Tuesday, May 31, 2022

सातूचे पीठ, माया आणि सुख वगैरे...

सातूचे पीठ. एक अत्यंत पौष्टिक खाणे. विशेषतः उन्हाळा दिवसात तर पोटासाठी थंड म्हणून याचे महत्व अजूनच.

सकाळी सकाळी काॅलेजला जाताना एक वाटी सातूचे पीठ दूध आणि साखर मिसळून खाल्ले की १ वाजता करीत असलेल्या दुपारच्या जेवणापर्यंत निचंती (निश्चिंती) झाली.
पण कधीकधी मधल्यावेळेचे खाणे म्हणूनसुध्दा हा पदार्थ रूचकर, पोटभरीचा आणि पौष्टिक ठरतो. उन्हाळ्यातल्या एखाद्या सुटीच्या दिवशी सकाळी मस्त आंब्याचा रस आणि कांद्याचे भजे हा टिपीकल वैदर्भिय बेत जमला असावा. (पुल बहुधा हिवाळ्यातच नागपूरला आले असावेत. उन्हाळ्यात आले असते तर त्यांच्या लिखाणात उपरोल्लिखित बेताचा नक्की उल्लेख असता.)
भरगच्च जेवणानंतर पानबिन जमवून दुपारी डेझर्ट कुलर मध्ये चांगली वामकुक्षी झालेली असावी आणि दुपारी उठल्यानंतर तांब्याभरून थंड पाणी पिल्यानंतर आपली पचनशक्ती किती मजबूत आहे याची जाणीव व्हावी, भूक लागावी.
भर उन्हाळ्यात दुपारी अशावेळी मग याच सातूच्या पीठात तेल, मीठ टाकून कच्चीच काकडी पेरून एक अप्रतिम चवीचा पदार्थ होतो.



बालपणी आजोळी चंद्रपूरला आज्यांच्या हातचा खाल्लेला पदार्थ जवळपास तीन तपांनी घरी केला आणि अनंत आठवणीत रमलो.
खरेतर एखादा पदार्थ म्हणजे भौतिकदृष्ट्या त्यात असलेली सामग्री, त्यांचे प्रमाण (इथे आजीच्या काळचा पदार्थ. म्हणजे "तेल एवढंएवढं, मीठ थोडंसच आणि काकडी एवढी" असे प्रमाण. उगाच ग्रॅम, मिलीग्रॅम मध्ये सामग्री घ्यायला तो काय भौतिकशास्त्रातला प्रयोग आहे ?) एव्हढाच नसतो. त्यात असते ती वडीलधार्यांच्या सुरकुतलेल्या हातांमधून ओघळलेली, जिभेवर अनंतकाळ रेंगाळत राहणारी आणि मनात कायम घर केलेली माया आणि खूप सगळ्या आठवणी.
मायापाशांमधून मुक्त व्हायला हवं ही आपल्या सगळ्या धर्मग्रंथांची शिकवण. पण कधीकधी खरंच असं वाटून जातं की वडीलधार्यांनी केलेली ही माया जर आयुष्यातून वजा केली तर आयुष्य नुसते पासबुकं, गुंतवणूक, नफा - तोटा इतक्यापुरतेच उरेल.
- नातेसंबंधात कसल्याही नफातोट्याशिवाय झोकून देणारा अव्यवहारी गृहस्थ पण अंती सुख लाभलेला माणूस, राम किन्हीकर.

(सगळेच सदरे सध्या धुवायला टाकलेले आहेत. सबब 'सुखी माणसाचा सदरा' मागायला येणार्यांनी पूर्वपरवानगीनेच व भेट ठरवून यावे ही नम्र विनंती.)

No comments:

Post a Comment