Saturday, November 13, 2021

स्लीपर: एक पायताण

 मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गाने जाताना खलघाट ला नर्मदामैय्या ओलांडली आणि धामनोद ला आलोत की रस्त्याच्या बाजूला स्लीपर्सची एकापेक्षा एक मोठमोठी दुकाने लागतात. आजही अगदी ५० ते १०० रूपयांमध्ये छान छान डिझाईन्सच्या आणि पायाला मऊ मुलायम, सुखद फ़िलींग देणा-या सुंदर स्लीपर्स तिथे मिळतात. ब-याचदा अशा स्लीपर्सचे कंटेनर्सच्या कंटेनर्स तिथे रिकामे होताना मी पाहिलेत. सुरूवातीला मला ह्या स्लीपर्स चिनी वाटल्या होत्या. पण त्या स्लीपर्स आपल्या देशातच बनतात आणि पूर्वेकडल्या खूपशा देशांमध्ये निर्यातही होतात हे ही मला कळले आणि त्या स्लीपर्सकडे माझा बघण्याचा दृष्टीकोन बदलला.



आमच्या बालपणच्या स्लीपर्स मला आठवल्यात. तेव्हा फ़क्त बाटा आणि करोना या दोनच कंपन्या स्लीपर्स बनवायच्यात. त्या स्लीपर्स म्हणजे पांढ-या रंगाच्या बेसवर निळ्या किंवा बदामी रंगाचे पट्टे बसविलेल्या असायच्यात. यापेक्षा तिसरा रंग मला त्या स्लीपर्समध्ये आढळला नाही. आजकाल बाटा च्या दुकानांमध्ये स्लीपर्स दृष्टीस पडतच नाहीत. आजकाल बाटाच्या दुकानांमध्ये फ़ार जाणेही होत नाही म्हणा. बालपणी भरपूर चालणे व्हायचे. चपला हरवता येतील अशा ठिकाणांना भेटी व्हायच्यात. वाढत्या अंगामुळे चपला छोट्या व्हायला लागायच्यात आणि मग चपलांच्या दुकानात वारंवार चकरा ठरलेल्या असायच्यात. आजकाल चपला, बुटांचा एकेक जोड हा पाच पाच, सहा सहा वर्षे टिकतो. साहजिकच चपला दुकानांच्या चकरा कमी झाल्यात.



बालपणी आमच्या शाळेसाठी् युनिफ़ॉर्म असला तरी युनिफ़ॉर्मचे लोण चपला बुटांपर्यंत पोहोचलेले नव्हते. त्यामुळे बहुतांशी मुले चपला आणि स्लीपर्स मध्येच यायचीत. पावसाळ्यात चालताना त्या स्लीपर्सचा मागचा भाग टाचेवर आपटून शर्ट - पॅंटवर (आणि क्वचित आतल्या बनियनवरही) चिखल माध्यमातल्या आधुनिक चित्रकलेचे एक प्रात्यक्षिक होत असे. आणि त्यामुळे घरी गेल्यावर शर्टाआधी आमची धुलाई होत असे. साहजिक आहे हो. त्याकाळी ते "पो रब पो" वगैरे प्रकार निघाले नव्हते ना. आमच्या आया बिचा-या "सनलाईट" किंवा "५०१ साबण बार" वर अवलंबून असायच्यात. आपल्या मुलांना मळक्या. डाग लागलेल्या कपड्यांनी शाळेत जावे लागू नये ही तळमळ त्या दोन्ही धुलाईंमागे असायची. त्या चपलांचा तो पांढरा बेस थोड्याच दिवसात ऑफ़ व्हाईट - तपकिरी आणि नंतर मातकट काळा असा व्हायचा. पावसाळ्यात एखाद्या स्वच्छ प्रवाहात पाय आणि त्या स्लीपर्स धुवून घेऊन त्या स्लीपर्सना त्यांचे मूळ रूप प्राप्त करून देण्याचे आमचे प्रयत्न असायचेत, नाही असं नाही. पण मुद्दाम स्लीपर्स घरी धुण्याचे लाड वगैरे होत नसत. अहो जिथे अंघोळीला आणि वापरालाच जेमतेम पाणी पुरत असे तिथे स्लीपर्स धुण्यासाठी पाण्याची उधळपट्टी कोण करणार ?


त्या स्लीपर्सचा अंगठा त्याच्या छिद्रातून निसटणे आणि त्याला रस्त्यात चालता चालता पुन्हा त्या छिद्रात टाकणे हे उद्योग तर माझ्या पिढीतल्या प्रत्येकाने केलेले असतील. काही काही स्लीपर्स खूप घासल्या जाऊन तो अंगठा त्या छिद्रात कशाही प्रकारे राहीनासा होई. अशा वेळी त्या अंगठ्यात एक सेफ़्टी पिन आडवी टाकली की काही दिवसांची निश्चिंती होत असे. एकत्र शिकणा-या सर्वांचीच आर्थिक परिस्थिती एकसमान असल्याने सगळ्यांवरच असे प्रसंग वर्षा दोन वर्षात येत असत. अशा पद्धतीने एखादी छोटी गोष्टही दुरूस्त करून वापरणे ही तत्कालीन जनरीत होती.



काळ बदलला. मुलांना युनिफ़ॉर्मचे दोन बूटस (एक चामडी आणि एक कॅनव्हासचा), बाहेर कुठे जायला एखादी सॅंडल, घरात वापरायला एखादी आधुनिक स्लीपर असे विविध जोड आलेत. नवनवीन दुकानांमधून नवनवीन कंपन्यांची छान, आरामदायक पादत्राणे उपलब्ध झालीत. स्लीपर्स घरापुरत्या मर्यादित झाल्यात की काय ? अशी भिती वाटू लागली. मधल्या काळात छान छान चपला बुटांचे प्रस्थ वाढले आणि स्लीपर्स घालून सार्वजनिक ठिकाणी वावरणे हे अगदीच मागासलेपणाचे आणि गावंढळ समजले जाऊ लागले. पण आजकाल तरूण तरूणी त्याच स्लीपर्सचे आधुनिक नामकरण "फ़्लोटर्स" असे करून त्या स्लीपर्स सुटसुटीतपणे सार्वजनिक ठिकाणी घालून वावरताना पाहिली की कालचक्राचा एक फ़ेरा पूर्ण झाल्याचे समाधान लाभते.


एक मात्र खरे. ज्या पायांनी आपण चल राहतो त्या पायांना सुरक्षा आणि आराम पुरविण्याचे काम या पादत्राणांनी केलेय पण ज्या महापुरूषांनी स्वतःच्या चालण्यासोबत आपल्यासोबतच्या समाजाला चालवले, त्यांच्या विचारांना चालवले आणि प्रगतीपथावर नेले त्या महापुरूषांची पादत्राणे नुसत्या चपला रहात नसून "पादुकां"चा दर्जा प्राप्त करतात आणि निरंतर पूजल्या जातात.


- अनेक संत सत्पुरूषांचा चरण रज आणि "पायीची वहाण, पायी बरी" या उक्तीवर स्वतःची किंमत जोखणारा रजःकण, राम प्रकाश किन्हीकर.


No comments:

Post a Comment