Sunday, August 27, 2023

प्रवासी पक्षाचे गाणे

गाडीने दूर पल्ल्याच्या प्रवासाला निघायचे असते. आदल्या रात्री लवकर निजानिज झालेली असते. सामानाच्या बॅगा भरून तयार असतात. आजवरच्या माझ्या सगळ्या प्रवासांमध्ये सामानाच्या बॅगा नीट आणि अचूक भरण्याचे काम माझे वडील आणि लग्नानंतर माझ्या सुपत्नीने केलेले आहे. या दोघांचेही बॅगा भरणे बघितले म्हणजे ती एक कला आहे आणि ती कला आपल्याला अवगत होऊ शकणार नाही ही जाणीव पक्की होते. त्याच बरोबर अत्यंत आवश्यक तयारी म्हणजे ड्रायव्हरसाहेबांच्या आवडीची सगळी गाणी पेन ड्राइव्हमध्ये किंवा सीडीज मध्ये घेऊन, क्रमवार लावून तयार असतात. स्वतःची गाडी घेतल्यावर नक्की काय काय चैन करायची ? या माझ्या विचारक्रमांमध्ये स्वतःच्या आवडीची गाणी ऐकत त्या नादात ड्राइव्ह करायचे या चैनीचा क्रम पहिल्या तीनात होता.


पहाटे पहाटे लवकर आन्हिके आटोपून आम्ही प्रस्थान ठेवतो. आज जवळपास सातशे ते आठशे किलोमीटरचा प्रवास करायचा असतो. प्रवासाचे, त्यातल्या थांब्यांचे नियोजन आदल्या दिवशीच चर्चा करून आम्ही पक्के केलेले असते. त्यानुसार पहाटे साडेचारला निघून पहिला थांबा जवळपास सकाळी अकराच्या आसपास घेण्याचे ठरले असते. मग कन्यारत्नासाठी एका झाकणबंद कपात तिचे दूध आणि बोर्नव्हिटा, आम्हा सगळ्यांसाठीच ब्रेड - बटर किंवा सॅंडविचेस किंवा शक्य असल्यास चिवडा (दिवाळीच्या आसपासच्या प्रवासांसाठी) सोबत घेतला जातो. एका छोट्या थर्मासमध्ये गरमागरम चहा घेतला जातो. सोबत कागदी कप, प्लेटस, वापरलेले कप्स, प्लेटस टाकण्यासाठी कागदी पिशवी असा सगळा जामानिमा तयार करण्यासाठी आमच्या घरच्या मिसेस परफ़ेक्ट यांची मी मदतही करतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरातल्या विविध आकारांच्या, विविध प्रकारच्या बाटल्यांमध्ये आम्ही जवळपास वीस लीटर पाणी सोबत घेऊन निघतो. प्रवासात शक्यतो बाहेरचे पाणी पिण्याची वेळ येऊ नये म्हणून ही खबरदारी. एकदा अशाच बाहेर प्यायलेल्या पाण्यामुळे ओढवून घेतलेल्या संकटाची कथा इथे. माझा मित्र सतीश या पाण्याकडे बघून माझी चेष्टाही करतो. "अरे, तुम्ही हे पाणी प्यायला नेताय की आंघोळीला ?" पण आम्ही त्याच्याकडे हसून तो मुद्दा टोलवतो.


पहाटे प्रवास सुरू होतो. आसमंतात आता अंधार असला तरी दरक्षणाला वाढत जाणा-या प्रकाशाची आस आणि आशा आमचा उत्साह वाढवीत असते. कन्यारत्न मागल्या सीटवर पाय पसरून तिची झोपेची थकबाकी गोळा करण्याच्या मागे असते तर गाडीतल्या टेपवर भजनांना सुरूवात झालेली असते. आमचे सदगुरू श्री नाना महाराज तराणेकर यांच्या प्रभाती भजनांनी सुरूवात होते. गाणारे म्हणजे परमपूजनीय नाना महाराजांचेच नातू श्री संजयदादा तराणेकर आणि अत्यंत गोड गळ्याच्या सुरेल गायिका सौ. शुभदाताई मराठे. परम पूजनीय नाना आता आमच्यासोबत प्रवासात आहेत ही जाणीवच हा मोठा प्रवास सुखकर करणारी असते. "जागो मोहन प्यारे", "जागिये रघुनाथ कुंवर", ""ऊठ पंधरीच्या राया" पासून आमच्य सदगरूंच्या "ऊठी ऊठी बा श्री गुरूवरा मार्तंडा" ही भजने मनाचा वेध घेत जातात. नागपूरला जाण्यासाठी जर हा लांब प्रवास असेल तर ही भजने संपेपर्यंत आम्ही खर्डी पार करून पंढरपूरच्या बायपासपर्यंत आलेलो असतो आणि नागपूरवरून परत कामासाठी निघालेलो असू तर ही भजने संपेपर्यंत आम्ही नागपूर महानगराची हद्द पार करून बाहेर आलेलो असतो.


तांबडं फ़ुटायच्या बेतात असतं. सभोवारचा मुक्त आसमंत जागा होत असतो. आजूबाजूला दिसणारी शेती, पाणी, वारा सगळं सकाळच्या पहिल्या प्रहरात विलोभनीय असतं. "माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा" ही सगळी त्या विठठलाची लीला आहे हे आठवून मन उल्हसित तर होतच आणि त्याच्याविषयीच्या कृतज्ञतेने भरून येतं. आणि नेमका त्याचवेळी पं. जसराजजी भटियार सादर करतात. "कोई नही है अपना..." या बंदिशीतून आपले नाते या जगायल्या नात्यांशी जुळण्याऐवजी त्या परमेश्वराशी दृढ होत जाते. आधीच हा राग मारवा थाटाचा. मारवा अंतर्मुख करतो. संध्याकाळ कातर करतो. भटियार हा राग मात्र आपल्याला ख-या स्वरूपाचे ज्ञान करवून देणारा वाटतो. विचार प्रवर्तक पण दिवसभराच्या कामांसाठी बळ देणारा.


आता आपण हायवेवर ब-यापैकी वेग पकडलेला असतो. एव्हाना पहिला टोल नाका वगैरे पार केलेला असतो. मग सुरू होते पं हरिप्रसाद चौरसिया आणि पं शिवकुमार शर्मा यांचा "कॉल ऑफ़ द व्हॅली" त ले भूप, पहाडी आणि अहिर भैरव. मंद लयीत सुरू होणारी गत जशीजशी द्रुत होत जाते तसा तसा ॲक्सिलेटरवरचा आपला पायही त्याला साथ देत देत जातो. गाण्याच्या लयीत आपल्या प्रवासाची लय मिसळत एकरूप होत जाते. गाडीत, कानात, अंगात गाणं आणि गाणंच अक्षरशः भिनतं. आपण आपले नसतोच. आपण गाण्यात आणि गाडी गाण्याच्या ताब्यात. स्पीडॉमीटर ऐंशी, नव्वद चा वेग दाखवत असतं. दोघेही सहप्रवासी अत्यंत खुशीत, तिसरा सहप्रवासी झोपेच्या खुशीत तरंगत असतो. प्रवास मजेत होत असतो. मध्ये मध्ये चालत्या गाडीतच एखादा कप चहा सहप्रवासी असलेली सुपत्नी ड्रायव्हरसाहेबांना देते. रोजचा सकाळचा चहा इतका खुमासदार का नसतो ? याचा विचार दोघांच्याही मनात येतो आणि लक्षात येतं की रोज ही सगळी गायक मंडळी सोबत नसतात ना.


आता चांगले उजाडलेले असते. प्रवास अधिक भरभर होऊ लागतो. रस्त्यावर इतर वाहनांची वाहतूक तुरळक असते. आमच्यासारखे एकटेदुकटे पहाटपक्षीच प्रवासाला बाहेर पडलेले असतात. आता राशिद खान साहेबांचा अहिर भैरव गाडीत लागलेला असतो. "अलबेला साजन आयो." ही मन उल्हसित करणारी द्रुत बंदिश दोन्हीही सहप्रवाशांच्या मनाचा ताबा घेत जाते. दोघाही सहप्रवाशांच्या जीवनाचा आजवरचा विलोभनीय सहप्रवास त्यांच्या त्यांच्या डोळ्यांसमोर उलगडत जात असतो. अपार खुशीचा. आनंदाचा. 


मधेच कुठेतरी चांगलेसे टॉयलेट पाहून आम्ही शरीरधर्माला ओ देऊन येतो. आमचे कन्यारत्नही आता उठलेले असते. पाच मिनीटांच्या ब्रेकनंतर पुन्हा प्रवास सुरू होते. या दरम्यान ड्रायव्हर साहेब गाडीतल्या लॉगबुकमध्ये पाहून आपला प्रवास नियोजनानुसार सुरू आहे की नाही याचा आढावा घेतात. बहुतांशी वेळा प्रवास नियोजित वेळेपेक्षा जलद झालेला असतो. पहिले दीडशे किलोमीटर्स प्रवास हा दोन ते सव्वा दोन तासात पार पाडलेला असतो. सकाळचा कमी ट्राफ़िक आणि सकाळी सकाळी असलेला उत्साह या जलद प्रवासासाठी कारणीभूत असतो.


मग सोबत आणलेले सॅंडविचेस धावत्या गाडीतच खाल्ली जातात. नागपूरवरून अमरावती मार्गे पुढे जाणार असू तर बडने-या नंतरच्या संत्री विकणा-या दुकानांसमोर गाडी थांबवून प्रवासात खाण्यासाठी आणि ज्या गावाला चाललोय त्या गावातील मित्रमंडळींसाठी भरपूर संत्री खरेदी केली जातात. ती संत्री सोलून खाण्याचा कार्यक्रम धावत्या गाडीत सुरू होतो. खाणे आणि पुन्हा एकदा चहा झाल्यानंतर मायलेकी त्यांच्या त्यांच्या गप्पांमध्ये रंगतात आणि ड्रायव्हरसाहेब भीमसेनजींच्या "तोडी" च्या सुरात रंगतात. जरी मध्य लयीतली बंदिश सुरू असली तरी त्यातल्या त्यांच्या सट्टेदार ताना अख्ख्या गाडीला शहारून टाकतात. आणि द्रुत बंदिश सुरू होईपर्यंत गाडीने आपसूकच तिचा टॉप स्पीड (ऐंशी ते नव्वद किमी प्रतिसातचा) पुन्हा पकडलेला असतो. भीमसेनजींनंतर पुलंनी वर्णन केलेला विलायतखां साहेबांचा सतारीवरचा तोडी येतो. अक्षरशः तोडीच्या सुरांचा पाणलोट खांसाहेबांनी काढलेला असतो. त्या पाणलोटात आम्हा सगळ्यांचीच मने वाहून जातात. एव्हाना आम्ही अडीचशे किलोमीटर अंतर केवळ साडेचार तासात पार केलंय हे ड्रायव्हरसाहेबांच्याच लक्षात येतय. इतर दोन प्रवासी मात्र आनंदात, "सुरावरी हा जीव तरंगे" हे जीवनगाणे गात मजेत जात असतात. गाडीत एसी सुरू असल्याने प्रवासाचा थकवा वगैरे कुणालाही जाणवत नसतो.


इकडे राजन आणि साजन मिश्रा ललित सुरू करतात. "जोगिया मेरे घर आ..." आता रस्त्यावर ब-यापैकी वाहतूक सुरू झालेली असते. क्वचित दुमार्गी रस्ता संपून एकमार्गी रस्ता सुरू झालेला असतो. येणा-या गाड्यांवर जास्त लक्ष देऊन ड्रायव्हिंग सुरू असते. कानातले सूर रस्त्यावरचे आपले लक्ष अधिक दृढ करीत असतात. अंगात गाणं भिनलं की आपली एकाग्रता कशी वाढत जाते याचे उत्तम उदाहरण. कुशलतेने गाडी चालवताना ही सगळी एकाग्रता या गाण्यांची देणगी आहे याचाही आपल्याला विसर पडत असतो. 


मग साधारण अकरा साडेअकराच्या सुमारास साडेतीनशे - चारशे किलोमीटर अंतर कापून आपण देऊळगावराजा इथला "चैत्रबन धाबा" किंवा मालेगाव (जि. नाशिक) इथला "साई कार धाबा" किंवा उमरखेड इथले गावाबाहेर असलेले एक छानसे टुमदार हॉटेल पाहून गाडी थांबवली जाते. छान पोटभर सात्विक जेवण आणि तिथे थोडी शतपावली वगैरे करून सगळे प्रवासी पुढल्या प्रवासाला सज्ज होतात. 


दुपारी मग मागल्या सीटवर कन्यारत्न आणि पुढल्या सीटचे पूर्ण रिक्लाईन वापरून सहप्रवासी असलेली सुपत्नीही वामकुक्षी करायला लागतात. ड्रायव्हर साहेबांना झोपून चालत नाही. मग गाडीतल्या टेपवर वसंतरावांची अकोला नाट्यसंमेलनातली वपु काळेंनी घेतली मुलाखत, पुलंचे किंवा वपुंचे सहस्र वेळा ऐकलेले कथाकथन सुरू असते. एकेका वाक्यासरशी डोक्यात विचारांचे मंडल सुरू होत जाते. गाडी चालवत असताना लिहीता येत नाही नाहीतर प्रत्येक प्रवासानंतर विविध विषयांवरचे अगदी दहा पंधरा ब्लॉग्ज लिहून झाले असते. त्या विचारांमध्येच मध्य महाराष्ट्रातले बीड - छत्रपती संभाजीनगर - जालना आदि जिल्हे पार होतात. नागपूरकडे येत असलोत तर विदर्भात प्रवेश केलेला असतो आणि जर नागपूरवरून कामाच्या ठिकाणी जात असू तर पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश केलेला असतो. गेल्या बारा तासांत (एक तासांचा जेवणाचा थांबा धरून) जवळपास साडेपाचशे किमी प्रवास झालेला असतो. सहप्रवाशांची झोप वगैरे झालेली असते. नागपूरकडे येताना कारंजा (लाड), शिरपूरकडे जाताना एरंडोलला किंवा सांगोल्याला जाताना बार्शीला एका छान हॉटेलला चहापानासाठी गाडी थांबवली जाते. पंधरा वीस मिनीटांचे सुंदर चहापान आटोपून मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने प्रवास सुरू होतो. 


