Sunday, January 31, 2016

मनाचे श्लोक - ६



मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तो ही पुढे जात आहे
पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्या ते
म्हणोनी जनी मागुता जन्म घेते  II १६ II 


ह्या पृथ्वीतलावर जो जीव जन्माला आला तो एक ना एक दिवस मरणार हे निश्चित आहे. गदिमांनी गीतरामायणात लिहील्याप्रमाने " जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात " हे अगदी खरे आहे, आपणा सर्वांच्या नित्य प्रत्ययाचे आहे. पण तरीही आपण हे सत्य कायम नाकारीत आलेलो आहोत.

किंबहुना या जन्ममृत्यूच्या फ़े-यातून कायमची सुटका होण्यासाठी प्रयत्न करणे हे या जन्माचे परमकर्तव्य आहे. श्री गजानन विजय ग्रंथात गजानन महाराजांनी परमभक्त बाळाभाऊंना उपदेश करताना " जन्मे न कोणी, मरे न कोणी, हे जाणावयालागोनी, परमार्थाचा उपाय " सांगितला. पण सर्वसामान्य संसारी पुरूष आपल्या आप्त स्वकीयांच्या मृत्यूच्या कल्पनेनेही सैरभैर होऊन जातो. ज्याच्या मृत्यूबद्दल आपण शोक करीत आहोत, त्याच्याच मार्गाने आपण आपलाही प्रवास करीत आहोत हे तो विसरूनच जातो. मृत्यूचे इतके जवळून दर्शनही त्याला ख-या अध्यात्माचा, जीवनाच्या ख-या उद्दिष्टांचा बोध करवून देण्यास असमर्थ ठरते. म्हणून मृत्यूच्या निकट दर्शनानंतर आपल्या एकंदरच इथल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा विचार करणे श्री समर्थांनी अभिप्रेत आहे. ते सोडून आपल्या उरलेल्या आयुष्यांत केवळ षडरिपुंच्या ताब्यात जात राहिलोत, क्षोभ करीत राहिलोत तर श्री शंकराचार्यांनी सांगितलेल्या " पुनरपी जननम, पुनरपी मरणम " याच चक्रात आपण भ्रमण करीत राहू. आपल्या या भ्रमंतीचा अंत होणार नाही.

मनी मानव व्यर्थ चिंता वहाते
अकस्मात होणार होऊनी जाते
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे
मतीमंद ते खेद मानी वियोगे  II १७ II 


आपल्या ताब्यात नसलेल्या आणि आपण कुठल्याही प्रकारे ज्या गोष्टींवर अधिराज्य गाजवू शकत नाही अशा अनंत गोष्टी जगात असतात पण आपण त्या सर्वांसाठी खूप चिंता करीत असतो. किंबहुना आपल्यापैकी प्रत्येकाने जर स्वतःच स्वतःच्या मनाचे विश्लेषण केले तर असे लक्षात येईल की अशा निरर्थक चिंतेनेच आपल्याला व्यापले आहे. आपल्या मनाचा, बुद्धीचा क्षय होतोय तो केवळ असल्या चिंतांमुळेच. कर्माच्या सिद्धांतानुसार क्रियमाण - संचित - प्रारब्ध हा क्रम ठरलेला आहे. आणि इथे आपण प्रारब्ध भोगायलाच आलेलो आहे. ते पूर्ण भोगल्यावर जेव्हा आपल्या क्रियमाणांची वजा बाकी शून्य होईल तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला या जन्ममरण चक्रातून मुक्ती मिळणार आहे. म्ह्णूनच वाईट कर्मे करायचीच नाहीत आणि चांगली कर्मेही आपल्याला चिकटून पुढल्या जन्माला कारण होऊ नयेत म्हणून " श्री कृष्णार्पणमस्तू " म्हणून त्या जगन्नायकालाच अर्पण करायची आहेत. त्यामुळे आपण ख-या आध्यात्मेकतेच्या प्रकाशात आपल्या जीवनाचा मार्ग आखत असताना मूढजनांप्रमाणे एखाद्या घटनेचा अती शोक किंवा एखाद्या वियोगाचा अती खेद मानणे सोडून दिले पाहिजेत.

मना राघवेवीण आशा नको रे
मना मानवाची नको कीर्ती तू रे
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे II १८ II 


म्हणून श्री समर्थ आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांवाचून इतर ठिकाणी आशा लावून देणे सोडून द्यायला सांगताहेत. ज्याची आस धरून राहिलो की लौकिक गोष्टींची हाव खुंटते आणि त्या परमपुरूषाचीच आस धरून आपले जीवन पैलपार व्हावेसे वाटते त्या राघवाची आशा धरायला काय हरकत आहे ? श्रीमद भागवतात म्हटल्याप्रमाणे ज्या परमात्म्याचे वर्णन सकल वेद, सकल शास्त्रे, सकल पुराणांनाही जमले नाही जो सर्व पृथ्वी, अंतरीक्ष, ब्रम्हांड व्यापूनही दशांगुळे उरलेलाच आहे त्याचे वर्णन आपल्या केवळ वाणीने कसे होईल ? तरीही केवळ त्याचीच आस धरून आपण आपल्या जीवनाचा मार्ग आखला पाहिजे.

                                                             II  जय जय रघुवीर समर्थ II 

No comments:

Post a Comment