Friday, January 21, 2022

गार्ड व्हॅन आणि तिचे गारूड

 बालपणी घरी आलेल्या पाहुण्यांपैकी कुणी विचारलं की बाळा, मोठेपणी तू कोण होणार आहेस ? (त्याकाळी घरी येणारे पाहुणे राहुणे असला बिनकामाचा निरूद्देश भोचकपणा करीतच असत. कदाचित हा प्रश्न आपण विचारला नाही तर आपल्याला यजमानांकडे पाहुणचार होणार नाही अशीच सगळ्यांची प्रामाणिक समजूत असावी.)


तर आमचे उत्तर तयार असे "बस किंवा रेल्वेचा ड्रायव्हर नाहीतर कंडक्टर." बसचे, रेल्वेचे प्रेम, वेड हे असे अगदी बालपणापासूनच.


ड्रायव्हरकाकांची ती बसमध्ये बसण्याची ऐट, बसल्यानंतर ड्रायव्हर केबिनचे दार लावून घेतल्याचा तो सुंदर आवाज, कंडक्टर साहेबांचा तो अधिकार, बस फलाटाला लागल्यालागल्या "८ ते ३५ सगळे रिझर्व आहेत, तेवढे सोडून बाकी सीटसवर बसा" अशी घोषणा करण्याचा रूबाब हे सगळे आमच्या बालमनाला भुरळ पाडणारे होते.


तसेच रेल्वेच्या ड्रायव्हरकाकांचा अधिकार, गार्डकाकांचा तो ड्रेस, त्यांच्या शिट्टीची (एवढी मोठी गाडी हलवून टाकण्याची) ताकद हे सगळं अप्राप्य वाटण्याजोगे असायचे.



या मालगाडीच्या गार्डाच्या डब्ब्याचे मात्र भीतीवजा कुतुहल आमच्या मनात असायचे.  शोले सिनेमात दाखवली तेवढ्यापुरतीच ही गार्ड व्हॅन आम्ही आतून बघितली होती. त्या व्हॅनमधून कायम एकटेच प्रवास करणारे गार्ड काका, रात्री बेरात्री गाडी एखाद्या आडबाजूच्या स्टेशनच्या आऊटर सिग्नलला थांबल्यावर दूर जंगलात कुठेतरी उभी असणारी ही गार्ड व्हॅन, तिच्यातले ते एकटे गार्ड काका, शोलेत दाखवल्याप्रमाणे तिच्यावर कधीही डाकूंचा हल्ला होऊ शकण्याची vulnerabilty (वास्तविक त्या गार्ड काकांकडे लुटण्याजोगे काहीही नसते. रेल्वेचे एक रजिस्टर, ज्यामधे ते प्रत्येक स्टेशनाच्या, मार्गात लागलेल्या रेल्वे फाटकांचा काहीतरी हिशेब ते सतत लिहीत असतात, आणि त्या गार्डकाकांची शिधा वगैरे असलेली, एक भलीमोठी ट्रंक बस्स. गाडीवर धाडसी हल्ला करून हा ऐवज पळवून नेणारा डाकू म्हणजे विरळाच.) या सगळ्या बाबींमुळे या डब्यातून प्रवास करावासा तर वाटे पण हिंमत होत नसे. 


त्या मिणमिणत्या कंदीलाचा प्रकाशात धावत्या गाडीत मार्गातल्या प्रत्येक स्टेशनांवर आणि फाटकांवर काहीतरी नोंदी करत राहण्याचे काम किती अवघड आहे हे जावे त्या वंशा तेव्हा कळे. मी तसा ड्रायव्हर काकांना विनंती करून एकदा महाराष्ट्र एक्सप्रेसच्या एंजिनमध्ये मनमाड ते भुसावळ असा प्रवास केलेलाही आहे. (लेखाची लिंक इथे) पण या गार्ड व्हॅन मधून प्रवास करण्याची खूप इच्छा असतानाही त्या डब्यातल्या गूढरम्य वातावरणामुळे तशी पृच्छा त्या गार्डकाकांना आम्ही कधीच करू शकलो नाही हे वास्तव आहे.


- स्वप्ने पुरी करण्यासाठी प्रयत्न करत राहणारा पण सगळीच स्वप्ने पूर्ण झालीच पाहिजेत हा अट्टाहास नसणारा एक अनुभवी रेलफॅन, राम.


No comments:

Post a Comment