Thursday, July 8, 2021

Gaunleted Tracks : काही जुन्या आठवणी.

 भारतीय रेल्वेवर आजवर तीन वेगवेगळ्या मितींचे लोहमार्ग होऊन गेलेत. आजकाल मेट्रोचा धरला तर चार.


१. ब्रॉड गेज : रूंदी १६७६ मिमी. (किंवा १.६७६ मी) आता हा असा अडनिडा आकडा ब्रॉड गेजसाठी का निवडला असेल ? याचे कुतुहल मला बरेच वर्षे होते.  मग लक्षात आले की ५ फ़ूट ६ इंचाला जर आजकालच्या मिमी मध्ये बदलले तर १६७६ मिमी होतात. ब्रिटीश शासित देशांमध्ये हाच रेल्वेमार्ग प्रामुख्याने आढळतो.


२. मीटर गेज : रूंदी १००० मिमी (१ मीटर) ज्या ठिकाणी भौगोलिक रचना जरा कठीण आहेत, जिथे ब्रॉड गेज शक्य नाही तिथे हा मार्ग वापरलाय. ब्रॉड गेजची वळणे अधिक अंतराची असतात. म्हणून ज्या पहाडी प्रदेशात तितकी जागा उपलब्ध नाही, तिथे हा गेज वापरलाय. इंदूर - महू - पाताळपाणी - ओंकारेश्वर - खांडवा - तुकईथड - अकोट - अकोला. हा मार्ग विंध्य आणि सातपुडा पर्वतांमधून जायचा आणि त्याकाळात आजच्या एव्हढ्या रेल्वे बांधकामाच्या सोयी / यंत्रे उपलब्ध नसायची म्हणून आत्ता आत्तापर्यंत हा मार्गे मीटर गेज होता. आता याच्या बदलाचे काम सुरू आहे.


३. नॅरो गेज : यात दोन प्रकार आहेत. 

अ. : रूंदी ७६२ मिमी (पुन्हा अडनिडा आकडा. अहो हे अंतर बरोबर २ फ़ूट ६ इंचाचे आहे. मोबाईल फ़ोनवर distance converter वरून करून बघताय ना ?)


आ : रूंदी ६१० मिमी (म्हणजे बरोब्बर २ फ़ूट अंतर)

४. स्टॅण्डर्ड गेज : आजकाल मेट्रोच्या निमित्ताने भारतात शिरकाव झालेली ही गेज. तसही जगभरात ५५ % गेजेस याच प्रकारातल्या आहेत म्हणा. "ब्रिटीश साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता" वगैरे कितीही वल्गना ब्रिटीशांनी केल्यात तरी जगाच्या फ़ार थोड्या भूभागावर त्यांनी राज्य केलेय ही वस्तूस्थिती आहे. ब्रिटीशांच्या राज्यांशिवाय इतर सर्व जगात ही गेज वापरली जाते. 

रूंदी : १४३५ मिमी (४ फ़ूट साडेआठ इंच) कलकत्ता मेट्रो आणि इतर मेट्रोंसाठी याच रूंदीचा लोहमार्ग वापरला गेलाय. 


भारतात जुन्या छोट्या गेजेसचे मोठ्या गेजेसमध्ये परिवर्तन करताना, कठीण भूप्रदेशातून मार्ग काढताना, बहुतांशी वेळा रेल्वेने पूर्णतः नवीन आखणीचा रेल्वेमार्ग तयार केला. त्यामुळे काही काही ठिकाणी जुना मार्ग पूर्णपणे बंद न करताही नवा मार्ग टाकला गेला. महत्वाच्या स्टेशन्सवर दोन्ही रेल्वे मार्ग एकत्र यायचेत. अशावेळी जो रेल्वे मार्ग टाकायचे त्याला इंग्रजीत Gaunleted Track म्हणतात. (याचा मराठी प्रतिशब्द मी शोण्याचा प्रयत्न केला, पण नाही मिळाला.)


२०११ मधील मथुरा ते इंदूर प्रवासात उज्जैन जवळ हा अशा प्रकारचा रेल्वेमार्ग सापडला. रतलाम ते इंदूर हा मीटर गेज आणि नागदा ते उज्जैन हा ब्रॉडगेज मार्ग असे एकत्र आलेले होते. दोन्हीही रेल्वेमार्गासाठी एक रूळ कॉमन आणि इतर दोन रूळ दोन प्रकारच्या रेल्वे मार्गांसाठी. खर्चात बचत. या प्रकारच्या रेल्वे मार्गांसाठी खाली आधारासाठी असलेले स्लीपर्स पण विशिष्टच प्रकारचे लागतात.

दोन्हीही लोहमार्ग एकत्र.


काही अंतर एकत्र चालल्यानंतर उज्जैन जवळ दोन्हीही मार्ग आपापल्या वेगळ्या वाटा चोखाळताना.

एकेकाळी मनमाड - औरंगाबाद - परभणी - पूर्णा मार्गाच्या रूंदीकरणातही अशा प्रकारचा Gaunleted Track वापरण्याचा तत्कालीन रेल्वेमंत्री सी के जाफ़र "शरीफ़" (शरीफ़ तरी कसे म्हणावे ?) यांचा बेत होता. मनमाड ते अंकाई किल्ला स्थानकापर्यंत तसा लोहमार्ग टाकून पण झाला होता. पण नंतर रेल्वेमंत्र्यांच्या त्या आग्रहामागचे कारण उघडकीस आले. मंत्रीमहोदयांच्या जावयाचा असे विशिष्ट स्लीपर्स तयार करण्याचा कारखाना होता म्हणे. हे अशा प्रकारचे लोहमार्ग भारतात कमी ठिकाणीच आणि फ़क्त काही किलोमीटर्ससाठीच असल्याने त्यांच्या कारखान्यातला मालाला पाहिजे तसा उठाव नसावा. म्हणून काचीगुडा (हैद्राबाद) पर्यंत हा पूर्ण ६८० किमीचा मार्ग, असा अभिनव पध्दतीचा बांधून जावयाला मोठ्ठे कंत्राट मिळवून देण्याचा हा मंत्रीमहोदयांचा विचार असावा. काही सामाजिक संस्थांच्या आक्षेपामुळे हा बेत बारगळला आणि मराठवाड्यातले प्रवासी मोठ्ठया त्रासातून वाचलेत. मीटर गेज डब्यांच्या उंचीनुसार फ़लाट कमी उंचीचे बांधावे लागले असते आणि त्यावर ब्रॉडगेज प्रवाशांना चढायला आणि उतरायला त्रास झाला असता. आणि एकेरी मार्गावरून जाणा-या मीटर गेज गाडीच्या कमी वेगामुळे त्याच मार्गावरून पाठीमागून येणा-या किंवा पुढून येणा-या ब्रॉडगेज गाड्यांचा खोळंबा झाला असता तो निराळाच. म्हणजे ब्रॉडगेज बांधल्याचा म्हणावा तसा फ़ायदा झाला नसताच.


तर अशी ही Gaunleted Tracks ची कथा.


- Railfan Ram


No comments:

Post a Comment