Monday, January 3, 2022

पन्नाशीला बॅग भरा....साठीला घराबाहेर पडा.

श्री. विवेकजी घळसासींना मी पहिल्यांदा 2009 मध्ये ऐकले. आमचे सदगुरू परम पूजनीय बापुराव महाराजांकडे त्यांच्या अमृतवाणीतून श्रीरामकथा ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. (त्याबद्दलची सविस्तर पोस्ट इथे.) त्यानंतर पुढच्या वर्षी लगेच त्यांच्याच मुखातून त्याच स्थानावर श्रीमदभागवत कथेचे श्रवण घडले. नंतरही त्यांच्या अनेक व्याख्यानांना आम्ही सहकुटुंब हजेरी लावली. दरवेळी त्यांच्या प्रतिपादनातून एक नवा विचार मिळत गेला. जीवन आखण्याचा, जगण्याचा एक नवा आणि प्रॅक्टीकल विचार. जे विचार अंमलात आणणे शक्य होते आणि असे विचार जे अंमलात आणल्यानंतर स्वतःसाठी आणि आसपासच्या समाजासाठीही सदैव श्रेयस्कर होते.

अशाच एका प्रवचनात त्यांचा एक विचार मनाला फ़ार भावला. "आयुष्यात पन्नाशीला बॅग भरा आणि साठीला घराबाहेर पडा." म्हणजे पन्नाशीत आल्यानंतर आपला बाह्य विश्वाचा पसारा आवरता घ्या आणि साठीला घरातून मनाने बाहेर पडा. घरात फ़ार लक्ष घालू नका. मुला-सुनेला, मुली-जावयांना त्यांचा त्यांचा संसार करू द्या. तुम्ही त्यांचे संसार करत बसू नका.
आपल्या संस्कृतीत वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम आहे तो याचसाठी. एखाद्या वानप्रस्थी व्यक्तीचे मार्गदर्शन हे त्या वानप्रस्थी व्यक्तीला सल्ला विचारल्यानंतरच मिळायला हवे. अन्यथा नाही. माझी मुले - मुली आपापला संसार करीत असताना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार आणि त्या त्या कालमानानुसार निर्णय घेत असतील तर त्यात माझ्या उपदेशाची लुडबुड नको हा वानप्रस्थी व्यक्तींनी पाळायचा छान दंडक होता. दुस-यांच्या संसारात मार्गदर्शन आणि लुडबुड यातला फ़रक आपल्या पूर्वजांना चांगलाच माहिती होता. आज आपण एखाद्याला "space देणे" म्हणतो तो प्रकार आपल्या संस्कृतीत पूर्वीपासूनच होता हो. मधल्या काळात आपणच परकीय मानसिक आक्रमणाच्या प्रभावाने त्यात फारच फेरफार केलेत.
संन्यासी व्यक्तींचा अधिकार हा सार्वभौम राजापेक्षाही जास्त असायचा तो याचमुळे. कारण एक संन्यासी जे बोलेल ते अत्यंत व्यापक समाजहितासाठीच असेल असा विश्वास सर्वजणांना असायचा. इथे संन्यासी म्हणजे केवळ वेषधारी संन्यासी नव्हे तर मनाने संन्यास ग्रहण केलेला संन्यासी. मग अशी व्यक्ती आपापल्या मुलाबाळांच्या संसारात अलिप्तपणे राहू शकते. आपल्या देहासकट या जगातल्या कशावरच आपला अधिकार नाही या भावनेने आयुष्य जगत राहू शकते. आपल्या अनुभवातून समग्र जगाचे कल्याण कसे होईल ? याचाच सदैव विचार करत राहू शकते. आणि आपल्या विचारांनेच या जगाने चालावे या अट्टाहासाशिवाय निर्मळ, निर्मम आयुष्य जगू शकते. त्यासाठी त्या व्यक्तीने वनात वास करण्याची सक्ती नाही. म्हणून आयुष्याच्या पन्नाशीला पसारा आवरता घ्या आणि तरच साठीला मनाने घराबाहेर पडू शकाल. कारण 50 वर्षेपर्यंत ज्या आसक्तीने आपण जगत असतो ती आसक्ती एकदम, एका क्षणात विरून जाणार नाही.
आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे दोन दिवसांपासून असलेल्या जबरदस्त थंडीने माझे अकडलेले गुडघे. थोडा वेळ हालचाल झाली नाही तर लगेच ते दुखायला लागत. हा अनुभव अगदी गेल्या दोन दिवसांपासूनच मला यायला लागला आहे. आजवर हा अनुभव केवळ दुस-यांकडून ऐकला होता आता स्वानुभव झाला. मला वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर हा अनुभव आला.
राजा दशरथाला कानावर रूपेरी केस दिसायला लागल्यावर स्वतःच्या म्हातारपणाची जाणीव होत, लगेच प्रभू श्रीरामांना राज्याभिषेक करण्याची आवश्यकता जाणवू लागली होती तसेच आज गुडघे दुखायला लागल्यावर मला पुढल्या 10 वर्षांचे संसारातून हळूहळू लक्ष काढून घेण्याचे नियोजन सुचायला लागले. वयाच्या साठीला "उरलो उपकारापुरता" असे रहायचे असेल तर या वर्षापासूनच तसे नियोजन करण्याची आवश्यकता अचानक आज वाटायला लागली. कितीही नाकारायचे म्हटले तरी निसर्ग आपल्या सर्वश्रेष्ठत्वाची जाणीव अशी करून देत असतोच. आज जर हे गुडघे दुखले नसते तर "Age is just a number" म्हणून मी बेफ़िकीरीत राह्यलो असतो. पण आज या दुख-या गुडघ्यांनी श्री विवेकजींच्या शिकवणीची आठवण करून दिली.



हा फ़ोटोही श्री विवेकजींच्या श्रीमदभागवतकथेत श्रीकृष्णजन्माच्या वेळी मी नंदबाबांची एक छोटी भूमिका केली होती त्यावेळेचा आहे. आजपासून जवळपास दहा वर्षांनी आपल्याला नंदबाबांसारखेच आनंदी, समृद्ध पण विरक्त असे सार्थक जीवन जगायचे आहे ही ती जाणीव.
किती सुखद आहे नाही ही जाणीव ?
- सध्या वेषधारी असलो तरी कधीतरी खराखुरा नंदबाबा बनण्याची आकांक्षा असलेला, जवळजवळ वानप्रस्थी, रामभाऊ.

1 comment: