Thursday, January 30, 2025

भारतीय रेल्वे्मधल्या डब्यांची रंगसंगती : एक निराळा विचार

निळ्या रंगातली "राॅयल ब्लू" ही रंगछटा आपल्या नावाप्रमाणेच राजेशाही ऐश्वर्याचे प्रतिक आहे असे मला मनापासून वाटते आणि म्हणूनच भारतीय रेल्वेच्या "राजधानी" दर्जाच्या सुपर डिलक्स गाड्यांना ही राॅयल ब्लू छटा भारतीय रेल्वेने वापरायला हवी होती हे माझे प्रामाणिक मत आहे.



लाल, पिवळा यासारखे उष्ण रंग हे जोश, वेग दर्शवतात. ही लाल + पिवळी रंगसंगती भारतीय रेल्वेने शताब्दी, वंदे भारत सारख्या अतिजलद गाड्यांसाठी वापरायला हवी होती. पण रेल्वेने अगदी उलट केलेय. निळा रंग शताब्दीला ,पांढरा + निळा रंग वंदे भारत एक्सप्रेसला आणि लाल + पिवळा रंग मात्र राजधानीला दिलाय.(राजधानीच्या जुन्या ICF रेक्सना ही लाल + पिवळी / क्रीम रंगसंगती होती. आजकाल सगळ्यांनाच एकसुरी लाल + राखाडी LHB रंगसंगतीचे डबे मिळतात. खरेतर LHB कोचेसचा मूळ रंग निळा + राखाडी असाच होता. मुंबई - गोरखपूर एक्सप्रेसचे १० वर्षांपूर्वीचे LHB डबे याची साक्ष देतील. पण आता सगळे डबे एकजात एकाच रंगातले. )
मध्येच ममताबाईंनी आपल्या विक्षिप्त स्वभावासारखे विक्षिप्त रंगसंगतीतले डबे दुरांतो गाड्यांसाठी आणलेले होते. त्यात सौंदर्यदृष्टी काय होती ? हे कळणार्यांना उद्या "भिंत पिवळी पडली" हे सुध्दा एक सौंदर्यवाचक विधान आहे हे पटेल. (Ref: पु. ल. देशपांडे)
आताही महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या "डेक्कन क्वीन" एक्सप्रेससाठी खूप विचारमंथन करून, प्रवाशांची मते वगैरे मागवून(आणि त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून) प्रवाशांची आवड जाणून घेऊन (किंवा जाणून घेतल्याचे यशस्वी नाटक करून) एका राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेकडून भारतीय रेल्वेनी डेक्कन क्वीनची जी हिरवी + लाल + पिवळी रंगसंगती निश्चित केलेली आहे ती सौंदर्यदृष्ट्या किती भयाण आहे हे आपल्याला खालील फोटोवरून कळेलच.



रेल्वेने जबलपूर स्थानकावर एका जुन्या डब्याला उपहारगृहात बदलून ठेवलेले आहे. (हा असा प्रयोग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथेने केलेला आहे पण तिथे मात्र इतकी उठावदार संगसंगती नाही.) जबलपूर इथल्या कोचची रंगसंगती ही "राॅयल ब्लू" आणि त्यावर पिवळे / सोनेरी (Yellow Ochre) पट्टे ही किती डौलदार वाटतेय ते बघा. हीच रंगसंगती डेक्कन क्वीनसाठी किंवा इतर प्रतिष्ठित गाड्यांसाठी वापरायला हवी होती हे माझे प्रामाणिक मत आहे.

- National Institute of Design मध्ये शिकलो नाही तरी ड्राॅइंगच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा पास केलेला आणि त्यादरम्यान रंगांची ओळख व चांगली / वाईट्ट रंगसंगती मनात पक्की केलेला सौंदर्यद्रष्ट्रा राम प्रकाश किन्हीकर. 

1 comment:

  1. दख्खन राणी विद्रूप केली आहे. प्रत्येक प्रकारातील गाडीचे डबे रंगसंगती साठी समान असावेत. उदा राजधानी, तेजस, शताब्दी इत्यादी.
    बाकी बिहारी आणि बंगाली नेत्यांनी रेल्वे ही स्वतच्या राजकारणाचे शस्त्र केले.
    कोकण वासी म्हणून पश्चिम महाराष्ट्र वाले भौतिक शास्त्राचे प्राध्यापक दंडवते जी यांना मना पासून दंडवत🙏🙏

    ReplyDelete