Thursday, August 17, 2023

जीवनाचे सोने

 इसवी सन पूर्व वर्ष ५१२६: महाभारत युद्ध समाप्त झाले होते. न्यायाने अन्यायावर भगवंताच्या मदतीने आणि साक्षीने विजय मिळवला होता. सर्वसामान्यांनी आपापल्या संसारात साक्षीभावाने कसे रहावे ? याचा उपदेशकर्ता भगवंत स्वतःच या सृष्टीच्या नियमनाच्या हेतूने झालेल्या महायुद्धात केवळ साक्षीभावाने उपस्थित होता. पण त्याची आंतरिक शक्ती सगळी सत्याच्या, न्यायाच्या बाजूने उभी होती. 


युधिष्ठीर महाराजांना हस्तिनापूरचा राजा म्हणून राज्याभिषेक झालेला होता. त्यानिमित्त त्यांनी मोठा यज्ञ आरंभला. त्या यज्ञात भारतवर्षातले सगळे श्रेष्ठ राजे जातीने हजर होते. मोठाच आनंद सर्वत्र झालेला होता. आलेल्या सर्व जणांचा आदरसत्कार स्वतः अर्जुन आणि भीम बघत होते. यज्ञाची व्यवस्था स्वतः नकुल आणि सहदेव बघत होते. यजमानीण बाई म्हणून द्रौपदी अभ्यागतांना हवे नको ते बघत होती आणि त्यांचा मामेभाऊ, भगवंत श्रीकृष्ण स्वतः सगळ्या व्यवस्थेत घरच्यासारखा राबत होता, लक्ष ठेवत होता.


यज्ञसमाप्तीच्या दिवशी सगळ्या याचकांना, अतिथींना महाराज युधिष्ठीरांनी सालंकृत गायी, रथ, घोडे, सुवर्णालंकार, जमिनी यांचे दान केले. कर्णाच्या दातृत्वाला लाजवेल असा दानधर्म त्या यज्ञमंडपात सुरू होता. सगळे पांडव, द्रौपदी आणि भगवंत श्रीकृष्ण हात पुढ्यात बांधून, अतिशय नम्रतेने, याचकांच्या डोळ्यात न बघता दानधर्म करीत होते. दानकर्त्याने स्वतःकडे अभिमान न घेता, याचकाच्या डोळ्यात न बघता दान केले पाहिजे हा त्रेतायुगाचा नियम तिथे आवर्जून पाळला जात होता. अजून कलियुगाची सुरूवात झालेली नव्हती.


त्या समाप्तीदिवशी तिथे एक अदभूत मुंगूस आले. अर्धे अंग सोन्याचे आणि अर्धे नेहेमीच्या कातड्याचे. असे ते मुंगूस त्या यज्ञमंडपात आले आणि त्या पवित्र यज्ञमृत्तिकेत लोळू लागले. दरवेळा दोन तीन कोलांट्या मारल्यात की ते आपल्या उरलेल्या अर्ध्या अंगाकडे निरखून पाही. उरलेले अर्धे अंग सोन्याचे झाले नाही म्हणून निराश होई. पुन्हा कोलांट्या मारे. पण त्याचे सगळे प्रयत्न विफ़ल झालेत. मग ते निराशेने तो यज्ञमंडप सोडून जायला निघाले.


त्याच्या या सगळ्या कृत्याचा अर्थ भगवान श्रीकृष्णांसह तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही लागेना. भगवंतांनी त्या मुंगूसाला थांबवले आणि त्याला या कृत्याचा अर्थ विचारला आणि ते मुंगूस बोलू लागले.


"भगवन, क्षमा असावी. पण आत्ता काही दिवसांपूर्वी मी आपल्याच राज्यातल्या एका गरीबाघरी गेलेलो होतो. त्या घरात खाणारी तोंडे पाच. पती पत्नी आणि वाढत्या वयाची तीन मुले. घरी दोन माणसांना पुरेल एव्हढाच शिधा. तो शिधाही त्या घरात जवळपास आठवडाभराने आलेला. त्या दोन माणसांचा शिधा रांधून थोडे थोडे खाऊ असा विचार करून त्या सुगृहिणीने तो शिधा रांधायला घेतला न घेतला तोच दारात एक अतिथी आला. अतिथी जवळपास पंधरवाड्यापासून उपाशी होता हे पाहून त्या गृहिणीने आपल्या शिध्यातला अर्धा शिधा त्याला दिला. तो शिधा घेऊन तो अतिथी जातोय न जातोय तोच तशाच परिस्थितीतली त्याची पत्नी तिथे हजर. ती सुद्धा पंधरवाड्यापासून उपाशी आहे कळल्यावर त्या गृहिणीसकट सगळ्या घराने उरलेला शिधाही तिला देण्याचे ठरविले. हे अतिथी तर पंधरवाड्यापासून उपाशी आहेत. आपण तर फ़क्त आठवडाभरापासून उपाशी आहोत. आपण अजून एक आठवडा उपाशीपोटी काढू शकतो या भावनेने सगळ्या घराने असलेला सगळा शिधा अतिथी दांपत्याला देऊन टाकला आणि स्वतःहून उपाशी राहण्याचा मार्ग स्वीकारला."


"राजा, मी तिथेच बाजूला होतो. त्या अतिथीला दान देताना त्या शिध्यातले काही कण जमिनीवर सांडले त्या कणांमधून मी सहज गेलो तर ते कण माझ्या अंगाला चिकटून माझे एव्हढे अंग सोन्याचे झाले. आज तुझ्या यज्ञाविषयी, दानधर्माविषयी मी खूप ऐकले आणि या यज्ञात अवभृत स्नान करून माझे उरलेले अंग सोन्याचे होतेय का ? हे बघायला आलोय. पण माझी निराशा झाली. राजा अजून तुला खूप मोठी मजल गाठायची आहे."


मुंगूस निघून गेले. आपल्या मनातला सूक्ष्म अहंकार नष्ट करायला आपल्या आतेभावाने, भगवान श्रीकृष्णाने ही आणखी एक लीला केलेली आहे हे महाराज युधिष्ठीरांसकट सर्व पांडवांना समजले. आपल्या सात्विकतेचाही अभिमान बाळगू नये. फ़क्त अधिकाधिक सात्विक होत जावे ही शिकवण घेऊन ते पुढील जीवनात मार्गक्रमण करू लागलेत आणि इतर मर्त्य मानवांप्रमाणे आपले देहकार्य आटोपून भगवंताच्या चरणांशी अक्षय्य रुजू झालेत.


इसवी सन २०२३ : कलियुग सुरू होऊन पाच हजारांपेक्षा जास्त वर्षे उलटली होती. काही लक्ष वर्षे आयुष्य असलेल्या कलियुगाने आपला अंमल मात्र फ़ार म्हणजे फ़ारच लवकर वसवला होता. पहिल्या पाच हजार वर्षातच सर्वत्र कलियुगाचा बोलबाला होऊ लागला होता.


महाराज आनंदेश्वर स्वामी हे आपल्या संपूर्ण प्रदेशात फ़ार मोठे महापुरूष म्हणून ओळखले जात होते. आपल्या वागणुकीने त्यांनी सर्व नागरिकांसमोर वागणुकीचा एक आदर्श ठेवलेला होता. गृहस्थाश्रम स्वीकारून तो अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवत महाराज आणि त्यांच्या पत्नीने सर्व प्रदेशात "अशा पद्धतीने गृहस्थाश्रम केला तर त्याला संन्यासाश्रमाचे फ़ळ आहे." हे सिद्ध करून दाखवले होते. सर्व प्रदेशात या दांपत्याविषयी एक आदर होता.


अधिक श्रावण महिना. आश्रमात महिनाभराचे विष्णुयाग नियोजित केल्या गेलेले होते. खूप मोठ्या प्रमाणात याग होणार. खूप अभ्यागत यागासाठी येणार म्हणून आश्रमात जय्यत तयारी होती. या यागासाठी दूरदूरवरून विद्वान, वैदिक ब्रम्हवृंद आलेला होता. आश्रमाच्या अत्यंत पवित्र वातावरणात, महाराजांच्या आणि त्यांच्या सुपत्नींच्या निगराणीत तो याग पार पडणार म्हणून सर्व भक्त मंडळी हरखून गेलेली होती. अनेक इच्छुक दांपत्यांनी यागासाठी आपली नोंदणी केलेली होती. सर्वांची राहण्या खाण्याची आणि इतर व्यवस्थांची सोय व्यवस्थित व्हावी म्हणून यागाला बसणा-या भक्त मंडळींकडून एक विशिष्ट सेवाशुल्क घेण्यात आले होते. सर्व भक्तमंडळी तशी सधन होती आणि ही पर्वणी साधण्यासाठी थोडाफ़ार जास्त खर्च झाला तरी त्याला कुणाचीही हरकत नव्हती.


नियोजनाप्रमाणे यागाला सुरूवात झाली. सर्वत्र वेदमंत्रांचा घोष, पवित्र समिधांच्या आहुत्यांनी पवित्र झालेले वातावरण यामुळे यज्ञमंडपात एक वेगळीच उर्जा निर्माण झाली होती. महाराजांसकट सर्व भक्तमंडळींच्या डोळ्यात ती कृतार्थता वाचता येत होती. 


पहिल्या दिवशीचा शेवट जवळ आला होता. स्वतः महाराज सपत्निक यज्ञात आहुती टाकत होते. अचानक वेदमंत्रांच्या मागून "विठ्ठलपंत उभा द्वारी, दीन अनाथ भिकारी, महाराजा हाक मारी." अशी अस्पष्ट हाक महाराजांच्या कानावर आली. त्यांनी आजुबाजूला नजर टाकली पण सुंदर सुंदर पितांबर नेसून असलेली भक्त मंडळी आणि पैठण्या, शालू नेसलेल्या त्यांच्या अर्धांगिनी ही सगळी मंडळी यज्ञकार्यात दंग होती. पाच दहा मिनीटांनी महाराजांच्या कानावर ही हाक पुन्हा आली. पूर्वीपेक्षा थोडी अधिक स्पष्ट, खणखणीत. त्यांनी आपल्या एका सेवकाला बोलावून प्रवेशद्वारावर धाडले आणि कोण आलय ? हे बघून यायला सांगितले.


सेवक प्रवेशद्वारी आला तेव्हा प्रवेशद्वाराबाहेर एक दांपत्य उभे होते. साधे, थोडे मळकेच धोतर, अंगात जुनापानाच, थोडा उतरलेला सदरा घातलेला माणूस आणि साध्यातलेच पण धुतलेले पातळ नेसलेली त्याची पत्नी. 



"काय हवेय ?" सेवकाने थोड्या त्रासिकतेनेच विचारले.


"काही नाही जी. इथे मोठा यज्ञ होतोय म्हणून कळले. म्हणून लांबून आलोय जी."


"ठीक आहे. आत या. भोजनप्रसाद सुरू आहे. तो घ्या." आश्रमात आलेल्या कुणाही अतिथी अभ्यागताला उपाशी पाठवायचे नाही ही आश्रमाची प्रथा त्या सेवकाला चांगलीच ठाऊक होती.


ते दांपत्य आत आले. यज्ञमंडपाच्या शेजारीच भोजनमंडपात सकाळपासून एकसारख्या भोजनपंक्ती उठत होत्या. तिथे हे दांपत्य भोजनाला बसले. अगदी अल्प अन्नात त्या दोघांनीही आपापले भोजन आटोपले. त्या दोघांच्याही भोजनाकडे पाहून ते अन्नार्थी याचक नव्हते हे लक्षात येत होते. भोजन करताना सुद्धा दोघेही अनिमिष नेत्रांनी यज्ञमंडपात, त्यात टाकल्या जाणा-या आहुतींकडे आणि म्हटल्या जाणा-या वेदमंत्रांकडे अगदी प्राण देऊन लक्ष ठेऊन होते.


हा क्रम रोजच सुरू झाला. रोज संध्याकाळच्या वेळी यज्ञमंडपात बसलेल्या महाराजांच्या कानी "विठ्ठलपंत उभा द्वारी, दीन अनाथ भिकारी, महाराजा हाक मारी." ही हाक यायची. ते आतून अस्वस्थ व्हायचेत. स्वतः यज्ञात सहभागी असल्याने कुणातरी सेवकाला ते दारावर पाठवून द्यायचेत. तो सेवक त्या दंपतीला यज्ञमंडपात घेऊन यायचा. भोजन करता करता त्या चाललेल्या यागाकडे ते दोघेजण अनिमिष बघत रहायचे. थोडेसेच जेवून, तृप्त होऊन ते दंपती आल्यापावली परतायचेत.


महिना संपत आला. सगळ्या गोष्टी नियोजनाप्रमाणे होत होत्या. भक्तमंडळीही खूष होती. खूष आणि तृप्त नव्हते ते खुद्द महाराज. आपल्या अतृप्तीचे कारण काय ? याचा त्यांनी स्वमनात शोध घेण्याचा खूप प्रयत्न केलेला होता पण त्यात त्यांना यश आलेले नव्हते. किंबहुना त्यांना "महाराज" पद प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकारची अतृप्ती, अशा प्रकारची अस्वस्थता त्यांना पहिल्यांदाच अनुभवायला येत होती. आपल्याला नक्की काय खटकतंय, नक्की कुठे कमी पडतंय हेच त्यांना कळत नव्हते. कुठेतरी काहीतरी कमी होतं हे मात्र नक्की त्यांना कळत होतं.


"महाराज, आपल्या अस्वस्थतेचे कारण कळेल ?" पतीची अस्वस्थता त्यांचे अक्षरशः अर्धांग असलेल्या पत्नीला कळल्याशिवाय थोडीच राहील. एके दिवशी रात्री विश्रामापूर्वी महाराजांच्या पत्नीने त्यांना विचारले. महाराजांनाही आपल्या अस्वस्थतेचे नक्की कारण सांगता येईना. आपल्या सुपत्नीपासून त्यांनी आजवर काहीही लपवून ठेवलेले नव्हते हे त्यांनाही आणि त्यांच्या सुपत्नीलाही माहिती होते. त्यामुळे महाराज खरोखर अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या अस्वस्थतेचे कारण त्यांचे त्यांनाही उमगत नाही हे तिच्या लक्षात आले. मग तिने त्यांना यज्ञाच्या पहिल्या दिवसापासून घडत आलेल्या एकेका प्रसंगांविषयी सविस्तर विचारायला सुरूवात केली. महाराजही तिच्यापासून काहीही न लपवता सगळे सांगत होते. त्यांनाही हे अपूर्णतेचे ओझे असह्य झाले होते. बोलता बोलता दर संध्याकाळी महाराजांच्या कानावर येणा-या "विठ्ठलपंत उभा द्वारी, दीन अनाथ भिकारी, महाराजा हाक मारी." या हाकेविषयी त्यांनी सांगितले आणि त्यांच्या अस्वस्थतेचा त्या दोघांनाही एकाच वेळी उलगडा झाला. इतकी साधी घटना आपल्याला लक्षात का आली नाही ? हे महाराजांनाही आश्चर्य वाटले. पत्नीशी सल्लामसलत करून दुस-या दिवशी संध्याकाळी ही हाक कानी आली की स्वतः दारावर जाऊन कोण आहे ते बघायचे हे त्यांनी ठरविले.


