Tuesday, July 20, 2021

परिवर्तन मार्क १

 २००३ च्या सुमारास आपल्या एस. टी. ने त्यांच्या साध्या गाड्यांच्या ताफ़्यात मोठ्ठा बदल करण्याचे ठरविले. आणि त्याप्रमाणे पहिली प्रोटोटाईप बस दापोडी कार्यशाळेत बांधल्या गेली. बसेसमधल्या संरचनेच्या परिवर्तनाचा हा पहिली मोठा प्रयत्न होता. तत्पूर्वी २००० मध्ये बसेसचे मागचे दार पुढे आणून बसच्या वरखाली होणा-या (dropping down) खिडक्यांऐवजी पुढेमागे होणा-या (sliding) खिडक्या आणल्या होत्या. पण जवळपास ४० - ४५  वर्षे तशाच असणा-या बसच्या संरचनेतले पहिले परिवर्तन या बसेसने आणले होते. म्हणून त्या बसेसपासून साध्या बसेसना (निम आराम नसलेल्या) परिवर्तन म्हणण्याची सुरूवात झाली.


एस. टी. महामंडळाच्या तिन्ही कार्यशाळांनी अशा प्रकारच्या बसेसची बांधणी सुरू केली. 


मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीने  MH - 12 / AU 90XX  व AU 91XX सिरीजमध्ये

मध्यवर्ती कार्यशाळा औरंगाबादने MH - 20 / D 64XX व D 65XX  सिरीजमध्ये

मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने MH - 31 / AP 95XX व AP 96XX सिरीजमध्ये


दापोडी कार्यशाळेची MH - 12 / AU 9194. अम. दर्यापूर आगार.


१. तोवर प्रवासी विभागात असलेल्या १० ते ११ छोट्या खिडक्यांऐवजी ६ मोठ्या खिडक्या या परिवर्तनात आल्यात. पूर्वी जवळपास प्रत्येक एका बाजूच्या एका आसन रांगेला एक खिडकी मिळायची आता दोन आसन रांगांमध्ये एक सामायिक खिडकी आली. (प्रवाशांच्या भांडणांना निमंत्रण)


२. बसेसची रंगसंगती बदलल्या गेली. लाल + पिवळ्या रंगांऐवजी निळा + हिरवा ही नेत्रसुखद रंगसंगती आली. पण नंतर महामंडळाने जुनीच रंगसंगती (लाल + पिवळा) आणण्याचा निर्णय घेतला. कारण पहिल्यांदा गाड्या जेव्हा पुन्हा RTO पासिंगसाठी रंगवायला आपापल्या विभागीय कार्यशाळाममध्ये गेल्यात तेव्हा त्या पुन्हा जुनाच साज घेऊन आल्यात. काही काही गाड्या मात्र नमुना रंगसंगती म्हणून महामंडळाने निळ्या + हिरव्या रंगातच जपून ठेवलेल्या होत्या.


पुन्हा लाल + पिवळ्या रंगसंगतीत रंगवलेली परिवर्तन मार्क १


३. चालकाच्या केबिनला पाठ लावून प्रवाशांकडे तोंड करून बसणारा तो ६ आसनी लांबच लांब बाक जाऊन आता नवीन आसनव्यवस्थेत सगळी आसने प्रवासाच्या दिशेलाच तोंड करून असणारी झाली होती.

४. परिवर्तन गाडीतली आसनव्यवस्था जरी जुन्या आसनव्यवस्थेप्रमाणेच ३ बाय २ असली तरी आसनामध्ये वापरल्या जाणा-या PU Foam मध्ये बदल झाला होता. प्रवाशांना अधिक आरामदायी आसने देण्याचा हा महामंडळाचा प्रयत्न होता.

५. बसच्या पुढील बाजूला असलेल्या दोन्ही आरशांसाठी (rear view mirrors) साठी खाजगी गाड्यांसारख्या दोन मोठ्या लोखंडी कांबी देऊन त्यावर मोठे आरसे दिलेले होते. तत्पूर्वी हे आरसे (rear view mirrors) छोट्याशा आकाराचे असायचे आणि चालकाच्या बाजूच्या दाराला अगदी लागूनच असायचेत.

६. बसेसच्या मागील बाजूला छताला पुढील बाजूप्रमाणे गोलाकार वळण देण्यात आलेले होते. यापूर्वी असे गोलाकार छत १९७० च्या दशकातल्या बसेसना असायचे.


                                 पाठीमागील छताला गोलाकार आकार असलेली परिवर्तन मार्क - १




७. या बसेसची नंबरप्लेट त्यापूर्वीच्या निम आराम गाड्यांना असायची तशी मधोमध आणल्या गेली होती.

८. मागील बाजूस निम आराम गाड्यांप्रमाणे मोठ्या काचेच्या खिडक्या देण्यात आल्या होत्या. जुन्या मॉडेल्समध्ये त्या ठिकाणी एकच मध्यम आकाराची संकटकालीन खिडकी असायची. आता बसच्या आतील अधिक चांगल्या प्रकाशयोजनेसाठी मोठ्ठ्या खिडक्या आल्या होत्या.


या बसेस प्रवाशांच्या पसंतीस उतरल्यात आणि नंतर मग एस. टी. महामंडळाने त्यात अधिकाधिक बदल करून परिवर्तन मार्क - २ (पूर्ण लाल रंगातली आणि समोरचा काऊल बदललेली), परिवर्तन मार्क - ३ (लाल + पिवळी, ३ बाय २ पण समोरचा काऊल नेहमीप्रमाणे असणारी), परिवर्तन मार्क - ४ (पूर्ण लाल आणि २ बाय २ आसनव्यवस्था असलेली) या बसेस आणल्यात. 

या परिवर्तनाची सुरूवात करणारी ही परिवर्तन मार्क - १

- बसफ़ॅन प्रा. राम प्रकाश किन्हीकर.

2 comments: