Wednesday, August 16, 2023

सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजतील पापाला.

आज अधिक महिना संपला. अधिक महिना, पुरूषोत्तम महिना आणि त्यातही अधिक श्रावण. गेले महिनाभर धार्मिक कार्यक्रमांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा होता. खूप अनुष्ठाने, आवर्तने यामुळे गेले महिनाभर धार्मिक वातावरण होते.

आज एका धार्मिक ग्रूपवर एका गुरूबंधूंची पोस्ट वाचली आणि अस्वस्थ झालो. एका धार्मिक ठिकाणी याग झाला आणि त्या यागात सहभागी व्हायचे असेल तर पाच सहस्र इतके शुल्क इच्छुकांना भरावे लागणार होते. याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे ज्या व्यक्तीकडे इतके शुल्क भरण्याची ऐपत आहे तो किंवा तीच या यागाची अधिकारी आहे. त्या व्यक्तीचे वैयक्तिक, धार्मिक, सामाजिक आचरण कसेही असले तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करून केवळ त्याच्या अर्थार्जनाकडे बघून त्याला अधिकारी किंवा अनाधिकारी ठरवणार आहोत हे आता नक्की झाले.

नाही, अशा यज्ञ यागाच्या आयोजनासाठी खर्च, खूप खर्च येतो हे मला माहिती आहे. तो खर्च भरून काढायला हवा म्हणून आयोजकांनी, भक्त मंडळींनी ऐच्छिक हातभार लावावा हे सुद्धा अगदी मान्य. पण यातून भक्तांच्या भावनांशी खेळून आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करणे ही शुद्ध लुच्चेगिरी आहे, फ़सवेगिरी आहे हे आपल्या लक्षात येतय का ? यज्ञ यागाचा एकूण खर्च काढून त्याप्रमाणे प्रत्येक इच्छुक व्यक्तीला शुल्क आकारण्यापेक्षा भक्तमंडळींच्या ऐच्छिक देणग्यांमधून एकूण किती रक्कम गोळा होतेय ? याचा अंदाज घेऊन त्या प्रमाणात यज्ञ यागाचे आयोजन करणे सगळ्यांसाठीच जास्त हितावह आहे हे आपल्या लक्षात येतय का ? यज्ञ यागाला आयोजकांनी आपले स्वतःचे भौतिक जीवन समृद्ध करण्याचे साधन बनवू नये ही अपेक्षा अगदी त्रेतायुगातली तर नाही ना ? आपण अध्यात्माला कुठे घेऊन चाललोय ? त्याचा उत्कर्ष करणे आपल्या क्षमतेच्या बाहेर असेल तर किमान अशा पद्धतीने तर त्याचा अपकर्ष होऊ देऊ नये हे तर आपल्या हातात आहे ना ?

खरेतर मी माझ्या मागील लेखात लिहील्याप्रमाणे अध्यात्म हा केवळ परमेश्वर आणि भक्त या दोघांमधला मामला आहे. हे यज्ञ, याग ही सगळी अध्यात्म साधण्याची बाह्य अंगे आहेत. ह्या साधनांचा वापर करून आपण स्वतःच स्वतःला परमेश्वराचा निकट सहवास मिळावा म्हणून अधिकारी करायचे आहे. साध्य परमेश्वर आहे आणि ही सगळी साधने आहेत. परमेश्वराच्या दरबारी कुणाचा किती अधिकार असेल ? हे बाह्य अंगाने लक्षात येणे कठीण आहे. पण आजकाल आपण हा अधिकार त्या व्यक्तीच्या विशिष्ट रक्कम खर्च करू शकण्याच्या किंवा न करू शकण्याच्या क्षमतेशी जर जोडणार असू तर कलियुगाच्या एका लीलेला आपण शरण गेलेलो आहोत. आणि संत गाडगे बाबांनी लिहीलेले भजन "सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजतील पापाला." हे आपल्यालाच लागू आहे हे आपण समजले पाहिजे. 

- साध्य आणि साधन यातला फ़रक संतकृपेने मनात पक्का असलेला, कर्मठ, याज्ञिक, सात्विक मनुष्य, राम 


No comments:

Post a Comment