Sunday, November 14, 2021

भारतीय रेल्वेची एक नावडती गाडी

 आम्ही आमच्या बालपणी ऐकलेल्या गोष्टींमध्ये राजाची एक "आवडती" आणि एक "नावडती" राणी असत. बालपणी आम्हाला कायम आश्चर्य वाटत असे की एखादी गोष्ट इतकी "नावडती" वगैरे कशी असू शकते ? पण १९८९ साली कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाराष्ट्र एक्सप्रेसचा वारंवार प्रवास घडायला लागला आणि लक्षात आले की महाराष्ट्र एक्सप्रेस हीच ती नावडती राणी.

साधारण १९९७ पर्यंत महाराष्ट्र एक्सप्रेस ही दक्षिण मध्य रेल्वेच्या मालकीची होती. एकूण पुणे ते कोल्हापूर हा रेल्वेमार्गच दक्षिण - मध्य रेल्वेच्या मालकीचा होता. त्यामुळे १२१९ किमी पैकी ९९० किमी मध्य रेल्वेवर चालणा-या या गाडीला दक्षिण मध्य रेल्वे ही आई जेऊ घालीना आणि ९९० किमी चालत असली तरी पूर्ण गाडी दक्षिण मध्य रेल्वेची असल्याने मध्य रेल्वे हा बाप भीक मागू देईना अशी अवस्था होती. बाकीच्या गाड्यांचे वापरून झालेले, किमान १५ ते २५ वर्षे जुने झालेले कोचेस, जुन्या प्रकारची एंजिने या गाडीला मिळत असत. ७३८३ डाऊन / ७३८४ अप असा या गाडीचा द. म. रेल्वेनंबर होता. १९९७ नंतर पुणे - कोल्हापूर हा विभाग मध्य रेल्वेला जोडल्यानंतर या गाडीला सध्याचा १०३९ / १०४० हा नंबर मिळाला. 

नावडती मुलगी लग्न होऊन सासरी वगैरे गेली तरी तिचे हाल संपत नसत. तसेच महाराष्ट्र एक्सप्रेसचे झाले. पूर्वी डबे १५ ते २५ वर्षे जुने मिळायचेत ते आता १० ते २० वर्षे जुने मिळायला लागलेत. आजही महाराष्ट्र एक्सप्रेसच्या नवीनतम डब्यांचा नंबर 12XXX इतकाच असतो. २०१२ पर्यंतच बनलेले डबे या गाडीला मिळतात. जणू २०१९ - २०२० चे डबे या गाडीला दिले तर रूळावरून घसरूनच पडतील. आज नागपूर ते भुसावळ सेक्शनमध्ये सगळ्याच गाड्यांना अगदी लेटेस्ट असे थ्री फ़ेज एंजिने WAP 7 मिळतात पण महाराष्ट्र एक्सप्रेसला अजूनही १५ वर्षे जुनी WAP 4 एंजिनेच मिळतात. नावडतीला काय करायचेत नवे कपडे ? या भूमिकेतून महाराष्ट्रला काय करायचेत ते WAP 7 ? असे रेल्वे बोर्डाचे धोरण असावे.

एकेकाळी महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूरला सह्याद्री एक्सप्रेस, नागपूरला सेवाग्राम एक्सप्रेस आणि दादरला सेवाग्राम एक्सप्रेस ही महालक्ष्मी एक्सप्रेससोबत आपला रेक शेअर करीत असे. त्यासंबंधी सविस्तर वर्णन असलेला लेख इथे आहे. आज सह्याद्री एक्सप्रेस सोडली तर सेवाग्राम एक्सप्रेस ही नागपूर विभागाची लाडकी राणी झालेली आहे आणि महालक्ष्मी एक्सप्रेस ही पूर्वी मध्य रेल्वेची आणि आता हरिप्रिया एक्सप्रेस या दक्षिण मध्य रेल्वेसोबतच्या रेक शेअरींगमुळे दक्षिण मध्य रेल्वेची लाडकी गाडी झालेली आहे. सेवाग्रामचे डबे एकदम नवे नसलेत तरी नुकतेच refurbished केलेले असतात. नागपूर यार्डात तिचे खूप लाड होतात. रंगरंगोटी, नवनवीन सुविधा तिला प्रदान केल्या जातात. पण महाराष्ट्र एक्सप्रेसचे नशीबच खोटे. चांगली नागपूरपर्यंतच धावली असती तर नागपूर विभागाचे लाड तिचाही नशिबात आले असते (किंवा मग तिचे आणि सेवाग्रामचे रेक शेअरींग चालू राहून सेवाग्रामचेही आज होताहेत तितके लाड झाले नसते.) पण प्रफ़ुल्ल पटेलांनी तिला गोंदियापर्यंत पळवून नेली आणि दक्षिण पूर्व रेल्वेच्या सासुरवासात ती अडकली. तिथे तिच्याकडे, तिच्या मेंटेनन्सकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. 

