Tuesday, November 9, 2021

काही लुप्त झालेले व्यवसाय


एकत्र कुटुंबे दुर्मिळ झाल्यानंतर स्टील, तांब्या पितळेच्या दुकानांसमोर (क्वचित सोनाराच्या पेढ्यांसमोरही) बसणारी भांड्यांवर नाव टाकून देणारी मंडळी अस्तंगतच झाली.


आमच्या बालपणी भांड्यांच्या प्रत्येक दुकानांसमोर ही मंडळी असायचीच. पूर्वी यांच्या हातात पेनवजा छोटीशी छन्नी आणि छोटी हातोडी असायची. कालांतराने त्यांच्या हातात विजेवर चालणारे पेनसदृश हत्यार आले.

भांड्यावर नक्की काय लिहायचे ? हा मजकूर या कारागिरांना लिहून द्यावा लागे. त्यात "अमुकतमुक (आत्या/काका/ मावशी) कडून चि. ह्यास / हीस सप्रेम भेट असा मजकूर बहुधा असायचा आणि पुढे कंसात त्या समारंभाची तारीख असायची.


काहीकाही कारागीर त्या छोट्याशा छन्नी हातोड्यानेही सुंदर हस्ताक्षरात हा मजकूर लिहायचेत. बहुतांशी कारागिरांचे हे लिखाण खूप सुरेख नसले तरी सुवाच्च तरी असायचेच. या व्यवसायासाठी ही अगदी मूलभूत अट असावी हे स्वाभाविक होते.

आजही घरी कधी दिवाळीची साफसफाई करताना जुने डबे मिळतात, कधी घरी भांडी घासताना जुन्या भांड्यांवरची नावे दृष्टीस पडतात. मन त्यावर टाकलेल्या दिवशी जाते. आप्तांची आठवण निघते. आप्त दिवंगत असतील तर डोळ्यांच्या कडा ओलावतातही. त्या चहा साखरेच्या डब्ब्यांवरच्या, एखाद्या पातेल्यावरच्या साध्याशा नावांमध्ये आपल्याला त्या काळात नेऊन, त्या आप्ताशी भेट करून देण्याचे कालातीत असे अफाट सामर्थ्य असते.

एकत्र कुटुंब पध्दती हळुहळू लयाला गेली. लग्न व इतर समारंभांमध्ये भांडीकुंडी भेट म्हणून देण्याचे प्रमाण कमी झाले. आणि प्रत्येक राजाराणींच्या त्रिकोनी / चौकोनी संसारात भांड्यांवर नावे लिहून ठेवण्याची गरजही संपली. आता समारंभांमध्ये महागड्या भेटींचा आणि उगाचच्या डामडौलाचे महत्व वाढले. प्रत्येक मनुष्याला भूतकाळात साधे डोकावण्यापेक्षाही भविष्यातल्या अनिश्चिततेकडे जिवाच्या आकांताने धावणे अतिशय आवडू लागले आणि भांड्यांवर नावे टाकून देणारी, आपल्याला तात्पुरती का होईना, भूतकाळात रमवून आणणारी ही कारागीर मंडळी स्वतःच इतिहासजमा झालीत.

- बदलत्या सामाजिक स्थितीचा दूरस्थ व्यवसायांवर होणारा "butterfly effect" या सामाजिक प्रबंधातील एका सिध्दांताचे उदगाते, प्रा. राम किन्हीकर.

No comments:

Post a Comment