Thursday, September 8, 2022

जगदी शहरे, हंब पाखर वगैरे...

 आता गणपतीचे दिवस आहेत. सर्वत्र आर्त्यांची धूम चाललीय. आर्त भावनेने केलेली आळवणी म्हणजे आर्ती. मला आमच्या बालपणीचे कुहीकर वाड्यातले दिवस आठवले.

आमच्या वाड्यात सगळ्या अठरापगड जाती एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने नांदायच्यात. भांडणे, कुरबुरी नसायच्यातच असे नाही पण त्या कधीच फार मोठे रूप घ्यायच्या नाहीत. एकाच नळाचे (रोजचे नंबर ठरवून घेतलेले) पाणी सगळ्यांच्या रक्तात मिसळत होते म्हणून की काय किंवा सगळीच मंडळी निम्न मध्यमवर्गीय वर्गात जगत होती म्हणूनही असेल पण एकंदर नात्यांची वीण घट्ट होती.
आमच्या वाड्यासमोरच कापकरांचा वाडा होता. तिथेही असेच चित्र. कापकरांचा, पाठकांचा आणि कुहीकरांचा मिळून आमचा वेटाळ (टिपीकल नागपुरी शब्द) बनत होता. आमच्या संपूर्ण वेटाळात फक्त कापकरांच्या घरी टेपरेकाॅर्डर होता. रोज सकाळी ८.०० वाजता ते त्या टेपवर "ॐ जय जगदीश हरे" ही आर्ती लावायचेत. चौथ्या वर्गापर्यंत हिंदी भाषेशी काहीच संबंध नव्हता. आर्त्या म्हणजे "सुखकर्ता, दुखहर्ता", "दुर्गे दुर्घट भारी", "लवथवती विक्राळा" किंवा "जय जय जगदंबे" इथपर्यंतच आमचे ज्ञान. त्यामुळे बरीच वर्षे आम्हाला ती "ॐ जय जगदीश हरे" ही आर्ती आहे हेच पचनी पडेना. त्याचा विग्रह आम्ही "जगदी शहरे" असा करीत असू. जगातल्या शहरांविषयी त्यात काहीतरी माहिती लपलेली असावी हा आमचा ग्रह बरीच वर्षे होता.
तसेच त्या सलमा आगाच्या निकाह सिनेमातल्या "दिलके अरमा" गाण्याबाबत आमचे होत असे. आमची मुळात हिंदीचीच पंचाईत तर हे असले भारी ऊर्दू आमच्या कसे पचनी पडणार ?
"दिलके अरमाँ आसूओंमें बह गएँ" ही पहिली ओळ ऐकून त्या मुलीचे हृदय वगैरे काहीतरी दुखावलय हे त्या अडनिड्या वयात थोडं समजत होत पण नंतरची "हम वफाँ करके भी तनहा रह गएँ" ही ओळ आमच्या ऊर्दूच्या अगाध अज्ञानामुळे आम्ही "हंब पाखर के भी तनहा रह गएँ" अशी ऐकायचो आणि त्या मुलीच्या घरी ती दुःखी असल्याने तिच्या घरची पाळीव गाय (हंब) आणि पोपटासारखी पाळीव पाखरे सुध्दा दुःखी झालेली आहेत असे आम्हाला वाटत असे.
बाकी त्याकाळी ती सलमा आगा गायिका आणि नटी या दोन्हीही भूमिकेत खूप लोकप्रिय झाली होती. पण त्या वयात तिचे ते डोळे, गोरा भरार रंग आम्हाला आकर्षणापेक्षा थोडा भीतिदायकच वाटायचा त्यात त्या काळात लता मंगेशकर पूर्ण भरात असताना ही सलमा आगा कशी ऐकवणार ? ("अहो, अप्सरेसमोर हबशीण" पु. ल. आठवलेत)
थोडक्यात काय उर्दू भाषेशी जवळीक होण्याऐवजी फारकतच व्हावी अशा वातावरणात बालपण गेले. आणि एका चांगल्या भाषेतल्या साहित्याला, त्यातल्या लहेजाला आम्ही मुकलो. त्यात ती सिनेमावाली मंडळी "मकसद", "दीदार - ए - यार" अशा अगम्य आणि भयानक नावांच्या फिल्मस आणायचीत. या शीर्षकाचा अर्थ आपल्याला कधीतरी कळेल का ? या विचारात सिनेमाचे नक्की कथानक काय आहे ? ते बघायलाच आम्ही विसरून जायचो.
- आजही "कुडी", "मैनू" , "तैनू", "पंजाबदी" वगैरे पंजाबी शब्दांना जामच घाबरून पंजाबी गाणी, गायक यांच्यापासून कायम दूर पळणारा अस्सल मराठी माणूस, राम किन्हीकर.

No comments:

Post a Comment