Saturday, January 4, 2025

चिंतनक्षण - ४

 


"बागेत लावलेल्या रोपाची आपण काळजी घेतो तेव्हढी तरी आपल्या साधनेतल्या संकल्पाची घ्यायला हवी." - डॉ. सुहास पेठे काका


जिज्ञासू साधक काहीतरी संकल्पाने साधना सुरू करतात खरे पण काही कारणांनी तो संकल्प पूर्णत्वास जायला अडचणी निर्माण व्हायला लागतात. परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की संकल्प छोटा असावा पण तो शाश्वताचा असावा. आपण साधक आपल्या शक्तीला न बघता फ़ार मोठे संकल्प करतो मग ते सिद्धीला कसे जातील याची काळजी आपल्याला लागून राहते.


बागेत रोप लावले की त्याने मूळ धरून ते मोठे होईपर्यंत त्याला सतत जपत रहावे लागते. तसे साधकांनी आपापल्या संकल्पांना तो दृढ होऊन आपल्या वृत्तीत मुरेपर्यंत, आपल्या अत्यंत सवयीचा होईपर्यंत, आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होईपर्यंत जपत राहिला पाहिजे. त्या संकल्पाला फ़ळे धरेपर्यंत (अर्थात ख-या साधकाचा त्याच्या संकल्पाला फ़ळे आलीच पाहिजेत हा अट्टाहास कधीच नसतो म्हणा) तो संकल्प सगळ्या भल्या बु-या वासनांपासून दूर, गुप्त ठेवता आला पाहिजे, त्या संकल्पाला आपल्या रोजच्या उपासनेचे जल समर्पित करायला हवेच. मधेमधे त्या संकल्पात आपल्या सदचिंतनाचे खत आणि सदगुरू विश्वासरूपी खाद्य देता यायला हवे. त्या संकल्पात विकल्पाचे तण साठायला सुरूवात झालीच तर दृढ निश्चयरूपी खुरपण्याने ते काढून टाकता यायला हवे.


एकदा संकल्पाने दृढ मुळे धरलीत तो चांगला पक्का झाला की साधक ही त्याच्या साधनेत स्थिर होतो आणि मग त्याला त्याच्या साधनेपासून दूर करणा-या शक्ती त्याच्या ध्येयापासून विचलित करू शकत नाहीत.



- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन"
पौष शुद्ध पंचमी शके १९४६ दिनांक ४ / १ / २०२५

Friday, January 3, 2025

चिंतनक्षण - ३

 


"शरणागती ही अवस्था आहे, काही साधण्याचा मार्ग नव्हे." - डॉ. सुहास पेठे काका


एखाद्या माणसाला किंवा सत्पुरुषाला आपण शरण जातो कारण तो त्याच्या जीवनात योग्य मार्गावर मार्गक्रमण करतो आहे याची आपल्याला खात्री पटलेली असते. आणि त्याला शरण गेल्यानंतर तो सत्पुरुष आपल्यालाही योग्य त्या  मार्गाने जाण्याचे मार्गदर्शन करेल आणि त्यायोगे आपलाही उद्धार होईल याची आशा आपल्याला असते.  

 

शरणागतीत हा अगदी सात्विक असला तरी थोडा स्वार्थाचा, स्वतःसाठी काहीतरी साध्य करण्याचा मार्ग आहे. अशा प्रसंगी परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराजामचे सत्शिष्य श्री ब्रह्मानंद महाराज यांचे उदाहरण आपण सगळ्यांनी आदर्श म्हणून ठेवण्यासारखे आहे. बुवा त्याकाळी काशीला जाऊन उच्च विद्या प्राप्त करते झाले. संस्कृतात त्यांनी प्राविण्य मिळवले. इतरही अनेक विषयात ते प्रवीण झालेत. पण जेव्हा ब्रह्मचैतन्य महाराजांना त्यांनी बघितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराजांकडे जे सामर्थ्य, जे समाधान, जे ज्ञान आहे ते त्यांच्याजवळ नाही. त्यांच्याजवळ केवळ स्वतःच्या लौकिक विद्येचा अभिमान आहे.

 

त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांचे  पाय घट्ट पकडले आणि म्हणाले "तुझी सगळी विद्या मी आजपासून घेतली असे म्हणा तरच हे पाय सोडीन.मला या लौकिक विद्येचा उगाचचा भार झाला आहे. तो भार तुम्ही घेतो म्हणा." परम पूजनीय महाराजांनी त्यांना तसे वचन दिले आणि मगच त्यांनी परम पूजनीय महाराजांचे पाय सोडलेत.

 

ही शरणागती अपेक्षित आहे. मी शरण आलोय. मला काहीही नकोय. मोक्ष, मुक्ती  अशी माझी काहीही मागणी नाही. मी कुणीही नाही फक्त तूच आहेस हे मला पटलेय म्हणून मी शरण आलोय. मला तुझ्या पदरात घे ही शरणागती सदगुरुंना किंवा प्रत्यक्ष पॅरमेश्वरालाही अपेक्षित असते. ती साधल्या जायला हवी. काहितरी मिळवण्यासाठी, काही अंतस्थ हेतू (कितीही सात्विक असला तरी) साधण्यासाठी शरणागती नको.

 

- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन"

पौष शुद्ध चतुर्थी शके १९४६ दिनांक / / २०२५

Thursday, January 2, 2025

चिंतनक्षण - २

 


"नामाचे खरे महत्व समजण्यास मानवी जीवनातील अपूर्णत्वाची कल्पना येऊन ते मान्य व्हावयास हवे." - डॉ. सुहास पेठे काका


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराजांनी आयुष्यभर नाम याच एका साधनाचा पुरस्कार केला. कलियुगात भगवंत प्राप्तीच्या इतर (तप, यज्ञ, याग इत्यादि) साधनांनी भगवंत प्राप्ती किती दुष्कर आहे आणि कलियुगात नाम या एकाच साधनाने भगवंत कसा सहज साध्य आहे हे परम पूजनीय महाराजांनी कायम प्रतिपादन केले.


मानवी जीवन अनेक अर्थाने अपूर्ण आहे. कलियुगात आपल्याला आयुष्य अत्यंत कमी आहे. या आयुष्यात आपण तप, यज्ञ याग इत्यादि साधनांनी भगवंत प्राप्ती करायची म्हटले तर अनेक जन्म जातील. बरे पुढल्या जन्मात मागील जन्माचे स्मरण, मागील जन्माची पुण्याई सोबत असेल तर मागील जन्माची तपश्चर्या पुढे चालू ठेवता येईल पण हे होईलच याची निश्चित खात्री नाही. त्यामुळे दर जन्मी असे भगवत्प्राप्तीची अनेक अपूर्ण प्रयत्न करून शेवटी भगवत्प्राप्ती होईलच याची खात्री नाही.


पण नामस्मरण हेच एक साधन या कलियुगात आपल्याला भगवत्प्राप्ती करून देऊ शकते. नामासाठी प्रत्येक मनुष्यमात्रांनी सर्वस्व द्यायला हवे. पण हे नामस्मरणाचे खरे महत्व आपल्याला तेव्हाच उमजेल जेव्हा आपण आपल्या मर्यादा, आपले अपूर्णत्व समजून घेऊ आणि याच जन्मात स्वतःचा सर्वार्थाने उद्धार करण्यासाठी योग्य प्रयत्न (नामाचा ध्यास) करू.



- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध तृतीया शके १९४६ दिनांक २ / १ / २०२५

Wednesday, January 1, 2025

चिंतनक्षण - १

 

"साधना करणे हा माणसाला मिळालेल्या मर्यादित कर्मस्वातंत्र्याचा सर्वश्रेष्ठ उपयोग होय." - डॉ. सुहास पेठे काका


मनुष्य जन्माला आलो म्हणजे आपण सगळे मागील काहीतरी प्रारब्धभोग भोगायला आलेलो आहे. मग मागील जन्मातल्या चांगल्या कर्मांमुळे या जन्मात सगळे छान छान चालू असो किंवा गेल्या जन्मांमधील काही चुकीची कर्मे भोगायला लागल्याने या जन्मात काही भोग भोगायला लागलेले असोत. मग सगळेच जीवन असे पराधीन, गत जन्माधीन आहे का ? मग मानवाचे कर्तृत्व ते काय ? परमेश्वराने मनुष्यप्राण्याला जी विचार करण्याची, आपले कर्म निवडण्याची शक्ती दिलेली आहे ती काय फ़क्त आपल्या जीवनात घडत असलेल्या गत जन्मार्जित घटना मूकपणे बघण्यासाठी ?


"मागील जन्मी जे करावे, ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे, जन्मा हा सिद्धांत असे" असे संतकवी दासगणू श्रीगजाननविजय ग्रंथात लिहून गेलेले आहेत. या जन्मात आलेलो आहोत तर कर्मे करावीच लागणार. कर्मे न करता कुणीही मनुष्यप्राणी राहू शकत नाही. मग नवी कर्मे म्हणजे नवे संचित, नवे काहीतरी भविष्य निर्माण होणार. कर्मे चांगली असोत किंवा वाईट ती पुढल्या जन्मात भोगावीच लागणार. नव्हे ती कर्मे भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागणारच.


विचारी मनुष्याला पुढला जन्म नको असतो. या जन्म मरणाच्या फ़े-यातून विचारी मनुष्याला मुक्ती हवी असते. पण प्रत्येक कर्मातून काहीतरी नवे संचित निर्माण होऊन त्यातून नवा जन्म मिळणार असेल तर नक्की काय करावे. विचारी मनुष्याला आपली कर्मे करण्याचे स्वातंत्र्य असे मर्यादित आणि अडचणीचे असते.


म्हणून मनुष्याला जे थोडे कर्मस्वातंत्र्य मिळालेले आहे त्यात त्याने जर साधना केली तर त्याला कळून येईल की सगळी कर्मे जर ईश्वरस्मरणात केलीत, नामस्मरणात केलीत, कर्तव्य बुद्धीने केलीत आणि सर्व कर्मे ईश्वराला अर्पण केलीत तर आणि तरच त्याच्या संचितात नव्या कर्मांचा आणि त्यायोगे भोगाव्या लागणा-या ब-या वाईट फ़ळांचा संचय होणार नाही. हे ज्ञान, ही समज केवळ साधनेत राहिल्याने मनुष्याला कळू शकेल. आणि एकदा कर्माचा हा सिद्धांत आणि संचितातून मोकळे होऊन मुक्तीपथावर चालण्याचा आनंद जर मनुष्यमात्रांना कळला तर तो आपली साधना निरंतर सुरूच ठेवेल. साधना करणे हा मनुष्याला मिळालेला विशेष कर्तव्याधिकार आहे.


- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध द्वितीया शके १९४६ दिनांक १ / १ / २०२५