आपण श्रध्दाळू लोक खूप तीर्थश्रेत्रांना भेटी देतो. क्वचित प्रसंगी तिथल्या सुंदर विग्रहांच्या तसबिरी किंवा तिथे होत असलेल्या उपासनेचे पुस्तक किंवा त्या संताची चरित्रात्मक पोथी घरी घेऊन येतो. त्या तसबिरी आपल्या देवघरात विराजमान होतात.
पण कालौघात आपल्या स्मृतींवर थोडी धूळ बसल्यासारखी होते. ती स्तोत्रे विस्मरणात जातात, एकाच पारायणानंतर आपण ती पोथी पुन्हा वाचतही नाही, त्या तसबिरींची नित्य पूजा होते पण ती तसबीर घरी आणण्यामागे जो हेतू असतो तो लोप पावल्यागत होतो.
असे करू नये. हे म्हणजे आपण आमंत्रण देऊन बोलावलेला पाहुणा घरी आलेला असताना त्याला केवळ बसण्यासाठी जागा देऊन नंतर त्याची / तिची दखलच न घेता उपेक्षा केल्यासारखे होईल.
आपण सश्रध्द असू, तर देवघरात विराजमान प्रत्येक देवाची थोडीतरी उपासना (एखादे स्तोत्र, अष्टक किंवा आर्ती) रोज व्हायलाच हवी, नियमित कालावधीत (वर्ष, सहा महिने) ती पोथी वाचनात आणल्या गेली पाहिजे, हे कटाक्षाने पाळले पाहिजे. हे अनुसंधान नित्य टिकवले गेले पाहिजे. त्यासाठी फक्त काही मिनीटांचा वेळ आपल्या दिनचर्येतून आपल्याला काढता आलाच पाहिजे. अशा रितीने आपण हळूहळू त्या देवतेशी आणि त्या तीर्थक्षेत्रांशी मनाने संलग्न होत जातो, अविभक्त कृपेची अनुभूती घेत जातो. "जो विभक्त नाही तो भक्त" ही व्याख्या लक्षात घेतली तर आपली "भक्त" होण्याकडे वाटचाल वेगाने होत जाते.
- स्वानुभवात्मक चिंतनातून उपयुक्त विचार मांडणारा एक भक्त, रामभाऊ.
No comments:
Post a Comment