Sunday, January 9, 2022

संकल्प, तो घेणे, मोडणे, त्याची पूर्ती : एक सहज प्रक्रिया.

 दरवर्षी ३० किंवा ३१ डिसेंबर ही तारीख आली की बहुतांशी संवेदनशील माणसांच्या मनात नववर्षात घेण्याच्या संकल्पांचा विचार सुरू होतो. १ जानेवारीपासून आचरणात आणण्याचे अनेक संकल्प योजिले जातात. 

बरे हे संकल्प तरी काय काय असतात ते बघूयात. 

१. नियमीत व्यायाम करणे, अमूक एक अंतर रोज फ़िरायला जाणे.

२. रोज डायरी लिहून त्यात दिनचर्या लिहीणे.

३. रोजचा खर्च कसोशीने लिहीणे. महिन्याअखेर, वर्षाअखेर त्याचा आढावा घेऊन खर्चात अनावश्यक खर्च ओळखणे आणि त्यावर योग्य ते  उपाय करणे.

४. रोज एखाद्या तरी ग्रंथाचे वाचन करणे

वगैरे वगैरे. काही काही व्यसनी मंडळी ते ते व्यसन सोडण्याचाही संकल्प करतात.

१ जानेवारीला थाटात संकल्पांना सुरूवात होतेही. यातील ब-यापैकी संकल्प पहिल्या आठवड्यातच कोलमडतात. मग निराशा मनी दाटून राहते. "पुढल्या वर्षी संकल्पच नको" अशी मनोधारणा मनात उमळून येते.

काही काही संकल्प मात्र अगदी पूर्वीपासून मनात योजिल्या जातात. आणि ते सुद्धा अगदी अपघाताने. उदाहरणार्थ. आपल्या ऑफ़िसमध्ये काम करणारी एखादी व्यक्ती नोव्हेंबरमध्ये एखाद्या कार्यालयीन चर्चेत सहज बोलून जाते, "आजपर्यंत या वर्षात आपल्या ऑफ़िसमध्ये माझा एकही लेटमार्क झालेला नाही." झालं. मन एकदम उसळी खातं. "पुढल्या वर्षी आपलाही एकही लेटमार्क नको." असा मनातल्या मनात संकल्प घेतल्या जातो. 

बरे, या अगदी निरूपद्रवी संकल्पाला सुरूवात छान होते. २ जानेवारी, ३ जानेवारी आपण अगदी वेळेच्या १५ मिनीटे आधी आपल्या ऑफ़िसमध्ये पोहचतोही. (जशी नवीन सायकल घेतली की पहिल्या दिवशी आपण तिचे स्पोक्ससकट टायर पुसतो. तसेच या नव्या संकल्पाचे लाड होतातही) ४ जानेवारीला आपल्यालाच घरून निघायला फ़क्त ५ मिनीटे उशीर होतो. मध्येच एका ठिकाणी ट्रॅफ़िक जॅम लागतो. आपण ऑफ़िसमध्ये फ़क्त १ मिनीटेच लवकर पोहोचतो. तोपर्यंत रोज पंधरा मिनीटे लवकर पोहोचण्याचा आपला दंडक (फ़क्त मागल्या २ दिवसांचाच हं) ) आपल्याला आज फ़क्त १ मिनीटेच लवकर पोहोचणे हा आपला पराभव वगैरे वाटतो.

५ जानेवारीला मात्र आपल्याला घरून निघायला चक्क दहा मिनीटे उशीर होतो. कालचा अनुभव लक्षात घेऊन आपण मनातल्या मनात गृहीतक मांडतो की आज तर आपल्याला नक्की उशीर होणारच. मग आपला संकल्प आज मोडणारच अशा भितीपोटी आज सुट्टी टाकण्यापर्यंत आपला विचार जातो. सुट्टी घ्यायची की संकल्प मोडू द्यायचा ? या मानसिक व्दंव्दात आपण अडकतो. अशावेळी आपली चिड्चिड होते. एकदा असा संकल्प मोडला तर "संकल्पच नको" अशी नकारात्मक मनोधारणा व्हायला सुरूवात होते. 

हे सगळे मी आज इथे विषद करतोय कारण मी स्वतः या सगळ्या व्दंव्दांमधून बरीच वर्षे गेलेलो आहे. पण त्यातून परमेश्वरी शक्तीने मानसिक शक्ती दिली. त्या व्दंव्दांवर मात करण्याची बुद्धी दिली. आज संकल्प मोडला तर चिडचिड आटोक्यात आणून "संकल्प का मोडला ?" याच्या कारणांचा शोध घेण्याची बुद्धी, स्वतःचे कठोर आत्मपरिक्षण करण्याची शक्ती आणि काहीकाही गोष्टींमध्ये स्वतःला माफ़ करण्याची सोपी युक्ती त्या ईश्वरीसत्तेनेच दिली. अनेक वेळा स्वतःचे संकल्प मोडलेत तरी पुनर्विचार करून नव्या जोमाने ते संकल्प पूर्णत्वास गेलेले मी बघितले आहे. पुलंच्या "तुझे आहे तुजपाशी" त जगण्याचा नवा दृष्टीकोन सापडलेले आचार्य शेवटी काकाजींना म्हणतात ना, की "काकाजी, तुम्ही शांतीचा उपदेश करताय कारण तुम्हाला तो अधिकार आहे. जगण्यातली सगळी मजा अनुभवून तुम्ही ती शांती मिळवली आहे." तसा अनेक संकल्प मोडलेत तरी नव्याने संकल्प करून ते चांगले तप तप भर चालवण्याचा अनुभव असलेला मी सुद्धा या क्षेत्रातल्या उपदेशाचा अधिकारी "काकाजी"च म्हटला पाहिजे.  

आज संकल्प मोडला तर पुढचा मुहूर्त शोधून ठेवूयात. मागचा संकल्प का मोडला ? याचे आत्मपरिक्षण करूयात, झालेल्या चुका दुरूस्त करूयात. आपला संकल्प तर अगदी आपल्या आवाक्याबाहेरचा, क्षमतेबाहेरचा तर नाही ना ? याचाही प्रांजळपणे शोध घेऊयात. आवाक्याबाहेरचा संकल्प असेल तर आपल्या आवाक्यातला संकल्प घेऊयात. आणि हळूहळू आपला आवाकाही विस्तारत नेऊयात. म्हणजे यावर्षीचा संकल्प पुढल्या वर्षी आपल्या खरोखर आवाक्यातही येईल आणि पूर्णत्वासही जाईल.

दरवर्षी एकदाच १ जानेवारी येते पण अशी मनोवृत्ती असलेल्या व्यक्तींसाठी १ जानेवारीनंतर येणारा प्रत्येक नवा मुहूर्त (मग तो १ जानेवारीनंतर येणा-या दुस-या आठवड्यातला सोमवार सुद्धा असू शकतो. १२ जानेवारीचा युवक दिवस असू शकतो, आपला गणराज्य दिवसही असू शकतो, मकर संक्रांत, रथसप्तमी, काहीही असू शकतो. अहो आपल्याला मुहूर्तांना काय कमी असते का कधी ?) नवा संकल्पदिवस ठरेल नाही का ?

- नववर्षींच्या संकल्पांबाबत सरळसाधा उपदेश करण्याचा अधिकार कमावलेला काकाजी, रामूभैय्या नागपूरकर.


No comments:

Post a Comment