१९८९ मध्ये नागपूर विभागात कोळसा एंजिने हळूहळू हद्दपार होत होती. मध्य रेल्वे्च्या नागपूर विभागात वर्धेचे कोळसा एंजिन शेड होते आणि भुसावळ विभागात भुसावळचे कोळसा एंजिन शेड होते. कोळसा एंजिने फ़क्त पॅसेंजर गाड्यांना नाहीतर मालगाड्यांना लागायचीत. पण १९८९ ते १९९१ काळात दोन तीनदा महाराष्ट्र एक्सप्रेसला कोळसा एंजिन लागलेले आम्ही बघितले होते. त्या कोळसा एंजिन लागलेल्या गाडीत बसणे म्हणजे मोठीच शिक्षा असायची. ती कोळश्याची उडत असलेली धूळ खिडकीतून आत येऊन कपडे काळे होणे, त्या कोळश्याचा आणि त्या गाडीच्या लोखंडाचा एक एकत्रित असा एवंगुणविशिष्ट वास कपडे आणि सामानासुमानाला लागणे, गाडी पूर्ण जोशात धावत असताना उडणा-या कोळशाच्या ठिणग्यांमुळे खिडकीतून बाहेर बघण्याची सोय नसणे (बालपणी मनमाड ते कोपरगाव या एका प्रवासात ही ठिणगी डोळ्यात जाऊन सुजलेल्या आणि ठणकलेल्या डोळ्याची आठवण ४३ वर्षांनंतर अजूनही ताजी आहे.) या सगळ्या गोष्टींमुळे मुलांमधल्या उपजत रेल्वेफ़ॅनिंगला मर्यादा यायच्यात. म्हणून ही कोळसा एंजिने आपल्या गाडीला नकोशी वाटायचीत. आज ही एंजिने दुर्मिळ वगैरे झाल्याने त्यांना heritage value प्राप्त झालेली आहे. तरीही आम्हाला ती नकोशीच वाटतात. या एंजिनांना वेग घ्यायला वेळ लागायचा त्यामुळे यांचा सरासरी वेग फ़ार कमी असायचा. त्यात महाराष्ट्र एक्सप्रेसला थांबे भरपूर म्हणून एकदा का गाडीला उशीर झाला की तो उशीर भरून काढून पुढील स्टेशनावर वेळेवर पोहोचणे (मेकप करणे) या गाडीसाठी अशक्य होत असे.


Maharashtra Express at Akola Jn. Photo Courtesy:  Bigley Hall

काल आमच्या एका रेल्वेफ़ॅन ग्रूपवर हा अकोला स्टेशनवरचा महाराष्ट्र एक्सप्रेसचा (साधारण १९८६-८७ चा) फ़ोटो आला. Photo Credits: Bigley Hall. कुणीतरी परदेशस्थ रेल्वेफ़ॅनने काढलेला हा फ़ोटो. त्याकाळी ब्लॅक ऍण्ड व्हाईट फ़ोटोच दुर्मिळ होते तर हा रंगीत फ़ोटो कुठला रेल्वेफ़ॅन काढणार ? अहो लग्नात देखील मोजून ३६ किंवा ७२ च फ़ोटो काढले जायचेत. म्हणजे एक किंवा दोन रोल. फ़क्त. कारण फ़ोटो काढण्याइतकेच पैसे ते फ़ोटो डेव्हलप करण्यासाठी मोजावे लागायचेत. काढल्यानंतर ८ - १५ दिवसांनी ते फ़ोटो हातात आल्यानंतरच ते कसे निघालेत ते कळायचे. त्यात एखाद्या रोलमध्ये ३६ ऐवजी ३७ वा फ़ोटो बसला की आम्हाला कोण आनंद व्हायचा ? ते आजकालच्या हातातल्या सेलफ़ोन्सने सतत "खिचिक" करत राहणा-या आणि एकदा काढलेला फ़ोटो पुन्हा कधीही न बघणा-या आजच्या पिढीला कळणार नाही.

या फ़ोटोत महाराष्ट्र एक्सप्रेसला लागलेले एंजिन हे WP प्रकारचे. हे एंजिन प्रवासी गाड्या ओढ्ण्यासाठी खास बनलेले असायचे. जास्त वेग आणि त्यामानाने कमी टॉर्क. (खेचण्याची ताकद) अशा एंजिनच्या बॉयलरचा समोरचा फ़ुगीर भाग आणि त्यावरील चांदणी हे आमचे बालपणीचे आकर्षण असायचे. नागपूरवरून जाणा-या जीटी एक्सप्रेस किंवा दक्षिण एक्सप्रेसला अशा प्रकारची एंजिने लागायचीत. महाराष्ट्र एक्सप्रेसला सहसा WG प्रकारची एंजिने लागायचीत. ही WG प्रकारची एंजिने मालगाड्यांसाठी बनविलेली असायचीत. जास्त टॉर्क (खेचण्याची ताकद) आणि त्यामानाने कमी वेग अशी. आजही WAG 7, WAG 9, WAG 12  ही इलेक्ट्रीक एंजिने मालगाड्यांसाठी तर WAP 4, WAP 5, WAP 7 ही इलेक्ट्रीक एंजिने प्रवासी गाड्यांसाठी वापरली जातात. त्याकाळी हे WP एंजिन महाराष्ट्र एक्सप्रेसला मिळाले म्हणजे या मार्गावरच्या इतर एक्सप्रेस गाड्यांना (मेल, गीतांजली, हावडा - मुंबई एक्सप्रेस) नक्कीच डिझेल एंजिने मिळत असणार. हे नकोसे असलेले, जुने झालेले एंजिन या नावडतीच्या माथ्यावर आलेले असणार. 

बरे एकेकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसला डब्यांची काढघालही बरीच असायची. नागपूर ते भुसावळ एक साधारण वर्गाचा (General Class) डबा भुसावळ स्टेशनात निघायचा तर भुसावळ - मनमाड असे ४ सर्वसाधारण वर्गाचे डबे (भुसावळ - मनमाड रोज अप डाऊन करणा-यांसाठीचे) डबे पुढून जोडले जायचेत. गाडीच्या मागल्या बाजूने गोरखपूर - कोल्हापूर आणि भुसावळ - पुणे असे दोन शयनयान वर्गाचे डबे जोडले जायचेत. भुसावळला ४० मिनीटे थांबा होता. मनमाड स्टेशनवर हे भुसावळ - मनमाड डबे निघायचेत. पुन्हा अर्धा तास गाडीचा थांबा. दौंड स्टेशनवर नागपूर - सोलापूर हा एकुलता एक शयनयान डबा निघायचा. आणि एंजिनाची व गाडीची दिशा बदलायची. त्यात पुन्हा ४० मिनीटे थांबा. पुणे स्टेशनवर नागपूर - पुणे, भुसावळ - पुणे हे दोन डबे गाडीपासून वेगळे काढणार आणि पुन्हा एंजिनाची व गाडीच्या रेकची दिशाबदल. पुन्हा ४० मिनीटे थांबा. अशी ही लेकुरवाळी गाडी होती. 

आता नवीन एल. एच. बी. कोचेस लागायला लागल्यानंतर मधल्या स्टेशन्सवर ही डब्यांची काढघाल पूर्णपणे बंद होणार असल्याचे कळलेय. सेवाग्राम एक्सप्रेसला मुंबई - बल्लारशाह हे स्लीप कोचेसचे डबे बंद करण्याची सूचनाही निघाली आहे. (या स्लीप कोचेसची एक रोमॅंटीक आठवण या ठिकाणी.)  बहुतेक सेवाग्राम एक्सप्रेसला हे नवे एल. एच. बी. डबे लवकरच मिळतील असे वाटतेय. पण महाराष्ट्रला हे डबे कधी मिळणार ? या प्रश्नाचे उत्तर "मध्य रेल्वेचा पहिला एल. एच. बी. डबा १५ वर्षे जुना झाल्यावर" असेच आहे. मध्य रेल्वेत पहिला एल एच बी डबा साधारण २०१२-१३ मध्ये प्रवेशकर्ता झाला होता. त्या न्यायाने २०२७ - २०२८ मध्ये महाराष्ट्र एक्सप्रेसला हे नवे डबे मिळतील अशी आशा आहे. तोपर्यंत सगळ्या लाडक्या एक्सप्रेस गाड्यांना "तेजस" या प्रकारातले डबे मिळायला सुरूवात झालेली असेल आणि हे एल एच बी डबे जुने म्हणून गणल्या गेलेले असतील.

बालपणीच्या गोष्टींमध्ये गोष्टीच्या शेवटी नावडती राणी काहीतरी पराक्रम करून राजाची आवडती होत असे. आता महाराष्ट्र एक्सप्रेसने असा कोणता पराक्रम करायला हवाय की ती मध्य रेल्वेची आवडती होईल ? हा सगळ्या महाराष्ट्र प्रेमींसमोरचा मोठा यक्षप्रश्न आहे. 

- एकूण रेल्वे प्रवासापैकी ४० % प्रवास महाराष्ट्र एक्सप्रेसने (उरलेला ४० % विदर्भ एक्सप्रेसने, १५ % सेवाग्राम एक्सप्रेसने आणि ५ % उरलेल्या सगळ्या गाड्यांने) केलेला एक स्टॅटिस्टिशियन रेल्वेफ़ॅन, राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment