Wednesday, August 30, 2023

दुःख हरले जन्माचे

 समर्थ रामदास स्वामींचा एक अभंग आहे.

"ध्यान लागले रामाचे
दुःख हरले जन्माचे"
म्हणजे मनुष्य जन्म हा या ना त्या कारणाने दुःखाचा आहे किंवा कुठल्यातरी दुःखाचा परिपाक म्हणून आपल्याला हा मनुष्यजन्म मिळालाय हे निश्चित आहे.
मग जर जन्म हे दुःख असेल तर या जन्मातून सोडविणारा मृत्यू हे सुख असले पाहिजे. पण आपण या मनुष्यजन्मात exactly उलट धारणा घेऊन जगतो. मृत्यूला आपण टाळतो, तो येऊ नये म्हणून घाबरत, धास्तावत जगत राहतो. आणि हा दुःखदायक जन्म मात्र त्यातला सगळ्या दुःखांचा, यातनांचा, अडचणींचा अनुभव घेऊनही आपल्याला हवाहवासा वाटत राहतो. हा जन्म कवटाळून ठेवावा वाटत राहतो. "अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी" अशा वृत्तीने जगण्याची आशा, जिगिषा, बाळगत जगत राहतो.
बरं हे जगणं आपलं आपल्यालाच टाळता येत नाही, जगत रहावच लागतं. हे तर आणखी अडचणीचं आहे.
म्हणून संतांनी आपल्याच या जगण्याकडे आपण केवळ साक्षीभाव ठेऊन जगावं अशा आशयाचा उपदेश केलाय. मग ती श्रीमदभगवत्गीता असो किंवा "नैष्कर्म्यम आविष्कृतम" हे outcome असणारे श्रीमदभागवत असो.
दुःखमय असले तरी हे जीवन जगायचे आहेच.
कसलेही कर्म न करता आपण कुणीच हे जीवन जगू शकत नाही.
कर्म करतोय म्हणजे त्या कर्माचे परिणाम, त्याची फळे आपल्याला स्वीकारावीच लागतील. चांगली आणि वाईटही. आणि त्या कर्मफळांचा परिपाक म्हणून नवीन कर्मे, नवा जन्म तयार होईल. असे किती फेरे ?
म्हणून मग सगळी कर्मे करताना हा आपला जीव केवळ साक्षी आहे. आपण निमित्त आहोत. कर्ता तो जगन्नियंता आहे या जाणीवेने जगलोत तर ही कर्मे आपल्यासाठी नैष्कर्म होऊन जातील. जन्म घेण्याचे आणि त्यातल्या भल्याबुर्या कर्मांच्या भीतिचे दुःख नाहीसे होईल. म्हणून त्या रामरायाचे ध्यान.
- श्रीमदभगवतगीता, श्रीमदभागवत आणि सकल संतांच्या शिकवणुकीतून एवढेच शिकलेला अत्यल्पबुध्दी, अजाण साधक वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
श्रावण शुध्द त्रयोदशी शके १९४५, दिनांक २९/०८/२३ चे सायंचिंतन.



No comments:

Post a Comment