दुस-या दिवशी ठरल्याप्रमाणे सर्व यज्ञविधी सुरू झालेत. पण आज महाराजांचे मन त्या विधींमध्ये नव्हते. ते संध्याकाळची वाट बघत होते. ती हाक कधी कानावर येतेय आणि कधी आपण जाऊन तो हाक मारणारा कोण आहे ? हे बघतोय असे त्यांना झाले होते. आजवर त्यांनी ज्या सेवकांना तिथे पाठवले होते त्यांच्यापैकी एकानेही त्या दंपतीचा विषय महाराजांसमोर काढला नव्हता. एकंदर कार्यात ही एक छोटी घटना होती आणि कार्यबाहुल्यामुळे या घटनेबाबत महाराजांशी मुद्दाम बोलावे असे त्या सेवकांपैकी एकालाही वाटले नव्हते.


संध्यासमय आला. यज्ञात असतानाच महाराजांच्या कानी रोजची "विठ्ठलपंत उभा द्वारी, दीन अनाथ भिकारी, महाराजा हाक मारी." ही हाक आली. हातातली आहुती यज्ञात टाकून ते लगबगीने प्रवेशद्वारापाशी गेले. तेच दंपती. तसेच साधे, किंचित मळके कपडे. पण आजवर एकाही सेवकांच्या लक्षात न आलेली एक गोष्ट महाराजांच्या चटकन लक्षात आली ती म्हणजे दोघांचेही हात त्यांच्या त्यांच्या गुडघ्यापर्यंत येऊन पोहोचत होते आणि त्यांनी वर बघितले आणि ते चमकलेच. त्या दोघांच्याही डोळ्यात एक विलक्षण तेज होते. असे तेज महाराजांनी आजवर भगवंतांच्या विग्रहातही बघितलेले नव्हते.


"यावे यावे अतिथी. काय आज्ञा आहे ?" महाराजांनी अकृत्रिम नम्रतेने विचारले.


"आनंदेश्वर महाराज, आम्ही जवळपास गेले महिनाभर आपणाकडे रोज येतोय. रोज भोजनप्रसाद घेतोय आणि परततोय. आम्ही अन्नार्थी याचक निश्चितच नाही. या यज्ञात सहभागी व्हावे, आपल्या हातून आहुती पडाव्यात अशी इच्छा आहे. पण आम्ही गरीब माणसे. यज्ञाच्या शुल्काचा दहावा भागही आम्ही देऊ शकत नाही. आमच्या हातून या इतक्या महान यज्ञात आहुती पडावी ही मनोमन इच्छा आहे पण "उत्पद्यन्ते, विलीयन्ते दरिद्रीणाम मनोरथः" हे आम्हाला माहिती असल्याने आजवर आपल्या सेवकांशी याबाबत बोलण्याचे धाडस होत नव्हते. आज आपल्याशी बोलताना आमच्याकडून काही औद्धत्य झाले असल्यास क्षमा करा." त्या माणसाच्या डोळ्यात पाणी होते. त्याने महाराजांसमोर हात जोडलेले होते.


महाराज गहिवरले. त्या दोघांचाही हात धरून महाराजांनी त्यांना आत नेले. भोजनमंडपात बसविले. त्यांच्या भोजनाकडे जातीने लक्ष दिले. त्यांचे अगदी अल्प भोजन पाहून ते अन्नार्थी याचक नाहीत याची महाराजांनीही अनुभूती घेतली. उद्या सकाळी यज्ञविधी सुरू होण्याआधी यज्ञमंडपात येण्याचे त्या दोघांनाही निमंत्रण देऊन त्यांना निरोप दिला. त्या रात्री महाराज निवांत, विना रूखरूख झोपू शकलेत.


