आजकाल एक्सप्रेस गाड्यांना सरसकट WAG 9 एंजिने मिळताहेत.
W - Wide Gauge (Broad Gauge)
G - Goods train.
मालगाडीसाठी फिट असलेले, महत्तम वेग फक्त १०० किमी प्रतितास गाठू शकणारे हे एंजिन एक्सप्रेस गाड्यांना देऊन भारतीय रेल्वे नक्की काय साध्य करू पाहतेय कोण जाणे ? इकडे रेल्वेमार्ग १३० किमी प्रतितास वेगासाठी सिध्द करायचेत आणि एक्सप्रेस गाड्यांना असे फक्त १०० किमी प्रतितास वेग गाठू शकणारे एंजिन्स द्यायचेत यात काय मजा ?
आणि याउलट गोष्ट परवा बघायला मिळाली. मुंबई - हावडा मुख्यमार्गावर असलेले जलंब हे जंक्शन स्टेशन. इथून रेल्वेचा एक फाटा खामगावकडे जातो. जलंब ते खामगाव फक्त १२ किमी अंतर. खामगावच्या प्रवाशांना मुंबई किंवा हावड्याकडे जाण्यासाठी प्रत्येक महत्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना जोडायला खामगाव - जलंब - खामगाव अशा रेल्वे सेवा चालायच्यात.
एकेकाळी जलंब - खामगाव - जलंब अशी रेल बस सेवा चालायची. एका डब्याची आणि त्यातच ड्रायव्हर कॅब असणारी ही रेल बस साधारण ६० - ६५ प्रवाशांना वाहून नेऊ शकायची. या रेल बसचा फायदा म्हणजे खामगावला आणि जलंबला रेल्वे एंजिन काढून पुन्हा उलट्या बाजूने लावण्याचा सव्यापसव्य यात वाचत होता.
कालांतराने प्रवासी संख्येत वाढ झाली असावी. त्यामुळे रेल बस जाऊन तीन डब्यांची एक छोटीशी गाडी आली. या गाडीला सुरूवातीच्या काळात WAM 4 एंजिन लागायचे.
W - Wide Gauge (Broad Gauge)
A - AC traction
M - Mixed Traffic (Passenger as well as Goods train.)
WAM 4 एंजिनांचे आयुष्य संपल्यानंतर या गाडीला एसी आणि डीसी या दोन्हीही वीजप्रवाहावर चालू शकणारे असे कल्याण शेडचे WCAM 3 एंजिन मिळायला लागले. या प्रकारच्या एंजिनांची महत्तम वेगधारण क्षमता १०५ किमी प्रतितास होती. अर्थात अवघ्या १२ किमी प्रवासासाठी एंजिनाची महत्तम वेग धारणक्षमता १०० किमी प्रतितास असली काय ? किंवा १३० किमी प्रतितास असली काय ? काही फरक पडत नव्हता.
W - Wide Gauge (Broad Gauge)
C - DC traction
A - AC traction
M - Mixed Traffic
(Passenger as well as Goods train.)
परवा संध्याकाळी शेगाव वरून खामगावला गेलो. आमचे सदगुरू परम पूजनीय कृष्णदास माऊली आगाशे काका यांच्या समाधीस्थानाचे दर्शन घेतले. तिथून बाहेर निघतो न निघतो तोच रेल्वेगाडीचा हाॅर्न ऐकू आला. त्यांच्या समाधीस्थानालगतच हा जलंब - खामगाव रेल्वेमार्ग गेलेला आहे.
बघतो तो काय ? ही तीनच डब्यांची रेल्वे भुसावळ शेडच्या WAP 4 या एंजिनमागे अक्षरशः धडधडत येत होती.
W - Wide Gauge (Broad Gauge)
A - AC traction
P - Passenger Train Traffic
या प्रकारचा एंजिनांची महत्तम वेग धारणक्षमता १३० किमी प्रतितास असते. त्या अर्थाने या तीन डब्यांसाठी एंजिनाची ही शक्ती खूप जास्त होती. आम्हा रेल्वेफॅन्सच्या भाषेत "The train was overpowered."
दुःख या गाडीला WAP 4 मिळाल्याचे नाहीच. या मार्गावर धावणार्या ११०३९ / ११०४० महाराष्ट्र एक्सप्रेस, १८०२९ / १८०३० शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाड्यांना WAP 4 आवश्यक असताना त्यांना सातत्याने WAG 9 देणार्या आणि या गाडीला कुठलेही एंजिन चालू शकत असताना हिला इतका जास्तीचा पाॅवर असलेले एंजिन देणार्या नियोजनशून्यतेचे दुःख आहे.
- व्यक्तिगत असो वा सार्वजनिक, काटेकोर नियोजनाबद्दल आग्रही असलेला रेल्वेफॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment