Friday, January 1, 2016

मनाचे श्लोक - १

नववर्षात मनाच्या श्लोकांविषयी थोडे लिहावे अशी इच्छा झाली. सदगुरू हे कार्य करवून घेवोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना. 

मनाला उद्देशून पण सर्व सामान्य जनांसाठी श्री समर्थांनी हे २०६ श्लोक रचियेले. मनाचे श्लोक हा श्री समर्थांचा एक मोठा मानसशास्त्रीय प्रयोग आहे असे मनापासून वाटले. रोज याचे पठण करून (पठणात थोडं या श्लोकांच्या अर्थावर लक्ष केंद्रीत करून) याचा अनुभव जिज्ञासूंनी घ्यावा. 

श्री. सुनील चिंचोळकर, डॉ. यशवंत पाठक यांचे या विषयावरील लिखाण वाचले. श्री. विवेकजी घळसासी, प्राचार्य राम शेवाळकर यांची प्रवचने हा तर माझ्या प्रवासातला एक मोठ्ठा दीपस्तंभ म्हणून आहेतच. त्या सर्वांच्या शुभाशिर्वादाने हे कार्य सिद्धीस जावो ही प्रार्थना. इतर लेखनाप्रमाणे काही दिवसांनी हेच लेखन व्हॉटस ऍपवर कुठल्यातरी समूहावर निनावी म्हणून वाचायला मिळेल. त्याला इलाज नाही.




गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंत या राघवाचा      II १ II 

श्री समर्थांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम. त्याच्या पंथावर चालण्याचा उपदेश करण्याआधी श्री समर्थ सगुण आणि निर्गुणाचाही आरंभ असलेल्या गणेशाला तसेच परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या चारी वाणींचे जे उदगम स्थान आहे त्या शारदेला वंदन करताहेत. यातल्या " आनंत" शब्दाविषयी मला खूप औत्सुक्य आहे. हा शब्द म्हणजे प्रभू श्रीरामांचे अनंतत्व वर्णन आहे की या पंथावर आपण सर्वांनी अनंतकाळ चालत राहण्याचा श्री समर्थांचा उपदेश आहे ? 



मना सज्जना भक्तीपंथेची जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे.     II २ II 

श्री समर्थांनी मनाला भक्तीपंथाचा उपदेश केला आहे. श्रीमदभगवतगीतेत १२ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला नेमके हेच पटवून देतात. सर्व साधनांमध्ये होणारे कष्ट सोसून ईश्वरप्राप्ती करवून घेण्याऐवजी भक्तीपंथाच्या साध्या मार्गाने जाऊन तीच ईश्वरप्राप्ती होऊ शकेल असे भगवंतांनी प्रतिपादन केले आहे. अर्थात भक्तीमार्ग दिसतो साधा पण आचरणात आणायला कठीण आहे. इतर कर्मकांडे पाळली नाहीत तरी मनाची खूप पथ्ये पाळावी लागतात. म्हणूनच मनाला केलेल्या पहिल्या उपदेशातच श्री समर्थ भक्तीमार्गाचे प्रतिपादन करतात. " लोकाचारे वर्तावे " " अलौकिक नोहावे, लोकांप्रती" ही श्री समर्थांचीच भूमिका असल्याने ते मनाला लोकानुकूल वागण्याचा सल्ला देतायत. 

" जनाची नाही पण मनाची तर लाज बाळग " असे आपण म्हणतो. म्हणजे सर्वप्रथम सर्व लोकांनी जनांच्या प्रतिक्रियेचा विचार केला पाहिजे हे यातून अधोरेखित होते. काही महाभाग जनलाज खुंटीवर टांगून (फ़ाट्यावर वगैरे मारून) जगतात त्यांच्या साठी आपण उपरोल्लेखित म्हण वापरतो. पण श्री समर्थ जनांचा विचार करून वागण्याची मनाला शिकवण देताहेत. उगाच उफ़राट वागून आज स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची जी प्रथा आलेली आहे, त्या विरूद्ध हा श्री समर्थांचा उपदेश आहे.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा
सदाचार हा थोर सोडू नये तो
जनी तोचि तो मानवी धन्य होतो.    II ३ II 

सकाळची वेळ विशेष असते. रात्रभराच्या शांत झोपेनंतर नवीन दिवसाची सुरूवात, नवीन कार्याप्रत जबाबदारीची सुरूवात छान आणि प्रसन्न व्हावी असे सगळ्यांनाच वाटत असते. उठल्या उठल्या इतर काही गोष्टींमध्ये मन घालण्याआधी सर्वप्रथम जर आपण प्रभू श्रीरामांचे स्मरण केले तर ? वैखरीतून दिवसभर आपल्या चरितार्थासाठी अनेक गोष्टी आपण बोलणार आहोत. पूर्णपणे संसारात गुरफ़टून जाणार आहोत पण त्या सर्वांच्या आधी प्रभू श्रीरामांचे स्मरण केले तर ते आपल्या कार्यात आपल्यासह सदैव असतील. आणि भगवंत सदा सन्निध असावा यावाचून एका भक्ताची काय अधिक अपेक्षा असावी ? हे मानवी जीवन धन्य होण्यासाठी सद आचरण सोडू नये हा उपदेशही श्री समर्थ मनाला करतात आणि दिवसभर सदाचरणासाठी प्रभू श्रीरामांचे सान्निध्य पाहिजे असेल तर सकाळी इतर व्यवहार सुरू करण्यापूर्वी त्याला प्रेमाने एकदा " राम " किंवा " श्रीराम " म्हणून हाक तर मारून बघूयात.

करायची मग उद्यापासून सुरूवात ?

                                                            II जय  जय रघुवीर समर्थ II




No comments:

Post a Comment