मावळतीचा सूर्य म्हणजे सुरूवातीला वसंतरावांचा "नट भैरव" त्यातला मध्यम लयीतला बडा ख्याल "मान अब मोरी बात..."हाच मुळी सर्व प्रवाशांच्या अंगातला आत्तापर्यंतचा आळस झटकून नवी स्फ़ूर्ती देणारा असतो. आणि त्यातली द्रुत बंदिश "गुन की चर्चा सुजान करिये..." हा तर उत्साहाचा अगदी कळसच. मग अपरिहार्य असा मारवा. तो पण भीमसेनजींचा. त्या पाठोपाठ मालिनीताईंचा. सुट्ट्या संपवून कामाच्या ठिकाणी चाललोय म्हणून मनात एक प्रकारची उदासी असते ती दर्शविणारा मारवा, सुट्ट्या घालवायला, नातेवाईकांमध्ये रहायला नागपूरला जातोय त्या अनामिक आसेचा मारवा अशी मारव्याची विभिन्न रूपे मनात घर करून राहतात. मारवा संपेपर्यंत पुन्हा संधिप्रकाश व्हायला सुरूवात झालेली असते. सकाळी आपल्या साक्षीने सुरू झालेला सूर्यनारायणाचा दिवसभराचा प्रवास संपत आलेला असलो. आपला प्रवास मात्र अजून दीडएकशे किलोमीटर बाकी असतो.


या कातर वेळी मालिनीताई भीमपलास सुरूवात करतात. मने पुन्हा उल्हसित होतात. "जा जा रे अपने मंदिरवा" या द्रुत बंदिशीने तर मनांमध्ये कमाल घडवलेली असते. जन्मभूमी नागपूर किंवा कर्मभूमी पश्चिम महाराष्ट्र या दोन्हीही ठिकाणी असलेली घरे आपली मंदिरेच आहेत आणि तिथेच आपण चाललोय ही भावना गाडीला पुन्हा द्रुत गती प्राप्त करते. प्रवासाचा हा शेवटचा टप्पा न थकता, न कंटाळता पार पाडण्याची शक्ती देते.


कधी प्रवास लांबलाच आणि मध्येच चंद्रोदय झालाच तर प्ले लिस्टमधली मधली मधली गाणी बाजूला सारून मी मालिनीताईंचे मालकंस मधील "नभ निकस रयो चंद्रमा" लावतो. त्या सुरांनी मी आणि सुपत्नी अत्यंत रोमॅंटिक मूडमध्ये जातो. आणि अधिक प्रवास लांबलाच तर मालिनीताईंचा किंवा राशिदखां साहेबांचा बिलासखानी तोडी तयार असतो. बहुतांशी वेळा प्रवास हे भीमपलास किंवा फ़ार फ़ार तर मालकंस मध्येच संपतात. सातशे - आठशे किलोमीटर प्रवास करून आपण गंतव्य स्थानी पोहोचतो. आपले फ़्रेश चेहेरे पाहून सगळे विचारतात "अरे ! तुम्ही इतके कसे फ़्रेश ? कंटाळला नाहीत ?" आपल्या मनातले उत्तर असते. "छे, छे. अजून दोन अडीचशे किलोमीटर अंतर सहज जाऊ शकू." कारण अजून गाडीतल्या प्ले लिस्ट मध्ये भीमसेनजींचा बिलासखानी तोडी, मल्लिकार्जून अण्णांचा केदार, आणि वरीलपैकी सगळ्यांनीच गायलेली किंवा इंस्ट्रूंमेंटसवर वाजवलेली भैरवी हे ऐकायचे बाकी असतात आणि ते ऐकताना उरलेला दोन अडीचशे किलोमीटरचा प्रवास हा सुखरूप आणि सुरेल होणार याची खात्री असते.


- तानसेन नसला तरी चांगला कानसेन असलेला प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.





No comments:

Post a Comment