Sunday, September 11, 2022

स्वप्नातल्या कळ्यांनो...

गणेशोत्सव नुकताच संपलाय. आमच्या बालपणी गणेशोत्सवात दाखवल्या गेलेल्या रस्त्यावरच्या सिनेमांनी आमच्या बालमनाला अक्षरशः ढवळून काढले होते. त्यातल्या त्यात "यादों की बारात" ने तर फारच.

त्या सिनेमात भावंडांच्या ताटातुटीचा एक सीन आहे. त्यात एक भाऊ रेल्वेगाडी पकडतो, ती गाडी हुकलेली इतर दोन भावंडे त्या दूर जाणार्या गाडीचा पाठलाग करून थकतात आणि डोळ्यासमोरून पसार होणार्या गाडीकडे हताश होऊन बघत राहतात. (तपशीलाची चूक भूल देणे घेणे माफ करण्यात यावी. कारण या एकाच प्रसंगाचा मनावर खोल परिणाम झाल्याने त्यानंतर टीव्हीवर, OTT प्लॅटफाॅर्मसवर सहज उपलब्ध असुनही हा पिक्चर बघायचा प्रसंग मी आवर्जून टाळत आलेलो आहे.)
प्रियजनांपासून ताटातूट होण्याच्या दुःखदायक प्रसंगाचा बालमनावर खोलवर झालेला परिणाम यामुळे मला पडणार्या एकूण स्वप्नांपैकी ५० % स्वप्ने ही "आपण स्टेशनवर गेलोय, आपल्या डोळ्यादेखत आपली गाडी सुटते आणि आपण तिला पकडण्याचा निष्फळ प्रयत्न करीत असताना गाडीच्या शेवटच्या डब्यावर असलेला हा X गाडी हळूहळू दूर जात असल्याने, हळूहळू छोटा छोटा होत जातोय" हीच आणि असलीच.
काल आमच्या एका रेल्वेफॅन ग्रुपवर हा फोटो कुणीतरी रेल्वेफॅनने टाकला आणि त्या दुःखद स्वप्नाची आठवण जागेपणी ताजी झाली.

उरलेल्या स्वप्नांपैकी ३० % स्वप्ने म्हणजे "मी भाषेचा पेपर आहे म्हणून परीक्षेच्या हाॅलमध्ये जातोय आणि हातात पेपर आल्यावर कळतय की आज गणिताचा / भौतिकशास्त्राचा पेपर आहे. अशावेळी तो परीक्षेचा टाईमटेबलपण दिसायला लागतो." आपली घोडचूक लक्षात येते आणि दरदरून घाम फुटून मी जागा होतो. जाग आल्यानंतर हे एक स्वप्न होतं हे कळल्यावर झालेला आनंद परीक्षेत पहिला नंबर मिळवल्याच्या आनंदापेक्षा किती मोठा असतो हे जावे त्या वंशा तेव्हा कळे.
उरलेली २०% स्वप्ने म्हणजे "एखाद्या उंच इमारतीवरून आपला तोल जाऊन आपण कोसळतोय." घाबरून जाग आली तर आपण झोपेत कूस बदलत असतो. अशावेळी आपला "जीव भांड्यात पडणे" म्हणजे काय ? याचा अनुभव येतो.
लोकांच्या स्वप्नात कायकाय कायकाय होतं ! सुंदर सुंदर नट्या येतात, सुंदर सुंदर देखावे येतात. आपल्यासारख्या सामान्य माणसांचीही स्वप्नेही अशीच, हुकलेली.
पण बर्याचदा असेही वाटून जाते की छानछान स्वप्ने पडून नंतर जागेपणातल्या वास्तवाची जाणीव होऊन दुःखी होण्यापेक्षा, अशी बिकट (आणि विकटही) स्वप्ने पडून नंतर वास्तवात आनंदी होणे हे केव्हाही चांगलेच नाही का ?
- स्वप्नांमध्ये रमणारा, साधा माणूस, राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment