव्हता. पहिला वहिला विमानप्रवास पूर्णपणे उपभोगायचा होता.

रात्रभर महेशकडे झोपलो. झोपतोय कशाचा ? उस्तुकतेपोटी रात्र जागून काढली. पहाटे ३ लाच उठलो आणि अंघोळ वगैरे आटोपून पहाटे ४.३० च्या सुमारास विमानतळावर पोहोचलो. रिक्षा उपलब्ध होत्या पण रिक्षाने विमानतळावर गेल्याचे मी कुणालाही पाहिले किंवा ऐकले नव्हते त्यामुळे उगाचच खोट्या प्रतिष्ठेपोटी टॅक्सी करून गेलो. तिथे सामसूम. थोडी चौकशी केल्यावर नागपूरला जाणा-या विमानाचे बोर्डिंग पास देणारे काउंटर सापडले. ते अजून सुरू व्हायचे होते. काउंटरपलिकडे काळे (किंवा गोरे, कबरे अगर इतर कुठल्याही रंगाचे) कुत्रेही नव्हते. मला उगीचच भीती की आता आपण चेक इन कधी करणार ? इमिग्रेशनचा फ़ॉर्म कधी भरणार ? (हा फ़ॉर्म फ़क्त परदेशात जाताना भरायचा असतो हे सत्य नंतर कळले. आमचे विमानप्रवासाचे ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी वाचनावर आधारीत होते. थॅंक्स टू पु.ल, रमेश मंत्री आदि. मराठी सारस्वत.) थोडक्यात अस्मादिक काउंटरभोवतीच घुटमळत.

विमान कंपनीलाच आमची दया आली असावी. पहाटे ५ च्या सुमारास काउंटरपलीएकडे एक "सुकांत चंद्रानना" येउन स्थानापन्न झाली . (आता ती खरोखर " सुकांत चंद्रानना" होती ? की आजवरच्या अती प्रवासवर्णने वाचनामुळे मला तशी वाटत होती ? हा प्रश्न मला अजूनही सुटलेला नाहीये.) मी थोड भीतभीतच तिला खिडकीची जागा मागितली. तिने " वत्सा, तुजप्रत कल्याण असो. " या भावातच १९ एफ़. क्रमांकाची सीट दिली. " ही नक्की खिडकीचीच जागा आहे नं हो ?"  असे विचारण्याचा मोह मी टाळला. तसा माझा माणसाच्या चांगूलपणावर फ़ार विश्वास आहे. कोण कशाला मला उगाच खिडकीची जागा नाकारेल ? ही मनाची समजूत घालत मी विमानतळाच्या अंतर्प्रतिक्षागृहात प्रवेश कर्ता झालो.

आता विमाने आणि त्यांचे फ़लाट दिसत होते. उगाचच त्या पॉश उपहारगृहातून मी महागडी कॉफ़ी घेतली आणि आपण जणू रोज सकाळी पॅरीस ते न्युयॉर्क आणि संध्याकाळी परतीचा असा प्रवास करत असतोय या उसन्या अवसानात ती प्यायलोही. शेवटी हो, नाही करता करता आमच्या विमानाची उद्घोषणा झाली. आम्हा सर्व मुसाफ़िरांना इंडियन एअरलाइन्स ने एका बसमधून दूरवर उभ्या असलेल्या आमच्या विमानाकडे नेले.




त्या पाय-या खूप उत्सुकतेत चढलो आणि "१९ एफ़" म्हणजे शेवटून दुसरी उजवीकडील खिडकी आहे हे पाहून सुस्कारा सोडला. काय बघू आणि काय नको असे झाले होते. विमान बहुतांशी रिकामेच होते. आमच्या १९ क्रमांकाच्या रांगेत तर अस्मादिक एकटेच होते. "कुर्सी की पेटी" बांधून सोडवण्याचे २, ३ प्रयोग झालेत. आणि मग विमान सुटण्याआधीच्या त्या हवाइ सुंद-यांच्या सूचना सुरू झाल्या. त्या सूचना ऐकून उत्साह वाटण्याऐवजी थोडी भीतीच वाटायला लागली. आजवर वाचलेल्या विमान अपघातांच्या बातम्या डोळ्यांपुढे तरळून जायला लागल्यात. (नशीब तेव्हा ते "Air Crash Investigations"    नव्हते नाहीतर त्यांच्या डॉक्युमेंटरीज पाहून पाहून पोटात अजूनच गोळा आला असता.)

माझ्या पहिल्या विमानप्रवासाचे मुख्य वैमानिक "कॅप्टन वैष्णव" आणि सहवैमानिक " विजयपत सिंघानिया " होते. ज्या माणसाने भारतीय विमानोड्डाणात विक्रमांवर विक्रम नोंदविले आहेत तो सिंघानियांसारखा माणूस माझ्या पहिल्या विमानप्रवासात वैमानिक म्हणून लाभावा हे माझे खरोखर भाग्यच. 

थोड्या विचारात, थोडा आठवणींमध्ये गढून गेलो. माझे दिवंगत आजोबा नकलाकार राजाभाउ किन्हीकर यांनी आम्हा नातवंडांसाठी जमीन जुमला इस्टेट वगैरे भलेही ठेवली नसेल पण ज्या कलेचा वारसा त्यांनी आम्हाला दिला,  त्या कलेमुळे ही संधी मला मिळाली होती. माझ्यातल्या विविध गुणांना जाणीवपूर्वक खतपाणी घालणारे माझे वडील प्रकाश किन्हीकर नागपूरच्या विमानतळावर माझी वाट पहात होते. त्यांच्या मित्र मंडळींमध्ये त्यांची छाती नक्की गर्वाने फ़ुगली असणार.

पहाटेच्या आणि सकाळच्या संधीकाळात विमानाने अलगद जूहूच्या समुद्रावर झेप घेतली. खालची मायानगरी छोट्या छोट्या दिव्यांनी लुकलुकत होती. धूसर होत होती. पण धूसरपणा हा उंचीमुळे आला होता की डोळ्यात दाटलेल्या आजोबा आणि वडीलांविषयीच्या कृतज्ञतेच्या अश्रूंमुळे ते ठरवणे कठीण होते.







12 comments:

  1. Replies
    1. Thank you, Shrikant. You were there to receive me at Nagpur.

      Delete
  2. राम हा अति उत्तम लेखक.... ते आज कळलं👌😊

    ReplyDelete
  3. मला विमान प्रवास खूप कंटाळवाणा होतो मग तो कितीही कमी वेळचा का असेना.चार-पांच दा केला तरीही बाकी पहिल्या वहिल्या विमान प्रवासाची उत्सुकता असतेच

    ReplyDelete
    Replies
    1. हो काका. विमानप्रवास कंटाळवाणा आहे खरा.

      Delete
  4. फारच सुरेख लेख आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, स्वप्नील जी.

      Delete