यागाचा अखेरीचा दिवस उजाडला. रोजच्याप्रमाणे त्या सुंदर यज्ञमंडपात उंची वस्त्रे, प्रावरणे परिधान केलेल्या सर्व श्रीमान यजमान मंडळींची लगबग सुरू होती. ठरलेल्या वेळेवर साध्या कपड्यातले हे दांपत्य आले. महाराजांनी स्वतःशेजारीच त्या दोघांचेही आसन मांडले. यज्ञविधी सुरू झाला. महाराज आणि त्यांच्या सुपत्नींसोबतच हे दांपत्यही यज्ञात आहुत्या टाकू लागलेत. त्यांनी टाकलेल्या एकेका आहुतीसरशी आपले एकेका जन्मातले कर्म जळून त्यांची राख होतेय ही अंतर्यामी जाणीव महाराजांना होऊ लागली. त्यांना यज्ञमंत्र ऐकूच येईनात. आपले डोळे भरल्यामुळे कानाने का ऐकू येत नाही ? हेच त्यांना कळत नव्हते. त्यांच्या सगळ्या देहजाणीवा गोठल्यात. त्या दंपतीकडे बघणेही अशक्य व्हावे इतका प्रकाश त्या यज्ञमंडपात जणू फ़ाकला होता. पण ही फ़क्त महाराजांची जाणीव होते. इतर सर्व मंडळींसाठी नित्यक्रमानुसार यज्ञकर्म सुरू होते. 


संध्याकाळ झाली. यज्ञकर्म आटोपले. रोजच्याप्रमाणे महाराज, त्यांच्या सुपत्नी आणि इतरही भक्त गणांनी भोजनप्रसाद ग्रहण करण्यास सुरूवात केली. आज त्या दंपतीचे आसन महाराजांनी स्वतःशेजारी मांडलेले होते. रोजच्याप्रमाणेच अगदी अल्पाहार करून त्या दंपतीने आपले भोजन आटोपले. महाराजांना तर भूक नव्हतीच. सगळ्याच देहजाणीवा गोठल्यावर भूक तरी कशी लागणार ? त्या दंपतींना निरोप द्यायला महाराज आणि त्यांच्या सुपत्नी मंडपद्वारापर्यंत गेलेत. इतर शिष्यवर्ग आवरासावरी करण्यात गुंतलेला होता. प्रवेशद्वारातून बाहेर पडण्याआधी महाराज त्या दंपतीच्या चरणावर एखाद्या निर्जीव काठीसारखे कोसळले. त्यांना साष्टांग दंडवत घातला. ते कोण आहेत ? कुठून आलेत ? हे प्रश्न विचारण्याची महाराजांना गरज नव्हती कारण काल संध्याकाळपासून त्या तत्वाची अनुभूती ते स्वतः घेत होते आणि ते पुरेसे होते. तो अनुभव वर्णण्यासाठी शब्द अगदी आगंतुक ठरले असते.


दंपती आशिर्वचन मुद्रेत उभे राहिले. महाराज आणि त्यांच्या सुपत्नींना त्यांनी मनःपूर्वक आशिर्वाद दिला. आणि एका क्षणात वीज चमकून नाहीशी व्हावी तसे ते दोघेही अचानक नाहीसे झालेत. आपल्या पतीच्या डोळ्यातले दिवसभर न खळणारे अश्रू त्यांच्या पत्नी बघत होत्या. त्यांनाही त्या तत्वाची आंतरिक अनुभूती झाली. आपल्या पतीच्या अधिकाराने आपणही कसल्या अधिकाराला पोहोचलोय याची त्यांना जाणीव झाली. आपल्या पतीप्रमाणेच आपलाही हा शेवटचा जन्म हे त्यांनी क्षणात ओळखले.


त्या रात्री सगळी आवराआवर अर्धवट झालेली असताना आश्रमात एक मुंगूस आले. अंगाचे अर्धे सोने झालेले. त्याने त्या यज्ञमृत्तिकेत लोळण घेतली आणि आपले उरलेले अंगही सोन्याचे करून घेऊन हे समाधानाने निघून गेले. त्याचे अंग आणि महाराज व त्यांच्या सुपत्नीचे जीवन सोन्याचे झालेले होते. इतर जगासाठी दुस-या दिवशी सकाळपासून जगरहाटीची नित्यकर्मे सुरू होणार होती. 


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

श्रावण शुद्ध प्रतिपदा, शके १९४५, दिनांक १७ / ८ / २०२३


2 comments:

  1. खूप छान राम दादा.... हा बूस्टर डोस आहे ... आपल्या अहंकाराला घालवून नम्रतेला आणखी बळकट करण्यासाठी....

    ReplyDelete