Wednesday, January 15, 2025

चहा: पिण्याचे एक शास्त्र असत ते

 सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा.


वर्तमानपत्र आल्यानंतर वर्तमानपत्र वाचताना सोबत चहाचा कप हवाच म्हणून आणखी एक चहा.


दूधवाल्याने सकाळी दूध दिल्यानंतर "नवीन"दूधाचा आणखी एक चहा. हे एक अवघड प्रकरण आहे. भलेही दूधवाल्याने दूध आदल्या दिवशीच काढून दुस-या दिवशी सकाळी आपल्याघरी विकायला आणलेले असो. 


शेजारचे काका सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचायला घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी एखादा कप चहा. सोबत आपलाही अर्धा कप.


एकेकाळी असा अगदी "चहाबाज" असलेला मी आता दिवसेंदिवस चहा न घेताही राहू शकतो. सकाळी चहा घेतला नाही तर लगोलग डोके दुखायला लागणारा मी आता चहाशिवाय दिवसेंदिवस तसाच कसा राहू शकतो ? याचे माझे मलाच आश्चर्य वाटते.

काॅफी आणि चहाची चव वेगवेगळी आहे इतकाच फरक मला या दोघांमध्ये जाणवतो. पण काॅफी पिल्यावर एक वेगळी किक बसणे किंवा काॅफी पिताना आपण काहीतरी उच्चभ्रूपणा करतोय असे मला कधीच वाटले नाही. आमच्या बालपणी नेस्कॅफे वगैरे येण्याआधी किराणा दुकानांमध्ये काॅफीच्या छोट्याछोट्या वड्या मिळायच्यात. बालपणी काॅफी प्यायलो ती त्या वड्यांचीच.

चहा / काॅफी पिल्यानंतर काही काळ झोप येत नाही हे माझ्याबाबतीत तरी १०० % असत्य आहे हे मी स्वानुभवावरून प्रतिपादन करू शकतो. कितीही कडक चहा किंवा काॅफी पिल्यानंतर पाचव्या मिनिटाला मी गाढ झोपेत असू शकतो आणि ड्रायव्हिंग दरम्यान जागे रहाण्याची निकड आलीच तर कुठलीही चहा काॅफी न घेता मी टक्क जागा राहू शकतो.

कितीही चिनीमातीच्या अगर तत्सम सुंदर पदार्थांच्या कपबशा आल्यात तरी अशा तांब्या / पितळी / कास्यांच्या पेल्यांमधून चहा / काॅफी घेण्याची मजा काही औरच आहे.




या खालोखाल मजा म्हणजे टपरीवर चहा ज्यातून देतात त्या काचेच्या पेल्यांमधून चहा / काॅफी पिण्याची.

सगळ्यात नकोसा प्रकार म्हणजे कागदी कप.

आजकाल कागदी पेल्यांचा आकार लहान होत होत केवळ पोलियो डोस इतकाच चहा मावेल असे कप आलेत. अरे चहा / काॅफी अशी गटकन पिऊन टाकण्याची चीजच नाही रे. ती आस्वाद घेत घेत, हळुहळू प्यायची चीज आहे. पहिले दोन तीन घोट तर खरी चव कळायलाच लागतात. मग आपण त्यावर आपले मत बनवू शकतो. चहा / काॅफी ही टेस्ट मॅच सारखी आरामात आस्वादली पाहिजे. छोट्याशा कागदी पेल्यातून गटकन चहा पिणे म्हणजे टी - २०. आस्वाद घेतो घेतो म्हणेपर्यंत संपलेली.

कितीही सोयीचे म्हटलेत तरी अशा कागदी कपांतून चहा / काॅफी पिणे म्हणजे केवळ "उदरभरण" होईल. चहा / काॅफी पिताना "यज्ञकर्मा" चा अनुभव हवा असल्यास या प्रकारच्या पेला वाटीला पर्याय नाही. त्यातही स्टेनलेस स्टीलचा पेला ही केवळ सोय झाली. काषाय रंगाचा, तसल्याच धातूचा पेला वाटी म्हणजेच खरी मजा.



- फक्त चहा / काॅफीतच आनंद मानणारा आणि त्याचा रास्त अभिमान बाळगणारा
"Teetotaller", प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment