Friday, July 23, 2021

रिता मंडप

 हळदीच्या दिवशी मैत्रिणी, नातेवाईकांच्या थट्टेत बुडून, लाजून गेलेली नवरी लग्नाच्या दिवशी (मंगल कार्यालय किंवा लाॅनमध्ये उभारलेल्या) लग्नमंडपात जाते.

लग्नाच्या दिवशी सगळे लग्नविधी आटोपून नवरी आपल्या नियोजित घरी रवाना होते. मुलीकडली वर्हाडी मंडळी परततात.



मुलीकडे उभारलेला मंडप अशा वेळी सगळ्यात केविलवाणा भासत असतो. या मंडपातून मंगल कार्यालयात गेलेली सगळी पाहुणेमंडळी परत मंडपात परतली असतात. फक्त उत्सवमूर्ती त्यात नसते. त्यात परतण्याची वेळ ही तिन्हीसांजेची कातरवेळ असते. हा असला मंडप खरोखर हृदय कातरत जातो. माणसांनी भरलेला असला तरी हृदयाने रिता. दिलासादायक बाब एव्हढीच असते की दोन तीन दिवसांनी नवी नवरी आणि नवे जावईबापू त्या मांडवात परतणार असतात. हा दूरदृष्टीचा मनोवैज्ञानिक विचार करूनच आपल्याकडे "मांडवपरतणी"ची ही प्रथा आली असावी.
असेच रितेपण गणेशोत्सवाची, श्रीमदभागवतसप्ताहाची विसर्जन मिरवणूक आटोपून परतल्यानंतर त्या मंडपात जाणवत असते. उगाचच उदास होण्याचे, सगळं काही असूनही आतून रिते रिते वाटण्याचे हे प्रसंग.
- स्वतःला सख्खी बहीण नसेलही पण कुठल्याही पाठवणीच्या प्रसंगी हळवा होणारा आणि नकळत डोळ्यांच्या कडा पुसणारा गृहस्थ रामचंद्रपंत.

No comments:

Post a Comment