Monday, January 4, 2016

मनाचे श्लोक - २



मना वासना दुष्ट कामा न ये रे
मना सर्वथा पापबुद्धी नको रे
मना धर्मता नीती सोडू नको हो
मना अंतरी साच वीचार राहो  II ४ II 

ह्या जगात मानवाच्या प्रकृतीधर्मानुसार त्याच्या वासना निर्माण होतात. तामस वृत्तींचे मनात प्राबल्य वाढले की वाईट वासना मनात जन्म घेतात. आता या वासना म्हणजे सदैव कामवासनाच असतात असे नव्हे तर " एखाद्याचे वाईट होऊ दे " असे वाटणे म्हणजेही दुष्ट वासनाच. या वासनांमुळे प्रत्येकाच्या मनात स्वाभाविकच असलेली नीरश्रीरविवेकबुद्धी नष्ट पावून तिथे पापबुद्धी उत्पन्न होते. श्री समर्थ आपल्याला उपदेश करताहेत की या वासना बाळगून भले होत नाही. आपल्या ईश्वरप्राप्तीच्या कार्यात या वासना सहाय्यकारी न होता उलट अडचणीच्याच ठरतात.
आपल्या अंतरात जर कुठले शाश्वत आणि काय अशाश्वत ही कल्पना स्पष्ट असेल तर नीतीधर्माचे शुद्ध आचरण आपल्याकडून होईलच. एकदा ठरले की प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यांचे नाम हेच शाश्वत आणि बाकी सारे अशाश्वत की मग पापाचरणाकडे आपल्या मनाचा कल आपोआपच कमी होईल कारण पापाचरण म्हणजे काही मानवांचे स्वाभाविक आचरण नाही.

मना पापसंकल्प सोडूनी द्यावा
मना सत्यसंकल्प जीवी धरावा
मना कल्पना ते नको वीषयांची
विकारे घडे हो जनी सर्व ची ची  II ५ II 

श्री समर्थ पुढे मनाला पापसंकल्प त्यागण्याचा उपदेश करीत आहेत. एखाद्याने आपल्या मनाशी चांगला संकल्प केला तर सगळे विश्व त्याच्या सहाय्याला धावून तो संकल्प पुरा करण्यासाठी त्याची मदत करीत असते. त्यामुळे आपण सर्वांनी पापसंकल्प त्यागून सत्यसंकल्पाला आपलेसे केले पाहिजे. थोडक्यात तामसी वृत्ती त्यागून सात्विक झाले पाहिजे. (खरेतर सर्व शास्त्रे सत्व, रज आणि तम या तीनही गुणांना त्यागून त्यापलीकडे असलेल्या ईश्वरी तत्वाचा बोध करतात. " सत्वगुणे मारावे रज, तम ; मारा सत्वाने सत्व पूर्ण " हा आमच्या सदगुरूंचाही उपदेश आहे. श्रीमदभागवतात {अष्टम स्कंध, गजेन्द्रमोक्ष कथा} श्री भगवान हाच उपदेश करतात. पण पहिल्या पायरीसाठी तमोगुण त्यागून सत्वगुणाचा आश्रय घेणे भाग आहे.)

आपल्या मनात निरनिराळे विकार कसे उत्पन होतात याचा श्री समर्थांनी ४०० वर्षांपूर्वी विचार करून ठेवला आहे. निरनिराळ्या विषयांची कल्पना मनात उत्पन्न झाली की ती विकारांना जन्म देते. आणि विकारांमुळे आपले वागणे बेताल होऊन सर्व जनात आपल्यावर केव्हा ना केव्हा लज्जित होण्याची पाळी येतेच. कारण विषय हे कधीही पूर्ण न होणारे, कल्पनेसोबत विस्तारत जाणारे आणि म्हणूनच अपूर्ण आहेत. आज सायकल असली की स्कूटर हवी असते, स्कूटर असली की नॅनो असेल तर बरे असे वाटू लागते. नॅनो घेतल्यावर ए़क्स. यू. व्ही. घ्यावीशी वाटते आणि शेवटी मर्सीडीज घेतली तरी समाधान होत नाही हा तुमचा माझा अनुभव आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा २१ व्या शतकात सर्वात जास्त भयानक रोग म्हणजे मानसीक रोग असण्याचा अहवाल श्री समर्थांचे द्रष्टेपण अधोरेखीत करतो. या रोगावर औषध त्यांनी ४०० वर्षांपूर्वीच सांगून ठेवलेले आहे.

नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नानाविकारी
नको रे मना लोभ हा अंगिकारू
नको रे मत्सरू दंभ भारू    II ६ II 

श्री समर्थ केवळ रोगाचे वर्णन करूनच थांबत नाहीयेत तर ते रोग होऊ नयेत म्हणून काय सावधगिरी बाळगली पाहिजे यावर पण त्यांचे विवेचन आहे. क्रोध हा सर्व विकारांचा आद्य जनक आहे. " क्रोधात भवती संमोहः, संमोहात स्मृतीविभ्रमः, स्मृतीभ्रंशात बुद्धीनाशो, बुद्धीनाशात प्रणश्यती " हे श्रीमदभगवतगीतेच्या २ -या अध्यायात भगवंतांनी सांगून ठेवलेच आहे. क्रोध आवरण्याचा एकच क्षण पश्चातापाच्या अनंत क्षणांना वाचवू शकतो हे आपणास माहिती आहे आणि चांगलेच अनुभवाचे देखील आहे.

आज हे हवे, उद्या त्याहून अधिक हवे ही हवे पणाची जाणीव म्हणजे काम. या कामामुळेच नाना विकार आपल्या मनात निर्माण होतात कारण हव्याहव्याश्या वाटणा-या सगळ्याच गोष्टी आपल्याला प्राप्त होतीलच असे नाही. शिवाय प्राप्त झाल्यावर असलेल्या गोष्टीपेक्षा दुसरी गोष्ट जास्त महत्वाची आणि आवश्यक वाटायला लागते आणि या वाटण्याला अंत तो नाहीच. मग जी गोष्ट माझ्याजवळ नाही ती येनेकेनेप्रकारेण माझ्याजवळ असायलाच हवी हा लोभ मनात उत्पन्न होतो. आणि मला हवी असलेली गोष्ट मला न मिळता दैववशाने दुस-या कुणाला प्राप्त झाली असेल तर त्याचा आपल्याला मत्सरही वाटतो. श्री समर्थ या सर्व विनाशकारी बाबींचा मनाला त्याग करायला सांगताहेत. या सर्व विकारांचा सारासारविवेक बुद्धीने त्याग केल्यानंतरच मनाला खरे सौख्य लाभू शकेल.

                                                             II जय  जय रघुवीर समर्थ II

2 comments: