Sunday, May 8, 2022

झाडे, पाने, फुले, फळे आणि सावली

 परवा आमच्या सौभाग्यवती माझ्या मेव्हणीशी बोलत होत्या. बोलता बोलता त्या आमच्या गॅलरीत गेल्यात. घरासमोर तीनचार झाडांची घनगर्द सावली आहे. अनेक पक्षांचा किलबिलाट तिथे दिवसभर अविरत सुरू असतो. माझ्या मेव्हणीला फोनवरूनच तो किलबिलाट खूप भावला. "ताई, हा किलबिलाट किती छान वाटतोय गं ! किती छान पाॅझिटिव्ह वाटत होतं" अशी दादही तिने दिली.


रोज आम्हाला पहाटे पहाटे त्यांच्यापैकीच एका पक्षाच्या अतिशय सुमधूर आणि लयबध्द गाण्याने येते आणि आमची खरोखरच सुप्रभात होते हे आमचे अहोभाग्यच.


आई गेल्यानंतर श्री. किशोरजी (Kishor Paunikar) समाचारासाठी घरापर्यंत आलेले होते. ते पण म्हणाले होते की ही झाडे नुसती सावलीच देत नाहीत तर ती स्वतःमध्येच एक परिपूर्ण इकोसिस्टीम असतात. अनेक पक्षांना आधार असतात, अनेकांची घरटी एकतर त्यांच्यात असतात किंवा घरटी बांधण्यासाठी उपयुक्त साहित्य ही झाडे पुरवितात.


आमच्याही घरासमोर अशीच चार मोठी झाडे आहेत. आम्हाला ती सुंदर सावली देतात. यांच्या सावलीमुळे गेली ५ वर्षे खालच्या मजल्यावर भर उन्हाळ्यातही छान थंडावा असतो. कूलर लावावा लागत नाही. त्यातली दोन झाडे तर फुले, फळे काहीही देत नाहीत. फक्त सावली देतात. ही झाडे लावताना आपण कुठल्या विचाराने ही झाडे लावलीत ? असा स्वार्थी विचार मनात येतोही पण त्यांचे असे उपकार स्मरले की मनातला हा संभ्रम नाहीसा होतो.


जुन्याकाळी एकत्र कुटुंबांमध्ये अशी फुले फळे न देणारी माणसे असायचीत. एखादा ब्रम्हचारी किंवा मुलेबाळे नसलेला विधूर काका, मामा, आत्येभाऊ, मामेभाऊ, चुलतभाऊ. एखादी बालविधवा असलेली, मुलेबाळे नसलेली आत्या, मामी वगैरे. आजच्या व्यावहारिक जगात ही सगळी फुले फळे नसलेली झाडेच. पण तत्कालीन एकत्र कुटुंबात त्यांचा सांभाळ व्हायचा. त्यांच्या अन्न पाण्याची, औषधांची, कपड्यालत्त्यांची यजमान कुटुंबाच्या आहे त्या परिस्थितीत पूर्तता व्हायची. त्या झाडांचीही त्याहून अधिक अपेक्षा नसे. घरात पडेल ते काम करणार्‍या आणि आपली उपयुक्तता या ना त्या मार्गाने पटवून देण्याची कमाल कोशिस करणार्‍या ह्या व्यक्ती. त्यांच्या घरातील उपयुक्ततेपेक्षा त्यांची सावली घराला हवीहवीशी असायची. मग घरातलं कर्तेधर्ते कुणी वडीलधारे देवाघरी गेलेत तर ह्याच व्यक्ती घरादारावर आपली शीतल छाया धरायच्यात. आपण फळाफुलांनी उपयुक्त ठरू शकत नाही याची खंत यांना कायम मनात बोचत असेलही पण त्याची कमतरता या आपल्या स्नेहपूर्ण वागणुकींनी आणि घरात सगळ्यांवरच  निरपेक्ष अकृत्रिम प्रेम करून भरून काढू पहायच्यात.


कालचक्रात ही झाडे हळुहळू वठायचीत आणि एकेदिवशी कालवश व्हायचीत. आपल्यामागे एखाद्या कापडी पिशवीत असलेली एखादी धोतरजोडी (एकदोन पातळे), एखादा अडकित्ता, एखादी पानाची, काथचुन्याची डबी एव्हढाच स्थावर जंगम ऐवज ही मंडळी सोडून जायचीत तरीही कुठलासा भाचा, पुतण्या यांचे दिवसवार करायचेत. "जिजीमावशी काय वाती करायची ? एकसारख्या आणि सुंदर." किंवा "सुधाच्या हातच्या शेवया म्हणजे काय विचारता ? केसांसारख्या बारीक आणि लांबसडक तरी किती ?" "विलासकाकाला किती आर्त्या पाठ असायच्यात ना ! तो गेला आणि तशी मंत्रपुष्पांजली कुणीही म्हणत नाही." अशा आठवणी यांच्यामागे कायम निघत रहायच्यात. खर्‍या श्राध्द कर्मापेक्षा आपल्यामागे असा आपला गौरव झालेला पाहूनच यांच्या आत्म्यांना समाधान लाभत असावे, मुक्ती मिळत असावी. शेवटी श्राध्द म्हणजेही श्रध्देने केलेली आठवणच की नाही ?


आज मुळातच एकत्र कुटुंबे दुर्लभ झालीत. त्यात अशा व्यक्तींना कोण सांभाळणार ? आज झाडे लावतानाच "आजोबांनी लावलेल्या आंब्याची फळे नातू खाईल." यावर आपला विश्वास नाही. आम्ही लावलेल्या आंब्याला पुढल्या ५ - ७ वर्षात फळे लागली पाहिजेत हा आपला अट्टाहास. अशात दूरचा काका, दूरची आत्या हिला कोण विचारतो ? 


फळे देणार्‍या झाडांचीच आपण निगा राखतोय, त्यांनाच खतपाणी देतोय. पण अशा फळे फुले नसलेल्या झाडांचा सावली देऊन आपल्या जीवनात थंडावा देण्याचा गुण आपण पारच दुर्लक्षित करतोय का ?


- सगळ्या फळे फुले देणार्‍या आणि क्वचित नुसतीच सावली देणार्‍या समस्त जीवसृष्टीविषयी कृतज्ञ असलेला मनुष्यमात्र, राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment