Tuesday, May 10, 2022

व्रतवैकल्ये आणि मनुष्यमात्रांचा पिंड

 अनेक सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींतूनही आपला पिंड घडत जातो असे म्हणतात. जीवन जगण्याचे अनेक आदर्श डोळ्यांसमोर असतात. त्यांच्यातल्या काही गुणांचा समुच्चय आपल्यात व्हावा असे आपल्याला वाटत असते. तसेच जीवनात काही काही अनुभव असेही येतात की "नको बाबा आपण असे बनायला." असे वाटून तसा मनाचा निश्चय पक्का होत जातो.


बालपणापासूनच अतिशय धार्मिक वातावरणाचे संस्कार झालेत. आमचे आईवडील, दोघेही, अतिशय धार्मिक, व्रतवैकल्ये करणारे. नित्यनेम करणारे. पापभिरू. त्यामुळे माझाही पिंड साहजिकच तसा घडला. हाॅस्टेलला असूनही हाॅस्टेलच्या खोलीत रोज संध्यावंदन करणारा, पोथीपुराणे वाचणारा आणि यथामिलीत उपचारद्रव्यैः रोज आर्ती वगैरे करणारा म्हणून मी प्रसिध्द होतो.

अंतिम वर्षात असताना आम्ही पुलं चं "तुझे आहे तुजपाशी" करायला घेतलं होतं. अगदी बालपणापासून पुल हे दैवत आणि "तुझे आहे तुजपाशी" हे त्यांच संपूर्णतः स्वतंत्र नाटक. (कुठल्याही परदेशी किंवा देशी नाट्यकृतीवर न बेतलेले म्हणून 'स्वतंत्र') त्या नाटकात, आमच्या तत्कालीन किडकिडीत शरीरयष्टीमुळे की काय, मला "आचार्य" ही भूमिका मिळाला. नाटकातला मुख्य Ante Hero.

नाटकाच्या तालमीत मी त्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात जितका पडलो त्याहूनही अधिक पुलंनी "काकाजी" या मुख्य व्यक्तिरेखेच्या व्यक्तिचित्रणात जे तत्वज्ञान ओतले होते त्याच्या प्रेमात पडलो. आपले अध्यात्म, आपली व्रतवैकल्ये ही आपल्यापुरते असावीत. आपल्यासोबत वावरणार्‍या कुटुंबियांना, समाजाला ती त्रासदायक ठरू नयेत याची काळजी आपण घेतली पाहिजे असा आमचा पिंड त्यावेळी घडला. अर्थात बालपणापासून अत्यंत धार्मिक वातावरणात वाढलेलो असल्याने आणि अनेक अध्यात्मिक अनुभव प्रत्यक्षात घेतले असल्याने पुलंप्रमाणे नास्तिकतेकडे मी वळलो नाही, व्रतवैकल्ये सुटली नाहीत पण व्रतवैकल्यांमधला अट्टाहास कमी झाला. उपवासातली कट्टरता कमी झाली. अपवादात्मक परिस्थितीत एखादा नियम मोडला तर मनाला लागणारी बोचणी कमी झाली. अशी थोडीथोडकी नाहीत २८ वर्षे गेलीत.

पण आताशा लक्षात यायला लागले की आपद्धर्म हा शाश्वतधर्मात बदलतो आहे. कुणाचेही मन दुखावू नये म्हणून आपण कुणाच्याही घरी केव्हाही खाणेपिणे करतोय त्याचा शारिरीक आणि मानसिकही त्रास आपल्याला होतोय. थोडं सुक्ष्मात जाऊन स्वतःचा विचार केला तेव्हा कळले की याला कारण आपणच आहोत. आपणच थोडे निग्रही झाले पाहिजे. कुणालाही त्रास होता कामा नये हे जरी खरे असले तरी आपल्या व्रतवैकल्यांचा इतर जगाला त्रासच होत असेल ही आपली भावनाही बरोबर नाही. आपण जसे इतरांच्या भावनांचा विचार करतो तसाच इतरांनीही आपण करीत असलेल्या व्रतांचा मान ठेवला पाहिजे ही अपेक्षा अनाठायी नाही. शेपुटतुटक्या कोल्ह्यांच्या कोलाहलात शेपूट शाबूत असलेल्या कोल्ह्याने बहिरेपणा स्वीकारून प्रवाहपतित होणे नाकारणेच इष्ट होय.

या गुढीपाडव्यापासून काही शुभसंकल्पांना सुरूवात केलीय. त्यातला महत्वाचा संकल्प आणि व्रत म्हणजे परान्न वर्ज्य.

परीक्षा बघावी तशी परान्न भक्षणाचे प्रसंग समोर येत गेलेत आणि व्रतस्थ भावनेने आणि निर्धाराने ते नाकारले गेलेत. त्याबद्दल टीकाही सहन केली. पण परान्न वर्ज्य केल्याने आपल्या अंतरात आणि शरीरात होत जाणारे सूक्ष्म बदल अनुभवता आले हा आनंद खूप मोठा होता. तसेही कुठल्याही बदलाचा अनुभव घेण्यासाठी ती कृती सतत ४० दिवस करून बघायला हवी हे आपले आधुनिक विज्ञान सांगते. (आपल्या पुराणांनी हेच माप सव्वा महिना सांगितले होते. म्हणजे जवळपास ४० दिवसच की.)

मग जाणवले की ही व्रत वैकल्ये तुमच्या पिंडाला घडवतातच आणि तुमचा निर्धारही वाढवितात. एकप्रकारचे character building च ही व्रते वैकल्ये करत असतात. अगदी आद्य काळापासून, कुठलाही गाजावाजा, जाहिरात न करता अनेक समाजघटकांना घडविण्याचे काम यांनी केलेले आहे.

स्वतःविषयी, आपल्या संस्कृतीच्या उद्देशांविषयीच्या अनेक "युरेका' क्षणांपैकीचा हा एक क्षण. ज्ञानाचा, समाधानाचा, तृप्ततेचा.

- आयुष्याच्या पन्नाशीनंतरच्या या टप्प्यात आपल्या संस्कृतीत वर्णन केलेली अधिकाधिक व्रते आचरणात आणून त्यांचा अनुभव घेऊ इच्छिणारा, व्रतस्थ राम

No comments:

Post a Comment